Login

उपकाराची जाणीव भाग 1

About Favour

"वृषाली, तुला एकदा सांगितले ना...नाही जायचे लग्नाला म्हणजे नाही जायचे..."

विनय आपल्या पत्नीला,वृषालीला रागाने म्हणाला.

"अहो, आतापर्यंत मी तुम्ही सांगितले तसेच तर वागत आले आहे ना...मनातील माझ्या इच्छांना कधी व्यक्त केले नाही. माझ्या इच्छांचा तुम्ही कधी विचार केला नाही.

लग्नाला जाणे ही माझी फक्त इच्छा नाही तर माझ्या माहेरचाही विचार करते आहे. त्यांनाही माझ्याकडून काही अपेक्षा आहेत ना?
माझ्या माहेरी काही कार्यक्रम असला आणि इकडे सासरी काही कार्यक्रम किंवा काही काम निघाले की मला तुम्ही माहेरी पाठवत नाही. मी न गेल्यामुळे त्यांनाही राग येतो, त्यांना वाईट वाटते ना!

माझ्यासारख्या सासुरवाशीण स्त्रियांना सासर व माहेर अशा दोन्हीकडच्या जबाबदार्‍या सांभाळाव्या लागतात. एक जबाबदारी सांभाळताना दुसरी नाही सांभाळली गेली तर ...कोणीतरी नाराज होतेच आणि मग बोलणी आम्हांलाच ऐकावी लागतात.

आतापर्यंत मी माहेरापेक्षा, सासरच्या कार्यक्रमांना जास्त प्राधान्य देत गेले. आता माझ्या काकांच्या मुलीचे लग्न आहे. मला सर्वांनी बोलावले आहे. तुम्ही माझाही विचार करा ना थोडासा आणि मला जाऊ द्या लग्नाला."

वृषालीही थोड्या रागातच म्हणाली.


"इकडे ताईच्या सासर्‍यांचा 75 व्या वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. तू आली नाही तर चांगले दिसेल का? ताईच्या सासरचे लोक तिला बोलणार नाही का? याचा तू विचार का करत नाही."

विनय आपले म्हणते मांडत म्हणाला.

"अहो, या कार्यक्रमाला जाण्यासाठी आई आहेत. तुम्ही,मोठे दादा व वहिनी आहेत. तुम्ही एवढे सर्वजण आहेत मग तरीही ताईंचे सासरचे का बोलतील? मी काही मुद्दाम थोडी असे करते आहे का? आमच्या घरचेच लग्न आहे ना? तुम्ही माझ्या जागी राहून विचार करा ना. तुम्हांला जशी तुमच्या नात्यांची काळजी, प्रेम वाटते तसे मलाही माझ्या माहेरच्या नात्याबद्दल वाटत असेल ना?"

विनयच्या म्हणण्यावर उत्तर देत वृषाली म्हणाली.

"अगं, तूच एकटी अशी माहेरची काळजी करणारी नाही आहे. ताईलाही आहे माहेरची काळजी; पण ती सासरचीही किती काळजी घेते. आता तिच्या सासर्‍यांच्या वाढदिवसाचे तीच तर सर्व जबाबदारी सांभाळत आहे. तिच्या गुणांचे सासरी किती कौतुक करतात सर्व.
फक्त तू व ताईच नाहीतर सर्व स्त्रियांना सासरची जबाबदारी,नाते सांभाळावेच लागते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताईचे आपल्यावर खूप उपकार आहेत, त्याची जाणीव ठेवून आपण वागले पाहिजे..."


विनयला अजून काही म्हणायचे होते; पण तेवढ्यात त्याला एक महत्त्वाचा फोन आला, त्यामुळे तो फोन येताच काही कामासाठी घराबाहेर निघून गेला.

क्रमश:
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all