वासना (एक सत्यकथा)

वासना ही व्यक्तीला वयाचे आणि वेळ काळाचे भान विसरायला भाग पाडते.


"बेटा थोडी तिकडे सरकतेस?"

"हो काका, बसा की."

पांढरा शर्ट आणि काळी पँट परिधान केलेला अंदाजे पंचेचाळीशीच्या घरातील एक गृहस्थ बसमध्ये चढला.

"अत्यंत उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू घरातील तसेच सभ्य आणि तितकीच प्रामाणिक असावी ही व्यक्ती."
काकांकडे पाहताच क्षणी समृध्दीने अंदाज बांधला.

"आपल्या वडिलांच्याच वयाची व्यक्ती जेव्हा आपल्याला "बेटा" म्हणून हाक मारते. याउपर इतर पुराव्यांची गरजच काय त्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी?"

हा विचार करून मागचा पुढचा कोणताही विचार न करता समृध्दीने सीटवर शेजारी ठेवलेली तिची सॅक उचलून मांडीवर घेतली नि खिडकीच्या बाजूला ती सरकली व त्या गृहस्थांना तिच्या शेजारी बसायला तिने जागा करुन दिली.

"काय मग बेटा इकडे कुठे? शिकायला असतेस का पुण्याला?"

"हो काका, मी इंजीनियरिंगच्या फर्स्ट इअरला आहे. नुकताच माझा एम.आय.टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगला नंबर लागला आहे."

"अरे वा! छानच की. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनसुद्धा सोप्पं नाही बरं एम.आय.टीला ॲडमिशन मिळणं."

"हो ना काका, पण आपली प्रामाणिक मेहनतच आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जाते. खूप कष्ट केले आहेत माझ्या आई वडिलांनी. शून्यातून सारं निर्माण केलं. त्यामुळे त्यांच्या कष्टाचे चीज करण्याची एकही संधी नाही सोडायची मला,असेच वाटते."

"खूप छान विचार आहेत बेटा तुझे. असेच आई वडिलांचे नाव मोठे कर."

काकांच्या त्या एका "बेटा" शब्दाने समृध्दीचे मन जिंकले होते. अनोळखी असतानाही नात्यात आपलेपणा वाटत होता तिला.

परंतु, अचानक त्या काकांनी समृद्धीच्या मांडीवर हात ठेवला आणि जणू तिला तिच्या कार्याबद्दल प्रोत्साहित करण्याचा खोटा आव आणला त्यांनी.

पण समृध्दीला अचानकच दोनशे चाळीस वोल्टचा झटका बसल्याचे फिलिंग आले क्षणभर.

काकांच्या त्या पहिल्याच स्पर्शात त्यांची नियत समृद्धीच्या लक्षात आली.

त्या काकांनी अत्यंत वासनायुक्त नजरेने समृद्धीकडे एक कटाक्ष टाकला. दोघांचीही नजरानजर झाली. काकांच्या चेहऱ्यावरील हास्य वासनेने प्रचंड बरबटलेले होते.

समृध्दीने झटकन खिडकीच्या दिशेने मान फिरवली. तिच्या अंगात वीज चमकावी तशी सनक तिच्या मेंदूपर्यंत पोहोचली. पण "आज आपण खूपच लाचार आहोत," असेही तिला आतून फील होत होते.

पंजाबी ड्रेसमधील अत्यंत साधी मुलगी, बाहेरच्या जगाचा खूपच कमी अनुभव गाठीशी घेवून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जात होती. दोन दिवसांची सुट्टी संपवून ती पुन्हा एस्टीने पुण्याला जायला निघाली होती.

अत्यंत बोलक्या स्वभावाची समृद्धी आतापर्यंत स्वतःला खूपच धाडसी समजत होती. पण पहिल्यांदा ती असा प्रसंग फेस करत असल्याने अशावेळी नेमके काय करावे? तेच तिला समजेना. आजूबाजूला अनेक लोक होते पण तरीही ती काहीही करू शकत नव्हती. कोणाचीही मदत मागू शकत नव्हती. असे म्हणण्यापेक्षा तिच्यात तेवढी हिम्मतच नव्हती. कारण मनातून ती खूपच घाबरली होती. आई वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या समृध्दीने कोणाला त्रास देण्याचा कधी स्वप्नातही विचार केला नसेल.

"देवा, कुठून बुध्दी आली नि ह्या माणसाला जागा दिली बसायला? खरंच दिसतं तसं अजिबात नसतं आणि म्हणूनच तर जग फसतं. जशी की आज मी सपशेल फसले आहे या नीच माणसाच्या बाह्य रूपाला."

समृध्दीला आता स्वतःचाच प्रचंड राग येत होता.

समृध्दीने आपले लक्ष आता पूर्णपणे खिडकीतून बाहेर केंद्रीत केले होते. पण काका काही शांत बसायचे नावच घेईनात.

समृध्दी घाबरली आहे, तिची हतबलता पाहून काका हळूहळू समृद्धीच्या जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले. सरकत सरकत जवळजवळ ते आता सीटच्या अर्ध्यापर्यंत आले होते. समृद्धी खूपच अंग चोरून बसली होती. खूप रडावेसे वाटत होते तिला. त्यात त्या काळी आतासारखा स्मार्ट फोनचा ट्रेंडही नव्हता. कॉईन बॉक्सचा काळ तो.

काकांनी तर लाज, लज्जा, शरम सर्वच वेशीला टांगले होते जणू. आपल्या मुलीच्या वयाचे लेकरु, भीतीने त्याची गाळण उडाली आहे, सर्व काही स्पष्ट दिसत असतानाही ते असे कसे काय वागू शकतात? याचे समृद्धीला नवलच वाटले.

परंतु, वासनांध झालेल्या लोकांना खरंच, ना वयाचे भान राहत ना नात्या गोत्याचे. आणि हीच त्यांची खरी विकृती ठरते.

समृद्धी मिनिटा मिनिटाला घड्याळात पाहत होती. पण आज वेळही सरता सरत नव्हता.

"का मी प्रतिकार करु शकत नाहीये? आई बाबा तर नेहमी म्हणत असतात, \"आमची समू म्हणजे आमच्या घराची शान आहे.\" आणि आज मी अशी हतबल होवून स्वतःवर होणारा अन्याय सहन करत आहे. खरंच नाही माझ्यात तितकी हिम्मत. आपण प्रतिकार केला आणि ह्या नराधमाने आणखी काही केले तर? उगीच तोंड दाखवायला जागा उरणार नाही मग."

हा विचार करून समृद्धी पुणे जवळ येण्याची अगदी आतुरतेने वाट पाहू लागली. आता धाडस करून समृध्दीने बोलायचे ठरवले.

"काका थोडं तिकडे सरकता का?" सभ्य शब्दात समृध्दी बोलली, पण तिच्या डोळ्यांत मात्र क्रोधाची लाली उतरली होती.  हे पाहून काका थोडेसे बाजूला सरकले. अन्यथा त्यांनी खांद्याने तिला जवळपास दाबूनच धरले होते.

त्या झटक्यात मांडीवरील सॅक झटकन तिने सीटवर दोघांच्या मध्ये ठेवली. अर्ध्या ते पाऊण तासापासून सुरू असलेला हा अत्याचार अखेर समृद्धीच्या प्रतिकारामुळे रोखला गेला.

इतके सारे होवूनही तिच्यातील संस्कार मात्र अजूनही कायम होते.

पुन्हा, "मी नाही त्यातला" असे भासवत काकांनी बोलायला सुरुवात केली, "मी पण तुझ्या कॉलेजच्याच बाजूला जात आहे, जाऊ सोबतच आपण."

"काय बोलावं आता ह्या निर्लज्ज माणसाच्या संकुचित आणि नीच विचारांवर?" क्षणभर समृद्धी विचारांतच पडली.
काहीही न बोलता तिने त्या इसमाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.

पुढे स्टेशनच्या अगोदर काही मिनिटे बस सिग्नलला थांबली.

"जरा उठता का मला उतरायचे आहे."
त्या इसमाकडे रागाने पाहत समृद्धी बोलली.

"अगं बेटा काय झालं? जावू ना सोबत. इथे कशाला उतरतेस?"
त्याच्या तोंडून निघालेल्या "बेटा" शब्दालाही वासनेचा गंध चढला होता जणू.

"उठा पटकन् मला उतरायचे आहे." रागातच समृद्धीचा आवाज वाढला.

आता उठण्याशिवाय त्यांच्याकडेही पर्यायच नव्हता.

मागचा पुढचा कोणताही विचार न करता समृद्धी बसमधून उतरली. त्या इसमाचे लक्ष समृद्धीकडेच होते. तिला आता खूपच भीती वाटत होती. कारण भावनेच्या भरात समृध्दीने खूप मोठी चूक केली होती, स्वतःची सर्व माहिती एका अनोळखी व्यक्तीला सांगून.

"देव न करो आणि ही व्यक्ती मला शोधत माझ्या कॉलेजपर्यंत न पोहचो." समृद्धीचे विचारचक्र थांबायचे काही नावच घेईना. मनात भीतीचे काहूर उठले होते तिच्या.

घाईतच तिने मग रिक्षा पकडून हॉस्टेल गाठले.

हॉस्टेलवर पोहोचताच पहिले तिने बाथरूम गाठले. थंड पाण्याच्या शॉवरखाली ती उभी राहिली. तो घाणेरडा स्पर्श इतका किळसवाणा वाटत होता तिला की ती कोणाला काही सांगूही शकत नव्हती तिच्या मनात सुरू असलेला हा सारा हलकल्लोळ.

डोळ्यांतील आसवांना पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू देत तिने मन मोकळे केले. पण घडलेला सर्व प्रकार तिला इतक्यात तरी विसरणे शक्यच नव्हते. त्या रात्री झोप जणू काही तिची वैरीणच झाली होती.

"घडलेल्या सर्व प्रकाराला आपण स्वतःच कारणीभूत आहोत." त्यामुळे आता हा विषय इथेच सोडलेला बरा. कारण इतरांच्या नजरेत आपणच चुकीचे ठरणार याची तिला पूर्णपणे खात्री होती. कसेबसे तिने मनाला समजावले पण अधूनमधून तिला घडलेला हा प्रकार खूपच त्रास देत राहायचा.

या प्रसंगातून समृध्दीने मात्र जीवनाचा खूप मोठा धडा घेतला.

"कोणावरही असा आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नाही." ही खूप मोठी शिकवण तिला मिळाली होती त्या एका प्रसंगातून.

पण त्या एका प्रसंगामुळेच समृद्धीचा समस्त पुरुष वर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र पुरता बदलून गेला.

"आणि का बदलू नये?"

आता तर समोर कितीही चांगली, सुशिक्षित आणि सभ्य व्यक्ती आली तरी तिचा त्याच्यावर विश्वास तरी कसा बसेल? त्या प्रसंगाने तिला आयुष्यभराची शिकवण मात्र दिली होती. बाह्य जगात निडरपणे वावरण्याचे बळ तिला त्यामुळेच मिळाले. भलेही कोणी मग ॲरोगंट म्हणू दे, ह्या मुलीवर संस्कार नाहीत असे म्हणू दे, ते एकवेळ परवडले पण हा असला अन्याय आता पुन्हा नको.

जरी हे योग्य नसले तरी लोकांच्या वागण्या बोलण्याला प्रथमदर्शनी आपण खरंच ओळखू शकत नाही. काहींना जमतही असेल हे, तरी काही गोष्टी आपण स्वतः अनुभवतो तेव्हाच त्या अधिक स्वच्छ होतात. जे की आता समृद्धीच्या बाबतीत घडले होते.

पुढे ते काका कुठे गेले? त्यांचे नेमके काय झाले? हे अद्यापही समृद्धीला माहित नाही. पण त्या प्रसंगानंतर मात्र अशा काका, मामा किंवा दादा लोकांपासून ती सावध राहायला मात्र शिकली होती.

समृध्दीसाठी तिचा हा अनुभव पुढे तिच्याच खूप कामी आला. हा प्रसंग जरी छोटा वाटत असला तरी खूप मोठी शिकवण देणारा आहे.

कारण समाजात आजही अशा खूप साऱ्या समृद्धी आहेत, ज्यांना अशा काका लोकांमुळे मोकळा श्वासदेखील घेता येत नाही. एक प्रकारच्या दडपणाखाली त्या जगत असतात. प्रतिकार करायचे म्हटले तर पुन्हा तिच्याकडेच बोटे दाखवली जाणार आणि तिलाच चुकीचे ठरवले जाणार. हा तर आपला समाज नियम. हो ना?

कारण आजही आपला समाज जुन्या रूढी परंपरांना चिकटून आहे. समाजात अशी एखादी घटना जरी घडली तरी त्याला तीच लेडीज जबाबदार असणार, असे म्हणणाऱ्यांची काही कमी नाही. पण त्याठिकाणी आपली बहीण,आपली बायको, आई किंवा मुलगी असेल तर? तेव्हाही पुन्हा त्या व्यक्तीची नाही तर यांचीच चूक आहे; असे ठामपणे म्हणणार की आपल्या घरातील लक्ष्मीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार?

इथे समृद्धीची नेमकी काय चूक होती? तिने आदराने त्या व्यक्तीला जागा दिली बसायला, हिच ना? आपलेपणाने मनातील भावना शेअर केल्या, हाच तिचा गुन्हा होता ना? पण येथेही तिने नकळतपणे तिचे संस्कार जपण्याचाच प्रयत्न केला.

वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायचा, वेळप्रसंगी त्यांना मदत करायची, कारण "भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत." हे फक्त पुस्तकापुरतेच मर्यादित ठेवायचे का हो?

विचार हा व्हायलाच हवा, कारण आपल्या संस्कृतीचे जतन हे आपल्याच हाती आहे. आपल्या लेकी बाळींची अब्रू ही आपल्याच हातात आहे. आणि तिचे रक्षण करणे ही पर्यायाने प्रत्येकाची जबाबदारी आहे.

मुलींना जसे चार गोष्टींचे बंधन पाळण्याचे सल्ले दिले जातात  तर मग मुलांनाही वेळोवेळी त्याची जाणीव करुन देणे ही प्रत्येक पालकाची प्राथमिक जबाबदारी नाही का?

आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसाठीच जर एखाद्या पुरुषाच्या मनात वासनेची भावना निर्माण होत असेल तर मग खरंच आपला देश प्रगतीपथावर आहे, असे म्हणणे उचित ठरेल का??

समाप्त

धन्यवाद..

सदरची कथा ही सत्य घटनेवर आधारित असून फक्त स्थळ, काळ, वेळ, व्यक्ती यांत बदल केलेला आहे.

तर मग कशी वाटली तुम्हाला ही कथा? कमेंट करून नक्की तुमचे विचार व्यक्त करा.

©® कविता वायकर