ईतिहासाची पुनरावृत्ती झाली तरी इतक्या अगतिक त्यागाचं पुन्हा सचेत होणं दुर्भाग्यच म्हणावं लागेल ...
काळाचं अमोघ अस्त्र या एकाच घटनेला फक्त स्पर्शून जावं ...तो आरंभ ही नको अंत ही नको ...अस्फुटांची वयोमर्यादा ठरवावी कुणी ..? महा मृत्युंजय जपातला कार्य कारण भावही विद्ध व्हावा ....सपुटांची आवर्तनं ही जपांतल्या काळसर्पाच्या सांगतेत संपावीत . विदीर्ण करणारा लाव्हा एका उत्पाताचा संकेत देत असेल तर महाभारत ही नुसती संकल्पना नव्हतीच .. साक्षीदार आणि भागीदार ही या घटनांचे पुन्हा त्या कालचक्रातलं सामिल होणं स्विकारणार नाहीत .....
उपेक्षिताचं जगणं,अवहेलना,संभ्रम या भावनांचे कल्लोळ आयुष्यभर झेलत जगणारा महारथी कर्ण ...युगांत होतांना त्यातली त्रिमिती ही समजून घेण्या पलीकडची ...
कुणासाठी जगायचं ..? कशासाठी लढायचं, कुणाच्या बाजूनं लढायचं ..?
जगतांनांचे ईतके अनिर्बंध प्रश्न स्वतःच्या आकलनाच्या कुवती बाहेर आहेत हे ठाऊक असूनही दृढ निश्चयी ,संयमित वागणारा कर्ण...
....तेजो वलयांची कवचकुंडले एका अनाहुत क्षणी अर्घ्य रुपात अर्पण करणारा दानशुर ...
उदात्त तेचं मुर्तीमंत देखणेपण ...
दुःखाची झालर शिशु असतांनाच पांघरली. ... कायम उपेक्षा,अवहेलना, अपमान सोसणं ..इतकी अगतिकता ती ही कशा साठी .? महापराक्रमी असणं हे ही शूला सारखं डसावं ..फक्त संयम,मर्यादा आणि विनम्रता याच्या जोरावर तोलायचं अपमानित होणं ...ईतिहास बदलायची कुवत असूनही कर्ण असा का वागला हे कोडंच आहे ...कर्णा बद्दल लिहावं तेवढं कमीच पण मला ईथे उर्वी कर्णाची द्वितिय भार्या तिचा उल्लेख आवर्जून करावांसा वाटतो ..प्रेमातलं समर्पण कीती पराकोटीचं असू शकतं हे उरवी जाणवून देते ..स्वतःचं अस्तित्व च पणाला लावणं , उपेक्षा होणारच हे गृहीत धरूनही आपले निर्णय अबाधित ठेवणं जमलंच नसतं कुणालाही ...
स्पर्धा युद्धातली बरोबरी ही न साधता अर्जुनानं जेंव्हा स्वतःचा पराभव ही खिलाडू वृत्तीनं स्विकारला नाही ..त्या क्षणातलं एका तेजस्वी ,महा पराक्रमी अत्यंत संयमित वागणाऱ्या कर्णावर लुब्ध होणं हे उरवीला कोणत्या गर्तेत घेऊन जाणार आहे हे लक्षात ही आलं नसेल ...अर्जुनाचा कींवा इतर कुणाचाही पती म्हणून स्विकार करणं जगमान्य होतंच पण तीचं भविष्य स्थिर ,समृद्ध झालंच असतं ..
मनस्वी आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही प्रेमापूढं हरणं तीनं मान्यच केलं नाही ..
आपल्या या निर्णयाचे पडसाद आपल्या माता -पित्यांसह ,जीवलगांना कीती क्लेशांचे अंतर्नाद भोगायला लावतील याची कल्पनाच आली नाही उरवीला ...ईतिहासात ही तीच्या या त्यागाचा कुठे ही फारसा उल्लेख नाही ...
स्वयंवरात ही मी कर्णालाच वरणार आहे हे जेंव्हा तीने वहुषाला सांगितलं काय झाली असेल त्याची अवस्था ... ?
रानजुईचा ,रातराणीचा मादक सुगंध प्रणयातुर असणाऱ्या युगुलांना बेधुंद केला नसता तर नवल ...कुठेतरी दूरवर शिवालयातल्या घंटानादांचे अनाहुत तरंग अनिलाच्या प्रवेगा समवेत कीत्येक घटीका उमटत राहीले ..निद्रिस्त देवतांना या कोटी स्वरतरंंगांच्या बरोबरीनं आपणच जागं करून यावं का असा भलतांच विचार कर्णाच्या मनांत चमकून गेला ... कशासाठी आहोत आपण ईथे ..? काय करतो आहोत ईथे ...? स्वप्न की आभास...गवाक्षातून आत येणारं शीतल ,दुधाळ चंद्रबिंबांचे लोलक ही आज दाहक वाटत होेतं ..चांदण्यांचा कैफ चढवणारी रात्र आज पण ती ही दग्धतेचा हळुवार शृंगार लेवून आलेली ...
बिलवर चूड्यांचा नाजूक कीणकीणणाटही ही सोसवेना झालाय ...रुणझुणत्या नुपुरांचे घायाळ करणारे नादही भ्रमिस्त करताहेत ..दोन्ही कर्णपटलांवर हात ठेवत कर्ण तसाच उभा राहीला ...
रेशमी ,मंत्रमुग्ध करणारी ,हवीहवीशी वाटणारी तीच सळसळ जेंव्हा बाजूलाच उभी राहीली तेंव्हा मात्र भानावर येणं जमवलं कर्णानं ...
नखशिखांत हीरेमाणिकांनी नटलेल्या आभूषणांचं तेजस्वी पण जास्त आहे की सलज्ज मनमोहीनी ,उर्वीच्या नेत्रातलं ..? नाजूक चण,तरी जबरदस्त आत्मविश्वास ,हळवी तितकीच हट्टी आणि मनस्वी ही.. तिच्या अनुपम सौंदर्याचं गुणगान ऐकीवात होतं ,कर्णानं तीला या आधी पाहीलं ही नव्हतं ..ती कशी आहे ,कशी असावी या फक्त कल्पनाच केलेल्या ...स्वयंवराचं निमंत्रण आलं तेंव्हा ही आश्चर्यचकित झालेला कर्ण आपल्या सारख्या आगंतुकाला निमंत्रण कसं काय स्वयंवराचं ...? ते ही आपण विवाहीत आहोत,दोन मुलांचे पिता आहोत हे माहीत असूनही ...? संभ्रमातच होता तो ..पण आलेलं निमंत्रण नाकारणं हे त्याच्या सारख्या विनयशील माणसाला शक्यच नव्हतं तो प्रघातही नव्हता ...
तरीही ऊत्सुकता होतीच या विवाहाची ..उर्वी अर्जुनालाच वरणार हे गृहीत धरलेलं सगळ्यांनीच ...एकतर ती बालपणापासून ची सखी होती कौरव -पांडवांची ...राजमाता कुंती आणि उर्वीची माता पुकेय देशाची महाराणी शुभ्रा या जीवलग मैत्रीणी होत्या ...उरवीचं हस्तिनापूरात येणं वरचेवर होत असलं तरी कर्णाशी याचा तिळमात्र संबंध नव्हता ,नसणारच होता ...
" कोणत्या उपकाराचं ओझं ठेवणार आहेस आता मस्तकावर ...?"
उर्वी या अनपेक्षित विचारलेल्या प्रश्नानं चपापली .....निदान आज तरी हा प्रश्न विचारायला नको होता ...सर्वस्वी अनोळखी माणूस ,फक्त भाळले मी याच्या पुरुषत्वावर ,सामर्थ्यावर,देखणेपणावर ..चुकले तर नाही ना ..?
पुन्हा तोच प्रश्न "का वरलंस मला ...?"
आता मात्र कर्णाला सामोरी जात उर्वीने त्याच्या कडे साशंकतेनं पाहीलं ...कर्ण या विवाहामुळे आनंदी नव्हता ,त्याचा म्लान चेहेरा पहातांच दचकली उरवी ...तीचे बोलके डोळे क्षणार्धात अश्रूंनी भरून आले ...ज्याच्यासाठी हे आरंभलंय , सुरु केलं तोच राजी नाहीये का या विवाहा ला ...? नव्हतांच का ...?
"उपकार .? तुम्हाला असं वाटतं ..?"
"मलाच का ?सगळ्या जगाला वाटतंय तसं ,वाटत असणार तसं .."
" कोणतं जग..?"
"वास्तवातलं जग."
"तू आणि मी वावरतोय ते जग .."
"माझ्यावर उपकारच केला आहेस तू स्वयंवरात मला वरलंस ,कुठला कोण उपरा ...
ईथे या या राजघराण्यांशी सोयर सुतक नसलेला .. मुळात मला स्वयंवराचं निमंत्रणच का दिलं गेलं ...? पुन्हा अपमानित होण्यासाठी...?
कोणता सूड उगवता आहात सगळे ...?"
" मी उपकार केलाय तुम्हाला वरुन ..?
सूड उगवतीय मी ...? ...मी ...?"
"हो ,नुसते दिखावे आहेत तुमचे ...माझ्या सारख्या यत्किंचित माणसाला नामोहरम करायच्या युक्त्या आहेत सगळ्या ..."
माझं सामर्थ्य ,माझा पराक्रम हा अहंकार नाहीये उरवी ...पदोपदी माझ्या अस्तित्वासाठी अपमान,उपेक्षा,मानहानी सोसणं या व्यतिरिक्त तुम्ही दिलंय काय मला ...? "
" तुझ्याशी स्वयंवर रचणं हा विचारही शिवला नव्हता माझ्या मनाला ...अजाणतेपणाचा कोणता वर्मी घाव घालणार आहेस ,तसं ठरवलंयस ...?"
" झालं तुमचं बोलून ..?येणारे कढ कसे बसे परतवून लावत ...उर्वी शांत व्हायचा प्रयत्न करत राहीली ...दुःखातिरेकानं थरथरणारा तिचा देह ,नववधुची कोणतीच संवेदना शिल्लक राहीली नसल्याचा आवेग सहन करत राहीली ..नीरव शांतता , जीवघेणी स्तब्धता वातावरणातला ताण कमालीचा वाढवत होती ...
" आपण हे आजच बोलायला हवं होतं का ?हे न उमजून कर्ण उर्वी थरथरणाऱ्या देहाकडे नुसतांच पहात राहीला ..पूढे होऊन तीला बाहुपाशात घ्यावं ,तीला धीर द्यावा अशी उत्कट ईच्छा क्षणभर जागीही झाली पण पुन्हा त्याच मानहानीच्या प्राणांतिक वेदना त्याला या मोहातून ही बाजूला काढत गेल्या ...
शेवटी उर्वी एका निश्चया पर्यंत आली की आज मोकळं मन केलं नाही तर राधेया पासून कायमची दूरावेन मी ...सत्य त्याच्या पर्यंत पोहोचवणं आजच गरजेचं आहे ...ज्याच्या भंरवशावर मी पुकेय सोडणार आहे ,माझ्या आप्त स्वकीयांची नाराजी ओढवून घेतलीय त्याचाच माझ्यावर विश्वास नसेल तर माझं जगणंच व्यर्थ होईल ...
डोळे कोरडे करत ती कर्णा समोर जाऊन उभी राहीली ...घशाशी येणारा आवंढा परतून लावत .तीनं कर्णाच्या डोळ्याला डोळे भिडवले ,तीच्या नितळ ,सात्विक,पारदर्शी हृदयाचा वेध घेणाऱ्या नजरेत नजर मिळवणं कठीण झालं राधेयाला ...नजर बांधून घातली तीनं जवळ जवळ ...
"तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ही नाही ही ..तुमच्या मनांतलं काहूर जाणवतंय मला ..शस्त्रास्त्र निपुणतेच्या स्पर्धे वेळी तुम्हाला पाहीलं ..एका प्रचंड उर्जेचा साक्षात्कार होता तो ..एकेक लक्ष्यवेध करतांना जराही विचलित न होणारा महारथी कर्ण ,तेजस्वी ,ओजस्वी कवचकुंडलांचा देखणा अधिधात्रा,दातृत्व ज्याच्या ठायी वसलंय,संयम,मर्यादा आणि विनम्रता ज्याची पाठराखण करतात असा राधेय ..प्रेमात पडले मी तेंव्हाच तुमच्या ..अर्जुना सारखा पराक्रमी वीर योद्धा ही स्वतःचा पराजय स्विकारु शकला नाही तीथं सहज शक्य अस तांना ही अहंकाराची बाधा न झालेला सूतपुत्र त्याच्या प्रेमात पडले मी ...या स्वयंवराला कोणाचीही संमती नव्हती ..आपल्या पेक्षा
उच्च श्रेणीतला अनुलोम मान्य आहे समाजाला पण प्रतिलोम मान्य नाही ,नसणार आहे हे माहीत असूनही सर्वस्व तुम्हालाच द्यायचं ठरवलं त्या दिवसा पासून ..हा उपकार आहे ..?हा सूड आहे ...?आप्तस्वकीयांचा ,समाजाचा, जीवलगांचा प्रखर विरोध पत्करून ही तुमचा स्विकार करणं कुटील कारस्थान वाटतं तुम्हाला ..?माझी आहुती दिलीय मी या अग्नीप्रवेशासाठी ..तरीही विश्वास नाही तुमचा माझ्यावर ..?असं असेल तर मला मार्ग कोणता उरतो देहत्यागा शिवाय ..?"मानहानी,उपेक्षा,विद्वेश ,तिरस्कार याचं दर्शन विवाह वेदी वरच झालं आपल्याला...युद्ध भुमीच व्हायची बाकी राहीलं होतं ...तरीही माझा निर्णय बदलला नसता ..माधवानं मध्यस्थी केली नसती तर प्रचंड उत्पात घडला असता हे नाकारताय का तुम्ही ...?"
उरवी च्या वाक्यचातुर्यापुढे नामोहरम झालेला कर्ण आवाक् होऊन तीचा हा प्रपात ,उद्वेग झेलत राहीला ..समर्पणाची ही नवीन व्याख्या त्याच्या आकलना पलीकडची होती ...कायम तिरस्कार,अवहेलनांचे पडसाद रीचवत प्रत्येक क्षण व्यतित करणारा कर्ण या युवराज्ञीच्या प्रेमात त्याच क्षणी पडला ...उरवी आता आपली जबाबदारी नाईलाजानं होणार आहे ही भावना नाहीशीच झाली .. तीच्या विद्ध हरीणी सारख्या चंचल नेत्रकटाक्षात भरकटत गेला .एका अनावर क्षणी त्यानं पूढं होऊन तीला बाहुपाशात ओढून घेतलं "पुढं काहीही बोलू नकोस .." असं म्हणत त्यानं तीच्या मस्तकावर आपले थरथरणारे अधर टेकवले ....तीच्या त्या घायाळ करणाऱ्या नेत्रकटाक्षांनी केंव्हाच विद्ध झाला होता तो ..
©लीना राजीव .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा