अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ४

अनटोल्ड कन्फेशन्स


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ४

सर्वजण खोलीजवळ येऊन थांबले. समोरचं दृश्य पाहून सर्वांचीच भीतीने गाळण उडाली होती. रिया रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि समोर विक्रम उभा होता. इतक्यात तिथे यामिनी, आदित्यही आले. रियाला रक्ताच्या थारोळ्यात पाहुन आदित्यला काय बोलावं सुचेना. तो प्रचंड घाबरलेला होता.

“ओह्ह नो.. हे काय झालं? रिया, रिया.. काय झालं तुला?”

तो रियाच्या बेडच्या दिशेने धावत आला.

“एक मिनिट मिस्टर सिंघानिया, तिथेच थांबा. कोणीही इथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. ही पोलीस केस आहे त्यामुळे पोलिसांना इन्फॉर्म करावं लागेल.”

विक्रम खिश्यातून मोबाईल काढत म्हणाला पण आदित्य खूप भावनावश झाला होता. विक्रमच्या बोलण्याला न जुमानता तो रियाजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. विक्रमने त्याला दोन्ही हातांनी धरलं आणि म्हणाला,

“मिस्टर सिंघानिया, सावरा स्वतःला. तुम्हाला असा त्यांना हात लावता येणार नाही. पोलिसांना येऊ द्या.”

त्याचं बोलणं ऐकून आदित्य अश्रू गाळत जागीच थांबला. विक्रमने पोलिसांना कॉल केला.

“हॅलो, इन्स्पेक्टर नार्वेकर, मी एसीपी विक्रम, तुम्ही मिस्टर सिंघानिया यांच्या बंगल्यावर ताबडतोब पोहचा. इथे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मी तुम्हाला लोकेशन शेअर करतो.”

विक्रमने इन्स्पेक्टर नार्वेकरांना लोकेशन शेअर केलं आणि कॉल कट केला. पाहुण्यांकडे पाहत तो म्हणाला,

“कोणीही बंगल्याच्या बाहेर जाणार नाही. मी पोलिसांना कळवलंय. सर्वांची चौकशी झाल्याखेरीज इथून कोणालाही हलता येणार नाही. पोलीस येतीलच इतक्यात. प्लिज सर्वांनी सहकार्य करावं समजलं?”

सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या.

“विकी.. विकी, रिया.. काय झालं हे?”

यामिनी भेदरलेल्या नजरेने विक्रमजवळ येऊन विचारू लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मैत्रिणीला पाहून यामिनी खूप घाबरली होती. तिचे हातपाय थरथरू लागले आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

“रिलॅक्स यामी, घाबरू नकोस. पोलीस येतील इतक्यात. चौकशी होईल. बस इतकंच.”

विक्रम तिला समजावलं तशी ती थोडी शांत झाली. इतक्यात रियाचे आई बाबा आणि तिचे सासुसासरे तिथे पोहचले. रियाला बेडवर निपचित पडलेली पाहून रियाच्या आईने आक्रोश करायला सुरुवात केली. ती रियाजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती पण जमलेल्या लोकांनी तिला अडवलं.

“सांभाळा स्वतःला..”

विक्रम रियाच्या आईला म्हणाला. इतक्यात पोलीसव्हॅनच्या सायरनचा आवाज आला.

“पोलीस आले वाटतं.”

दबक्या स्वरात मिसेस पारेख म्हणाल्या. पोलिसांच्या व्हॅनने बंगल्याचा आवारात प्रवेश केला. इन्स्पेक्टर आशिष नार्वेकर आणि त्यांची टीम व्हॅनमधून खाली उतरले. सोबत दोन लेडी कॉन्स्टेबलसुद्धा आल्या होत्या. सर्वजण पटकन घटनास्थळी म्हणजेच रियाच्या खोलीजवळ पोहचले. त्यांनी सर्वांना बाजूला केलं आणि ते खोलीत आले. समोर विक्रमला पाहताच त्या सर्वांनी त्याला सॅल्यूट केलं. विक्रमने बोलायला सुरुवात केली.

“हॅलो इन्स्पेक्टर नार्वेकर, मीच तुम्हाला कॉल केला होता.”

“काय झालं नेमकं सर? पहिल्यापासून सांगाल प्लिज?”

“बंगल्याबाहेर गार्डनमध्ये पार्टी सुरू होती. सर्वजण पार्टी एन्जॉय करत होते. बराच उशीर झाला म्हणून आम्ही म्हणजे मी आणि माझी बायको यामिनी आमच्या घरी जायला निघालो होतो. जाण्याआधी मिस्टर अँड मिसेस सिंघानिया यांचा निरोप घ्यावा असा आम्ही विचार केला पण आम्हाला पार्टीत ते दोघे दिसले नाही. मी आणि माझी बायको त्यांना शोधत होतो. इतक्यात बंगल्याच्या आतून गोळी झाडल्याचा आवाज आला. सगळे धावत आत आले. सर्वात आधी मीच इथे पोहचलो. पाहतो तर समोर मिसेस सिंघानिया रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यानंतर लोकल पोलिसांना कळवायला हवं म्हणून मी लगेच तुम्हाला कॉल केला.”

नार्वेकरांनी विक्रमचं बोलणं ऐकून घेतलं आणि पुढच्या कारावाईला सुरुवात केली. सर्वांनी त्यांच्या हातात हँडग्लोज घातले. विक्रमने हवालदारांकडून हॅन्डग्लोज घेऊन हातात घातले आणि तपासाला सुरुवात केली. इन्स्पेक्टर नार्वेकरांनी सोबत आलेल्या हवालदारांना सूचना द्यायला सुरवात केली.

“हवालदार शिंदे, सगळ्या पाहुण्यांना बाहेर हॉलमध्ये घेऊन जा. सर्वांची कसून झडती घ्या आणि सर्वांचे जबाब लिहून घ्या. लेडी कॉन्स्टेबल जाधव आणि सोनटक्के यांना मदतीला घ्या.”

असं म्हणत इन्स्पेक्टर नार्वेकर रियाच्या मृतदेहाजवळ आले. त्यांना रिया बेडवर निपचित पडलेली दिसली. तिच्या उजव्या कानपट्टीवर गोळी लागली होती. तिच्या डाव्या हातात पिस्तूल होतं आणि दुसऱ्या हातात कसलातरी पेपर फडफडत होता. इन्स्पेक्टर नार्वेकरांनी रियाच्या हातातून सावकाशपणे पिस्तूल काढून घेतली आणि नाकाजवळ लावली. त्यातून हलकासा धूर बाहेर येत होता. म्हणजे गोळी नुकतीच झाडली असावी असा त्यांनी अंदाज बांधला. सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत त्यांनी बंदूक ठेवली आणि काँस्टेबल सुर्वेच्या हातात दिली. मग त्यांनी रियाच्या नाकासमोर दोन बोटं धरली आणि तिच्या हाताच्या मनगटावरची नाडी तपासून बघत ते म्हणाले,

“शी इज ऑलरेडी डेड. काँस्टेबल सुर्वे, तुम्ही खोलीचा कप्पा न कप्पा शोधून काढा. काहीही सुटता कामा नये. इथल्या सगळ्या वस्तू फोरन्सिक लॅबला पाठवून द्या. ऍम्ब्युलन्सला कॉल करा म्हणजे बॉडीला पोस्टमार्टमसाठी पाठवता येईल.”

त्यानंतर इन्स्पेक्टर नार्वेकरांनी रियाच्या हातातला पेपर अलगद काढून घेतला आणि ते वाचू लागले,

“मी रिया सिंघानिया, हे कनफेस करते की, आयुष्यात घडलेल्या एका चुकीचं गिल्ट घेऊन मी जगू शकत नाही म्हणून मी स्वतःला संपवत आहे. माझ्या हत्येसाठी मी स्वतः जबाबदार आहे. त्यासाठी कोणालाही दोषी धरू नये. प्लिज मला माफ करा.”

तुमची दुर्दैवी
रिया सिंघानिया

पत्र वाचून संपताच ते पत्र विक्रमच्या समोर धरत इन्स्पेक्टर नार्वेकर म्हणाले,

“काय वाटतं एसीपी विक्रम? सुसाईड की मर्डर? मला तर सुसाईड केस वाटतेय.”

रियाने आत्महत्या केली असेल की तिचा खुन झाला? ती कोणत्या चुकीची कबुली देत होती? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all