उत्तर द्यायलाच हवं होतं!! इट्स नन् ऑफ योर बिझनेस

One Should Speak For Self
"साहेब गावाला गेलेत वाटतं! ह्या महिन्यातली ही दुसरी खेप ना? सारखं सारखं काय असतं गं त्यांचं गावाला? त्यांचे आईवडिल नक्कीच तुझ्याबद्दल त्यांच्या मनात भरवत असणार!!" शेजारणीने आगीत तेल ओतलं अन् "ती" च्या संसारात वादाचा भडका उडाला.

"का ? आईवडिलांना भेटायला जायला का कुणाची परवानगी घ्यावी त्यांनी? त्यांचं घर आहे... आणि त्यांचे आईवडील! त्यांना वाटेल तेव्हा जातील... आपण खासकरून तू लक्ष न घातलेलंच बरं!" तिनं वेळीच उत्तर द्यायला हवं होतं...

**************************************

"ए, तू हे असे भडक रंगाचे कपडे नको घालत जाऊस बाई! तुला नाही शोभत! अगं रंग जरा जास्तच सावळा आहे ना तुझा.. तुला बाई काही चॉईसच नाही कश्याचा !" नणंदेनं फुकट सल्ला दिला अन् मूळची अबोल "ती" अजूनच हिरमुसली अन् उरलासुरला आत्मविश्वास गमावून बसली.

"एकतर मी काय घालावं ही माझी आवड आणि निवड आहे.. मला आवडेल तेच मी घालणार. बाय द वे, तुमच्या भावाला माझा जीवनसाथी निवडणं हा देखील माझाच चॉईस आहे... तो वाईट आहे असं म्हणायचंय का तुम्हाला?" तिनं वेळीच उत्तर द्यायला हवं होतं...

***************************************

"काय गं? तुझे सासुसासरे तुझ्याकडे येत नाहीत अजिबात! कधी कधी बोलाव त्यांना तुझ्याकडे! कसं आहे ना -आमच्या मुलीनेच का म्हणून सांभाळायचं त्यांना? त्यांनी सहा महिने एका मुलाकडे राहावं आणि सहा महिने दुसऱ्या!! "ती" च्या धाकट्या जावेची आई चारचौघीत ताडताड बोलून गेली.... ती धुसफुसत राहिली अन् वडाचं तेल वांग्यावर तसं तिचा सगळा राग सर्दीने हैराण झाल्याने किरकिरणाऱ्या तिच्या बाळावर निघाला.

"हे बघा, माझे सासुसासरे राहतात ते घर तुमच्या मुलीचं नसून त्यांचं स्वकष्टार्जित आहे आणि राहता राहिला प्रश्न त्यांनी कुठे राहावं ह्याचा तर दोन्ही मुलं आणि दोन्ही घरं त्यांचीच आहेत.. त्यांना वाटेल तिथे ते राहू शकतात.. तुमच्या माझ्या ठरवण्याप्रमाणे नाही." तिनं उत्तर द्यायला हवं होतं...

**************************************

मैत्रिणींनो, हे असे प्रसंग तुमच्या माझ्या प्रत्येकीच्या आयुष्यात येत असतात. अश्यावेळी आपण दुखावले जातो, रागावतो किंवा कुढत राहतो .... कारण वाद नको म्हणून किंवा बोलणं संयुक्तिक ठरणार नाही म्हणून आपण अश्या प्रसंगांना गप्पच राहतो.

पण स्वतःचा स्वाभिमान जपत, घराची आणि मनाची शांती जपायची असेल तर अश्या प्रसंगी उत्तर द्यायलाच हवं!

तुम्हाला काय वाटतं?