Oct 16, 2021
Love

उसनं हसू

Read Later
उसनं हसू
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

उसनं हसू

आई बाहेर गेलेली. योगिनी चोवीस वर्षांची..तिच्या लग्नाची तारीख अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपलेली.

 योगिनीने आईबाबांचं कपाट आवरायला काढलं..काय होतं त्या खणांत! अहो,काय नव्हतं त्या खणांत!

 एका छोट्याशा गाठोड्यात योगिनीची काही मोजकी बाललेणी अजुनही आईने जपून ठेवली होती . तिची ज्युनिअर केजीची वहीही होती त्यात..मोठ्या चौकडींची..ज्यात नुकतच शिकू लागलेल्या योगिनीचा हात धरुन आईने तिच्याकडून १ २ ३ ४ गिरवून घेतलं होतं..दुरेघी वही ज्यात अ आ इ काढली होती..तोडकीमोडकी अक्षरं..पण आईला किती अप्रूप!

 कधी शाळेतल्या बाईंनी शेरा दिला की योगिनीऐवजी आईच नाराज व्हायची न् योगीकडून अजून मेहनत करुन घ्यायची. योगिनीने बाहुलीची पापणी मोडली म्हणून टाकलेली बाहुलीही एका कोपऱ्यात उभी होती. 

योगिनी विचार करु लागली..आता माझं सेपरेट कपाट हक्कानं बनवून घेतलं मी पण आईने तिच्या कपाटातल्या माझ्या वस्तू,माझे लहानपणीचे फोटोचे अलबम किती जपून ठेवलैत! तुझं तुझं कपाट आलंय ना,त्यात ह्या तुझ्या वस्तू जपून ठेव..गरज नसली तर फेकून दे असं ती सहज सांगू शकली असती पण माझ्यातच जिचं विश्व सामावलंय ती माझी माय असं नाही करु शकली.

लग्न जवळ आलं तसं पायाला भिंगरी लागलीय तिच्या..ह्याला पत्रिका,त्याला पत्रिका,रुखवतं,मानपान पण आतून हललेय का ती! मी सोडून जाणार म्हणून आतल्या आत स्फुंदतेय पण याचा त्रास मला किंवा बाबाला होऊ नये म्हणून चेहऱ्यावर मात्र हसू वागवतेय. असं उसनं हसू आणायला कसं जमतं हिला?

योगिनी स्वैंपाकघरात गेली. स्टीलच्या गोल डब्यात आईने तिच्या आवडीचे मेथीचे पराठे..पांढऱ्या मऊसर फडक्यात झाकून ठेवले होते..बाजुलाच लिंबाच्या लोणच्याची बरणी होती..योगिनीच्या मनात आलं..किती जपते ही माझ्या आवडीनिवडी. मला आलं सहन होत नाही म्हणून पराठ्यांत आलं घालत नाही. बाबाही याविषयी कुरकुर करत नाही. योगिनीला जे आवडेल तीच या दोघा़ची आवड. मी सासरी गेले तरी पराठ्यांत आलं ठेचून घालायला हिचा हात पुढे व्हायचाच नाही. 

एकीकडे नवीन संसाराची ओढ लागलेली, जोडीदाराची स्वप्नं मनात रंगवणारी मी आणि दुसरीकडे आपलं पिल्लू घरट्यातून उडून जाणार म्हणून कातर झालेले माझे आईबाबा. ही दोन्ही घर एकच असती तर! सासरमाहेर ही भानगडच नसती तर! तर मग मला आजोळ कसं मिळालं असतं! दाराची बेल वाजली तशी योगिनीने दार उघडलं..दारात आई योगिनीच्या आवडीची पेस्ट्री घेऊन उभी होती.

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now