अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ८

अनटोल्ड कन्फेशन्स..
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ८

“सिद्धार्थ, तुला वाटतं विकी असं काही करेल?”

देविकाने प्रश्न केला. तिला खूप नवल वाटत होतं.

“नाही गं.. मुळीच नाही. विक्रम असं काही करणारच नाही. मग पुरावे?”

सिद्धार्थने देविकाला विचारलं.

“हो तेच काही कळत नाही की, नेमकं काय झालं असेल? पण मला खात्री आहे की, विकी असं काही करणार नाही.”

देविका विचार करू लागली. इतक्यात विक्रम डीसीपी राघव सरांच्या केबिनमधून बाहेर आला आणि त्याने रागाने डेस्कवर हात आपटला.

“अरे विकी, काय करतोयस? कंट्रोल यार! स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळव जरा..”

एसीपी सिद्धार्थ त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

“कसा कंट्रोल करू? माझी काही चुक नसताना मला मुद्दाम या केसबाहेर ठेवलं जातंय. हे न कळण्याइतका मी काही मूर्ख नाही.”

“तसं काही नाहीये. आपण इतकी वर्ष त्यांच्या सोबत काम करतोय. मला सांग संशयिताला त्याच केसमध्ये समाविष्ट केल्याची एकतरी केस तुला आठवतेय का? घडलंय का असं कधी?”

“मग काय करू मी? नुसतं हातावर हात धरून गप्प पडून राहू? नाही जमणार ते मला. जे मी केलंच नाही त्याची शिक्षा मी का भोगू?”

विक्रम रागाने लालबुंद झाला होता. सिद्धार्थने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. देविकाने तिच्या डेस्कजवळ जाऊन पटकन थंडगार पिण्याच्या पाण्याची बाटली आणून विक्रमच्या हातात दिली. विक्रम पाणी प्यायल्यावर थोडा शांत झाला. मग एसीपी सिद्धार्थने बोलायला सुरुवात केली.

“हे बघ विक्रम, तुझे फिंगर प्रिंट्स मिसेस सिंघानिया यांच्या खोलीतल्या वस्तूंवर सापडलेत. तुझ्या काही वस्तू जसं की, तुझा लाईटर, रुमाल, तुझं घड्याळ ह्या साऱ्या गोष्टी तिथे सापडल्या. तुला मिसेस सिंघानिया यांच्यासोबत बोलताना बऱ्याच लोकांनी पाहिलंय त्यामुळे आता तू एक संशयित आहेस. राघव सरांनी सांगितल्याप्रमाणे तू आता ऑफिशली या केसवर काम करू शकत नाहीस. आता तुझं तू ठरव की स्वतःला तू कसा निर्दोष सिद्ध करशील.”

विक्रमने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. सिद्धार्थची नजर जणू अनऑफिशली तू या केसवर लक्ष देऊ शकतो हेच सांगू पाहत होती. विक्रम त्याच्याकडे किंचित हसून पाहिलं. सिद्धार्थ आणि देविका समजायचं ते समजून गेले आणि त्यांनी त्याला स्मित हास्य करत अनुमोदन केलं.

“चला तर मग, आपल्या नेहमीच्या ‘सागर कॅफे’ मध्ये बसून बोलू.”

सिद्धार्थ हसून म्हणाला.

इकडे डीसीपी राघव शास्त्री इन्स्पेक्टर नार्वेकरांशी बोलत होते.

“इन्स्पेक्टर, मान्य आहे की, एसीपी विक्रम सावंत यांचे फिंगर प्रिंट्स आणि त्याच्या काही वस्तू तुम्हाला त्या खोलीत मिळाल्या पण मी जितकं विक्रमला ओळखतो त्यावरून मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, तो असं काही करूच शकत नाही. खरा गुन्हेगार दुसराच कोणी आहे किंवा खरोखरीच मिसेस सिंघानिया यांनी आत्महत्या केली असेल. तुम्ही दुसऱ्या अँगलनेही विचार करा. आता ही केस आमच्या ताब्यात आलीच आहे आम्ही लवकरात लवकर सत्य सर्वांसमोर आणूच.”

“हो सर, काही मदत लागली तर नक्की सांगा. मी तुमच्या मदतीला नक्की येईन. आता मी येतो सर..”

असं म्हणत इन्स्पेक्टर नार्वेकरांनी त्यांच्यासमोर सॅल्यूट ठोकला आणि ते तिथून त्यांच्या कामाला निघून गेले.

एसीपी सिद्धार्थ आणि देविका यांच्या तपासाला सुरुवात झाली आणि विक्रम त्यांना अनऑफिशली मदत करणार होता. विक्रम ऑफिसमधून बाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग देविका आणि सिद्धार्थही बाहेर पडले. विक्रम आधीच त्यांची सागर कॅफेमध्ये वाट पाहत बसला होता. एसीपी सिद्धार्थ आणि देविका त्याला येऊन जॉईन झाले. देविकाने तीन नेस कॉफीची ऑर्डर केली. थोड्याच वेळात वेटर कॉफी घेऊन आला. तिघांना कॉफी देऊन निघून गेला. एसीपी सिद्धार्थने बोलायला सुरुवात केली.

“विकी आणि देवी, आपण पहिल्यापासून केसवर लक्ष देऊया. विकी मला नीट आठवून सांग त्या रात्री नेमकं काय घडलं? तू त्या खोलीत कसा पोहचलास?”

“मी तुला सुरुवातीपासून सांगतो.”

विक्रमने बोलायला सुरुवात केली.

“मिस्टर अँड मिसेस सिंघानिया यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होती. मला आणि यामिनीला आमंत्रण होतं म्हणून आम्ही पार्टीला गेलो होतो. पार्टी छान सूरू असताना मिसेस सिंघानिया माझ्या टेबलजवळ आल्या मला एका कोपऱ्यात घेऊन जात म्हणाल्या,

“मिस्टर विक्रम, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. आय नीड युअर हेल्प..”

त्या मला काहीतरी सांगत होत्या पण म्युझिक आणि लोकांच्या गोंगाटामुळे मला त्यांचं बोलणं नीट ऐकू येत नव्हतं. म्हणून मग त्यांनीच मला थोड्या वेळाने दुसऱ्या मजल्यावरच्या त्यांच्या खोलीत येऊन भेटायला सांगितलं. त्यानंतर मी मिस्टर सिंग आणि केळकरांसोबत होतो. एक पेग ड्रिंक घेतली. त्यानंतर यामिनी आणि मी डिनर केलं. घरी जायचं म्हणून आम्ही मिस्टर सिंघानिया आणि मिसेस सिंघानिया यांचा निरोप घ्यायला गेलो पण ते पार्टीत कुठेच दिसत नव्हते. मला सिंघानियांनी खोलीत बोलावल्याचं आठवलं आणि मी त्यांच्या बंगल्यात शिरलो आणि खोलीच्या दिशेने चालू लागलो. इतक्यात मला त्याच दिशेने गोळी झाडल्याचा आवाज आला. मी धावत खोलीत पोहचलो तर मिसेस सिंघानिया रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.”

विक्रम बोलता बोलता थांबला आणि त्या दोघांकडे पाहिलं. सिद्धार्थ आणि देविका नोटपॅडवर पॉईंट्स लिहून घेत होते.

“हं.. मग पुढे काय झालं?”

सिद्धार्थने प्रश्न केला.

“मग काय? माझ्यानंतर बाकीचे लोक तिथे आले. मी इन्स्पेक्टर नार्वेकरांना कॉल केला. पोलीस आले आणि त्यांनी पंचनामा करायला सुरुवात केली.”

“आणि मिस्टर सिंघानिया?”

“ते सर्वात शेवटी आले. पण सिद, पोलीस येईपर्यंत मी तिथे निरीक्षण करत होतो तेंव्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली; ती म्हणजे मिसेस सिंघानिया यांच्या उजव्या कानपट्टीवर गोळी लागली होती आणि बंदूक डाव्या हातात होतं. हे कसं शक्य आहे? डाव्या हातात बंदूक आणि गोळी उजव्या कानपट्टीवर? बंदूकपण उजव्याच हातात असायला हवी होती नं? कोणी असं उलट्या हाताने कसं गोळी मारून घेईल? दुसरी महत्वाची गोष्ट मिसेस सिंघानिया यांच्या उजव्या हातात आम्हाला एक लेटर सापडलं. त्यांच्या उजव्या कानपट्टीवर गोळी लागली होती पण या लेटरवर रक्ताचा हलकासा डागही नव्हता. हे कसं शक्य आहे?”

इतक्यात सिद्धार्थ त्याला थांबवत म्हणाला,

“पण विक्रम, मला सांग, दुसऱ्या कोणी खुन केला असेल तर तो समोरून बंदूक रोखेल नं? असं एका बाजूला उभं राहून खुन का करेल? आणि मग त्या सुसाईड नोटचं काय? त्या नोटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की माझ्या एका चुकीमुळे मी आत्महत्या करतेय. त्या कोणत्या चुकीबद्दल बोलत होत्या? अशी कोणती चुक ज्यामुळे त्यांना आत्महत्या करावीशी वाटली?”

सिद्धार्थचं बोलणं ऐकल्यावर विक्रमला एकदम मिस्टर सिंग आणि केळकरांचं बोलणं आठवलं. त्याचबरोबर यामिनीचं कारमधलं बोलणंही आठवलं.

“मिस्टर सिंघानिया आणि त्यांची सेक्रेटरी रोझी यांचं अफेयर असेल तर आपल्याला रोझीची चौकशी करावी लागेल आणि मिसेस सिंग यांच्या म्हणण्यानुसार रियाचं अफेअर असेल तर त्याचाही शोध घ्यावा लागेल.”

विक्रम विचार करत म्हणाला.

“हं.. सिद, तू म्हणतोस तो पॉईंट विचार करण्याचा आहे. खुनी समोरून गोळी झाडेल तो बाजूला कानपट्टीवर गोळी मारणार नाही पण जर मिसेस सिंघानिया यांचं आत्महत्या करणं आधीच ठरलेलं होतं तर त्या शांतपणे त्यांच्या खोलीत येऊन आत्महत्या करू शकल्या असत्या पण मी जेंव्हा त्यांच्या खोलीत पोहचलो तेंव्हा ड्रेसिंग टेबल आणि बेडवरच्या वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसल्या. जसं की त्या खोलीत त्या एकट्या नसून अजून त्यांच्या खोलीत कोणीतरी होतं आणि त्यांच्यात झटापट झाली असावी आणि त्यामुळे वस्तू विखूरलेल्या होत्या. हे तुला जरा ऑड नाही वाटत? आत्महत्या असेल तर खोलीतल्या वस्तू का पसरल्या असतील?”

“हं.. बरोबर आहे. एनी वे, मिसेस सिंघानिया कोणत्या चुकीबद्दल बोलत होत्या ते आपल्याला शोधावं लागणारचं आहे. विकी, तू एक काम कर, इन्स्पेक्टर नार्वेकरांनी तिथे हजर असलेल्या पाहुण्यांचे घेतलेले जबाब पुन्हा एकदा चेक कर. काही सापडतं का ते बघ. देवी, तू मिसेस सिंघानिया यांच्या आईबाबांकडे चौकशी कर आणि मी मिस्टर सिंघानिया यांच्या बंगल्यावर जाऊन काही सापडतंय का ते पाहतो. चला कामाला लागू या.. आणि हं.. डीसीपी राघव सरांना विकीच्या या केस इन्व्हॉल्व्हमेन्ट विषयी कळता कामा नये. समजलं?”

“हो रे बाबा, चल निघूया.”

असं म्हणत देविका उठून उभी राहिली. ते तिघेही केस तपासासाठी कॅफेच्या बाहेर पडले.

पुढे काय होतं? ही हत्या होती की आत्महत्या? पाहूया पुढील भागात.

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all