तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..
अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ९
आदित्य सिंघानिया ही औद्योगिक क्षेत्रातली सुप्रसिद्ध व्यक्ती होती. त्यामुळे प्रसार माध्यमांनी रिया सिंघानिया आत्महत्या प्रकरण उचलून धरलं. या केसमध्ये विक्रम संशयित सापडल्याने चर्चांना उधाण आलं होतं. हाय प्रोफाईल केस असल्याने डीसीपी राघव शास्त्री यांच्यावरही एसीपी विक्रमला निलंबित करण्याची मागणी प्रसार माध्यमाकडून होऊ लागली. त्यामुळे नाईलाजाने काही दिवसांसाठी एसीपी विक्रमला निलंबित करण्यात आलं. एसीपी सिद्धार्थ मिसेस सिंघानिया सुसाईड केस लीड करत होता. त्यामुळे त्याच्या ऑर्डर फॉलो करत एसीपी देविका तपासासाठी ऑफिस बाहेर पडली. सिद्धार्थच्या सांगण्यानुसार देविका मिसेस सिघांनिया यांच्या आईबाबांच्या बंगल्यावर चौकशीसाठी गेली. रियाचे आई बाबा अजूनही दुःखातच होते. देविकाने विचारायला सुरुवात केली.
“नमस्कार, मी एसीपी देविका, तुमच्या मुलीबद्दल जे झालं ते खरंच खूप वाईट होतं. मी तुमचं दुःख समजू शकते पण मला माझं काम करावं लागेल. प्लिज मला मिसेस सिंघानियाबद्दल सांगा.”
रियाचे बाबा सांगू लागले.
“रिया आमची एकुलती एक मुलगी. खूपच शांत आणि सोज्वळ. कधी कोणाला दुखावलं नाही. खूप चांगली होती ओ..”
मुलीच्या आठवणींने त्यांना रडू येत होतं. ते पाहून देविकालाही गलबलून आलं.
“मिस्टर सिंघानिया आणि त्यांचं लग्न कधी झालं? त्यांच्या घरी काही त्रास वगैरे?”
“तीन वर्षांपूर्वी आदित्य आणि रियाचा विवाह झाला. रिया सुखातच होती म्हणजे ती कधीच आम्हाला काही बोलली नाही. उलट आदित्य तिची खूप काळजी घेतो. तिच्याशी प्रेमाने वागतो. सासुसासरे खूप चांगले आहेत असंच तिने आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे तिला सासरी काही त्रास असेल असं मला तर वाटत नाही.”
रियाचे बाबा म्हणाले.
“आणि ते त्रास का देतील? उलट सिंघानिया कुटुंबाशी सोयरीक करून एकप्रकारे आम्ही त्यांना मदतच केलीय. त्यांचा बिझनेस खूपच नुकसानीत चालला होता. तेंव्हा आम्ही त्यांच्या बुडीत कंपनीचे शेअर्स विकत घेऊन त्यांना आर्थिक मदत केली शिवाय आमच्या बिझनेसमध्ये त्यांना भागीदार करून घेतलं. आमची सगळी संपत्ती, मालमत्ता आमच्या एकुलत्या एक मुलीच्या नावावरच केली होती. त्यामुळे आम्हाला नाही वाटत की सिंघानिया कुटुंबातलं कोणी आमच्या रियाला त्रास देत असेल.”
“मग त्यांनी आत्महत्या का केली? त्या त्यांच्या आयुष्यात सुखी होत्या, आनंदी होत्या तर मग त्यांच्या हातून कोणती चुक झाली की त्यांनी स्वतःला संपवलं?”
देविकाने प्रश्न केला पण रियाच्या बाबांकडे देवकीच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
“आम्हाला खरंच काही माहित नाही ओ!”
“ठीक आहे. थँक्यू सो मच सर फॉर युवर कॉपरेशन. गरज वाटली तर मी पुन्हा येईन. आता निघते.”
असं म्हणून देविका तिथून निघाली. इकडे एसीपी सिद्धार्थ मिस्टर सिंघानिया यांच्या बंगल्यावर पोहचला. आदित्य अजूनही त्या दुःखातून सावरला नव्हता. त्याचे आई बाबाच्या डोळ्यातून अजूनही पाणी झरत होतं. आदित्यने सिद्धार्थला हॉलमध्ये बसायला सांगितलं. आदित्यने त्याच्या आई बाबांनाही बोलवून घेतलं. सिद्धार्थने बोलायला सुरुवात केली.
“मिस्टर सिंघानिया, मी डायरेक्ट विषयालाच हात घालतो. मला सांगा मिसेस सिंघानिया तुमच्या घरात खूष नव्हत्या? त्यांना इथे कसला त्रास होता?”
आदित्यने दीर्घ श्वास घेत बोलायला सुरुवात केली.
“नाही, रियाला इथे कसलाच त्रास नव्हता.”
“नक्की?”
हो खरंच, ती इथे फार सुखात होती.”
“मग ही औषधं कसली आहेत? तुम्ही खोटं बोलताय मिस्टर सिंघानिया. या डिप्रेशनवरच्या गोळ्या आहेत. तुमच्या मिसेस गेली वर्षभर या गोळया खाताहेत. त्या मानसिक आजारावरची औषध घेत आहेत. हे खरं आहे की नाही?”
एसीपी सिद्धार्थने त्याला थोडं दरडावून विचारलं तसा तो वरमला आणि म्हणाला,
“हो, हे खरं आहे की रिया डिप्रेशनवर ट्रीटमेंट घेत होती पण आम्हाला कारण माहित नाही कारण घरात तर तिला कसलाच त्रास नव्हता. हवं तर माझ्या आई बाबांना विचारा.”
आदित्यने त्याच्या आईवडिलांकडे पाहिलं. आदित्यच्या आईचा काळवंडलेला चेहरा पाहून सिद्धार्थला थोडा संशय आला. त्याने प्रश्नार्थक नजरेने आदित्यच्या आईवडिलांकडे पाहिलं. आदित्यच्या आईने बोलायला सुरुवात केली.
“रिया आम्हाला आमच्या मुलीसारखी होती. तिने सुद्धा आमच्यावर खूप माया केली. मुलीची जागा भरून काढली. आम्ही कधीच तिला दुखावलं नाही. उलट सिंघानिया एम्पायरची ती एकमेव मालक होती. आदित्यच्या बाबांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी आपल्या सुनेच्या म्हणजेच रियाच्या नावावर केली होती.”
असं म्हणून त्यांनी डोळ्याला पदर लावला.
“मला तुमच्या नोकर माणसांशी बोलायचं आहे.”
आदित्यने त्यांच्या नोकरांना आवाज दिला. सिद्धार्थने सर्वांची चौकशी केली पण सर्वांकडून रियाला कसलाच त्रास नव्हता. रियाचे सासू सासरे, आदित्य यांच्याविषयी सर्व नोकर चांगलंच बोलत होते. संशय येण्यासारखं त्याला फारसं काही जाणवलं नाही. सिद्धार्थ विचार करू लागला.
“ठीक आहे. लवकरच केसचा उलगडा होईलच. आता मी निघतो. गरज पडली तर पुन्हा येईन.”
असं म्हणून तो बंगल्याच्या बाहेर पडला. इतक्यात त्याला मागून कोणीतरी शुक शुक केल्यासारखं वाटलं. त्याने मागे वळून पाहिलं. त्या व्यक्तीने त्याला जवळ बोलवून घेतलं.
“साहेब, मी निमेश देसाई, सिंघानिया साहेबांच्या बंगल्यात आचारी म्हणून बरीच वर्षे काम पाहतोय. एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. ज्या दिवशी साहेबांच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होती त्याच सकाळी साहेबांचे लहान भाऊ नीरज साहेब घरी आले होते. साहेबांचे आईबाबा आणि नीरज साहेबांचं कडाक्याचं भांडण झालं होतं.”
“का? कशावरून भांडण झालं?”
सिद्धार्थने त्याला विचारलं.
“साहेबांच्या आईबाबांनी सर्व प्रॉपर्टी रिया मॅडमच्या नावावर केली म्हणून त्यांच्यात वाद सुरू झाला. तेंव्हा ते रिया मॅडमवर चिडून म्हणाले होते की, तू माझ्या आईवडिलांना फितवून सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतलीस. असं वाटतं की तुझाच जीव घ्यावा. मी तुला सोडणार नाही. तू मेल्याशिवाय इथे कोणालाच शांतता मिळणार नाही. तुझ्या मरणानेच सगळे सुखी होतील आणि ते तिथून रागाने तणतणत निघून गेले.”
“ओह्ह आय सी! असं घडलं तर! त्यांचा काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत का तुझ्याकडे?”
“हो साहेब, माझ्याकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे. साहेब, रिया मॅडम खूप चांगल्या होत्या. त्यांच्या गुन्हेगाराला शोधून काढा आणि चांगली कठोर शिक्षा द्या.”
“आपण लवकरच खऱ्या गुन्हेगाराचा शोध लावू.”
निमेशने हात जोडले आणि तो तिथून निघून गेला.
“मग मिसेस सिंघानियांनी आत्महत्या का केली? डिप्रेशनमध्ये जाऊन नसेल? की संपत्तीसाठी त्यांचा कोणी खुन केला असेल? पण कोणी?”
वाचकहो, तुम्हालाही हे प्रश्न नक्की पडलेच असतील. त्यासाठी कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा