अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ७

अनटोल्ड कन्फेशन्स..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ७

“मलाही खूप नवल वाटलं; पण सर, ही गोष्ट खरी आहे.”

इन्स्पेक्टर नार्वेकर म्हणाले.

“काय झालं सर? काय आलेत रिपोर्ट्स?

विक्रमने प्रश्न केला.

“हे घे तूच बघ म्हणजे समजेल तुला.”

डीसीपी राघव यांनी रिपोर्ट्स विक्रमच्या हातात दिले. विक्रमने लिफाफा उघडून रिपोर्ट्स वाचायला सुरुवात केली.

“काय? व्हॉट नॉन्सेन्स! हे कसं शक्य आहे?”

“ते तुलाच माहित असेल ना?”

डीसीपी राघव शास्त्री चिडून म्हणाले.

“अहो सर, मला खरंच माहित नाही.”

विक्रम कळवळून म्हणाला.

“मग सांग, तू मिसेस सिंघानिया यांच्या खोलीत काय करत होतास? त्या ग्लासवर तुझे फिंगर प्रिंट्स कसे सापडले?”

डीसीपी राघव शास्त्रीनी प्रश्न केला.

“सर, आम्ही पार्टीत हजर असलेल्या लोकांची चौकशी केली तेंव्हा आम्हाला त्यांच्याकडून असं समजलं की, पार्टीतल्या बऱ्याच जणांनी एसीपी सावंत आणि मिसेस सिंघानिया यांना एका कोपऱ्यात उभं राहून बोलताना पाहिलं होतं आणि मिसेस रिया यांना गोळी लागली तेंव्हा त्यांच्या खोलीत सर्वात आधी पोहचणारे एसीपी सावंतच होते मग बाकीचे लोक तिथे आले. सर्वांनी त्यांनाच तिथे पाहिलं.”

इन्स्पेक्टर नार्वेकरांनी डीसीपी राघव शास्त्रीना सांगितलं.

“अहो पण नार्वेकर, मी असं का करेन? मिसेस रिया यांचा खुन करण्यासाठी माझ्याकडे काय मोटिव्ह असेल? मीच खुन केला आणि मीच तुम्हाला कॉल करून घटनास्थळी बोलवून घेतलं. या आणि मला पकडा.. व्हॉट नॉन्सेन्स! काहीही काय बोलता!”

विक्रम चिडून म्हणाला.

“मोटिव्ह काय होता हे तूच आम्हाला सांगायचंय विक्रम.. तू त्या खोलीत काय करत होतास? त्या ग्लासवर तुझ्या हाताचे फिंगरप्रिंट्स कसे सापडले? मिसेस रिया आणि तुला लोकांनी एकत्र बोलताना पाहिलं याचा अर्थ तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत होतात? की तुमच्या दोघांत काही?”

डीसीपी राघव संतापले होते.

“सर, तुम्ही समजता तसं काही नाहीये. त्या रात्री मी मिस्टर आणि मेसेस सिंघानिया यांना पहिल्यांदाच भेटलो. तेही माझ्या बायकोच्या हट्टापाई मी त्या पार्टीला गेलो. मी तिथे कोणालाच ओळखत नव्हतो. तिथे गेल्यावर सर्वांची ओळख झाली. आणि तुम्ही म्हणताय की मिसेस सिंघानिया यांना आधीपासूनच ओळखतो? सर, मी तुमच्या बरोबर गेली दोन वर्षांपासून काम करतोय. तुम्हाला वाटतं मी असं काही करेन?”

विक्रमने डीसीपी राघव सरांकडे आणि आपल्या सहकारी मित्रमैत्रिणींकडे पाहून प्रश्न केला.

“आम्हाला काही वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? हे पुरावेच सांगताहेत की तू तिथे होतास. तुम्हा दोघांना बोलताना लोकांनी पाहिलंय. आता तुला सांगायचंय की त्या रात्री मिसेस सिंघानिया यांनी तुला असं काय सांगितलं की तुला त्यांचा इतका राग आला आणि तू रागाच्या भरात त्यांचा खुन केलास?”

डीसीपी राघव चिडून म्हणाले.

“सर, मी मिसेस सिंघानिया यांचा खुन केलेला नाहीये. त्या रात्री लोकांनी आम्हाला बोलताना पाहिलं हे खरंय; पण नेमकं काय बोललो याची पडताळणी न करता तुम्ही असं कसं डायरेक्ट निष्कर्षावर पोहचता? त्या रात्री मिसेस सिंघानिया माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या,

“मिस्टर विक्रम मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. आय नीड युवर हेल्प.”

मी त्यांना काय मदत हवीय असं विचारल्यावर त्या मला सांगण्याचा प्रयत्न करत होत्या पण म्युजिक आणि लोकांच्या गोंगाटामुळे मला नीट ऐकू येत नव्हतं. तेंव्हा त्या म्हणाल्या की,

“थोडा वेळाने मी माझ्या खोलीत जाणार आहे. तुम्ही जेवण करून घ्या आणि माझ्या खोलीत या. तिथे आपल्याला नीट बोलता येईल पण यामीनीला सध्या तरी यातलं काही सांगू नका ”

मी त्यांच्या बोलण्याला होकार दिला. नंतर मी मिस्टर सिंग, केळकर यांच्या सोबत एक ड्रिंक घेतलं, गप्पा मारल्या आणि त्यानंतर यामिनी सोबत डिनर केलं. मिसेस सिंघानिया यांनी मला त्यांच्या खोलीत बोलवलं होतं हे मी साफ विसरून गेलो होतो. आम्ही दोघे घरी जाताना निरोप घ्यायला गेलो तेंव्हा ते दोघेही पार्टीत दिसले नाही. मग मला स्ट्राईक झालं की मिसेस सिंघानिया त्यांच्या खोलीत असतील आणि म्हणून मी बंगल्याच्या दिशेने चालू लागलो. इतक्यात गोळी झाडल्याचा आवाज आला आणि मी धावत त्यांच्या खोलीत पोहचलो तेंव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मला दिसल्या. बस इतकंच झालं सर, यावरून मीच खुन केला असं कसं म्हणता? मीच खुन केलाय हे सिद्ध होतं का?”

“ठीक आहे, पण नार्वेकरांनी सादर केलेल्या फिंगर प्रिंट्स एक्सपर्ट्सच्या रिपोर्टवरून सध्या तरी तू संशयित आहेस. त्यामुळे तुला सिंघानिया केसवर काम करता येणार नाही.”

डीसीपी राघव शास्त्रीनी आपला निर्णय सुनावला.

“पण सर, ही केस मी चांगल्या पद्धतीने हॅन्डल करू शकतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच काही केलेलं नाही.”

विक्रम पोटतिडकीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता पण डीसीपी राघव शास्त्री आपल्या निर्णयावर ठाम होते.

“हे बघ विक्रम, तुझ्या आता पर्यंतच्या चांगल्या कामामुळे मी तुला अटक करण्याचे आदेश देत नाहीये हेच तुझं नशीब समज आणि या केसपासून दूर रहा. समजलं? मी मिसेस सिंघानिया आत्महत्या केस एसीपी सिद्धार्थ आणि एसीपी देविकाकडे सोपवत आहे. सिद्धार्थ, ही केस तू लीड करशील आणि देविका तुला तपास कार्यात मदत करेल. गेटिंग माय पॉईंट? यू बोथ मे गो नाऊ..”

एसीपी सिद्धार्थने मान डोलावली आणि तो केबिनच्या बाहेर आला. त्याच्या मागोमाग एसीपी देविकाही बाहेर आली.

पुढे काय होतं? विक्रम खुनी आहे? पाहूया पुढच्या भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all