उसवले धागे कसे कधी? ( अंतिम भाग)

प्रेम हे आंधळ असत पण ते डोळे उघडे ठेवून करायला पाहिजे नाहीतर ते जीवघेणं ठरतं.
रोमाने राजकडे बघितलं आणि बोलली,...  " राज बोलणं सोप्पं असते रे, पण भूतकाळ माझा पिच्छा नाही सोडणार. माझा चेहरा बघून सगळे घाबरतात मला.मुलं माझ्याकडे ट्युशनला येतात ना तेव्हा पण मी चेहऱ्यावरची ओढणी कधीचं काढत नाही. मला माझी स्वतःची अशी काही ओळख नाही राहिली आता."

" अगं तू कधी पासून एवढं नकारात्मक बोलायला लागली. राहिला तुझ्या ओळखीचा प्रश्न. तू बनव ना स्वतःची ओळख. तू शिक पुढे... तुला जी मदत हवी ती करेल मी. एक सांगू का?... दिसण्यावरून नाही तर आपल्या कर्तृत्वाने जगाने  ओळखावं असं तूच म्हणायाची ना! कुठे हरवला तुझा तो आत्मविश्वास."

रोमाने राजकडे बघितलं. राज उठला टेबलावर ठेवलेल्या बॅग जवळ गेला. बॅगमधून एक बॉक्स काढला. रोमाच्या जवळ गेला. तो बॉक्स त्याने उघडला आणि त्यातून दोन बांगड्या काढल्या  आणि रोमाच्या हातात देत म्हणाला,...

" आई बाबांची खूप इच्छा होती तुला द्यायची ह्या बांगड्या. तुझ्या लग्नात काहीच नाही दिले त्यांनी ह्याची दोघांना खूप खंत होती. पण काही दिवसांनी त्यांनी ह्या विकत घेतल्या पण  तू कधी परत आली नाही आणि तुझा फोन सुद्धा कधी लागला नाही. त्याच दरम्यान काळाने दूर नेलं त्यांना आपल्यापासून. पण आईने जाताना शेवटी मला सागितलं ह्या बांगड्या तुला देण्याची जबाबदारी माझी आहे म्हणून.मी खूप शोधलं गं तुला.पण तू मला भेटलीच नाहीस.मात्र आता  त्यांची इच्छा पूर्ण झाली. तू मला भेटली. ह्या  धर तुझ्या बांगड्या, तुझी अमानत .आता कधीच दूर नको करू त्यांना."

रोमाने बांगड्या हातात घेतल्या आणि तिने अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
रोमा त्या बांगड्या पर्समध्ये ठेवणार तोच.." अगं रोमा तुला घालायला दिल्या बांगड्या.... त्या मी ठेवायला नाही दिल्या."

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बाहेर शिवा आणि त्याची बायको उभे दिसले. राजने दरवाजा उघडला.

" अरे शिवा....आणि वहिनी आज कुठे रस्ता चुकलात. या...या ..या... ना... घरात."

" अरे तू आज ऑफिसला आला नाही, म्हटलं बघून तरी येऊ काय झालं.ते?"

दोघं सोफ्यावर बसले. रोमा आतून पाण्याचे ग्लास घेऊन आली आणि दोघांना पाणी दिले.

" रोमा?...रोमा?... बरोबर ना.!" शिवाची बायको जरा अडखळत बोलली.

राजने आश्चर्याने विचारले,..."वहिनी...तुम्हाला कसं माहीत?"

वहिनी शिवाकडे बघत म्हणाली....

" शिवा मला प्रत्येक गोष्ट सांगतो तुमची,  मग त्यातून रोमा कशी सुटेल. खरं तर आज तुमच्या पेक्षा शिवा जास्त खुश आहे. म्हणून आम्ही भेटायला आलो तुम्हा दोघांना. आता तुम्ही दोघं काय निर्णय घेणार आहात आम्हाला माहीत नाही, पण आमचा निर्णय झाला आहे."

रोमा आणि राज दोघं एकमेकांकडे बघत."कसला निर्णय ? आम्हाला कळू देत!"

तेवढयात वहिनीची नजर टेबलावर ठेवलेल्या  बांगड्यावर  पडली.

" अय्या!!! किती सुंदर आहे बागंड्या!...अगदी रोमासारख्या आणि टेबलावर नाही शोभत  त्या बांगड्या हातात शोभतात रोमा. राज भाऊजी चला उचला त्या बांगड्या आणि घाला रोमाच्या हातात."

राजने बांगड्या उचलल्या आणि रोमाच्या हातात दिल्या.
वहिनी तिथूनच ओरडल्या...."नाही ..नाही....अहो हातात नका देऊ , तिच्या हातात घाला त्या बांगड्या आणि अगं बाई विसरलेच! ही रिंग पण घ्या."

"वहिनी!!!!" राज आश्चर्याने बोलला.

" भाऊजी काही नाही....ही रिंग पण घाला तिच्या हातात. आम्हाला सगळं माहित आहे. तुमचं खूप प्रेम आहे रोमावर."

"पण रोमाचं? ..तिचं मत असल्याशिवाय मी नाही उचलणार पाऊल. मी तिच्या लायक आहे का नाही तिला ठरवू दे."

रोमा राज जवळ आली,...." राज हे काय बोलतोय तू?..लायकी तर माझी नाही रे!...हजारो हातांनी मला  ..." आणि गप्प बसली

राजने तिच्या ओठांवर हात ठेवला..."बस.... या पुढे हा विषय बंद."

"हो भाऊजी खरच बंद. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यात तुझी काय चूक रोमा.अगं तू तर प्रेम केलं ते ही अगदी मनापासून. पण कदाचित रोहितने कधी केलचं नाही. तो फक्त आणि फक्त पैशाच्या मागे धावला. त्याने तुझ्या मनाचा विचार कधी केला नाही आणि केला असता तर ही वेळ तुझ्यावर आलीच नसती."

"हो वहिनी अगदी बरोबर पण मी थोडी चौकशी करायला हवी होती. प्रेम हे खरंच आंधळ असतं हे खरचं आहे. मी सुरुवातीपासून जरा सतर्क रहायला पाहिजे होतं. माझा प्रियकर... माझा नवरा..हा कधी माझ्या जीवावर उठला हे मला कळलेच नाही."

"अगं रोमा... आता तो विचार नको करत बसू.अजून तुझ्यापुढे संपूर्ण आयुष्य आहे आणि अग काही निर्णय चुकतात आपले म्हणून मग पुढे आपण पाऊल टाकायचे नाही का? नाही घ्यायचे का स्वतःचे निर्णय?"

"नाही अरे.... राज आता नाही हिंमत.फार खचून गेले रे. जेव्हा जेव्हा मी आरशात बघते  तेव्हा हा जळालेला चेहरा  हसतो माझ्यावर  आणि जसा माझ्याशी बोलतो, तुझ्या आयुष्याचे धागे उसवले आता, तुला जगण्याचा काही एक अधिकार नाही. आणि तेव्हा मला आरशात रोहित दिसतो आणि तो हसतो रे माझ्यावर की मला फसवले त्याने."

शिवा मध्येच बोलला,..."रोमा अगं आता विचार करून सांग. राजला तू लहानपणापासून ओळखते आणि त्याच प्रेमही आहेच तुझ्यावर.  तुझ्याशी लग्न म्हणजे सहानभुती नाही हे मात्र नक्की लक्षात ठेव. तुला एक चांगला जोडीदार हवा आणि तो म्हणजे राजशिवाय आम्हाला दुसरं कुणीचं दिसलं नाही. तुला हवा तेवढा वेळ घे तू. फक्त सकारात्मक विचार कर एवढचं सांगतो.

शिवा आणि त्याची बायको उठले.

"बरं भाऊजी निघतो आता आम्ही. तुमचा जो काही निर्णय असेल तो कळवा आम्हाला."

"हो वहिनी नक्की. शिवा तू आलास खूप बरं वाटलं रे.आता कुणी नाही आमच्या आयुष्यात तुमच्याशिवाय."

रोमा लगबगीने उठली,..."नाही वहिनी.... अहो जेवण करून जा."

"नको...आता जेवण नकोय मला रोमाच्या हातचं, तू जेव्हा  या घरची सून होशील तेव्हा आम्ही खाऊ तुझ्या हातचं."

एवढं बोलून दोघे निघून गेले. इकडे रोमा राजला म्हणाली,...."राज अरे आता बराच उशीर झालायं.मला निघायला हवं.ताई वाट बघत असेल."

"अगं... आता कुठे जाऊ नकोस तू. हेच तुझं घर समज  आता..... "

"राज.... हे काय बोलतेस तू?"

" अगं तू रहा  बिनधास्त इथे. तसा मी मावशीला फोन केला की, तू इकडेच थांबणार आहे आता तिच्या हक्काच्या घरात."

"राज खरचं तुझं मन एवढं कसं मोठं आहे रे?  तूला सगळं माहित असून देखील. तू माझ्याशी लग्न करायला तयार आहे!"

"अगं  रोमा मी तुझ्या स्वभावावर, तुझ्या वागण्यावर प्रेम केलय. तूझा चेहरा लोकांसाठी खराब झालेला असेल पण तरीही तो मला आपलेपण देतो. तुला काही त्रास होऊ नये एवढीच इच्छा आहे ..तू नाही लग्न केलं आणि इथे राहिलीस तरीही चालेल. लग्न झाल्यावर सुद्धा तुझ्या मर्जी शिवाय हात नाहीं लावणार तुला हे वचन आहे माझं. अगं लग्न म्हणजे फक्त शरीरानं जवळ येणं नाही तर मनानं पण जवळ आलं पाहिजे आधी. बरोबर का?"

रोमा धावतच आली आणि त्याच्या गळ्यात पडली."राज किती समजून घेतो तू मला."

तेव्हा पहिल्यांदा राजने तिला मिठी मारली.

"राज...अरे, किती तरी दिवसांनी मला तुझ्या या मिठीत प्रेम जाणवले नाहीतर....फक्त...."

आणि रोमा शांत झाली.दोन ते तीन दिवस गेले  आणि रोमाने राजशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राजने ही बातमी शिवाला कळवली. आणि रोमाने त्या ताईला जिच्याकडे ती राहत होती.

दोघांनी मंदिरात लग्न करण्याचे ठरविले. अगदी साध्या वेशभूषेत दोघं तयार झाले. शिवा आणि त्याची बायको राजकडून तर रोमा कडून ताई (शांता मावशी) आली. आणि दोघांचे लग्न झाले.

काही दिवसातच रोमा पहिल्यासारखी वागू लागली. तिचं हसणं, बोलणं हे वाढू लागलं. ती हळुहळू सगळं विसरायला लागली. तिच्या चेहऱ्याची  कुरूपता  न जुमानता तिने निराधार बायका, मुली जिथे असतात तिथे काम करायला लागली आणि तिथे तिचं उदाहरण घेवून बऱ्याच जनी जगण्यास खंबीर उभ्या झाल्या.

त्यामुळे रोमाचे आत्मबळ, आत्मविश्वास खूपच वाढला.
दोघांचा संसार अगदी सुखाने सुरू झाला. दोघंही एकमेकांना खूप जपायचे. मैत्रीचे हे नाते कधी प्रेमात बदलेले त्यांना सुद्धा कळले नाही.

खरचं प्रेम हे आंधळ असतं.पण ते  डोळे उघडे  ठेवून करायला पाहिजे नाहीतर  त्या प्रेमाचा कोण, कसा आणि कधी गैर फायदा घेईल याचा आपण विचारही करू शकत नाही. त्या प्रेमाच्या धागे कसे  कधी उसवतील हे समजण्या पलीकडले आहे.

 मग असे हे  जे प्रेम असतं ते जीवघेणं ठरतं. त्यातून बाहेर पडण सुद्धा आपल्याच हातात आहे. आयुष्यात  बऱ्याच गोष्टी येतात की आपण खचून जातो, निराश होतो पण आपण त्या गोष्टीचा बाऊ न करता खंबीर होऊन लढायला पाहिजे जसे की रोमा. तिने तिची लढाई सुरू केली आणि जिंकेल सुद्धा तिच्या आत्मविश्वासाने आणि राजच्या प्रेमाने...

धन्यवाद!

समाप्त...
©®कल्पना सावळे, पुणे

🎭 Series Post

View all