अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ५

अनटोल्ड कन्फेशन्स..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ५

विक्रमने खोलीभर चौफेर नजर फिरवली. प्रशस्त खोली, एकीकडे कपड्यांची कपाटं, ड्रेसिंग टेबल, त्यावर अस्ताव्यस्त झालेली सौन्दर्यप्रसाधने, एका बाजूला वॉशरूम, पलीकडे बाल्कनी, मधोमध राजेशाही पद्धतीचा मोठा बेड आणि त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली रियाचा मृतदेह.. विक्रमने पत्र वाचलं आणि पुन्हा त्यांच्या हातात दिलं. त्याने इन्स्पेक्टर नार्वेकरांना काहीच उत्तर दिलं नाही.

“इन्स्पेक्टर, आधी तुम्ही फिंगरप्रिंट एक्स्पर्ट्सना बोलवून घ्या. पोस्टमार्टम आणि फिंगरप्रिंट एक्स्पर्टचे रिपोर्ट आल्याशिवाय काही बोलता येणार नाही. पण तरीही मला असं वाटतं….”

विक्रम बोलता बोलता मधेच थांबला. तो रियाच्या बॉडीकडे पाहून विचार करू लागला. नार्वेकरांना विक्रमचं म्हणणं पटलं आणि त्यांनी पटकन फिंगरप्रिंट एक्स्पर्ट्सना बोलावून घेतलं. थोड्याच वेळात एक्स्पर्ट्स आले आणि पंचनाम्याला सुरुवात झाली.

थोड्या वेळाने इन्स्पेक्टर नार्वेकर आणि विक्रम रियाच्या खोलीतून बाहेर हॉलमध्ये आले. हॉलमध्ये कॉन्स्टेबल शिंदे आलेल्या पाहुण्यांचे जबाब लिहून घेत होते. लेडी कॉन्स्टेबल जाधव हॉलमध्ये उपस्थित असलेल्या बायकांची झडती घेत होत्या आणि कॉन्स्टेबल सोनटक्के मॅडम आणि फिंगरप्रिंट एक्स्पर्ट्स उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे दोन्ही हातांचे पंजे निळ्या शाईत बुडवून फिंगरप्रिंट्स गोळा करत होते. कॉनस्टेबल सुर्वेनी रियाच्या खोलीचा कप्पा न कप्पा तपासला. तिथे सापडलेल्या वस्तू फोरन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या. इतक्यात सुर्वेनी काही औषधांची पाकिटं गोळा करून प्लास्टिकच्या पिशवीत भरून आणली.

“कसली औषधं आहेत ही?”

विक्रमने प्रश्न केला.

“नाही माहित सर, फॉरेन्सिक लॅबला पाठवून देतो. त्यानंतर कळेलच आपल्याला. कशासाठी आणि कोणाची औषधं आहेत ती?”

काँस्टेबल सुर्वे उत्तरले. तपासाची प्रक्रिया सुरू झाली होती. विक्रम हॉलमध्ये जमा असलेल्या सर्व पाहुण्यांचं सूक्ष्म निरीक्षण करत होता. इतक्यात विक्रम इन्स्पेक्टर नार्वेकरांना सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात मोठ्यानं म्हणाला,

“मिसेस सिंघानिया यांच्याकडे सापडलेल्या पत्रावरून तर त्यांनी आत्महत्या केलीय हे स्पष्ट दिसतंय. आता आपल्याला त्यांच्या आत्महत्येमागचं कारण शोधायचं आहे.”

नार्वेकरांनी त्याच्याकडे एकदम चमकून पाहिलं,

“अरे, आता खोलीत तर तपासणी केल्याशिवाय सांगता येणार नाही असं म्हणाले होते. मग आता सर्वांसमोर आत्महत्येचा विषय का काढला असेल? क्राईम ब्रँच ऑफिसर आहे तेंव्हा केसची गोपनीयता काय असते हे तर त्यांना नक्कीच माहित असेल. मग असं?”

नार्वेकरांना प्रश्न पडला. विक्रमची युक्ती कामी आली. बायकांत कुजबुज सुरू झाली.

“ओह्ह नो! इट्स अ शॉकिंग न्यूज! रियाने आत्महत्या केली? पण का?”

मिसेस केळकर आश्चर्याने म्हणाल्या.

“हो नं, मला कळत नाही. रिया आत्महत्या का करेल? सगळं छान होतं. कायम हसतमुख असायची. नेहमी नवरा, सासुसासऱ्यांचं कौतुक करायची. इतका प्रेमळ नवरा! सासू सासरे इतके चांगले होते की तिला कधी तिच्या जन्मदात्या आईवडिलांची आठवण सुद्धा होऊ दिली नाही.”

मिसेस पारेख म्हणाल्या.

“तुम्हाला कसं माहित?”

मिसेस सिंग यांनी प्रश्न केला.

“अहो, मागे एकदा तिनेच सांगितलं होतं नं.”

मिसेस पारेख यांनी उत्तर दिलं.

“मग आत्महत्या करण्याचं कारण काय? पैसा, संपत्ती कशाचीही कमतरता नव्हती. सगळी सुखं रियाच्या पायाशी लोळण घालत होती. तुम्हाला काय वाटतं मिसेस पारेख, काय कारण असेल? तिने आत्महत्या का केली असेल?”

“अफेअर?”

मिसेस सिंग हळूच म्हणाल्या.

“कोणाचं? नाही हं.. काहीही काय बोलता मिसेस सिंग? रिया तशी मुलगी नव्हती.”

यामिनी मध्येच म्हणाली.

“यामी, तू तिला कितीशी ओळखतेस? आताच काही दिवसांपूर्वी तुमची लेडीजक्लबमध्ये ओळख झाली. मग तिच्याबद्दल तुला ठाऊक आहे? आम्ही तिला खूप आधी पासून ओळखतोय. तशी ती फार चांगली होती पण कोणाचं काय सांगावं ना? आमची कामवाली बाई तर म्हणत होती…”

मिसेस सिंग बोलता बोलता थांबल्या. मिसेस पारेख यांनी हळूच त्यांचा हात दाबला तशा त्या शांत झाल्या. त्यांचं वागणं यामिनीच्या लक्षात आलं पण ती काही बोलली नाही. विक्रमची नजर चौफेर फिरत होती. त्याचे कान कानोसा घेत जमलेल्या पाहुण्यांचं बोलणं टिपत होते. सर्वांच्या हालचालीवर त्याची सूक्ष्म नजर होती.

“बापरे! लग्नाच्या वाढदिवसाला आत्महत्या केली म्हणजे नक्कीच खूप टेन्शनमध्ये असणार. बिच्चाऱ्या!”

मिस्टर शेख सहानुभूतीने म्हणाले.

“तुला काय वाटतं केळकर? काय कारण असेल रे? मिस्टर सिंघानिया तर कारणीभूत नसतील ना? त्यांची सेक्रेटरी रोझी बद्दल ठाऊक आहे ना आपल्याला..”

मिस्टर शेख दबक्या स्वरात म्हणाले.

“शू.. शांत बस यार! आपल्याला कोणाच्या लफड्यात अडकायचं नाही. आपल्याला आपले व्याप कमी आहेत का म्हणून उगीच ही ब्याद मागे लावून घ्यायची?”

मिस्टर केळकरांनी आपल्याला तोंडावर बोट ठेवून मिस्टर शेख यांना शांत राहायला सांगितलं तसे ते गप्प बसले परंतू त्यांचं बोलणं विक्रमच्या कानावर पडलंच. इतक्यात इन्स्पेक्टर नार्वेकर रियाच्या घरच्यांकडे पाहून म्हणाले,

“मिस्टर सिंघानिया, जे घडलं ते वाईट आहे. आम्ही आमचा तपास सुरू केलाय. बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवून दिली आहे. त्याचे रिपोर्ट्स आल्यावरच त्यांची बॉडी तुमच्या ताब्यात देण्यात येईल. त्यांच्या मृत्यूमागचं कारण समोर येत नाही तोपर्यंत हा तपास सुरू राहील. सुर्वे, सर्वांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहून ठेवा. गरज लागली तर त्यांना चौकशीसाठी यावं लागेल. कदाचित आपल्यालाही जायला लागू शकतं.”

इन्स्पेक्टर नार्वेकर पाहुण्यांकडे पाहत पुढे म्हणाले,

“पंचनामा झालाय. आम्ही तुमच्या सर्वांचे जबाब घेतलेत. आता तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता पण चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं तर तुम्हाला पोलीसस्टेशनला यावं लागेल किंवा पोलीसही तुमच्या घरी येऊ शकतील. तेंव्हा तुम्हाला जे काही माहित असेल अगदी छोट्यातली छोटी गोष्टही पोलिसांना सांगा आणि पोलिसांना सहकार्य करा. दुसरी गोष्ट म्हणजे तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणालाही शहराबाहेर जाता येणार नाही.”

इन्स्पेक्टर नार्वेकरांनी स्पष्ट शब्दात पाहुण्यांना जणू तंबीच दिली होती. त्यानंतर नार्वेकरांनी रियाची खोली सिलबंद केली. पाहुण्यांना घरी जाण्याची अनुमती दिली. सिंघानिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. रियाचे आई बाबा, तिचे सासूसासरे तिच्या जाण्याने शोकाकुल झाले होते. सिंघानिया परिवाराचे जवळचे नातेवाईक आणि काही मित्रपरिवार त्यांच्यासोबत थांबला होता आणि बाकीचे एकेक जण त्यांचं सांत्वन करत तिथून निघून जात होते. यामिनी आणि विक्रमही तिथून बाहेर पडले.

सर्वांनी तिथून निरोप घेतला खरा पण रियाने आत्महत्या का केली असेल हा प्रश्न मात्र सर्वांच्या मनाला भेडसावत होता.

पुढे काय होतं? रियाने आत्महत्या का केली? पाहूया पुढच्या भागात…

क्रमशः
निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all