अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग २

अनटोल्ड कन्फेशन्स


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..


अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग २

रविवारची संध्याकाळ येऊन ठेपली. यामिनी पार्टीला जाण्यासाठी तयार होत होती.

“अगं आवरलं का नाही तुझं? तुम्ही मुली पण नां.. किती वेळ लागतो तुम्हाला आवरायला! तुमचं नटणं काही संपतच नाही.”

विक्रम बाहेर हॉलमध्ये फेऱ्या घालत घड्याळात पाहून म्हणाला.

“हो आले आले.. झालं थोडंसं राहिलंय.”

आतल्या बाजूने यामिनीने आवाज दिला. अर्धा तास उलटून गेला तरी यामिनी काही बाहेर आली नाही ते पाहून विक्रम वैतागून यामिनीच्या खोलीत आला.

“झालं की नाही अगं? किती वेळ लागतो तुला?”

पुढचे शब्द त्याच्या तोंडातच विरून गेले. यामिनीला पाहून तो जागीच थबकला. यामिनीने गडद हिरव्या रंगांची डिझाईनर साडी नेसली होती. हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि गळ्यात मोत्यांचा नेकलेस, मंगळसूत्र घातलं होतं. काळ्याभोर केसांचा छान अंबाडा घालून तिने त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला होता. डोळ्यांत काजळ, ओठांवर गुलाबी रंगांची लिपस्टिक फिरवली.

“हाय! कसली गोड दिसतेय यार!”

असं म्हणत विक्रमने तिला जवळ ओढून कवेत घेतलं.

“चल, तुझं आपलं काहीतरीच.. सोड नं मला. माझा मेकअप खराब होईल ना.”

“हो का? माझ्यामुळे तुझा मेकअप खराब होतो काय? मग होऊ देत नां. माझी बायको मुळातच इतकी सुंदर आहे की, अशा सौंदर्यवतीला मेकअपची गरजच नाही बरं.”

असं म्हणत त्याने त्याची मिठी अजून घट्ट केली.

“अरे विकी सोड नां.. आता उशीर होत नाहीये का तुला? परत मलाच रागवशील तुला तयारी करायला उशीर झाला म्हणून.”

ती लटक्या रागाने म्हणाली. विक्रमने दीर्घ सुस्कारा टाकला.

“आता आपल्याला मिस्टर आणि मिसेस सिंघानिया यांच्या पार्टीला जायचंय म्हणून सोडतोय पण असं समजू नकोस मी सगळं विसरून जाईन, रात्री घरी आल्यावर याचा बदला घेईन. व्याजासकट सारं वसुल करेन. समजलं?

विक्रम मिश्कीलपणे हसून म्हणाला आणि त्याने तिची त्याच्या मिठीतून सुटका केली. यामिनी लाजून गालातल्या गालात हसली.

“चला राणीसरकार.. आपण निघूया का? सगळे आले असतील.”

यामिनीने मान डोलावली. गॅस, फॅन, पाण्याचे नळ घराची दारे खिडक्या सर्व नीट बंद आहे की नाही याची खात्री करून घेतली आणि दाराला कुलूप लावून ती दोघे बाहेर आली. पार्किंगमध्ये उभी असलेली कार बाहेर काढली. दोघे कारमध्ये येऊन बसले. विक्रमने कार स्टार्ट केली. आता गाडी सिंघानिया यांच्या बंगल्याच्या दिशेने धावू लागली.

“विकी, गाडी जरा फ्लॉवर शॉपीजवळ थांबव हं. मला मिसेस सिंघानियासाठी बुके आणि एखादी भेटवस्तू घ्यायचीय.”

“अजून आहेच का तुझं बाकी?”

विक्रमने हसून विचारलं तसं तिनेही हसून होकारार्थी मान डोलावली. यामिनीने फुलांचा गुच्छ आणि एक छोटीशी भेटवस्तू घेतली.

“चल निघूया आता.”

यामिनी गाडीत बसत म्हणाली. विक्रमने गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात त्यांची गाडी सिंघानिया यांच्या बंगल्यासमोर येऊन थांबली. गाडी पार्किंगमध्ये पार्क करून ते दोघे त्या शानदार बंगल्याच्या दिशेने चालू लागले.

“व्वा! कसला सुरेख बंगला आहे रे! अप्रतिम!”

यामिनीच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले. विक्रमही थक्क होऊन बंगलाच्या सौन्दर्याकडे पाहत होता. तो भव्यदिव्य बंगला म्हणजे जणू पांढऱ्या शुभ्र संगमरवरी रंगाचा तीन मजली भव्य महालच. अतिशय सुरेख कोरीव नक्षीकाम केलेला बंगला पाहून यामिनी खूप आनंदून गेली.

विक्रम आणि यामिनी आलिशान बंगल्याकडे पाहत हिरव्यागार लॉनवरून पुढे चालत होते. आजूबाजूला पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या पडद्यानी, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईनी बंगला सुशोभित करण्यात आला होता. बंगल्याच्या शानदार गार्डनमध्ये पार्टी आयोजित केली होती. गार्डनमध्ये थोड्या थोड्या अंतरावर डिनरसाठी छोटे छोटे डायनींग टेबल मांडले होते. पाहुण्याच्या स्वागताची जय्यद तयारी करण्यात आली होती. त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या ललना पाहुण्यांना स्टार्ट्स आणि वेलकम ड्रिंक सर्व्ह करत होत्या. एकीकडे मिस्टर आणि मिसेस सिंघानिया येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होते. त्यांना काय हवं नको ते पाहत होते. कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे पुढे जाऊन मिस्टर अँड मिसेस सिंघानिया यांना पुषगुच्छ आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा देत होते आणि ती दोघं उभं राहून हसून त्यांच्या सदिच्छांचा स्वीकार करत होते आणि दुसऱ्या बाजूला मंद स्वरात मधुर संगीत वाजत होतं.

“हॅलो यामिनी..”

मिसेस पारेख यांनी यामिनीला आवाज दिला. यामिनीने त्यांच्याकडे हसून पाहिलं.

“ओह हाय, मिसेस पारेख, मीट माय हजबंड विक्रम सावंत.”

विक्रमकडे बोट दाखवून यामिनी म्हणाली.

“हॅलो मिस्टर विक्रम, नाईस टू मीट यू.”

मिसेस पारेख यांनी हसून विक्रमच्या हातात हात मिळवला. त्यानेही हसून प्रतिसाद दिला. मग मिसेस शहा, मिसेस सिंग, मिसेस शेख, मिसेस देसाई, मिसेस केळकर, मिसेस परांजपे एकेक करत हळूहळू यामिनीच्या बऱ्याच मैत्रिणी तिच्याभोवती गोळा झाल्या. यामिनी सर्वांना विक्रमची ओळख करून देत होती. तोही तिच्या मैत्रिणींशी, त्यांच्या नवऱ्यांशी ओळख करून घेत होता. बहुतांशी सगळे बिझनेसमन होते. सर्वांचं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नाव होतं. कोणी मोठा ऑफिसर तर कोणी मोठ्या नामांकित कंपनीचा सीईओ होतं. यामिनी सर्वांत छान रमली होती. विक्रमला या वातावरणाची जास्त सवय नसल्याने तो थोडा कंटाळला होता पण चेहऱ्यावर तसं काही न दाखवता तो पार्टीत सामील होत होता. इतक्यात यामिनी हळूच विक्रमला म्हणाली,

“विकी, चल आपण मिस्टर अँड मिसेस सिंघानिया यांना भेटून येऊया. तुझी त्यांच्याशीही ओळख होईल.”

विक्रमने मान डोलावली आणि तो यामिनीसोबत स्टेजच्या दिशेने चालू लागला. दोघे स्टेजवर पोहचले.

पुढे काय होतं? मिस्टर अँड मिसेस सिंघानिया यांना भेटल्यावर विक्रम काय बोलेल? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all