उत्तरेच्या नजरेतून महाभारत

उत्तरेच्या नजरेतून महाभारत
नमस्कार. मी उत्तरा. आपल्या तेजोमय वीरश्रीने अजरामर झालेल्या योद्धा अभिमन्यूची भार्या. मत्स्य देशाची राजधानी विराटनगरीत राजा विराट आणि माता सुदेषणा यांच्या पोटी माझा जन्म झाला. राजकुमार उत्तर माझाच जुळा भाऊ होता. माझा उत्तरवर खूप जीव होता. दोघे एकत्रच वाढलो. खेळलो. राजवाड्यात माझे प्रचंड लाड झाले. कुरु राष्ट्र आणि पांचाल राष्ट्र मत्स्य राष्ट्राच्या जवळच होती. त्यामुळे माझे लहानपण पांडवांचा पराक्रम ऐकूनच गेले. सोबतच महाराणी याज्ञसेनीबद्दल वेगळेच आकर्षण निर्माण झाले. पाच पराक्रमी वीरांची पत्नी असलेल्या स्त्रीसोबत किती वाईट घडले. भर दरबारात तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतके महारथी उपस्थित असूनही कुणीच तिला वाचवायला आले नाही. खूप सहानभूती वाटायची तिच्याबद्दल आणि चीड यायची हस्तिनापूरच्या लोकांबद्दल. पण खूप कौतुक आणि आदरभावही वाटायचा महाराणी द्रौपदीबद्दल. त्यांनी चक्क दुशासनाच्या छातीच्या रक्ताने केस धुण्याची भीषण प्रतिज्ञा केली. तो अपमान फक्त याज्ञसेनीचा नव्हता तर भारताच्या सर्व नारीजातीचा होता. कधी पाहिले नव्हते त्यांना पण कल्पना करू शकत होते की न्यायासाठी केस मोकळे सोडणारे स्त्री कशी दिसत असेल ? डोळ्यात किती आग असेल ? चेहऱ्यावर अग्नीचे तेज असेल. किती वेदना आणि दुःखद आठवणी मनात ठेवून ती जगत असेल ?

असो. किशोरवयात प्रवेश केल्यावर माझ्या मनात नृत्य आणि संगीत शिकण्याची इच्छा निर्माण झाली. पिताश्री कधीच कोणत्या गोष्टीला नकार देत नसत. खूप लाड करत. म्हणून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी बृहन्नलाची नेमणूक केली. ती एक तृतीयपंथी होती. तरी माझ्या मनात तिच्याविषयी कायम आदर होता. ती मला गुरुसमान होती. अल्पावधीतच माझी मैत्रीणही झाली. तिच्या अंगात उच्च दर्जाची कला होती. ती नृत्य करत तेव्हा नटराज नृत्य करतोय असा भास होई. तिच्याच मुखातून अर्जुनपुत्र अभिमन्यूबद्दल समजले. अभिमन्यूबद्दल बोलताना तिचे डोळे पाणावत. तिने कधी अभिमन्यूला पाहिले नाही पण तरीही ती असे बोलत की अर्जुन तिचाच पुत्र आहे. नकळत माझ्याही मनात वीर अभिमन्यूबद्दल अनामिक ओढ निर्माण झाली. महान धनुर्धारी अर्जुन आणि देवी सुभद्राचा पुत्र , साक्षात भगवान वासुदेवाच्या छायेखाली वाढलेला मुलगा कसा असेल.

कधी कधी वृक्षाला विषारी फळे लागतात. तसच विराट देशाला पण एक विषारी फळ लागला होता. दुर्दैवाने तो राज्याचा सेनापती आणि माझा मामा "किचक" होता. त्याची वासनांध नजर माता सुदेषनाची प्रमुख दासी सैरद्रीवर पडली. जखमी आणि अपमानित सैरद्री भर दरबारात गेली आणि पिताश्रीसमोर न्याय मागितला. पण मंत्री कंकने शब्दांचे बाण टाकून प्रसंग निभावून नेला. या प्रसंगाने मला विचारात टाकले. मी माझ्या आईला प्रश्न केला की जर उद्या मामाची वासनांध नजर माझ्यावर पडली तर मला पण मदिरा घेऊन पाठवले असते का ? आईने रागात माझ्यावर हात उगारला. आई म्हणाली की सैरद्री दासी आहे. माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजू लागले. स्त्रियांच्या अब्रूची किंमत तिच्या स्थानावरून निर्धारित होते का ? राजकुमारीची अब्रू ती अब्रू आणि दासींची कवडीमोल ? मत्स्य आणि हस्तिनापूर , पिताश्री आणि अंध राजा धृतराष्ट्र यात फरक काय राहिला ? की स्त्रिया जन्मतःच लाचार असतात आणि त्यांना पुरुषांचा अत्याचार सहन करावाच लागतो. हीच त्यांची नियती असते का ? 

किचक माझा मामा असला तरी माझ्या मनात त्याच्याविषयी घृणा निर्माण झाली. पिताश्री पण विवश होते कारण राज्याची खरी शक्ती मामाच्या हातात होती. एका रात्री मामाचा वध झाला. मला आनंद झाला पण तो आनंद क्षणभंगुर होता. कुरुसेना आणि त्रिगरता राज्याच्या सेनेने विराटनगरवर आक्रमण केले. यावेळी मी खूप घाबरले. सैरद्री , कंक , बृहन्नला हे सर्वजण आधीपासूनच मला विशेष वाटत होते. कुरुसेनाचे आक्रमण झाले तेव्हा मला वाटले जे लोक स्वतःच्या कुलवधूला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न करू शकतात ते लोक पराजित राज्याच्या स्त्रियांसोबत काय करतील. हा विचार जेव्हा मी बोलून दाखवला तेव्हा बृहन्नलाला अतीव दुःख झाले.

"सर्वच पुरुष सारखे नसतात. प्रत्येक राज्यात किचकसारखे वासनांध असतात पण धर्म पाळणारेही लोक असतात. " बृहन्नला म्हणाली.

माझा बंधू उत्तर स्वतः कुरुसेनेला सामोरा गेला आणि बृहन्नलाने त्याचे सारथ्य केले. राजकुमार उत्तरने सर्व कुरु महारथीचा पराभव केला आणि माझ्या बाहुल्यासाठी महारथीची वस्त्रेदेखील काढून आणली. तिकडे त्रिगरता सेनेचाही पराभव झाला.

सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. पिताश्री तर उत्तरचे तोंडभरून कौतुक करून लागले.

"ज्याचे सारथ्य बृहन्नला हिने केले त्याला विजयश्री तर भेटणारच होती. " मंत्री कंक म्हणाले.

राजपुत्राची सोडून तृतीयपंथीची स्तुती ऐकून पिताश्री रागावले आणि त्यांनी फासा कंककडे फेकून मारला. मंत्री कंक यांच्या नाकावर जखम झाली.

काही दिवसांनी समजले की तो मंत्री कंक सम्राट युधिष्ठिर आहे. सैरद्री महाराणी द्रौपदी आणि माझी गुरू बृहन्नला साक्षात महाधनुर्धारी अर्जुन.

अधर्म होत असताना खूप जण बघ्याची भूमिका घेतात पण काही शूर धर्माचे रक्षण करतात. पांडव तसेच शूर होते.

"तुम्ही पुरुष असूनही नपुसंक का बनले ? आणि धनुष्य धरणाऱ्या पुरुषाच्या हातात नृत्याची कला कशी आली ?" मी विचारले.

"पुत्री उत्तरा. कला स्त्रीपुरुष पाहत नाही. आपणच कलेचे विभाजन करून चुक करतो. आणि नपुसंक शब्द नको वापरू ग. किन्नरदेखील माणसे असतात. त्यांनाही भावना असतात. नपुसंक ते नसतात तर किचकसारखे वासनांध प्रवृत्तीचे लोक असतात. माता उर्वशीचे आभार त्यांच्यामुळे मी किन्नर बनलो आणि मला त्यांच्या वेदना समजल्या. किन्नर तर ईश्वराची सुंदर सृजनशील निर्मिती आहे. " महारथी अर्जुन मला उत्तरले.

एकीकडे आनंद झाला की धर्माची स्थापना करण्यासाठी जन्म घेतलेल्या पांडवांच्या अज्ञातवासात नकळत का होईना आमच्याकडून मदत झाली. पण दुसरीकडे गेल्या एक वर्षात दास समजून आम्ही अपमानही केला होता. आज तेच दास इंद्रप्रस्थचे राज्यकर्ते पांडव निघाले. ही सल मनातून काढण्यासाठी पिताश्रीनी माझा विवाह अर्जुनासोबत लावण्याचा निर्णय घेतला. पण त्या धनुर्धारीचे मोठेपण आणि चारित्र्य बघा.

"उत्तरा माझी शिष्य होती आणि म्हणून मुलीसमान होती. त्यामुळे उत्तराचा विवाह माझाच पुत्र अभिमन्यूसोबत लावा. " अशी मागणी त्यांनी केली.

माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. रात्री स्वप्नात पण अभिमन्यू दिसू लागला. पण माझी माता चिंतेत होती.

"कधीही युद्ध होईल. विवाह युद्धानंतर केला तर चालेल का ?" माता पिताश्रीला विनवणी करू लागली.

मला हे पटले नाही.

"माता मी एक क्षत्रिय स्त्री आहे. धर्मयुद्ध झाले तर आरती करून पतीला रणांगणात पाठवेल. छावणीत त्याची वाट बघेल आणि जर तो परत आला तर जखमांवर औषध लावेल. युध्दात कितीजण तरी प्राण गमावतील मग आपण आनंदोत्सव तर कसा साजरा करायचा ?" मी म्हणले.

"आणि जर युध्दात पतीस विरगती प्राप्त झाली तर ?" माता म्हणाली.

"तर मला अभिमान वाटेल की धर्मयुध्दात एक योगदान माझेही आहे. " मी उत्तरले.

राजकुमार अभिमन्यूला पाहताच मी त्याच्या प्रेमात पडले. तेजस्वी , वीर , राजबिंडा आणि तितकाच स्वभावाने शांत , मोठ्यांचा आदर करणारा आणि लहान्याशी प्रेमाने वागणारा. मुळात अर्जुनाचा पुत्र जसा असावा तसाच होता.

याच काळात श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. ओठांवर नेहमी स्मितहास्य असत. असे वाटत यांना भविष्यात काय होणारे सर्व माहीत आहे. प्रसन्न चेहरा पण स्वभावाने खोडकर होते. नात्यात मोठे होते पण मित्रच वाटायचे. हेच का ते ज्यांनी कंसाला मारले , हेच का ते सुदर्शनचक्र घेणारे ? हाच का तो आई यशोदेचा कान्हा , प्रेयसी राधेचा श्याम  , रुक्मिणीचा कृष्णा , सखी द्रौपदीचा गोविंद , अर्जुनाचा माधव , कालयवनचा रणछोड , सुदामाचा केशव. किती मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ स्वभाव आहे. स्त्रीच्या प्रत्येक अवस्थेत आपलासा वाटावा असा हा देव आहे. माणसांत राहून माणसाहून श्रेष्ठ ठरलेला. श्रीकृष्णानी मला "सुखी भव" चा आशीर्वाद दिला. मी वेळ साधून आणि धाडस करून इतर आशीर्वाद जसे की "सौभाग्यवती भव" आशीर्वाद का दिला नाही विचारले. ते स्मितहास्य करत म्हणले. " स्त्रीचे कल्याण पुत्र किंवा पतीतच का शोधायचे ? तिचे स्वतःचे अस्तित्व किंवा सुख नाही का ?" माधव म्हणाले. मी अनुत्तरित झाले. असो.

अभिमन्यूसोबत मोठ्या थाटामाटात विवाह झाला. मत्स्य , यादव आणि कुरु वंशला जोडणारा हा विशेष विवाह झाला. कदाचित युद्धापूर्वीची शेवटची आनंदाची घटना. कदाचित या नंतर पांडव परिवार रणांगणातच कुरु सेनेसमोर उभे ठाकणार. या विवाहात द्वारकेहून बरीच यादव मंडळी आली. भारताच्या काही राज्यातून राजेमंडळी सेनेसहीत आली होती. माझ्या विवाहामागे छुपा राजकीय हेतूही होता. राजकीय चर्चा आणि युद्धनीतीच्या गोष्टी रंगल्या होत्या. विवाहाच्या आनंदापेक्षा युद्धाची उत्सुकता जास्त लागली होती.

लग्नाच्या पहिल्या रात्रीत मी अभिमन्यूला घाबरतच प्रश्न विचारला.

"तुम्ही पोटात असताना महारथी अर्जुन देवी सुभद्राला चक्रव्यूहाचे ज्ञान देत होते पण देवी सुभद्रा अर्ध्यातच झोपी गेल्या. त्यामुळे तुम्हालाही फक्त अर्धेच ज्ञान आहे. ही कथा खरी आहे का ?" मी विचारले.

राजकुमार अभिमन्यू हसला.

"मी कधी आईला विचारले नाही. पण मला खरच अर्धे ज्ञान आहे जे घातक असते. मी पिताश्रीकडून चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे लवकरच शिकेल. असो. आपण पतीपत्नीच्या नात्यात जरी बांधलो गेलो तरी आपल्यात मैत्रीचे नाते आधी असेल. मला युध्दात खूप पराक्रम गाजवायचा आहे. अर्जुनाचा पुत्र सौभद्र म्हणून नाव त्रिखंडात गाजले पाहिजे. आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्व असते. " अभिमन्यू मला म्हणला.

आमच्या प्रेमळ नात्याला नुकतीच पालवी फुटली होती. प्रेमाचे चार क्षण जगले न जगले की लगेच युद्धाचे चौघडे वाजू लागले. युद्धाच्या आदल्या दिवशी मी सहज उत्तरला चिडवले की उद्या घाबरून पळून नको येऊ. तो हसत म्हणाला विराटनगरीला माझा अभिमान वाटेल असाच पराक्रम गाजवेल. केवढा होता माझा भाऊ ? मिसुरडे पण फुटले नव्हते त्याचे. पण डोळ्यात कसली जिद्द होती. युद्धाच्या पहिल्याच दिवशी माझ्या भावाचा बळी गेला. मद्रनरेश शल्यने उत्तरला ठार केले. काहीजण म्हणले की शल्यचा एक भाला सम्राट युधिष्ठिरला लागणार होता पण बंधू उत्तरने सम्राटाला वाचवले. युद्ध संपल्यावर उत्तरचा मृतदेह पाहून माता सुदेशना मूर्च्छित पडली. माझ्या पित्याच्या भाळी कोवळ्या मुलाला अग्नी देण्याचे दुर्भाग्य आले. मद्रनरेश शल्य मला म्हणाले की पुत्री तुझा भाऊ खरच शूर होता. त्या रात्री मी खूप शोक केला. आक्रोश केला. आईचे सांत्वनही केले.

"आई धर्मयज्ञात पहिली समिधा मत्स्यच्या राजकुमाराची पडली बघ. " मी रडत म्हणले.

त्या रात्रीपासून मनात सतत धडकी भरू लागली. एका रात्री अभिमन्यूला बोलून दाखवले.

"जर युध्दात तुम्हाला काही झाले तर मी सती जाईल!" मी म्हणाले.

अभिमन्यूच्या डोळ्यात पाणी आले.

"तू मला वचन दे की तू कधीच सती जाणार नाहीस. मी तुझ्या सुंदर देहाला अग्नीचे चटके लागलेले नाही पाहू शकत. अमानवीय अमानुष वाटते मला ते. तू आपल्या होणाऱ्या अपत्यासाठी जगशील. मुलगा झाला तर त्याला चांगले संस्कार दे. वीर बनव. देशाचे भविष्य आहे तो. मुलगी झाली तरी हरकत नाही. तिला सर्वप्रथम शस्त्रविद्या दे. दुर्गा बनव तिला कारण पुन्हा कुणी दुशासन स्त्रीचे वस्त्र ओढण्याचे धाडस करणार नाही. त्याचे हात ती स्त्रीच कापेल. पण तू जगायचे उत्तरा. " तेजस्वी पतीच्या डोळ्यात अश्रू पाहून मीही रडू लागले आणि त्यांनी मला मिठी मारली.

दहाव्या दिवशी महामहिम भीष्म पडले. त्या रात्री माता पांचाली माझ्यासहीत इतर पांडवपुत्रांच्या पत्नींना घेऊन त्यांना भेटायला गेल्या. आम्ही हातात आरतीची थाळी घेतली होती. आधी तर भीतीच वाटली. हेच का ते गंगेचे पुत्र देवरथ ? पांढरी मोठी दाढी , वृद्ध पण कणखर देह , पांढरेशुभ्र वस्त्र आणि तसेच चारित्र्य. बाणांच्या गादीवर झोपलेले होते. कित्येक बाण शरिराच्या आरपार गेले होते. जखमा अजूनही तश्याच होत्या. डोक्याला उशीच्या जागी दोन बाण होते. त्यावर ते पवित्र मुंडके टेकवले होते.  काय ही अवस्था ? ज्या व्यक्तीने आयुष्यभर कोणाचे वाईट केले नाही त्याला जीवनाचे अंतिम क्षण असे प्राप्त व्हावे ? महामहिमला पाहिले की असे वाटत होते की देवाच्या एका मूर्तीचे खंडन झाले आहे. किती निष्ठुर आहेस तू नियती ? मातेच्या आदेशानुसार आम्ही महामहिमची पूजा केली.

"उत्तरा. तुझ्या मनात कोणते प्रश्न काहूर माजवत आहेत ठाऊक आहे मला. मी आयुष्यभर कर्मच केले नाही हेच पाप घडले माझ्या हातून. पित्याच्या सुखासाठी राज्य त्याग करणे निश्चितच चांगली गोष्ट होती. पण नंतर जेव्हा स्वतः माता सत्यवतीने सिंहासनावर बसायला सांगितले तेव्हा जनतेचे हित सोडून मला माझी प्रतिज्ञा महत्वाची वाटली. माझी चूक म्हणजे मी धृतराष्ट्रमध्ये पिता शांतनूची सावली शोधली. मला कळत होते की धृतराष्ट्र गादीसाठी कधीही योग्य नाही कारण त्याला पुत्रमोह होता. मी माझ्या प्रतिज्ञाची ढाल बनवून अधर्माचा भागीदार न होण्यासाठी पळवाट शोधली. म्हणूनच आज या बाणांच्या गादीवर बसलोय. जगाला सांगतोय की प्रतिज्ञा करायची तर धर्माची करा. प्रतिज्ञा धर्माच्या रक्षणाची करा. तुमचे एकमेव कर्तव्य धर्माचे रक्षण आहे. धर्माची हानी होत असताना मी मात्र मौन राहिलो. कुलवधूचा अपमान होताना , राज्याचे विभाजन होताना , दुर्योधनाचे अधर्म बघताना मी मौन धारण केले. म्हणूनच आज ही शिक्षा भोगतोय. माझ्या परपौत्र अभिमन्यूला रणांगणात भेटतोय. उत्तरा तुझा पती अत्यंत वीर आहे. असे वीर शतकातून एकदाच निपजतात. आणि युगानुयुगे नाव गाजवतात. तुझे कल्याण हो पुत्री. तुला द्यायला आशीर्वादच उरले आहेत. " महामहिम म्हणाले.

त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही जड अंतकरणाने निघालो.

एक दिवस सौभद्र सकाळीच प्रसन्न चेहरा घेऊन आले. हातात प्राजक्ताची फुले आणि चिंचा होत्या . मी लाजले.

"तुम्हाला कस समजले की मला चिंचा खाऊ वाटत आहेत ते ? आणि ही फुले मला अत्यंत प्रिय आहेत. " मी आनंदून म्हणले.

"या युद्धाच्या धामधुमीत तुझ्या गरोदरपणाच्या लाडाकडे कुणाचे लक्षच नाही गेले ग. कुरूवंशाच्या भविष्याचे रोप तुझ्या कुशीत असूनही कुणीच तुझे लाड पुरवले नाही. माफ कर आम्हाला. " अभिमन्यू

"त्यात माफी कसली. माझा पुत्र युद्ध बघतोय. शिकतोय. याहून मोठे भाग्य कोणते. मी क्षत्रिय आहे. आणि कुरुक्षेत्रात माझा पुत्र निपजेल याचा मला अभिमान आहे. " मी म्हणले.

अभिमन्यूने मला जवळ खेचून घट्ट मिठीत घेतले.

"असच आनंदी आणि प्रसन्न रहा. मी सदैव तुझ्या सोबत राहीन. आपल्या अपत्याच्या डोळ्यातून मीच तुला पाहत असेल. " अभिमन्यू म्हणला.

मी काहीच बोलले नाही. दिवसभर विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. संध्याकाळी समजले की आर्य गतप्राण झाले. मी मोठा आक्रोश केला. आभाळ फाटेल असा आक्रोश. माझ्या बांगड्या फोडल्या गेल्या. कुंकू पुसले गेले. मंगळसूत्र काढण्यात आले. पांढरी वस्त्रे घालण्यात आली. क्षणार्धात माझे रूप बदलले. मला वैधव्य आले. आर्यचा रक्ताळलेला देह पाहून मी परत किंचाळले. देहाला हलवून परत आर्यला उठवण्याचा प्रयत्न केला. माझे पिताश्री तर सुन्न होऊन गेले. कोवळा तरतरीत पुत्र गमावला आणि आताच लग्न झालेली पुत्री डोळ्यादेखत विधवा झाली. याचवेळी सेनानी कर्णही भेटले.

"शोक नको करू. तुझा पती सौभद्र महान वीर होता. जो अजरामर राहील. लोक त्याचे उदाहरण देतील. " महारथी कर्ण मला म्हणाले.

त्यांच्या चेहऱ्यावर सुर्यासारखे तेज होते आणि डोळ्यात पश्चाताप होता. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा असे वाटले की तेही पांडवांपैकीच कुणी एक आहेत. आठ जणांनी मिळून माझ्या पतीला ठार केले. धिक्कार असो या सर्वांचा.

दुसऱ्या दिवशी पिताश्री अर्जुन यांनी सिंधनरेश जयद्रथला मारण्याची शपथ घेतली. माता द्रौपदी आणि मी एकाच खोलीत होतो. मला सांत्वन देत त्या म्हणाल्या , "उत्तरा प्रार्थना कर की आज सूर्य लवकर अस्त होऊ नये. जयद्रथचा वध होऊ दे. त्याने अभिमन्यूच्या देहाला लाथ मारून त्याने अभिमन्यूचा नाही तर समस्त वीरांचा अपमान केलाय. "

मला काहीच कळत नव्हते. मुळात प्रसंग इतक्या लवकर घडत होते की काहीच कळत नव्हते. मला फक्त इतकंच समजले की मी माझा पती गमावला. आणि जयद्रथचा वध जरी झाला तरी तो पती परत येणार नाही. भगवान वासुदेवने सुदर्शन चक्राने सूर्य झाकला आणि जयद्रथचा वध करवून घेतला. त्या रात्री मी वासुदेवला भेटायला गेले. त्यांचे चरणस्पर्श केले.

"वासुदेवा. भगवंता. आज तुम्ही पिता अर्जुनाचे रक्षण केले तर मग त्या दिवशी माझ्या पतीचे रक्षण का नाही केले ? माझे पांढरे कपाळ तुम्हाला बघण्याची इच्छा होती का ?" मी रडत प्रश्न केला.

श्रीकृष्णाच्या डोळ्यातही पाणी आले. त्यांनी माझे अश्रू पुसले आणि डोक्यावर हात ठेवला.

"धर्मयुध्दात आहुती पडत आहेत. अबालवृद्ध लोक समिधा म्हणून अर्पण होत आहेत. पांडव जिवंत राहणे अनिवार्य आहे. कारण पांडव आणि द्रौपदीच धर्माचे प्रतीके आहेत. आणि तेच धर्माची पुनर्स्थापना करू शकतात. " श्रीकृष्ण उत्तरले.

"मग माझे पती धर्माचे प्रतीक नाहीत का ? काय दोष होता माझ्या भावाचा आणि पतीचा की अल्पवयातच मृत्यू आला ? हा नरसंहार का ?" मी प्रतिप्रश्न केला.

"पुत्री उत्तरा. मानवजातीचा स्वभाव आहे की जोपर्यंत त्याच्या जवळच्या गोष्टींची हानी होत नाही तोपर्यंत त्याला त्याची किंमत कळत नाही. म्हणून मानवांना खूप काही गमवावे लागेल मगच त्यांना धर्माचे महत्व आणि अधर्माचे परिणाम कळतील. या युद्धात फक्त तुझाच पती आणि भाऊ गेलाय का ? चारही दिशांना बघ. विधवांचे आक्रोश बघ. या युद्धात पांडव विजयी होऊन धर्माची पुनर्स्थापना करतील. मानवजाती या युद्धाला सदैव लक्षात ठेवेल. लक्षात ठेवेल की नारीचा अपमान झाल्यावर काय परिणाम होतो. या यज्ञात जर इतके जण मृत्युमुखी पडत आहे तर पांडव तरी कसे वेगळे राहतील. त्यांनाही त्याग करावा लागेल. उद्या भविष्यात कुणी अधर्माविरोधात उभा राहील तेव्हा जर शत्रूने त्याला त्याच्या पुत्राला मारू अशी धमकी दिली तर त्या व्यक्तीला अर्जुन आठवेल. जर पार्थ आपल्या पुत्राला वाचवू शकला नाही तर इतरांचे काय बोलावे. म्हणून पुत्रमोहात न अडकता ते धर्माच्या मार्गावर अग्रेसर होतील. जीवन-मृत्यू आपल्या हातात नसते उत्तरा. कोण किती जगणार हे विधिलिखित असते पण कसे जगायचे आपल्या हातात असते. तू शोक नको करू उलट अभिमान बाळग की या धर्मयुध्दात तुझाही त्याग मोठा आहे. तुझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे उत्तरा. या अल्पवयातच वैधव्य आले. पण त्यामागे प्रयोजन समजुन घे. भविष्यात कुणी युध्द करण्याचा निर्णय घेईल तर त्याच्या डोळ्यासमोर तू असशील. युध्दाचे काय भीषण परिणाम होतात हे जगाला सांगणारी उत्तरा. " श्रीकृष्ण

"मला माफ करा. तुमच्या हेतूबद्दल शंका घेतली. लोक म्हणतात तस तुम्ही खरच विष्णूचे अवतार आणि देव आहात ते खरे आहे का ? मग देव असूनही तुम्ही स्वतः का युद्ध करून हे युद्ध संपवत नाही ? " मी विचारले.

"मला ज्या रुपात पाहशील त्या रुपात मी दिसेल. पुत्र , मित्र, प्रियकर किंवा कपटी शत्रू. देवत्व सर्वात असते. फक्त शोधावे लागते. आणि माफी मागू नको. ही तर सुरुवात आहे. युद्ध संपल्यावर मला खूप जणांचे खूप काही ऐकून घ्यायचे आहे. देव होणे सोपे नाही. त्यासाठी सर्वांच्या यातना सहन कराव्या लागतात. सर्वांचे दुःख मनात सामावून घ्यावे लागते. आणि मी फक्त मार्गदर्शन करतो. युद्ध तर तुम्हा मानवांनाच करायचे. आपले मन कुरुक्षेत्र आहे. माझी गीताच तुमचे सारथ्य करेल. हा प्रपंच यासाठीच की लोकांनी बोध घ्यावा. काहीतरी शिकावे. त्यांना त्यांच्या जीवनात मार्गदर्शन भेटावे. मी फक्त दिशा दाखवेल बाकी चालायचे तुम्हालाच आहे. असो. तू आराम कर. तुझ्या गर्भात भविष्य वाढत आहे जो युगपरिवर्तनाचे कारण बनेल. " श्रीकृष्ण म्हणले.

मी आशीर्वाद घेतले. काय झाले होते मला ? वैधव्यच्या शोकात मी क्षत्रिय स्त्रियांच्या धर्मालाच विसरले होते. कुठे गेली होती आईकडून  लग्नासाठी अनुमती मिळवणारी कणखर उत्तरा ? असो. भगवान श्रीकृष्णाने मला परत योग्य मार्गावर आणले आणि मी स्वतःला सावरले. पण नियती अजूनही माझ्यावर नाराज होती. दुसऱ्याच दिवशी माझे पिताश्री पण मला सोडून गेले. मत्स्य देश पोरका झाला. गुरू द्रोणकडून पिताश्रीचा वध झाला. पण युद्ध पुढे सरकत गेले. द्रोण , कर्ण , दुशासन सर्व मारले गेले.
महारथी कर्ण तर कौंतेय होते हे समजले. एकेकाळी सुतपुत्र म्हणून त्याला हिनवणारे पांडव आज त्याच्या मृत्यूनंतर त्याचा शोक करत होते. काय असते आयुष्य ? जीवनभर व्यक्तीचा द्वेष करायचा आणि मृत्यूनंतर शोक ? रणांगणात रणचण्डिका तांडव करत होती. कालभैरव भयावह रूप धारण करत होता. कपटी शकुनी मारला गेला. गुरू द्रोणचे मस्तक छाटले गेले. माता पांचालीने दुशासनच्या छातीच्या रक्ताने केस धुतले. त्या दरबारात ज्यांनी मूकपणे माता पांचालीचा अपमान बघितला ते सर्व मृत्युमुखी पडले. आता वाटले की दुर्योधन शरण येईन. आमचा विजय निश्चित होता. पण युद्धाचा अंत कल्पनेच्या पलीकडे अतिशय भयावह होता. दुर्योधन मारला गेलाच पण अश्वत्थामाने पांडवपुत्रांना झोपितच ठार केले. पांचालचे उरलेले राजसदस्यही गतप्राण झाले. मी माझ्या दालनात विश्राम करत असताना एक महाकाय अग्नीने माखलेला बाण माझ्याकडे अतिशय वेगाने आला. काही क्षणातच तो माझ्या गर्भात येऊन धडकला आणि लुप्त झाला. मला अतिशय वेदना होऊ लागल्या. मी जिवाच्या आकांताने ओरडू लागले. किंचाळू लागले. माता सुभद्राने लगेच श्रीकृष्णाला बोलावण्याचा आदेश दिला आणि मला मांडीवर बसवले.

"घाबरु नको. मी योगमाया आहे. मी माझ्या पौत्राला काहीच होऊ देणार नाही. " माता सुभद्रा म्हणली.

श्रीकृष्ण येताच माता सुभद्रा त्यांना म्हणली.

"भ्राता या अभागी मुलीने या धर्मयुध्दात तिचा पती भाऊ पिता गमावला आहे. तिचे पूर्ण माहेर उध्वस्त झाले आहे. हा अपत्यच तिच्या जीवनाचा एकमात्र आशेचा किरण आहे. ज्याने जन्मच नाही घेतला त्याला का युद्धाची शिक्षा भेटत आहे ?" माता सुभद्रा ओरडल्या.

पहिल्यांदा मी त्यांना इतक्या रागात बघितले होते.

"सुभद्रे. मी पांडवांचा वंश संपू देणार नाही. हा बालक गर्भातच युद्ध करेल आणि विजयी होईल. मोठा राजा बनेल." श्रीकृष्ण

भगवंतांनी माझ्या पुत्राला जीवनदान दिले. माझ्या पुत्राचे नाव "सुपरीक्षित" ठेवण्यात आले.

युद्ध जरी जिंकलो तरी खूप काही गमावून बसलो होतो. प्रत्येक स्त्रीने तिचा पती किंवा पुत्र किंवा भाऊ अथवा पिता गमावला होता. सर्वत्र विधवांचा आक्रोश कानी पडत होता. रक्ताचे पाट वाहिले गेले होते. कुरुक्षेत्र आता रक्तक्षेत्र बनले होते. ती मातीही लाल भासत होती. आकाशी घुबडासारखे पक्षी रेंगाळत होते. मिळेल त्या देहाचे लचके तोडत होते. काहींना तर नातलगांचा मृतदेहच सापडत नव्हता. शहरात अन्नाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे भूकमारीने लोक मरू लागली. सर्वत्र हाहाकार उठला. काहीजणांचा हट्ट आणि लाखोंचे जीवन उध्वस्त झाले. युद्धानंतर माता गांधारीला भेटण्याचा योग आला.

"या वयात हिला वैधव्य आले आणि मला पुत्रवियोग. "माता गांधारी रडू लागल्या.

रागातच त्यांनी श्रीकृष्णाला शाप दिला. श्रीकृष्ण यांनी हसत स्वीकारला. या देवाने कधीच कोणत्या स्त्रीला आजन्म दुखावले नाही.

पिता युधिष्ठिर पुन्हा सम्राट बनले. महाराणी माता द्रौपदी पुन्हा सम्राग्नी बनल्या. आता पूर्ण भारत एका छत्राखाली आला. आता धर्माचे राज्य आले.

पुढे मी सुपरीक्षितला चांगले संस्कार देऊन वाढवले. भारताचा सम्राट बनवले. खूपदा मध्यरात्री प्रेमाची कळी खुलत. पण मी शारीरिक भावना आणि मानसिक गरजा आतच शमवल्या. थंड पाण्याने आंघोळ करू लागले. सात्विक अन्न किंवा कंदमुळे खाऊ लागले. देवाधर्मात लक्ष घालू लागले. लोक माझ्या रुपाला पाहून हळहळत. मी उरलेले सर्व आयुष्य एकांतात काढले. एका विधवेला पण आधाराची गरज असते. तिच्याही शारीरिक इच्छा आणि गरजा असतात. पण समाजाच्या नजरेत त्या अनैतिक ठरतात. गुन्हा ठरतात. विधवांचा विचार करतय कोण ?

मरताना सुपरीक्षितला एकच उपदेश दिला.

"बाळा. आमच्या चार पिढ्यांनी एकाच युध्दात स्वतःचा बळी दिला. आबालवृद्ध सर्वांनी प्राण वेचले. कारण आम्ही एका सुंदर भारताची कल्पना केली होती. ज्या भारतात स्त्रीचा आदर केला जाईल. जिथे धर्म असेल. आमचे बलिदान व्यर्थ नको जाऊ देऊ. त्या सुंदर भारताची निर्मिती कर. महाभारत ज्योत आहे. त्याचा उपयोग करून अंधार मिटव. कपटी शकुनीला वेळीच ओळख. महाभारतामधून जर काही शिकला नाहीस तर लक्षावधी अभिमन्यू पुन्हा पुन्हा प्राण सोडतील आणि उत्तरा पुन्हा पुन्हा विधवा होतील. " इतके बोलून मी प्राण सोडला.

पुढे मी भारतात कितीतरी उत्तरा पहिल्या. ज्यांचे पती मातीसाठी मेले आणि ह्या उत्तरा मातीसाठी जगल्या. उत्तरा एक "उत्तर" आहे युध्दाचे परिणाम किती भीषण असतात. महाभारतवर लोकांनी इतके लिहिले पण कुणास ह्या उत्तराची कीव आली नाही. हिने पूर्ण आयुष्य कसे कंठले असेल ? रात्री जेव्हा प्रेमाची गरज भासली तेव्हा त्या इच्छा कश्या शमवल्या असतील ? समाज अभिमन्यूचे गौरवगीत गात राहिला उत्तराच्या त्रासाचे उत्तर नसल्यामुळे तो तिच्याविषयी फक्त आणि फक्त मौनच बाळगले.

समाप्त

🎭 Series Post

View all