काही वेळातच रोमा उठली. तिला सगळं सांगायचं होतं राजला, पण कसं सांगू ह्या विचाराने ती बेचैन झाली. ती रूममधून बाहेर आली, राज काहीतरी काम करत होता. तिने सगळं आवरून चहा केला आणि राजकडे गेली. त्याच्या हातात चहाचा कप दिला आणि खाली बसली.
" गूड मॉर्निग...बरी आहेस ना आता? अगं चहा कशाला केलास मी केला असता ना!"
यावर रोमा काहीच बोलली नाही.हे बघून राज परत बोलला,...
.
"चल आपण जरा बाहेर फिरायला जाऊ. तुला फ्रेश वाटेल. आवर पटकन."
हे बोलून राज उठला .रोमाने त्याचा हात पकडला आणि खाली बसवलं.
" थांब आज कुठेही जायचं नाही. मला माझ्या मनातलं तुला काही सांगायचं आहे.मी जे गेली दीड वर्ष भोगलं ते. गेली सहा महिने मी वणवण भटकत आहे या आशेवर की तू मला भेटशील. तुला माहित नाही मी तुझ्या पहिल्या घरी देखील गेले होते. पण तिथे कुलूप दिसले आणि मी हताश होऊन जीव द्यायला निघाले. तेव्हा या मावशीने मला वाचवले आणि आसरा दिला."
" अगं पण असं काय झालं? ही तुझी अवस्था कशी झाली? कोण जबाबदार आहे याला? मला जरा सविस्तर सांगशील का? "
" दुसरं कोण असणार ...फक्त रोहित."
" काय? रोहित!"
" हो रोहित...एक नंबरचा नालायक माणूस आहे तो."
"अगं जरा नीट सांग मला काहीच कळत नाही आहे."
"हे बघ, माझं लग्न झालं आणि मी सासरी गेले. तेव्हा माझा तुझ्याशी कॉन्टॅक्ट नसला तरीही काका काकुंशी होता, त्यांच्याशी मी फोनवर बोलत असे.रोहितचं घर जरा गावापासून लांब होतं. का तर त्याला शांतता आवडायची म्हणून."
"राज, तो दिवस अजून आठवत आहे मला.आमची पहिली रात्र...त्या दिवशी रोहित खूप जास्त पिऊन आला, म्हणजे एवढं जास्त की त्याला सोडायला त्याचे मित्र घरी आले. तो एवढा गुंगीत होता की मी कोण आहे हे सुद्धा त्याला आठवले नाही. तो घरी आला आणि झोपी गेला.पहाटे तो उठला दहा वाजता. मी तोपर्यंत घरचं सगळं आवरून घेतलं. त्याला चहा दिला आणि एवढच बोलले की रात्री जरा जास्त झाली ते चांगलं नाही."
"त्यावर तो खूप भडकला आणि चहाची कप बशी माझ्या अंगावर फेकली.नशीब मला भाजलं नाही.मला त्याचं वागणं जरा विचित्र वाटलं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि दार उघडलं तर बाहेर रोहितची मावशी उभी होती. त्यांना मी घरात बोलावलं .त्यांनी हे सगळं बघितलं आणि म्हणाल्या रोमा अगं नीट काम करायला शिक आता तू लहान नाहीस, लग्न झालं तुझं."
" मग तू का नाही सांगितलं खरं काय आहे ते."
" अरे, मी सांगायला जाणार तोच त्यांनी मला आत जायला सांगितले आणि रोहितने काहीतरी पर्सनल बोलायचे म्हणून मला तिथून जायला सागितलं. मला माहित नाही त्यांच्यात काय गप्पा झाल्या.पण तो उठला आणि मला न सांगता दोघे निघून गेले."
" दुपार झाली तरीही त्यांचा घरी पत्ता नव्हता म्हणून मी रोहितला फोन केला तर त्याने माझा एक ही फोन उचलला नाही. मला आश्चर्य वाटले या गोष्टीचे. मात्र तो संध्याकाळी घरी आला तेव्हा मला माझा पहिला रोहित भेटला. त्याने मला सॉरी सॉरी म्हणत जवळ घेतले.पण जेव्हा मी त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मात्र मला दूर ढकलले आणि तो खूप थकला म्हणून रूमच्या बाहेर पडला."
" पण नंतर रात्र झाली, तेव्हा मला छान तयार व्हायला सागितलं. मी ही तयार झाले. माझ्या हृदयाची धडधड वाढली. त्याने एक ग्लास दुधाचा भरून आणला आणि तो मला प्यायला दिला. त्यानंतर काय झाले मला काहीच कळालं नाही. मला सकाळी जाग आली. मला खूप रक्तस्त्राव व्हायला लागला होता. अंगावरची सारे कपडे इकडे तिकडे अस्थाव्यस्थ पडलेले दिसले, मी घाबरले. रोहितला आवाज दिला. तो पटकन आला आणि माझी खूप काळजी आहे असं दाखवत म्हणाला, 'अगं पहिल्यांदा होतं असं, काही काळजी करू नकोस. तुला त्रास होत असेल तर आपण दवाखान्यात जायचं का?'
"पण त्याच्या प्रेमळ बोलण्याने मला बर वाटलं. मला त्रास होत होता म्हणून त्याने बाहेरून जेवण मागवलं. परत आज मावशी आली आणि त्यांनी मला आत जायला सागितलं. मी गेले पण मी त्यांचं बोलणं चोरून ऐकलं."
" मावशी म्हणाली,' अरे नवी कोरी साडी असेल तर महाग असणार नाही का? हीच खरी वेळ आहे पैसे कमवायची. सोडून नकोस.' आणि दोघे हसायला लागले.खरं तर मला काहीच समजले नाही."
" पण मग तू काही विचारलं नाही का?"
" हो विचारलं ना पण वेळ आली की सांगेल असं म्हणून त्याने टाळलं.असाच महिना निघून गेला. रोज रात्री रोहित मला दूध आणायचा आणि मला सकाळीच जाग यायची. मला रोज त्रास होऊ लागला."
मी एक दिवस मावशीला विचारले की, मला खूप त्रास होतोय. तर मावशी एवढच बोलल्या की, अगं सुरुवातीला होईल त्रास पण एकदा का सवय झाली की काहीच नाही वाटणार. मी ही त्यावर विश्वास ठेवला कारण मी अजून कुणाला कसं विचारणार? एवढं जवळचं कुणीच नव्हतं मला."
"आणि मी महिनाभरातच गरोदर राहिले म्हणून मी खूप खूष झाले. मी त्या दिवशी शिरा बनवला आणि मी मस्त रेडी झाली. रोहित आल्याबरोबर मी त्याला मिठी मारली. पण त्याने मला एका क्षणात दूर लोटलं, जसं की मी त्याच्या कधी जवळ गेलीच नाही. आणि तो मला नवीन आहे. मी त्याच्याकडे लक्ष नाही दिले. किचन मध्ये गेले आणि एका वाटीत शिरा आणला. रोहितला एक चमचा शिरा भरवला."
"मला त्याला सांगायची खूप घाई झाली होती कारण आमच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट होती. मला राहवलं नाही आणि मी त्याचा हात घेतला आणि माझ्या पोटावर ठेवला आणि एवढेच बोलले, आपलं बाळ."
" रोहितने माझ्या हाताला झटका दिला. रोहितला हे अजिबात आवडले नाही हे मला कळून चुकलं. पण का आवडलं नाही हे अजूनही मला कळत नव्हतं. त्याने कसलाही विचार न करता चक्क मला गर्भपात करायला सांगितले. मला तर खूप मोठा धक्का बसला. मला हे त्याचं वागणं पुन्हा खटकलं. मी मावशीला सागितलं तेव्हा मावशीने ही त्याच्या हो मध्ये हो मिळवलं आणि त्याला जे पटेल तो ते करेल आणि तुही ते मान्य करायला पाहिजे." असे मावशी मला म्हटली.
" तेव्हा मला जरा शंका आली की, मावशी रोहितला काहीच म्हणत नाही नेहमी त्याच्या बाजूने बोलतात, मी बरोबर असेल तरीही.मग मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम होते.मला गर्भपात करायचा नव्हता. कारण ती आमच्या प्रेमाची निशाणी होती."
मी त्या दिवशी जेवले नाही. काहीच सुचत नव्हतं आणि करमत सुद्धा नव्हतं. त्या दिवशी रात्री रोहित माझ्या रूममध्ये आला नाही आणि दूधही आणलं नाही. मी विचार करतच झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले त्या दिवशी मात्र मी एकदम फ्रेश होते.त्या दिवशी ना माझं डोकं नाही दुखलं किंवा मला असं सुस्थावल्या सारखं सुद्धा झालं नाही."
" अगं पण तू तेव्हा आई बाबांना का भेटण्याचा प्रयत्न केला नाही? त्यांनी नक्की मदत केली असती तुझी."
" हो राज....हाच विचार माझ्या मनात आला की, आपलं इथे कुणी जरी ऐकत नसेल तरीही काका काकू नक्की मला समजून घेतील. तेव्हा मी काकूंना कॉल करायला फोन हातात घेतला. मात्र त्यावेळी माझ्या जवळचा फोन रोहितने हिसकावून घेतला आणि सिम काढून फेकून दिले. मला त्याचं वागणं खूप विचित्र वाटलं.
मी ओरडले त्याला, तू असा काय करतोस म्हणून मी जाब विचारला त्याला. तेव्हा तो मला म्हणाला' इथे जे काही होईल ते माझ्याच मर्जीने, मी जे म्हणेल तेच करायचे. तुझं डोकं नको वापरू.'
मी त्याच्या विरोधात गेले आणि त्याला स्पष्ट नकार दिला की मी गर्भपात करणार नाही. मी या बाळाला नक्कीच जन्म देईल. तुला नसेल घ्यायची जवाबदारी तर नको घेऊ. पण मी मात्र त्याला या जगत आणणार हे नक्की.'
"यावर तो काय बोलला रोमा?"
"त्याने मला बरच समजावलं की, एवढ्या लवकर आपल्याला बाळ नकोय. काही दिवस जाऊ दे नंतर करू बाळाचा विचार पण मी त्याचं काहीच ऐकलं नाही."
"त्याचा राग नाही आला का रोहितला?"
" आला ना खूप आला. जेव्हा त्याला कळलं की मी नाही ऐकणार ,तेव्हा त्याने मोबाईल मध्ये असलेला एक व्हिडिओ मला दाखवला."
क्रमशः...
©®कल्पना सावळे, पुणे
