अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १९

अनटोल्ड कन्फेशन्स..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १९

सर्वजण श्वास रोखून विक्रमचं बोलणं ऐकत होते.

“आज सकाळी मी ते फुटेज घेऊन डीसीपी राघव शास्त्री यांच्याकडे गेलो. मी त्यांना केस समजावून सांगितली. त्यांनी माझं सस्पेन्शन कॅन्सल केलं. त्यामुळे आता मी या केसवर लीगली काम पाहू शकणार होतो.”

विक्रमने सर्वांकडे पाहिलं आणि एका व्यक्तीवर नजर रोखत प्रश्न केला.

“आता सांग यामिनी, तू असं का केलंस?”

“कोण मी? व्हॉट नॉन्सेन्स विकी? वेड लागलंय का तुला? काहीही काय बडबडतोयस? मी का असं करेन?”

यामिनी जवळजवळ किंचाळलीच. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का होता. सर्व जमलेल्या लोकांत एकच कुजबुज सुरू झाली.

“हो तुच यामिनी..”

त्याने त्याच्या हातातला मोबाईल तिच्यासमोर धरला. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंगल्याच्या मागच्या बाजूने जिन्यावरून रियाच्या बेडरूममध्ये जाताना यामिनी स्पष्ट दिसत होती.

“या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जिन्यावरून वर जाताना तुच दिसतेय. आता सत्य सर्वांसमोर आलंच आहे तेंव्हा तू अशी का वागलीस ते सांगून टाक.”

हे बोलताना त्याचा आवाज बदलला होता. फुटेजमध्ये स्वतःला पाहून यामिनीचा नाईलाज झाला आणि तिला सत्य सांगावं लागलं. यामिनी बोलू लागली.

“या शहरात आल्यावर लेडीज क्लबमध्ये माझी ओळख रिया सिंघानियाशी झाली. मग हळूहळू माझी तिच्याशी मैत्री झाली. तिच्या बोलण्यातून ती तिच्या संसारात खूष नाहीये हे मला समजलं होतं. तिच्या नवऱ्याचं तिच्यावर प्रेम नाही आणि तो दुसऱ्या मुलीच्या म्हणजेच त्याच्या सेक्रेटरीच्या प्रेमात आहे असं तिला कळलं होतं त्यामुळे ती खूप डिप्रेस झाली होती. इमोशनली वीक झाली होती. मी तिला आधार देण्याचं नाटक केलं. नवऱ्याचे अफेअर कळल्यावर रिया खूप हळवी झाली होती. तिच्या घरी आलेल्या अल्बर्टसोबत तिचे शारीरिक संबंध आले हे तिनेच मला सांगितलं. त्यांच्यातल्या नात्याबद्दल सांगितलं. मी तिच्या मनात गिल्ट निर्माण केलं. ती आपल्या नवऱ्यासोबत प्रतारणा करतेय हे चुकीचं आहे. तिच्यामुळे कुणीच सुखी नाही. आदित्य सिंघनिया, अल्बर्ट, रोझी, तिचे आईवडील आणि आता सासू सासरे प्रत्येकाच्या दुःखाचं कारण ती आहे असं मी तिच्या मनात भरवलं. मीच तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. मी तिला सांगितलेली मात्रा कामी आली. तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसला होता. मी सांगेल तसंच ती करायची. स्वतःला संपवून टाकावं ही भावना सतत तिच्या मनात प्रबळ होऊ लागली. आणि तिने आत्महत्या करायचं ठरवलं. मी तिला तसं कन्फेशन लेटर लिहायला लावलं. तिने लिहिलेलं पत्र सुद्धा तिच्याच हस्ताक्षरात असल्याने गुंता वाढून सर्वांच्या मनात कन्फ्यूजन व्हावं हाच प्लॅन होता. तिच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी ती आत्महत्या करणार होती.”

“मग माझ्या वस्तू त्या खोलीत कशा आल्या?”

विक्रमने प्रश्न केला. यामिनीचे डोळे वाहत होते.

“त्या मीच ठेवल्या होत्या. पार्टीत जेंव्हा तू मिस्टर सिंग आणि मिस्टर पारेख यांच्या सोबत ड्रिंक करत उभा होतास मी तुला तिथून बाजूला घेऊन गेले आणि जाताना तुझ्या कोटावरचा ब्रॉच मी तुझ्या नकळत काढून घेतला. त्यानंतर मी तुला वॉशरूमला जाते असं सांगून तिथून बाजूला आले. वेटरला मी आधीच मॅनेज केलं होतं. तो तुझा ड्रिंक केलेला ग्लास ट्रेमध्ये तसाच ठेवून तिथून निघून गेला. मी तो ग्लास रुमालाने अलगद पकडला आणि बंगल्याच्या मागच्या जिन्याने रियाच्या बेडरूममध्ये आले. तुझ्या कोटावरून काढलेला ब्रॉच आणि तो तू ड्रिंक केलेला ग्लास मी पोलिसांना सहज दिसतील अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवून दिला आणि पुन्हा पार्टीत तुझ्यासोबत येऊन तुला जॉईन झाले. जेव्हा आपण रिया आणि मिस्टर सिंघानिया यांना भेटायला स्टेजवर गेलो तेंव्हा रियाने मला सांगितलं की पार्टीत आदित्यची गर्लफ्रेंड, रोझीही आलेली आहे. ती खूप पॅनिक झाली होती. तिने ज्यावेळीस रोझी आणि अल्बर्टला बोलताना पाहिलं तेंव्हा ती घाबरून तुझ्याशी बोलायला आली. तेही मी पाहिलं होतं. थोड्यावेळाने मी रिया बंगल्याच्या आतल्या बाजूला तिच्या खोलीत जाताना पाहिलं. माझा प्लॅन यशस्वी होण्याच्या मार्गांवर होता.”

यामिनी क्षणभर थांबली. डोळ्यातलं पाणी पुसत तिने दीर्घ श्वास घेतला.

“जर तुझ्या प्लॅनप्रमाणे रिया आत्महत्या करणार हे ठरलं होतं मग तू माझ्या वस्तू त्या खोलीत का ठेवल्यास?”

“कारण मला तुला खुनी ठरवायचं होतं. तुला या प्रकरणात अडकवायचं होतं.”

यामिनी त्वेषाने म्हणाली.

“अगं पण का? तू मला का अडकवत होतीस? मी तुझं काय वाईट केलं होतं?”

विक्रम चिडून म्हणाला.

“तूच विकी, तुच माझं आयुष्य उध्वस्त केलंस. माझ्याशी लग्न करून तू मला माझ्या सुखापासून वंचित केलंस. मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं. पैसा, नोकरी, घरदार या गोष्टींनी माझ्या आईवडिलांना तू भुरळ पाडलीस. ते तुझ्या स्टेट्सला भुलले आणि त्यांनी आपलं लग्न ठरवलं. आई वडिलांच्या इच्छेखातर मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. मला तू कधीच आवडला नव्हतास. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. समजलं तुला?”

पुढे काय होतं? कोण आहे खरा गुन्हेगार? पाहूया पुढच्या आणि अंतिम भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all