उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..... भाग 1

विनोदी कथा
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

भाग 1:

बारीकराव आज भल्या पहाटेच घराबाहेर पडले. ट्रॅक सूट, पाठीवर डफल बॅग, हातात स्मार्ट वॉच, आणि पायात स्पोर्ट शूज....

असा सगळा तामझाम करून स्वारी पायी चालत निघाली होती.. बारीकराव म्हणजे "सुदृढ " गावचे सरपंच.

हरहुन्नरी , सतत उत्साही, सुस्वाभावी, आणि कार्यतत्पर!
मागच्या वर्षी त्यांची 'सुदृढ' गावाच्या सरपंच पदी निवड झाली. आणि वर्षभरातच त्यांनी गावाचा कायापालट केला.

गावात नळ योजना आणली, स्मशानासाठी निवारा बांधला , पानवठा बांधला. सगळ्या सोयी सुविधा केल्या.


पण घाई करणार नाही ते बारीकराव कसले?? प्रत्येक गोष्टीत त्यांची घाई ठरलेली. नळ योजना मंजूर होण्याचा अवकाश, तोच बारीक रावांनी द्वारे पाण्याचा नाश होऊ नये म्हणून आधीच नळीने गाड्या धुवू नये , रस्त्यावर पाणी सांडू नये असा हुकूम काढला!!

उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, हि म्हण बारीकरावाना तंतोतंत लागू पडावी असा सरपंच साहेबांचा स्वभाव!!


आईच्या पोटात सुद्धा बारीकराव नऊ महिन्यांपर्यंत थांबले नाहीत म्हणे!!

सातवा महिना चरताच ते बाहेरच जग बघायला उतावळे झाले होते, आणि जन्म घेऊन या भूतलावर आले. जन्मानंतर ते अगदी किडकिडीत , तळहाता एवढेच दिसत होते. म्हणूनच सर्वांनी त्यांचे नाव बारक्या ठेवले.


अंगकाठी बारीक, आणि उंची ही कमी , फक्त त्यांचे वय वाढत गेले. पण नाव मात्र तेच चिकटून राहिले. फक्त बारक्याचे बारकू, बारकू शेठ, आणि नंतर बारीकराव झाले.


शाळेत असताना बारकूबा भयंकर उचापती ... मूर्ती लहान पण कीर्ती महान असे याचे व्यक्तिमत्व. आई आणि उतावळेपणा याच्या पाचवीलाच पुजलेला . यामुळे बरेचदा बारकूचे नुकसानच होत असे.


शाळेमध्ये असताना विज्ञानच्या तासाला शिक्षक प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक घेत होते. सर्व उपकरणांनी सिद्ध अशा प्रयोग शाळेत प्रात्यक्षिक चालू होते. प्रात्यक्षिक करून बघणे शाळेतल्या मुलांना खूप आवडते. काचेची सर्व भांडी हाताळणे, काही द्रावणात काही पदार्थ मिसळून तयार होणारी रासायनिक पदार्थ पाहणे सर्वच मुलांना आवडते. बारकूही त्याला अपवाद नव्हता. पण त्याच्या उतावळा स्वभावामुळे काही ना काही बिघडत असे.

बारकू साधारण नववीत असतानाची गोष्ट. प्रात्यक्षिक चालू होते. सर्वांसमोर प्रयोगाचे साहित्य मांडण्यात आले होते. शिक्षक मुलांना प्रयोगाबद्दल माहिती सांगत होते. सर्व मुलेही शांततेत प्रयोगाची कृती समजून घेत होते.


चंचुपात्रातील द्रावणाला उष्णता दिली आणि ऍसिडचे दोन थेंब टाकले असता गुलाबी रंगाचा धूर तयार होऊन एक वायू मोकळा होतो, अशा स्वरूपाचा प्रयोग होता. बारकूने सगळे अर्धवट ऐकले . त्याला कधी आपण प्रयोग करून बघतो असे झाले. शिक्षकांनी पुढची सूचना देण्याच्या आधीच पठ्ठ्याने गॅस सुरू केला.

द्रावणाला उकळी फुटताच, ऍसिडच्या बाटलीतील चांगले झाकणभर ऍसिड उकळत्या द्रावणात टाकले. अचानक काही कळायच्या आत फट असा आवाज झाला. त्या द्रावणाचा स्फोट झाला, पात्र फुटले आणि ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या काचा बारकूच्या तोंडावर उडाल्या .

डोळ्यावर चष्मा असल्यामुळे डोळ्याला इजा झाली नाही. परंतु गालावर, कपाळावर, गळ्यावर त्याचे तुकडे घुसले, तर हातावर उकळते द्रावण सांडल्यामुळे हाताला भाजले.

महिनाभराच्या उपचारानं

तर जखमा बऱ्या झाल्या पण उतावळेपणाची खून म्हणून काच घुसल्याचे व्रण मात्र आयुष्यभरासाठी तसेच राहिले.


पुढे कसेबसे शिक्षण उरकून बारीक राहून नोकरी करायचे ठरवले. अति घाईमुळे नोकरीच्या ठिकाणी यश मिळालेच नाही.


आता बारकू चे लग्नाचे वय झाले होते. पण काम धंदा नसल्यामुळे कोणी मुलगी देण्यास तयार नव्हते.

शेवटी बारकूच्या वडिलांनी एक युक्ती केली, ज्यायोगे बारकू चे लग्न जमू शकेल.....


काय असेल ती युक्ती? बारकूच्या आयुष्यात पुढे काय घडणार. पाहूया पुढच्या भागात.....


क्रमश :

गीतांजली सचिन.

🎭 Series Post

View all