उत्सव नात्यांचा... नव्या प्रथांचा

दीपावली एक उत्सव नात्यांचा नव्या प्रथांचा




गोष्ट छोटी डोंगराएवढी


विषय- दीपावली-उत्सव नात्यांचा


शीर्षक-उत्सव नात्यांचा… नव्या प्रथांचा


"सुधा, वाण-सामानाची यादी बनवली का? दिवाळी आठ दिवसांवर आलीये. उटणं, धूप, अगरबत्ती, वाती, पणत्या, लाह्या-बत्तासे सध्या मला एवढं आठवतंय. तुला अजून काही सामान आठवलं तर या कागदावर लिहून ठेव. मी काय म्हणतो, आपल्या बैठकीच्या खोलीच्या खिडकीला थोडी लायटिंग लावून घेतो आणि हो चकलीची भाजणी, हरभरा दाळ वगैरे काय काय दळून आणायचं ते पण देऊन दे." दुपारचे चार वाजत होते. मंगेशराव डायनिंग टेबलवर बसून सामानाची यादी लिहीत होते. चहाचं आधण ठेवता ठेवता सुधाताईंनी मंगेशरावांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला.


"अरे हो! तुझ्या डोळ्यांकडे बघून आठवलं सुरसुऱ्या, चक्र, अनार फटाके लिहायचेच राहिले." मंगेशराव एक तिरपा कटाक्ष टाकून बोलले.


"जळलं मेलं लक्षण ते! मनाची नाहीच नाही निदान जनाची तरी ठेवा थोडी." सुधाताईंनी बोलता बोलता चहाचा कप अक्षरशः टेबलवर आदळला.


"एक हजारवाली लड लिहायचीच राहिली…" मंगेशराव थोडं थट्टेत बोलले.

"म्हणजे मी बडबड करते असं म्हणा ना सरळ." सुधाताई


"विषय काय! तू बोलतेस काय!" मंगेशराव


"बरोबरच बोलतेय. जेमतेम दोन वर्षं झालीयेत मंदारला जाऊन आणि तुम्हाला दिवाळी साजरी करायची सुचतंय. अहो, समाजतले लोकं काय म्हणतील याचा काही विचार तरी केलाय का? मंदार आपला एकुलता एक मुलगा…" सुधाताईंच्या डोळ्यात मंदारच्या आठवणीने पाणी आलं.


"हे बघ सुधा, जे झालं ते झालं. थोडा मीराचाही विचार कर." मंगेशराव


"तिचा काय विचार करायचा? पांढऱ्या पायाची! लग्न होऊन सहा महिनेही झाले नव्हते आणि माझ्या लेकाला गिळून बसली…" सुधाताई


"सुधा, अपघात होता तो. त्यात मीराचा काय दोष? अगं, त्या पोरीकडे बघ जरा. दोन वर्षं झाली चेहऱ्यावर हसू म्हणून नाही तिच्या. आजकालच्या पोरींना तसेच सासू सासरे जड होतात; पण मीरा मंदार नंतरही आपल्याकडे राहतेय. आपलं दुखणं-खुपणं, पथ्य-पाणी सगळं सांभाळतेय. हे सगळं सोडून ती कधीच जाऊ शकली असती; पण मंदारला दिलेली सगळी वचनं पाळतेय ती. आपला मुलगा गेला; तिचाही नवरा गेला ना… संसाराचे किती  स्वप्न पाहिले असतील तिने… तिच्या सगळ्या स्वप्नांची अगदी राख रांगोळी झाली… समाजाचा विचार करतेस तू… तुझा मुलगा गेला तरी समाजाने दिवाळी साजरी केलीच ना… मग मीराने किती दिवस त्याच दुःखाला कवटाळून बसायचं... तिचा जरा तर विचार कर… मंदार गेला म्हणून तिने आनंदाने जगायचंच नाही का? मी तर म्हणतो की तिने पुन्हा कोणाच्यातरी प्रेमात पडावं… पुन्हा नव्याने संसार करावा… किंवा आपणच तिचं दुसरं लग्न लावून देऊ… या समाजाला काही घेणं देणं नसतं… समाज घोड्यावर बसूही देत नाही आणि घोड्यासोबत चालुही देत नाही… समाजात बदल हवा असेल तर त्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागते… कळलं? आणि हो मीरा येईल थोड्यावेळात, तिच्यासमोर हा विषय काढून बडबड केलीस तर याद राख." मंगेशराव चिडून तिथुन निघून गेले.


संध्याकाळी मीरा घरी आली. सुधाताईंनी मीराच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अवखळ झऱ्यासारखं तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधी गळून पडलं हे या दोन वर्षांत त्यांना कळलं देखील नव्हतं. मीराच्या चेहऱ्यावरचं तेज कधीचच हरवून गेलं होतं. तिचा चेहरा अगदीच निस्तेज आणि मलूल झाला होता. लग्नानंतर सतत प्रसन्न दिसणारी, प्रसन्न राहणारी मीरा कधी एवढी शांत झाली आणि साधीसुधी राहायला लागली ते कळलंच नव्हतं. मीरा सकाळी उठून सगळं आवरून ऑफिसमध्ये जात होती. ऑफिसमधून परत आल्यानंतरही घरातलं सर्व आटोपत होती, अगदी शांततेत, एक चिक्कार शब्दही न बोलता!


लक्ष्मी पूजनाचा दिवस उजाडला. सुधाताईंनी सकाळीच मीराला उटणं लावून दिलं. मीराच्या डोळ्यांत अश्रूंची गर्दी झाली होती पण तिने ते अश्रू अलगद अडवले. मीरा स्नान करून येईपर्यंत सुधाताईंनी तिच्यासाठी गरम अनारसे तळले. समोर फराळाची प्लेट बघून पुढे काय बोलावं मीराला कळत नव्हतं. मंगेशराव आणि सुधाताईंनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि तिघांचा अश्रूंचा बांध फुटला.



"मीरा, ही पैठणी आणि हे दागिने संध्याकाळी घाल हो." दुपारी सुधाताईंनी मीराला साडी आणि दागिने दिले.


"पण आई हे सगळं…" बोलता बोलता मीराचा कंठ दाटून आला.


"मीरा, माफ कर मला. माझ्या दुःखासमोर मी तुझा विचार केलाच नाही. हसण्या-बागडण्याचे, नटण्या-मुरडण्याचे दिवस आहेत तुझे… हे सगळं असं झालं म्हणून तू जगणंच सोडून द्यावं असं तर नाही ना. मला माझी मीरा तशीच हवी जशी लग्न करून या घरात आली होती. हसरी… खेळकर…" सुधाताई मीराचा हात हातात घेऊन बोलल्या. मीराने त्यांना एक मिठी मारली.


मीराने आणि सुधाताईंनी संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी केली. मीराने अंगणात सुरेख रांगोळी काढली. कितीतरी दिवसांनी तिने रांगोळीत मनसोक्त रंग भरले. सुधाताईंनी दिलेल्या  मोरपंखी रंगाच्या पैठणीत आणि सोन्याच्या दागिन्यांत मीरा अतिशय सुंदर दिसत होती. मीराला पाहून लक्ष्मीपूजनासाठी पाटावर बसलेले मंगेशराव एकदम उठले.


"मीरा… हा मान तुझा आहे बेटा… या घरची लक्ष्मी तूच आहेस…लक्ष्मीपूजन तुझ्याच हाताने होणार." मंगेशरावांनी मीराला प्रेमाने पूजेला बसवलं आणि मीराच्या हातूनच लक्ष्मी पूजन केलं. आज खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न झाली होती… खऱ्या अर्थाने दिवाळी हसली होती.


समाप्त

फोटो- पिंटरेस्टवरून साभार

© डॉ. किमया मुळावकर