Feb 24, 2024
ऐतिहासिक

उरवी २

Read Later
उरवी २


उरवी हा ललित बंध उरवी च्या परिचयाशी निगडीत होता .त्या नंतरचे लेख हे कर्ण आणि उरवी यांच्या भावविश्वातली उलथा पालथ दाखवता हेत..

काळाचं विधिनिषिध न बाळगता प्रत्येक पळांमध्ये भरून उरणारा ,त्या भीषणतेची जाणीव सतत करून देणारा कालखंड महाभारत ,उद्वेग,त्वेष,आवेश,असूया यांचे ओरखडे सतत बाळगणारा ... द्युतात पराभव पत्करल्या नंतर.. एक भयाण अशांतता व्यापुन राहीलेली .त्या काळाच्या ही आधी खांडव वनांत प्रस्थान केलेले पांडव त्यांनी वसवलेली मय नगरी ,तिथले अपमान यांचे भीषण पडसाद नकळत उमटताहेत अशी कर्ण पत्नी उरवी हीची धारणा... त्यांतून तीला जीवघेणे होणारे आभास या पार्श्वभूमीवर मी लेख लिहीला आहे.. संपुर्ण काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी...
इथल्या घटना ही काल्पनिक आहेत ...कुठे असा संदर्भ जाणवलाच तर तो निव्वळ योगा योग समजावा ...ऐतिहासिक,पौराणिक घटनांचे पुरावे असे मिळत नाहीत काळानुरूप वेगळा विचार ही या घटनांचा करु शकतो आपण ही माझी संकल्पना ....कर्ण आणि उरवी यांच्यातले संवाद ही याचाच भाग आहेत..माझा ही खूप अभ्यास आहे अशातला भाग नाही तेंव्हा वाचकांनी रसग्रहण करतांना मला सांभाळून घेणं अपेक्षित आहे .... या लेखांसाठी काही पुस्तकांचे संदर्भ घेतलेले आहेत याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी..
लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे अबाधित आहेत..

उरवी -२
रात्रीचा दूसरा प्रहर... निःशब्द शांतता ..आपला भरजरी शेला सांवरत उरवी बेचैन अवस्थेत बिछान्यावर उठून बसली ..घर्मबिंदूंनी डबडबलेला चेहेरा कसा बसा पुसत तीनं कोरडा पडलेला घसा ,आवंढा गिळून ओला केला ... गवाक्षांतून दिसणाऱ्या प्राचिराच्या अभेद्य भिंती पहातांना ही काळजात होणारी घालमेल तीला सहन होईना ... प्रासादातल्या थरथरणाऱ्या दिपांतल्या ज्योती मालवताहेत हा भास ,आणि लगबगीनं ती उठली , पायात कधी नव्हे तो अडकणारा शेला कसा बसा सांवरत ती शेजारच्या समईतली शांत होणारी ज्योत स्थिर करु लागली ...एकदाच तीनं कर्णा कडे ओझरता कटाक्ष टाकला . एरवी निरागस अतिशय निःश्चल असणारा त्याचा चेहेरा ही तीला उदास ,अस्वस्थ वाटला ...ललाटा वरच्या त्याच्या रेघाही ओढल्या सारख्या दिसताहेत की आपलेच भास ...?कोणत्याही परीस्थितीत अचल रहाणारा आज सारखी कुशी बदलतोय याचा अर्थ माझ्या संवेदना त्याच्याशी एकरुप आहेत . मला जे जाणवतंय ते त्यालाही जाणवतंय ...तीनं घाई घाईनं प्रासादातले दिप पुन्हा स्थिर करायचा प्रयत्न सुरु केला ...
अनिलाचा आवेग नसतांनाही फडफडणाऱ्या त्या ज्योती पाहून तीचं मन सैर भैर झालं ...गवाक्षातून येणाऱ्या मृगांकाचे रुपेरी कवडसे ही आज तीला भिववू लागले ..त्या छायांची अक्राळ विक्राळ रूपं घेरताहेत असेच आभास .. त्या सावल्यांचा जीवघेणा खेळ चाललाय अशी उगाचच शंका मनांत येऊ लागली ...तीच्या नुपुरांचा आणि कंकणांच्या किणकिणाटानं कर्णाची निद्रा चाळवली त्यानं शेजारी पाहीलं तर उरवी नव्हती ...
"काय झालं .?" अचानक कर्णाचा आवाज त्या निःशब्द शांततेत घुमला ...उरवी दचकली .. "अं , काही नाही .."
"अग सुर्योदयाला वेळ आहे अजून शांत झोप ...रात्रीचा दुसरा प्रहर आहे आता काय करती आहेस ...?"
दोन्ही करांनी फडफडणारी ज्योत पुन्हा पुन्हा स्थिरावत ठेवली उरवीनं ...
"काय करती आहेस हे ...?"उगीच पाजळत कशाला ठेवायचे दिप हे .शांत कर ... " नको नाथ ,शांत नाही करायच्या ... मी ..मी पुन्हा ऊजळवते ..."कर्णानं उरवीला खांद्याला धरुन हलवलं तू जागी आहेस की स्वप्नात बडबडतीयस ...शिणलीयस ,विश्रांती घे ."
" नाही नाही जागतं राहीलं पाहीजे आपण सगळ्यांनीच... " सैरभैर फीरणारी उरवी दचकली जेंव्हा एकाच अनिलाच्या जोरदार आवेगात सगळे दिप मालवले ..अंधाराचं अक्राळ विक्राळ रुप चेतना बधीर करायला लागलं ... " अशुभाचे संकेत , अशुभाचे संकेत .."एवढी जोरात कींचाळली उरवी की कर्णही दचकला तीला ओढत मंचकावर बसवत त्यांनं तीला शांत करण्याचा प्रयत्न केला ....गदगदून अश्रु ढाळणाऱ्या उरवीची समजूत काढणं कठीण झालं त्याला ,जागी हो , जागी हो एवढंच म्हणत राहीला ..." "हो जागंच रहायला हवंय ,काळ रात्री आहेत या काळ रात्री ..."उरवी प्राचिराच्या अभेद्य भिंती पहातीयस ना ...?"
" कोणाची प्राज्ञा आहे असलं धाडस करण्याची ...?"
"ढासळताहेत यांच्या भिंती ...पाया खचलाय ,बुरुज ढासळताहेत ,आर्त किंकाळ्या ,कोणीतरी भेसूर हसतंय ऐकू येत नाहीये का तुम्हाला ...?" "काळ रात्री या भीषण सत्याची जाणीव करुन देताहेत ."
" शांत हो उरवी ,शांत हो माझ्यावर विश्वास आहे नं ?एव्हढी का भयभित आहेस ...?"
क्रमशः
©लीना राजीव.

# विद्रोह भाग-२


विद्रोह भाग 2

उरवी अजूनही शांत झालेलीच नव्हती .
तीला समजावणं कर्म कठीण होत चाललेलं .उरवीचे अश्रू अनावर होत होते . कर्णानं तीला बाहुपाशात घेतलं" इकडे बघ ,माझ्या डोळ्यांत पहा ."तीची हनुवटी किंचीत वर उचलली त्याने,निरागस ,अतिशय शांत असणारे नेत्र तीचे आज काहीसे गढूळलेले जाणवले... तीच्या या अतिशय बोलक्या डोळ्यांत किती वेळा स्वतःला आरपार पहायचा तो . दर्पणा सारखा ,जिथं प्रतिमा आपल्याच लपवणंही कठीण व्हायचं त्याला . पण काहीच दिसेना कदाचित त्यांवर येणारे निराशेचे,भयग्रस्त असण्याचे अश्रुंचे तरंग , हो असेल असंच स्वतःचीच समजूत घातली कर्णाने आणि "तुझा माझ्यावर विश्वास आहे नं उरवी ...?" म्हणत तीचे अश्रु अतिशय हळूवारपणे पुसले .
उरवी नं शांतपणे कर्णा कडे नेत्रांची उघडझाप करुन पाहीलं अगदी स्थिर होत "नाथ,तुम्ही कोणाच्या बाजूंनी आहात...?"
तीनं हा अचानक विचारलेला प्रश्न आणि अंगावर सरसरुन काटा उभा राहीला कर्णाच्या .. तरीही सावध होत "मला रोख कळला नाही उरवी तुझ्या प्रश्नांचा .?आज अचानक हे विचारते आहेस ...?"
"तुम्हाला ज्ञात आहे मी काय विचारते आहे ते ...? उमजतंय ,समजतंय पण जाणून घ्यायची ईच्छा नाहीये की ......"
"स्पष्ट बोल उरवी ,विषय निघालाच आहे तर ,तुझ्या अती चिकीत्सक वृत्तीं आणि कोणत्याही विषयाचा तड लावायचाच या स्वभावा पुढे मी हतबुद्ध होतो ..."
बोलावं की न बोलावं या संभ्रमांत उरवीनं थोडा वेळ घेतला .
उरवीचा स्वभाव हा अत्यंत मनस्वी आहे, अभिजात सौंदर्य ही तीची ओळख ,प्रगाढ बुद्धिमत्ता ,अतिशय लाघवी तितकीच कोणत्याही निर्णयाशी ठाम असणं ही तीची जमेची बाजू असली तरी तीचा प्रांजळपणा,स्पष्ट वक्तेपणा,आणि तेवढंच निडर असणं हेकट पणाच वाटायचं इतरांना . तीच्या विद्ववत्ते समोर भलेभले चीत व्हायचे ...प्रश्नांचा भडीमार करुन एखाद्या उत्तराची उकल होई स्तोवर अस्वस्थ रहाणं ...समोरच्याला नेस्तनाबूतच करणं हे सहजी जमायचं तीला ..
राजघराण्यातली असल्या मुळे चौसष्ट कला प्रवीण असणं हे आवश्यक आणि तीच्या सारख्या अनुपम सौंदर्यवतीला साजेसंच .. कर्ण या बाबतीत कमी पडायचा ...एकतर अती सामान्य कुळात जन्म ,उरवी सारखं आयुष्य स्वप्नातही कल्पना केलेली नव्हती त्यानं,त्याला याची मुभाच नव्हती ..
दैव बलवत्तर म्हणून राजघराण्याशी संपर्क आला ...राजकारण आणि युद्ध कौशल्य या व्यतीरीक्त इतर गोष्टींकडे तटस्थ होऊन पहाणं एवढंच ज्ञात होतं त्याला ... उरवी हा प्रश्न जो त्याला आधीपासूनच भेडसावतो आहे तो इतक्या स्पष्टपणे विचारेल ही संभावनाच वाटत नव्हती त्यामुळे थोडा वेळ घ्यावांच उत्तर देतांना हा विचार त्यानं केला .
एक आवंढा गिळत उरवीनं शेवटी धाडस केलंच "तुम्ही कोणाच्या बाजूनं आहात,नाथ...?सत्याच्या की असत्याच्या ? आश्वस्त तेच्या की नाईलाजाच्या ...?"
तीचा हा प्रश्न अंगावर आला कर्णाच्या ... काय उत्तर द्यावं हे आकलेना त्याला... विचार तरी कोणता करायचा ..?
"तुमच्या निष्ठा बांधल्या गेल्या आहेत मला ज्ञात आहे नाथ ,पण त्या इतक्याही अगतिक असूच शकत नाहीत की सत्य -असत्य ,विवेकशून्य वागण्याची मुभा तुम्हाला त्यांनी द्यावी ..."
"स्वतः समर्थ असतांना इतरांच्या स्वार्थी ,आप मतलबी मनोवृत्तींसाठी स्वतःच्या चांगुलपणाचीही ,स्वाभिमानाचीही आहुती तुम्ही द्यावीत ...केवळ आणि केवळ निष्ठा बांधिल आहेत म्हणून ही पळवाट शोधतां आहांत तुम्ही ..."
कर्ण काहीही उत्तर देण्याच्या तयारीत नव्हता ..,उरवी या प्रश्नाचं समाधान कारक उत्तर मिळेस्तो पर्यंत अस्वस्थ रहाणार ही मनोमन खात्री पटली त्याची ....
क्रमशः ....

#उरवी भाग- 3
"तसं काही नाही आहे उरवी ..तू समजतेस तसं.. ." "नाही कसं ..? एक क्षण भर मान्य एकदम मान्य तुमच्या निष्ठा बांधिल आहेत त्या असाव्यातही ,पण म्हणून कोणताही निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकत नाही...?अमान्य असेल काही , कशालाच विरोध ही करु शकत नाही ही अगतिकता कुठली ...?"
या पृथ्वी तलावर तुमचा पराजय केवळ अशक्य आणि हे साधण्यासाठी ज्यांनी तुम्हाला साह्य केलं त्यांचं ऋणी असणं एका बाजूला ,पण त्यांच्या आततायी, विवेकशून्य वागण्याचं समर्थन तुम्ही केलंच पाहीजे का ...?" "किमान विरोध दर्शवणं हे ही टाळता आहात तुम्ही नाथ ." तुम्हाला ज्ञात आहे का तुम्हाला वरण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा होता त्याचा पश्चात्ताप मला कधीही झाला नाही ..पण नंतरही मला एका चांडाळ चौकडीचा हीस्सा असणाऱ्याची अर्धांगिनी म्हणून उपेक्षित केलं जातंय ते दुःख ,ती पीडा असहनिय आहे माझ्या साठी ...."
"सत्य-असत्य यांच्या व्याख्या काय करता तुम्ही...?" " जे सूर्यबिंबा इतकं स्वच्छ आणि स्पष्ट दिसतंय ते ही नाकारता आहात ...?"
कर्ण आता मात्र सावध झाला ,उरवीचं हे बोलणं मात्र त्याला अजिबात रुचलं नाही .. "थांब जरा तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे .. स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्वश्रेष्ठ योद्धा असणं ही सामर्थ्यावर मिळवलेली संधी, मी कुणाच्या अहंकारा मुळे दवडली हे सांगशील ...?"
"सत्य तेंव्हाचं वेगळ होतं हे म्हणायचंय तुला ...? माझा स्वाभिमान,माझं सर्वस्व पणाला लावूनही फक्त उपेक्षेचा धनी झालो .. दुर्योधनानं त्या समयी मैत्रीचा मान राखला ...हे नाकारु शकतेस तू ..?"
"मलाही हेच म्हणायचंय की तुम्ही समर्थ असतांना पराजय का स्विकारलांत...?माघार का घेतलीत ..?अतुलनीय असं युद्ध कौशल्य दाखवलंत तुम्ही. एकही योद्धा बरोबरीही गाठू शकला नाही तुमची ,तुम्हाला आव्हान देणं गुरुवर्यांनाही शक्य नव्हत .... तुमचा स्वाभिमान ,पराक्रम याचं कोणतंही मूल्य नव्हतं तीथे तुम्ही साधा विरोधही दर्शवला नाही की निषेधही दर्शवला नाहीत..."
"नाथ एक सांगू ,जर आज सर्वश्रेष्ठ योद्धा असतात तर ...तर....माझ्या ऐवजी पांचाली आज इथे तुमची पट्टराणी असती .."
इतकं सहज हे ही सत्य स्विकारणं आणि ते प्रांजळपणानं कबुल करणं उरवीच करु शकत होती ...अचंबित झालेला कर्ण उरवी कडे कौतुकानं पहात होता वाग्चातुर्यात तीचा हात कोणीही धरु शकणार नाही हे मनोमन मान्य केलं त्यानं..
"तुम्ही कोणत्या नीती -धर्मांना जागून वागता आहात ..? क्षत्रिय कुलांत जन्म घेणं नव्हतं तुमच्या भाग्यात पण स्वतःला सिद्ध करुच शकता ,यासाठी कुणाच्या बाजूनं असणं तुमचं प्रजेच्या हीताचं आहे हे ही पहात नाहीये तुम्ही ... हस्तिनापुरातली प्रजा तुमच्या या निर्णयाचा विरोध करेल असं वाटतंय का तुम्हाला ...?की तुम्हालाच हे घडवून आणायचं नाहीये ... स्वतःच्या दुःखाला कवटाळून बसणं तुम्हाला योग्य वाटतंय...?"
"हा ,आरोप करते आहेस माझ्यावर उरवी ज्यांनी कायम मला पाण्यांत पाहीलं,पदोपदी अपमान केले ,त्यांच्या सोबत राहू म्हणतेस...?"
"जिचा उल्लेख केलास पांचाली,तीनंही मला स्वयंवरावेळी अव्हेरलं माझ्या पराक्रमा पेक्षा,शौर्यापेक्षा माझं कुळ कोणतं हे तीनं पाहीलं .. अशां शी वैर नको तर काय करू?"
\"जसा पार्थाला श्रीकृष्ण हवा आहे तसाच दुर्योधना पाशी कर्ण असणं हेच योग्य आहे ... नीती-अनीती,चूक -बरोबर मला पहायचच नाहीये ... जो माझ्या साठी आहे त्याच्या साठी मी आहे ... राजकारण ,अर्थकारण मला यातलं समजून घ्यायचच नाहीये ... एरवी मी सूत पुत्र असणंच ,तसंच वागणं नियतीला मान्य असावं ,क्षत्रियांचे कोणतेही गुण माझ्यात नाही आहेत हे तू विसरते आहेस ..."
सुर्योदयाची चिन्ह दिसू लागली .. प्राचिरावरचे स्तंभ एका वेगळ्याच स्वर्णिम तेजानं झळकत होते ... शिवालयातल्या घंटा नादांनी पावित्र्याचं ,मंगलमय ,उत्साही वातावरण निर्माण केलं ... नवीन संघर्षाची सुरुवात उरवी आणि कर्णात सुरु झालेली या प्राचिरानं पाहीली ...
"मान्य ,क्षत्रिय नाही तुम्ही ...
महापराक्रमी असलांत तरी विचारां मुळे आचारां मुळे झाकोळले जाता आहात .. इंद्रप्रस्थात घडलेल्या मानहानी च्या घटना या षडयंत्राचाच भाग होता पांडवांच्या हे मलाही मान्य आहे ... मय सभेत जी घटना घडली तीनं अस्वस्थ होतेय मी नाथ... दुर्योधन भाऊजींचा उताविळपणा नडला ... तरीही त्या मयसभेतल्या अपमाना पेक्षाही भयग्रस्त मला आणखी एक घटना करती आहे ,तुम्हा सर्वांनी पांचाली कडे बुभुक्षितासारखं पहाणं हे कुणाच्याही सहज लक्षात येण्या जोगं होतं ,तुम्ही ही अनुपम सौंदर्यावर लुब्ध होतात तीच्या ... पांचालीचं भेसूर हसणं आजही काळजाचं पाणी पाणी करतं माझ्या ..
"या कुरु वंशाचा सर्वनाश हीच काळ नागिणी सर्पिणी करणार आहे की काय या भयानं माझ्या जीवाचा थरकाप होतो आहे ...."
क्रमशः
©® लीना राजीव.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//