Login

अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

(सदर कथा ही काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्ती, प्रसंग घटनेशी काहीही संबंध नाही असल्यास योगायोग समजावा)

अनटोल्ड कन्फेशन्स..


“विकी, ऐक ना. या रविवारी तुझा काय प्लॅन आहे?”

यामिनीने चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवला आणि कप उचलून विक्रमच्या पुढे धरत त्याला प्रश्न केला.

“मला काम आहे थोडं. बाहेर जायचंय. का गं?”

विक्रमने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.

“तुझं हे नेहमीचंच आहे विकी, तू कधीच मला वेळ देत नाहीस.”

यामिनी नाराज होत म्हणाली.

“कम ऑन यार! यू नो माय जॉब अँड हाऊ मच इट इज इम्पॉर्टन्ट टू मी.”

“याह, आय नो, पण कधीतरी बायकोलाही वेळ देत जा ना की, बायको इम्पॉर्टन्ट नाहीये तुझ्यासाठी?”

यामिनी गाल फुगवून सोफ्यावर बसली.

“अरे यार, असं का म्हणतेस? बोल काय करायचंय?”

“राहू देत. तू जा.. तुला काम आहे ना!”

“अगं, बोल ना स्वीटहार्ट, अशी रागावू नकोस ना.”

विक्रम तिला समजावणीच्या सुरात म्हणाला.

“अरे, रविवारी मिस्टर अँड मिसेस सिंघानिया यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे.”

“कोण सिंघानिया?”

“अरे, त्या आमच्या लेडीज क्लबच्या मेंबर आहेत. त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे म्हणे. इतक्या श्रीमंत असूनही अजिबात गर्व नाही बघ. सर्वांशी खूप छान वागतात. मिसेस सिंघानिया किटी पार्टीला आपल्या घरी आल्या होत्या, नेमका तू तेव्हा टूरवर होतास. त्यामुळे म्हणून आता त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी पार्टीला आमंत्रित केलंय.”

“ओह्ह नो. पार्टी? तुला माहितीये ना? मला हे पार्टी अँन ऑल आवडत नाही. उगीच गर्दी, वेळ वाया घालवायचा, सगळ्यांशी बळजबरीने हसून बोलायचं, हे किती कठीण काम आहे आणि असंही माझ्या प्रोफेशनमुळे कोणी माझ्याशी फारसं बोलायलाही येत नाही. नको ना यार प्लिज! त्यापेक्षा आपण दोघेच कुठेतरी बाहेर छान फिरायला जाऊ.”

“नाही हं विकी, आपण पार्टीला जायचंय. आपल्या सोसायटीतल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या नवऱ्यांना आपल्यासोबत घेऊन पार्टीला येतात आणि मी मात्र एकटी असते. तू कधीच माझ्यासोबत नसतोस. तुझ्या नवऱ्याला तुझ्यासोबत राहायला आवडत नाही की काय असं म्हणून माझ्या मैत्रिणी मला चिडवत असतात. यावेळेस मी विकीला सोबत घेऊन येईनच, असं मी त्यांना प्रॉमिस केलंय. तेव्हा आपण त्या पार्टीला जायचं म्हणजे जायचंच. मला काही माहित नाही.”

यामिनीने हट्ट केला.

“असंही माझ्या नोकरीमुळे मी तिला फारसा वेळ देत नाही म्हणून ती नाराज असते. निदान तिची ही छोटीशी इच्छा तरी पूर्ण करूया. तेवढीच ती खूश होईल.”

विक्रम जरासं हसून मनातल्या मनात पुटपुटला.

“हं. मग आता काय! राणीसरकारांचं मला ऐकावंच लागेल ना? ठीक आहे, आपण जाऊ या. कुठे आहे पार्टी?”

विक्रमने हातातला रिकामा चहाचा कप ट्रेमध्ये ठेवत तिला विचारलं.

“त्यांच्या बंगल्यावर, तीन चार किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यांचा बंगला.”

“तुला कसं माहीत? तू कधी त्यांच्या घरी गेलीस का?”

“किती प्रश्न विचारतोस विकी? तुझ्या प्रोफेशनचा प्रभाव इथे पण?”

“अगं, मी तर सहज विचारलं. नसेल सांगायचं तर राहू दे पण अशी चिडू नकोस.”

विक्रम शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला.

“तसं नाही विकी, मी त्यांच्या घरी कधी गेले नाही पण त्यांनी मला मागे एकदा सांगितलं होतं आणि असंही त्यांनी मला माझ्या व्हाट्सअपला लोकेशन शेअर केलंय. मी तुला तो मेसेज फॉरवर्ड करते.”

असं म्हणत यामिनीने विक्रमच्या व्हाट्सअपवर मेसेज फॉरवर्ड केला.

“बरं, म्हणजे आता तुझं ऐकावंच लागेल नं? काय करणार बाबा, मी एक साधा गरीब बिचारा नवरा!”

“तू आणि गरीब बिचारा नवरा? काहीही! चल आवर पटकन. ब्रेकफास्ट करून घे आणि मला सिटीमॉलला ड्रॉप कर. मला पार्टीसाठी थोडी शॉपिंग करायचीय.”

“जो हुकूम राणीसरकार!”

विक्रम यामिनीकडे पाहून मिश्किलपणे म्हणाला आणि त्याने स्वतःचं आवरायला घेतलं. यामिनी त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. पार्टीला जाण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. सतत आपल्या कामात व्यस्त असणाऱ्या नवऱ्याला पार्टीला येण्यासाठी तयार करणारी यामिनी आजच्या मिशनमध्ये नक्कीच जिंकली होती.

विक्रम आणि यामिनी छान सुखी नवदांपत्य. नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं. खरंतर कॉलेजमध्ये असल्यापासून ती त्याला आवडायची. ती होतीच तशी. सुंदर, देखणी तर ती होतीच पण कमालीची उत्साही, तडफदारही होती. कॉलेजच्या गॅदरिंगला प्रत्येक वर्षी तीच निवेदन करायची. तिच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता. कायम इतरांच्या मदतीला उभी राहायची, कोणावर अन्याय झाला तर भांडायची सुद्धा. कॉलेजमधली टारगट मुलं तिला जरा वचकूनच असायची. तिची बोलण्याची अदा, तिचं आकर्षक राहणीमान, तिचा तो आत्मविश्वास, धडाडी वृत्ती विक्रमला यामिनीकडे खेचत होती. विक्रमला ती खूप आवडायची पण कधी यामिनीला बोलून दाखवण्याची त्याची हिंमत झाली नव्हती. पुढे कॉलेज संपलं आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले. यामिनीने पोस्ट ग्रॅज्यूएशन केलं आणि विक्रम स्पर्धा परीक्षा देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. क्राईम ब्रँच विभागात ऑफिसर म्हणून रुजू झाला. त्यानंतर मग त्याने यामिनीबद्दल घरी सांगितलं आणि मग त्याच्या घरच्यांनी यामिनीला रीतसर मागणी घातली. यामिनीच्या घरच्यांनाही विक्रम आवडला. इतकं चांगलं स्थळ शिवाय इतका हुशार, कर्तबगार जावई कोणाला आवडणार नाही. त्यांनी विक्रम आणि यामिनीचं थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्नाचे सारे सोपस्कार आटोपून थोड्या दिवसांनी विक्रमला कामावर रुजू व्हायचं होतं. त्यामुळे ती दोघं मुंबईतल्या ‘ग्रीनव्हेलीज’ नावाच्या उच्चभ्रू सोसायटीत राहायला आले होते.

विक्रम आणि यामिनी यांचा संसार सुरू झाला. विक्रम कायम त्याच्या कामात बिझी असायचा. त्याचं प्रोफेशनच तसं होतं, नवीन लग्न झालेलं असतानाही चोवीस चोवीस तास तो ऑफिसमध्येच असायचा. मग यामिनी घरात एकटी कंटाळून जायची. त्याच्याच सांगण्यावरून यामिनी शेजाऱ्यांशी थोडंफार बोलू लागली. हळूहळू यामिनीची सोसायटीतल्या इतर बायकांची ओळख झाली. सुरुवातीला ती त्यांच्याशी बोलताना बुजून जायची पण नंतर हळूहळू तिची त्यांच्याशी छान मैत्री झाली. त्यांच्यासोबत तिचं शॉपिंग, किटी पार्टी, क्लबला जाणं सुरू झालं. बऱ्याचदा बाहेर हॉटेलमध्ये जाणंही होऊ लागलं. क्लबमध्ये तिच्या नवीन ओळखी झाल्या. त्यापैकीच क्लबमधल्या एका मेंबरच्या लग्नाची पार्टी होती आणि त्यासाठी ती विक्रमला पार्टीला येण्यासाठी कंव्हिन्स करत होती.

विक्रम आणि यामिनी पार्टीला जातील का? पार्टीत काय घडेल? पाहूया पुढील भागात...

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all