उसवले धागे कसे कधी? ( भाग २)

प्रेम हे आंधळ असत पण ते नेहमी डोळे उघडे ठेवून करावं नाहीतर ते कधी कधी जीवघेणं ठरतं.

तिने एक नजर वर टाकली...तिच्या डोळ्यात असंख्य वेदना आणि खूप भीती होती...भरलेल्या डोळ्यांनी तिने त्याला दूर ढकलले आणि जोरात ओरडली.


"चला चालते व्हा इथून, मी नाही ओळखत तुम्हाला."

"अगं खरच ओळखत नाही की ढोंग करतेस विसरायचं?"

" नाही मी नाहीच ओळखत तुम्हाला." ती तोंड फिरवत म्हणाली.

"मला तर अजूनही आठवत आहे सगळं. तुला बघितले आणि सगळं बालपण, शाळा, कॉलेज डोळ्यापुढे उभं राहीलं. तुला नाही आठवत का गं काही?"

त्याचे तसे बोलणे तिला विचलित करत होते तरीही राज थांबला नाही बोलायचं.
उलट विचारले," मला पाणी मिळेल?"

ती जरा शांत झाली पाणी द्यायला उठली तेवढ्यात राजने जवळ असलेली खुर्ची घेतली आणि तो बसला. पाणी पिऊन झाल्यावर तो तिला म्हणाला,...

" माझे बाबा आणि प्रकाश काका  दोघे जिवाभावाचे मित्र. तुझ्या आईला प्रसूती वेदना व्हायला लागल्या म्हणून तिला ताबडतोब दवाखान्यात हलवले. आणि त्यांना एक गोंडस मुलगी झाली, ती म्हणजे तू.  आणि  ज्या दिवशी तू झाली त्याच दिवशी तुझी आई देवाघरी गेली. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले पण अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्या आपल्याला सोडून गेल्या
सगळे प्रयत्न केले पण हाती निराशाच आली."

" तुझे बाबा खूप एकटे पडले, कधी कधी तुला जवळ घेऊन खूप रडायचे, तर कधी कधी खूप चिडचिड करायचे. आजीने आणि बाबांनी खूप समजावले तुझ्या बाबांना की,....

"प्रकाश....अरे, तुझ्यापुढे अख्खं आयुष्य पडलंय. तू दुसरं लग्न करून घे. रोमाचं किती दिवस करशील? जीवनात एका साथीदाराची गरज भासते. मी तुझा मित्र म्हणून नाही तर तुझा भाऊ म्हणून सांगतोय तुला."


मावशी म्हणजेच रोमा जणू भूतकाळात शिरली होती.

तेव्हा काका म्हणाले,..."अरे , प्रदीप मी तुमच्या भावना समजू शकतो पण खरं तर मी दुसऱ्या कुणाचा विचारचं करू शकत नाही. राहिला रोमाचा प्रश्न आई आहेच तिला सांभाळायला आणि तु आहेस की सोबतीला. वहिनी करतील मदत आईला."

तिच्या चेहऱ्यावर वेदनेची एक झुळूक येऊन गेली. तो अजूनही बोलतच होता.

"त्यावर आजी लगेच म्हणाली,...."हो जशी काय मी शेवट पर्यंत टिकेल. माझा काय भरवसा? मला देव कधीही बोलावण पाठवेल. त्यात त्या पोरीचं आणि तुझं पण नुकसान करतोय तू लक्षात ठेव."

काका म्हणाले,"नाही आई .पण मी दुसरं लग्न केलं तर कदाचित माझ्या मुलीचं नुकसान होईल असं वाटतं मला. एवढं गोजिरवाणं लेकरू माझ्या आयुष्यात आलं. तिचा काय दोष की तिची आई आम्हाला सोडून गेली. आता या घरात माझ्या लग्नाचा विषय परत कधीच काढायचा नाही.

" एवढं बोलून काका निघून गेले.


"एक एक दिवस जात होता. तू जसं जशी मोठी होत गेली तस तशी तू तुझ्या आईची झेरॉक्स कॉपी दिसायला लागली. रोमा तू एक स्वच्छंदी , आनंदी आणि दिसायला गोरी पान, टपोऱ्या डोळ्यांची एक दिलखुलास मुलगी. तू आईला कधी बघितलं नव्हतं .पण तरीही तूला आईबद्दल खूपच प्रेम होत. तुला लहानाची मोठी केली ते तुझ्या आजीने."
"काही वर्षांनी तुझी आजीही तूला सोडून गेली. मला फारसं आठवत नाही पण मग तुला सावरलं ते तुझ्या वडिलांनी. बाबा म्हणून नाही तर एक आई म्हणून तुला समजून घेतलं. तुला काय हवंय काय नकोय ते सगळं बाबाच बघायचे."

तिच्या टपोऱ्या डोळ्यातून आठवणी थेंब थेंब बाहेर येत होत्या. तो त्या थेंबांनी जरा विचलित झाला होता पण तरीही अजून बोलत होता.

"मी लहान असलो तरीही खूपच समजदार होतो असे नेहमी बाबा सांगायचे. दिसायला जरा काळा असलो तरीही माझं मन अगदी स्वच्छ होतं असं सगळेच म्हणायचे. आपली चांगलीच गट्टी होती. एकाच शाळेत आणि एकाच गल्लीत राहणारे आपण दोघं  चांगलेच चर्चेत असायचो. एकमेकांसाठी जीव देखील देऊ अशी आपली यारी  होती."

आता ती त्याचे  बोलणे ऐकू लागली होती...कदाचित जुन्या मैत्रीची भावना पुन्हा ताजी झाली होती.
तो अजूनही आपल्यातच हरवून बोलत होता,

"कधी कुणी तुला त्रास दिला तर मीच धावून यायचो आणि कधी मला  काही झालं तर तू धावून यायची."
आणि ह्या क्षणाला मावशी म्हणजेच रोमा नकळत बोलायला लागली त्या दिवसांबद्दल...

"रविवार म्हणजे सुटीचा दिवस....त्या दिवशी"....
"रोमा अगं ए रोमा"...काकूंची हाक
"काय काकू?"
"अगं बाबांना सांग आज नका जेवण बनवू इकडेच या जेवायला. आज मस्त फिश आणलेत तुझ्या काकांनी."

"अरे वा! काकू मस्तच!"

"तेवढ्यात दार वाजलं....मी धावतच गेले आणि दार उघडलं बाहेर माझेच बाबा."

बाबा म्हणाले,..."रोमा.... अगं आज रविवार आहे.आज तरी मदत करशील का नाही? रोज तुझी शाळा असते आजही सकाळपासून तू इकडेच आहे."

मी त्यांना सहज बोलले,..."अहो बाबा कशाला चिडता, आज नका करू काही. इकडेच बनवलं आहे  काकूंनी."

"तेवढ्यात तुझी आई पदराला हात पुसत आली आणि बोलली,....
"अहो भाऊजी  या ना आत. बाहेरच उभे राहीलात!"

"हो... हो... येतो ना वहिनी."

"वहिनी तुम्ही रोमाचा लाड करण बंद करा. हिला लावा कामाला. आता काही लहान नाही रोमा."

"कशाला उगाच...लहान आहे ती, मोठी झाल्यावर तिला कळेल तिचं". डोक्यावरून हात फिरवत काकू म्हणाल्या.  

"मग जेवण आटोपली. मी ही  भांडी घासायला घेतली." तेवढ्यात काकू बोलल्या,...
"रोमा अगं राहू दे."

"नाही काकू, करते मी.मला पण यायला हवं ना, खरच बाबा थकलेत आता माझं करून.आई असती तर...
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं."

"मला काकुने छातीशी धरले."
मग काकू बोलल्या," बाळा हे आपल्या हातात नसतं. नियतीचा खेळ आहे सारा."

"तेवढ्यात तू  आला आणि म्हणाला",
"आई घासू दे गं तिला भांडी, लग्न झाल्यावर तू किंवा काका नाही जाणार हिच्या सोबत सासरी. नुसतं गाव भर फिरत असते.चलं लाग कामाला."

"मी अश्रू पुसले. आणि बोलली",

"त्यांना कशाला नेवू मी तू आहेस की रिकामं टेकडा. तुला नेईल मी सोबत."


"मग तू लगेचच बोलला", "मी नाही येणार तुझ्या बरोबर. तू तिथेही ही मला पाणी द्यायला लावशील."


"अरे दोघे काय भांडताय. तुमचं असं आहे ना. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.चला आवरा पटकन."
"खरंच त्यावेळी कळतच नव्हते आपण किती पटकन भांडून एक व्हायचो...
काकू बोलत आत निघून गेल्या. मग मी  ग्लासभर पाणी तुझ्या हातात दिलं."

"राज, असेच काही दिवस निघून गेले. पुढे तू ज्या कॉलेजला होतास तिथेच मी  एडमिशन घेतली."
रोमाला असे बोलती  झालेली पाहून राजला खूप आनंद झाला. तो तिला म्हणाला,...

"अगदी बरोबर रोमा.चार पाच दिवस कॉलेजला होत नाही तोच आपली मैत्री रोहित नावाच्या मुलाशी झाली. रोहितची हाईट, बॉडी, हेअर एकदम भारी.
रोहितला आईवडील नव्हते. तो एका अनाथ आश्रमात लहानाचा मोठा झालेला मुलगा.तो एवढ्या लहान वयात  काम करून पैसा कमवायचा आणि शिक्षण घ्यायच्या. बरोबर ना रोमा."
रोहितचे नाव ऐकताच रोमाच्या चेहऱ्यावर थोडी वेदना जाणवली राजला.

" आठवते का?..मी बोललो त्याला,

"अरे रोहित तू कसा काय अनाथ आश्रमात आलास तुला काहीच आठवत नाही का?"


तो बोलला,"अरे मी काहीतरी पंधरा दिवसांचा होतो तेव्हा मला कुणी तरी सोडून गेले त्या आश्रमात असे सांगतात मला. आणि जेव्हापासून मला समजते तेव्हापासून तेच माझे घर झाले. तिथली लोकच माझे आहेत. शाळेत असताना माझ्याशी धड कुणी बोलत नव्हतं. खूप वाईट वाटायचं की या सगळ्यात माझा काय गुन्हा."

मी बोललो त्याला... "ओहह ! सो सॅड!!!यात तुझी काय चूक."

रोहित बोलला..."हो ना मलाही तेच म्हणायचे आहे. खरं तर माझ्या आईवडिलांनी ज्यांनी कुणी मला इथे सोडलं त्याचीच चूक आहे. मला खूप राग येतो त्याचा. जर अस टाकून द्यायचं होत तर जन्माला कशाला घातलं मला काय माहीत."

तेव्हा मी बोललो "अरे चिडू नकोस रोहित. कोणी केलं? का केलं ?आणि कसं केलं ? हे आपल्याला माहीत नाही मग का उगाच आईवडिलांना शिव्या घालतो."

"त्याचा मनात राग कायम होता..तो रागातच बोलला, " शिव्या घालू नाही तर काय करू? मला कुठल्याच नात्यांवर विश्वास नाही राहिला .अगदी मनापासून बोलतोय मी. मला अजिबात नाही आवडत ह्या नात्यांचा दिखावा. जे आहे ते बोलून स्पष्ट व्हावं माणसानं."

तू  आणि मी दोघांनी  एकमेकांकडे बघितलं. चहा घेऊन तिघे उठलो"

तेव्हा रोहित म्हणाला आपल्याला....
"अरे बसा निवांत. मला जरा घाई आहे. तुम्ही सांगा की तुमची स्टोरी."


मी बॅग हातात घेत म्हणालो, "अरे रोहित बोलू निवांत. काय घाई आहे. आता मला जरा उशीर होतोय."


तेव्हा तू मला म्हणाली, "राज तुला काही काम असेल तर तू जा पुढे मी येते नंतर."

मी लगेच विचारलं, "का? तुला कुणाला भेटायचं का कॉलेजमध्ये?"

तू बोलली मला, "नाही तसं काही नाही पण.येते ना मी जा तू. पण मी तरीही विचारलं तुला अगं पण सांग ना, म्हणजे जाता जाता मी निरोप देतो काकांना."

तू ही काहीच सागितलं नाही मात्र तू एवढचं बोलली, "नको तू काम करून घरी जा मी येतेच थोड्या वेळात."

रोमा पुन्हा बोलली,...
" मी तुला बाय केलं. तू निघून गेला आणि रोहित मला म्हणाला",

"रोमा चल मी पण निघतो. मग मी बोलले, अरे हे काय मी तुझ्यासाठी थांबले आणि तू.
तो लगेच खाली बसला आणि म्हणाला "काय! माझ्यासाठी?"

मी उत्तरले "हो तुझ्यासाठी."

"अरे व्वा!छान.बोल काय म्हणतेस?"

"अरे मला सुद्धा आई नाही .बाबा खूप कष्ट घेतात माझ्यासाठी. काही दिवसांनी आजी  मला सोडून गेली."

तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं आणि रोहितने माझ्या डोळ्यातले अश्रू पुसले."

मी त्याच्याशी बोलत राहिले, "रोहित आई काय असते? मला तर काहीच माहीत नाही. पण माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात आणि जर कधी मला आईची आठवण आली तरी मी ते दाखवत नाही. का तर बाबांना वाईट वाटू नये म्हणून. हे सगळं तुला सांगण्या मागच कारण म्हणजे तू जे म्हणतोस की  तुझा कुठल्याच नात्यावर विश्वास नाही. ते तू चुकीचं बोललास."

तेव्हा रोहित म्हणाला,..."अगं मला तसा अनुभव आलाय म्हणून मी बोललो तसे. सॉरी इफ आय हार्ट यू."

असं म्हणत त्याने माझा हातात घेतला आणि मी त्याचा हात झटकला. मी बॅग घेवून उठले आणि रोहितला म्हटले, "चल बराच उशीर झालाय निघुया आपण. त्यानेही होकार देत मान हलवली."


क्रमशः.....
©®कल्पना सावळे, पुणे

🎭 Series Post

View all