गोष्ट छोटी डोंगरएवढी-उत्सव नात्यांचा

मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशाने आसमंत उजळून काढणारा सण म्हणजे दिवाळी. आणि अश्या या सणाला आपल्या माणसांची सोबत असेल तर त्याची मजा काही निराळीच...हो ना!
दिवाळीला फक्त चारच दिवस उरलेत पण काही उत्साहच वाटतं नाही. ना फराळाचं काही करावं वाटतं ना ही काही काम आवरावी म्हणून उत्साह. दिवे, पणत्या, तोरण, लायटिंग, कपडे, गिफ्ट कित्ती ती तयारी करायची आहे.....
समीक्षा मनातल्या मनात बोलत होती. एवढ्यात
शेजारच्या आपटे काकूंनी आवाज दिला,
"काय ग समीक्षा, झाली का खरेदी दिवाळीची".

हो ना काकू, झालीय तशी, पण खरेदी संपायचं नावच घेत नाही.
"एवढी काय खरेदी करायचीय ग तुला" काकू
म्हणजे ना! मला कळतच नाहीये...कुठून सुरुवात करावी ते. दिवाळीसारखा मोठा सण, आणि तयारी करणारी मी एकटीच. सागर ला तर अजिबात वेळ नसतो. तो आणि त्याचं ऑफिस एवढंच त्याच विश्व. काकू, सागर ला फक्त एकच दिवसाची सुट्टी आहे ती पण लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची. सर्व आवरता आवरता माझीच दमछाक होतेय. अपूर्वा पण लहानच. तिला सांभाळत सर्व बाजारहाट करतांना नाकी नऊ येतात माझ्या. समीक्षा आपल्या मनातलं दुःख काकूंना सांगत होती.

काकू, खरं सांगू का दिवाळीची मजा ना भरल्या कुटुंबातच हो. आमचं सासरचं मोठ्ठ, भरलं कुटुंब पाच भावाचं. खूप मजा येते सणवार साजरी करतांना. दरवर्षी आम्ही गावीच जातो. पण यावर्षी सुट्ट्या नसल्यामुळे इथेच दिवाळी साजरी करावी लागणार. घरच्यांना सांगितलं यावर्षी तुम्हीच या सर्वजण पुण्याला. पण गावाकडची मजा शहरात नाही म्हणून नाही म्हणतायत.
खरच तर आहे त्यांचंही म्हणणं. गावाकडची एकत्र कुटुंबातली मजा शहरातल्या फ्लॅट मध्ये नाहीच येणार.
किती ती मजा...फटाके, फुलझडया, अनार ....
ना वेळेचं भान ना कामाचं पण टेन्शन.
सर्व एकत्र म्हणजे खाण्याण्यापिण्याची नुसती चंगळच हो. बोलता बोलता समीक्षाच्या डोळ्यात पाणी आलं.
पण काय करणार?
नोकरी मुळे नाही जमत हो गावी जाणं.

तेवढ्यात मोबाईल वाजला, म्हणून समीक्षा धावत घरात गेली. सासूबाईंचा फोन होता.
हॅलो समीक्षा, ऎकतेय ना! आम्ही सर्व तिकडेच येतोय दिवाळीला.
समीक्षा- हो हो. खरंच येताय ना.
या लवकर मी वाट बघतेय.
तिने लगेच फोन करून ही बातमी सागरला सांगितली. छोटी अपूर्वा पण आईला असं अचानक हसतांना बघून खुश झाली.

गावात राहणाऱ्या सासुबाई, जावा, दीर, भासरे, नणंद सगळेच येणार.....(बच्चा पार्टी पण)
म्हणजे फुल्ल धमाल होणार.
समीक्षा नव्या जोमाने कामाला लागली.
परत नव्याने खरेदी सुरू.....आता कुठे तिला वाटलं... आता आली दिवाळी.
नात्यांशीवाय दिवाळी अपूर्णच ....हो ना!
चला तर मग आपणही साजरा करूया
"उत्सव नात्यांचा
उत्सव नवचैतण्याचा"....

चारुलता राठी