Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

वारसा संस्कारांचा

Read Later
वारसा संस्कारांचा

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी 
विषय : मना घडवी संस्कार

                         वारसा संस्कारांचा
संस्कार या शब्दाची व्याख्या प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळीच असावी. आणि या वाक्याचा प्रत्यय हल्ली येतोच. 'जनरेशन गॅप' म्हणा किंवा मग विचारांतील बदल अथवा फरक, संस्कारांच्या व्याख्येतील फरक जाणवून येतो. एक वेळ अशी होती जेव्हा संस्कार म्हणजे केवळ वागणं बोलणं नव्हे तर पोशाख आणि इतर काही गोष्टींच्या अनुषंगाने सुद्धा तोलले जात. पण आज चित्र बऱ्याच अंशी बदललेलं दिसतं. म्हणून काही जुने आचार-विचार पूर्णपणे लुप्त झाले आहेत, असंही नाही. प्रांत, आधुनिक विचारांचा प्रभाव, संस्कृती, कौटुंबिक वातावरण, यांसारख्या अनेक गोष्टी 'संस्कार' या शब्दाची व्याप्ती ठरवतात.
जग कितीही पुढे गेलं आहे असं म्हटलं तरी आजही काही गोष्टी अजिबात बदलल्या नाहीत. त्यापैकीच एक बाब म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यावरून त्या व्यक्तीच्या कुटुंबाने केलेल्या संस्कारांचा हिशोब करणे. हो नाही म्हणता कोणतेही पालक आपल्या पाल्याला उत्तमरित्या घडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. हा म्हणजे बरेचदा 'अति'लाड करणं पुढे जाऊन त्रासदायक ठरतं. परंतु योग्य ती जडणघडण करून सुद्धा जर एखादी व्यक्ती वाईट मार्गाला लागली तर दोष पालकांचाच असतो, असं नाही. कारण स्वतः केलेल्या कर्माची जबाबदारी ही स्वतःचीच असायला हवी. इतर व्यक्ती किंवा संस्कारांना जबाबदार ठरवणं निरर्थक असावं. संस्काराचं बीज रुजविण्याचं काम पालक अगदी काळजीपूर्वक करतात. पण पुढे जाऊन त्यांना जपणं त्या पाल्याला जमत नसेल तर दोष कुणाचा? पालक, संस्कार, की ती व्यक्ती?
आधुनिकता अंगिकारली म्हणजे ती व्यक्ती स्वतःचे संस्कार विसरली आहे, असं मुळीच म्हणता येणार नाही. शेवटी जीवनात बदल ही महत्त्वाचे आहेत. त्यांना आत्मसात न करणं म्हणजे आजच्या भाषेत 'आऊटडेटेड' होणं! असे कितीतरी लोकं आहेत जे परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालणं अगदी उत्तमपणे पार पाडतात. हा सारा खेळ स्वतःच्या विचार आणि इच्छेचा म्हणावा लागेल. या दोन गोष्टी नसतील तर कोणी कितीही बोललं तरी काहीच फरक पडणार नाही.
जाणीव हा शब्द खरंतर महत्त्वाचा आहे. पिढ्यानपिढ्या होणारी संस्कारांची देवाणघेवाण तशीच सुरू ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मनात संस्कारांच्या मुळांचं अस्तित्व टिकून असायला हवं. कदाचित तरच ही शिदोरी पुढच्या पिढीला सोपवली जाऊ शकते.
एखाद्याचा आदर करणं, वागण्या-बोलण्यात विनम्रता असणं, मदतीची वृत्ती, यांसारख्या गोष्टी चटकन लक्ष वेधून घेतात. आईवडील, इतर कुटुंबीय आणि शिक्षक यांनी केलेल्या संस्कारांचं जीवनाच्या जडणघडणीत अमूल्य स्थान असतंच. पण सोबतच आपले सवंगडी, आसपासचे लोक सुद्धा या संस्कारांच्या आदानप्रदानात तितकेच महत्त्वाचे ठरतात. काय घ्यायचं अन् काय नाही घ्यायचं, कसं वागावं आणि कसं नाही, या सगळ्या गोष्टी शेवटी ज्याच्या त्याच्या इच्छेवर आहेत. कळत नकळत मनावर झालेले संस्कार ओळखणं, त्यांची जाण ठेवणं, त्यांना अंगिकारणं, आणि त्यांचा वारसा पुढे चालू ठेवणं, सारं काही आपल्याच हाती आहे. जुने विचार असो किंवा मग आधुनिक, योग्य ते वैचारिक संस्कार आताच्या तसेच पुढील पिढीला मिळावे हीच सदिच्छा.
-©® कामिनी खाने.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//