Login

उपवास स्पेशल - कच्च्या केळीची उसळ

बनते झटपट... लागते चटपट.. खमंग चटकदार गुणकारी कच्च्या केळीची उसळ.


उपवास स्पेशल - कच्च्या केळीची उसळ

साहित्य - ४ ते ५ कच्ची केळी, २-३ टेबलस्पून शेंगदाणा तेल/तूप, ४-५ हिरव्या मिरच्या, १ वाटी शेंगदाणा कूट (जाडसर), १ लिंबू, सैंधव मीठ, साखर.

कृती - केळीचे साल काढून केळी जाडसर खिसून घ्यावी. कढईत शेंगदाणा तेल अथवा तूप घालून चांगले तापले की हिरव्या मिरचीचे तुकडे घालून थोडे परतून घ्यावे. ज्यांना अगदी खमंग खायला आवडतं त्यांनी मिरचीच्या तुकड्यांसोबत अर्धा चमचा तिखट घालावे. खीस घालून थोडे परतून घ्यावे. जाडसर शेंगदाणा कूट आणि चवीनुसार सैंधव मीठ घालून थोडे परतून घ्यावे. झाकण ठेवून ३-४ मिनिटांत एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर एक लिंबू आणि अर्धा टीस्पून साखर घालून उसळीला पुन्हा एक वाफ आली की गॅस बंद करावा. ही हटके उसळ गरमागरम सर्व्ह करावी. खुसखुशीत आणि खमंग अशी ही कच्च्या केळीची उसळ अगदी झटपट बनते आणि दह्याच्या चटणीसोबत/दह्यासोबत खाल्लेली ही प्लेटभर उसळ उपवास असल्याची जाणीव होऊ देत नाही. विशेष म्हणजे इतर उपवासाच्या पदार्थांमुळे होणारी जळजळ या उसळी मुळे नक्कीच होत नाही.


गुणधर्म : साबुदाणा हा पचनास अत्यंत जड असतो तर भगर बरेचदा उपवासात वर्ज असते. अशावेळी भरपूर फायबर आणि स्टार्च असलेली कच्ची केळी अत्यंत गुणकारी ठरते. लठ्ठपणा तसेच बध्दकोष्ठता यावर कच्ची केळी उपायकारक तर ठरतेच परंतु या केळीच्या सेवनाने भूकेवर नियंत्रण येते. कच्च्या केळ्यामुळे प्राथमिक स्टेजमधील डायबिटीज नियंत्रणात यायला मदत होते.

टीप : कच्च्या केळी खिसून घेतल्यावर लगेचच उसळ बनवावी. अथवा पाण्यात लिंबूरस घालून त्यात केळीचा खीस ठेवल्यास खिसाचा रंग काळा पडत नाही. मात्र उसळ करते वेळी हे पाणी पूर्णतः निथळून घ्यावे.

तेव्हा या नवरात्रीत ही चटकदार झटपट उसळ अवश्य बनवा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका.