अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ६

अनटोल्ड कन्फेशन्स..
अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ६

यामिनी, विक्रम आणि इन्स्पेक्टर नार्वेकर एकमेकांशी बोलत बोलत बंगल्याबाहेर उभी असलेल्या पोलीसव्हॅनजवळ आले. इन्स्पेक्टर नार्वेकर विक्रमकडे पाहत म्हणाले,

“एसीपी विक्रम, आता आम्ही निघतो. जर काही आवश्यकता पडली तर तुम्हाला कॉल करेनच.”

“हो, नक्की. कधीही कॉल करा. मी असेन. शेवटी आपल्या दोघांचं क्षेत्र एकच आहे. जनतेच्या मदतीला कायम तत्पर..”

विक्रम हसून म्हणाला आणि केसविषयी थोडं बोलून त्यांचा निरोप घेतला. यामिनी आणि विक्रम दोघे कारमध्ये येऊन बसले. विक्रमने गाडी स्टार्ट केली. आता गाडी त्यांच्या घराच्या दिशेने धावू लागली. गाडीत दोघेही शांत होते. विक्रमच्या डोक्यात केसचा विचार सुरू होता.

“मिस्टर शेख असं का म्हणाले? खरंच रोझी आणि आदित्य सिंघानिया यांच्यात? मिस्टर शेख बोलता बोलता का थांबले? मिस्टर केळकरांनी त्यांना गप्प बसायला का सांगितलं? काहीतरी नक्कीच घडलंय. पण नेमकं काय?”

विक्रमच्या डोक्यात विचार सुरू होते. इतक्यात डोळ्यातलं पाणी पदराने टिपत यामिनी म्हणाली,

“विकी, हे असं का झालं असेल रे? मी या नवीन शहरात आल्यावर पहिल्यांदा इतकी मनापासून मैत्री केली होती. रिया खरंच खूप छान मैत्रीण होती. मग मिसेस सिंग असं का म्हणाल्या असतील?”

“काय म्हणाल्या मिसेस सिंग?”

विक्रमने चमकून तिच्याकडे पाहिलं.

“अरे त्या रियाबद्दल खुप चुकीचं बोलत होत्या. त्यांची कामवाली बाई सांगत होती म्हणे की, रियाचं अफेअर?”

“अच्छा? मग त्यांच्या कामवाली बाईला भेटायलाच हवं”

विक्रम गाडी चालवता चालवता म्हणाला. थोड्याच वेळात त्यांची गाडी सोसायटीच्या पार्किंगमध्ये येऊन पोहचली. यामिनी गाडीतून खाली उतरली आणि विक्रमने गाडी पार्किंगमध्ये पार्क केली. दोघे घरी पोहचले. दोघेही इतके दमले होते की घरी जाताच फ्रेश होऊन लगेच झोपायला गेले. बेडवर आडवं होताच विक्रम झोपी गेला पण यामिनी जागीच होती. रियाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देह राहून राहून तिच्या डोळ्यासमोर येत होता. डोळ्यातून पाणी आपोआप झरत होतं. केंव्हातरी उशिरा तिला डोळा लागला.

सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने यामिनीला जाग आली. तिने घड्याळात पाहिलं.

“बापरे! आठ वाजले? आज खूपच उशीर झालाय. विकी, ए विकी.. उठ लवकर. आठ वाजून गेलेत. पुन्हा ऑफिसला जायला उशीर होईल हं. उठ बघू.”

तिने पटकन केसांचा संभार सावरत आंबाडा घातला आणि पटकन फ्रेश व्हायला ती बाथरूममध्ये गेली. तिच्या आवाजाने विक्रमला जाग आली.

“अरे यार! किती लेट झालाय बघ. आता ऑफिसला जायला उशीर होणार. तू पण ना..”

विक्रम पटकन उठून बसला. खरंतर नेहमीपेक्षा थोडा जास्तच उशीर झाला होता. यामिनी फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिने पटकन ब्रेकफास्ट बनवायला घेतला. थोड्याच वेळात विक्रम तयार होऊन बाहेर हॉलमध्ये येऊन बसला. यामिनीने ब्रेकफास्ट आणि कॉफीचा ट्रे टीपॉयवर ठेवला आणि टीव्ही सुरू करून न्यूज चॅनल लावलं. न्यूज चॅनलवर बातमी झळकली.

“उद्योगपती आदित्य सिंघानिया यांच्या पत्नी रिया संघानिया यांची आत्महत्या.. पोलिसांचा तपास सुरू.. केस सीबीआयकडे सोपवण्याची रिया सिंघानिया यांच्या आईवडिलांची मागणी.”

“अरे हे काय! रात्रीची बातमी लगेच यांना कशी लागली? हे रिपोर्ट्स पण ना..”

यामिनी आश्चर्याने उद्गारली.

“फर्स्ट क्लास आता या केसमध्ये मला लक्ष घालता येईल.”

विक्रम आनंदून म्हणाला. इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलच्या स्क्रीनवर एसीपी सिद्धार्थचं, त्याच्या कलीगचं नाव झळकलं.

“हं.. बोल सिद्धार्थ.”

“अरे कुठे आहेस?”

“हे काय निघालोच.”

“अरे लवकर ये.. एक न्यूज आहे. ती रिया सिंघानिया आत्महत्या केस आपल्याकडे सोपवण्यात आली आहे. लवकर ये.. सर तुझी वाट पाहताहेत.”

“हो, हो.. आलोच.”

असं म्हणून विक्रमने कॉल कट केला.

“यामी, चल मी निघतो. केस आमच्याकडे आलीय. आता भरपूर काम असणार आहे. मला घरी यायला उशीर होईल. चल बाय.”

असं म्हणून विक्रमने यामिनीचा निरोप घेतला. थोड्याच वेळात तो ऑफिसला पोहचला आणि तडक डीसीपी राघव शास्त्री यांच्या केबिनमध्ये गेला. तिथे एसीपी सिद्धार्थ, एसीपी राजन आणि एसीपी देविका आधीच हजर होते.

“गुडमॉर्निंग सर,”

“ओह्ह! व्हेरी गुडमॉर्निंग, ये विक्रम.”

डीसीपी राघव बोलण्यासाठी खुर्चीतून उठले.

“विक्रम, आम्ही या केसच्या संदर्भातच बोलत होतो. तुला समजलं असेलच की, रिया सिंघानिया आत्महत्या केस आता सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबियांनी वरून दबाव आणून आपल्याला कामाला लावलंय. आपल्याला लवकरात लवकर या केसचा निकाल लावावा लागेल. मला खुद्द कमिशनरांचा फोन आला होता. माझ्यावर खूप प्रेशर आहे. चला कामाला लागू. मला सांग विक्रम, त्या पार्टीला तू पण गेला होतास ना? तिथे नेमकं काय झालं?”

विक्रमने रात्री घडलेला सर्व वृतांत सांगितला. विक्रम डीसीपी राघवशास्त्री यांच्याकडे पाहून म्हणाला.

“असं सगळं घडलं सर, पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्स आल्याखेरीज मिसेस सिंघानिया यांनी आत्महत्या का केली ते समजणार नाही. पण मला काय वाटतं सर….”

“अगदी बरोबर बोलतात एसीपी सावंत, रिपोर्ट्स आल्याशिवाय काही सांगता येणार नाही आणि आमच्याकडे फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्स आलेत.”

आत येत इन्स्पेक्टर नार्वेकर म्हणाले.

“अच्छा? रिपोर्ट्स आले? काय म्हणताहेत रिपोर्ट्स? बघू.”

डीसीपी राघव शास्त्री इन्स्पेक्टर नार्वेकरांकडे पाहून म्हणाले. नार्वेकरांनी रिपोर्ट्स डीसीपी राघव शास्त्री यांच्या हातात दिले. त्यांनी रिपोर्ट वाचायला सुरुवात केली तसं त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव पसरू लागले.

“इम्पोसीबल! हे शक्य नाही. असं कसं घडलं? काहीतरी गल्लत होतेय. असं कसं शक्य आहे? इन्स्पेक्टर नार्वेकर, आर यू शुअर?”

रिपोर्ट्स पाहून डीसीपी राघव शास्त्री यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य का पसरलं? त्यांचा चेहरा आश्चर्याने का भरून गेला? पाहूया पुढच्या भागात…

क्रमशः
निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all