अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग २० (अंतिम)

अनटोल्ड कन्फेशन्स..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..
अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग २० (अंतिम )


“माझं फक्त आणि फक्त त्याच्यावर प्रेम होतं. त्याच्याशीच मला संसार करायचा होता.”

यामिनीने डोळ्यातलं पाणी पदराने टिपत समोर बोट केलं. समोर आदित्य उभा होता.

“आदित्य सिंघानिया?”

सर्वजण आश्चर्याने कुजबुजू लागले.

“व्हॉट मी? काहीही काय!”

आदित्य आश्चर्याने काहीसा चरकलाच.

“तुम्ही नाही मिस्टर सिंघानिया तुमच्या मागे उभा आहे तो.. एसीपी सिद्धार्थ..”

विक्रम कुत्सितपणे हसत मोठ्याने म्हणाला. एसीपी सिद्धार्थचं नाव ऐकताच सगळे ‘आ’ वासून एकमेकांकडे पाहू लागले. देविकासाठीही हा खूप मोठा धक्का होता. डीसीपी राघव शास्त्री मात्र शांत होते. बहुतेक त्यांना याची आधीच कल्पना होती.

“म्म..मी? काहीही काय विकी! अरे काहीही काय? असं कसं बोलू शकतोस तू?”

सिद्धार्थच्या तोंडून चाचरत शब्द बाहेर पडले.

“मला आधी नुसता संशय होता मग खात्री होत गेली आणि आता थोड्या वेळापूर्वी त्यावर शिक्कामोर्तबही झालं. एसीपी सिद्धार्थ.. माझा जिवलग मित्र सिद..”

“तुला माहीत होतं म्हणजे?”

यामिनीने काहीसं कचरत प्रश्न केला.

“विकी, अरे तू नाहीतर मग कुणी अल्बर्ट येणार आहे का माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवायला? आठवलं का? तुझ्या वाक्यासरशीच मी समजून गेलो होतो की ती व्यक्ती सिद्धार्थच आहे. अल्बर्ट कोण, त्याच्या तोंडून निघालेलं तेच वाक्य तुला काय माहित? अगं जे बोलणं फक्त माझ्यात आणि सिद्धार्थमध्ये झालं होतं. ते तुला कसं कळलं?”

विक्रमच्या अशा बोलण्याने यामिनी चपापली. यामिनी तिच्याच सापळ्यात अडकली होती. विक्रम पुढे बोलू लागला.

“याचा अर्थ तुला या केसमधली प्रत्येक गोष्ट माहित पडत होती. संशय तर मला त्याच दिवशी आला होता जेव्हा तू मला सारखी सिंघानिया सुसाईड केस संदर्भात मुद्दाम विचारत होतीस. आता तू अनावधानाने बोलून गेलीस पण मी ती गोष्ट बरोबर हेरली. यामिनी, तू विसरलीस की, एसीपी विक्रमसोबत लग्न केलेलं आहेस तू! ज्याच्या नजरेतून कोणताच गुन्हेगार सुटत नाही. समजलीस?”

सिद्धार्थने खाली मान घातली.

“ओह्ह माय गॉड! सिद तू? अरे आपल्या मैत्रीचा तरी विचार करायचा. इतके दिवस तुला मित्र म्हणून सगळं सांगत होते पण तू तर आमचा शत्रू निघालास. मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसलास? लाज वाटली नाही तुला? आणि तू यामिनी, तू काय केलंस? नवऱ्याचा विश्वासघात? अगं रियाने आत्महत्या केली आणि तसं करण्यापूर्वी निदान आपल्या चुकीची कबुली देण्याचा प्रयत्न तरी केला होता पण तू? तू तर विकी आणि तुझ्या, नवराबायकोच्या नात्याचा खून केलास. असं करताना तुला काहीच वाटलं नाही?”

देविका चिडून म्हणाली.

“कोण म्हणतं ही आत्महत्या आहे? मिसेस रिया सिंघानिया यांची हत्याच झाली आहे. काय एसीपी सिद्धार्थ! खरं आहे ना हे?”

विक्रमने सिद्धार्थला प्रश्न केला.

“एसीपी सिद्धार्थ, का केलंस असं? मित्रालाच फसवलंस? का? मी तुला चांगला ऑफिसर समजत होतो पण तू गद्दार निघालास? जो आपला मित्राचा होऊ शकला नाही तो डिपार्टमेंटचा काय होईल? शेम ऑन यू.. मला तुझी लाज वाटते.”

डीसीपी राघव चिडून म्हणाले.

“कोण मित्र? कसला मित्र? कोणाचा मित्र? आजपर्यंत काय केलंय याने माझ्यासाठी? उलट माझी प्रत्येक गोष्ट याने माझ्याकडून हिरावून घेतलीय. अगदी शाळा कॉलेजपासून.. शाळेत असताना माझ्या वाट्याचं सगळं प्रेम, कौतुक यालाच मिळायचं. कॉलेजमध्ये असताना नेहमी हा टॉपला असायचा म्हणून मुली कायम याच्या मागे असायच्या. इतकंच काय तर ज्या यामिनीवर मी मनापासून प्रेम केलं तिलाही याने माझ्यापासून हिरावून घेतलं. तिच्याशी लग्न केलं. प्रत्येक ठिकाणी याच्यामुळे मी दुर्लक्षित राहिलो. आम्ही ठरवून पोलीस फोर्स जॉईन केलं. त्यातही यालाच नाव, प्रसिद्धी मिळत गेली. प्रत्येक केसचं क्रेडिट विक्रमला मिळत गेलं आणि सोबत प्रमोशनही! ज्या यशाचा मानकरी मी होतो ते त्याला मिळत गेलं आणि तो कायम पुढे जात राहिला. मला सांगा सर, मित्र असा असतो? जो आपल्याच मित्राचा आनंद, सुख, यश प्रेम सगळं हिरावून घेतो?”

सिद्धार्थ त्वेषाने बोलू लागला. आजपर्यंत मनात दाबून ठेवलेला विखार आज शब्दांची गरळ बनून बाहेर पडत होता. त्याच्या डोळ्यांत असूया, अवहेलना, अपमान सगळ्या भावनांचा आवेग स्पष्ट दिसत होता. त्याचे कपटी डोळे आग ओकत होते. तो पुढे बोलू लागला.

“मग मी याचा प्रतिशोध घ्यायचं ठरवलं. मला विकीला धडा शिकवायचा होता. त्याने जे जे काही हिरावून घेतलं होतं ते मी सगळं त्याच्याकडून परत घेणार होतो मी. मला त्याला कफल्लक बनवायचं होतं. रस्त्यावर आणायचं होतं. संपवून टाकायचं होतं. मी संधीची वाट पाहत होतो. विकीने यामिनीशी लग्न करून तिला माझ्यापासून हिरावून घेतलं होतं. मी तिथूनच सुरुवात केली. ती मुंबईत आल्यावर मी तिला भेटत राहिलो. माझं प्रेमाचं जाळं मी तिच्यावर टाकत होतो. मी माझं प्रेम व्यक्त करत राहिलो आणि अखेर ती पुन्हा माझ्याकडे आकर्षित झाली. जुन्या प्रेमाच्या आठवणी ताज्या झाल्या. मी माझ्या कटात तिला सामील करून घेतलं. मी जे सांगेन तेच ती ऐकत होती. विकीच्या विरोधात मला साथ देत होती. तिने मला रियाबद्दल सांगितलं. तिच्या मानसिक स्थितीबद्दल मला कल्पना दिली आणि मग मी रियाचा या प्लॅनमध्ये उपयोग करून घ्यायचा ठरवलं. यामिनी अल्बर्टविषयी विकीजवळ बोलली नसती तर कदाचित माझा प्लॅन यशस्वी झाला असता पण..”

“पण तुझा प्लॅन माझ्या लक्षात आला आणि तू बरोबर माझ्या सापळ्यात अडकत गेलास.”

विक्रम सिद्धार्थकडे पाहून म्हणाला.

“पण रिया आत्महत्या करणार होती मग तिचा खून कसा झाला? सिद तू तिचा खून कसा केलास? सांग पटकन..”

देविका चिडून म्हणाली तसा सिद्धार्थ पुढे बोलू लागला.

“पार्टीत रिया प्रचंड डिस्टर्ब होती. तिने आदित्य सिंघानिया आणि रोझीला एकत्र पाहिलं होतं. अल्बर्टला पाहून ती अजूनच हायपर झाली. यामिनीने तिला बोलून बोलून, गिल्ट देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. रिया दुःखाच्या एक्सट्रीम लेवलला पोहचली होती. आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आता आपल्या जगण्याचा काहीच उपयोग नाही असं तिला वाटू लागलं. ती रडतच तिच्या खोलीत आली. मी मागच्या दाराने आधीच आत आलो होतो. पूर्ण चेहरा मी झाकला होतं. मला कोणी ओळखू शकणार नव्हतं. मी बाहेर गॅलरीमध्ये खिडकीत येऊन बसलो. रियाने कन्फेशन लेटर टेबलवर ठेवलं. कपाट उघडून ड्रॉवरमधलं पिस्तुल बाहेर काढलं आणि फायर करण्यासाठी तिने पिस्तूल स्वतःच्या कानफटीवर लावलं. पुन्हा पिस्तूल खाली केलं, पुन्हा कानपट्टीवर लावलं. दोन तीन वेळा ती असंच करत होती. बहुतेक आत्महत्या करण्याचं डेअरिंग तिच्यामध्ये नसावं. तिने पिस्तुल खाली बेडवर ठेवलं पण रियाने असं करून चालणार नव्हतं. तिने स्वतःवर गोळी चालवणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. मी पटकन आत आलो. मला असं अचानक समोर पाहून ती खूप घाबरली.

“कोण आहात तुम्ही? नाव सांगा नाहीतर मी आरडाओरडा करेन. तुम्ही आत कसे आलात? निघा इथून..”

“मिसेस सिंघानिया, तुम्हाला आता मरावंच लागेल. तुम्ही न केलेल्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. माझा नाईलाज आहे मिसेस सिंघनिया..”

मी बेडवरचं पिस्तुल उचलून तिच्या उजव्या कानपट्टीवर उगारलं. आमच्या दोघांत झटापट झाली. ती माझं डोकं तिच्या हातात पकडण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी माझ्या पुरुषी शक्तीपुढे तिचं काही चाललं नाही आणि मी तिच्या कानपट्टीवर गोळी झाडली. ती बेडवर कोसळली. मी टेबलवरचं ते लेटर उचलून तिच्या हातात ठेवलं. पिस्तुलावरचे माझे फिंगरप्रिंट्स रुमालाने पुसून तिच्या डाव्या हातात पिस्तूल ठेवली आणि पुन्हा पटकन बाहेर जाऊन लपून बसलो. गोळीच्या आवाजाने सगळे बंगल्याच्या दिशेने धावले आणि कोणी आत यायच्या आधी, मला पाहण्याआधी मागच्या दाराने मी पसार झालो.”

“पण घाईत तू खूप चुका केल्यास. तुझ्या माहितीसाठी सांगतो मिसेस सिंघानिया डावखुऱ्या होत्या. मग त्या उजव्या कानपट्टीवर गोळी कशा मारतील? आणि कन्फेशन लेटर त्यांच्या हातात होतं तर त्यावर रक्ताचा एकही डाग कसा नाही हा साधा विचारही तुझ्या मनात कसा आला नाही?”

“विकी, सिद्धार्थच खुनी आहे हे तू कसं ओळखलंस?”

देविकाने प्रश्न केला.

“देवी,मघाशी मी ऑफिसमधून निघताना सिद्धार्थच्या हातात हात मिळवला आणि जाण्यास निघालो. माझा हात सहज केसावरून फिरवण्यासाठी मी डोक्यावर नेत असताना माझ्या हाताचा नाकाला स्पर्श झाला. तेंव्हा सिद्धार्थने लावलेल्या जेलचा वास मला आला. हा वास यापूर्वीही मला जाणवला होता. मी आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आठवलं की, रियाच्या मृतदेह पाहताना तिच्या हातालाही असाच वास होता. झटापटीत केस धरले असताना त्यांच्या हाताला सिदच्या केसातील जेल लागली होती. आणि अशा रितीने माझा संशय आता खात्रीत बदलला. सिद्धार्थ माझ्या तावडीत आला.”

विक्रम देविकाकडे पाहून म्हणाला.

“अरेस्ट देम..”

डीसीपी राघव शास्त्रीनी ऑर्डर दिली. देविकाने दोघांना अटक केली. जाताना यामिनीने भरल्या डोळ्यांनी विक्रमकडे पाहिलं. कदाचित ती तिच्या चुकीची कबुली देत असावी. विक्रम मात्र तिच्याशी काहीही संबंध नसल्यासारखा निर्विकार चेहऱ्याने पाहत होता. रिया सिंघानियासोबत विक्रम आणि यामिनीच्या नात्याचाही खून झाला होता.

“गुन्हेगार कितीही चलाख असला तरी काही पुरावे मागे सोडतोच. आणि त्या पुराव्यांचे कन्फेशन्स असेच काहीही न बोलता सगळं काही सांगून जातात. गुन्ह्याची कबुली देऊन जातात. पण काही अनटोल्ड कन्फेशन्सही असतात जे मनातला शैतान जागा करतात. ज्याला प्रेमाची, नात्यांची कसलीच पर्वा उरत नाही.”

डीसीपी राघव सर्वांकडे पाहून काहीसे हताशपणे म्हणाले. यामिनी आणि सिद्धार्थ खाली मान घालून तोंड लपवत पोलीस व्हॅनमध्ये जाऊन बसले. विक्रम मात्र निर्विकार चेहऱ्याने सगळं पाहत हतबल होऊन खुर्चीत बसला.

समाप्त
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all