अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १८

अनटोल्ड कन्फेशन्स..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १८


विक्रमने आदित्यकडे पाहिलं. त्याने खाली मान घातली. आदित्यच्या शेजारी उभे असलेल्या त्याच्या आईबाबांनी चमकून विक्रमकडे पाहिलं.

“रियाच्या आईवडिलांनी आपली सारी संपत्ती रियाच्या नावावर केली होती. इतकं सगळं करूनही रिया सिंघानिया परिवारात खूष नव्हती. याचं महत्वाचं कारण म्हणजे मिस्टर सिंघानिया. मुळात त्यांना हे लग्नच आवडलेलं नव्हतं. रिया आवडलेली नव्हती. आईवडिलांच्या इच्छेखातर आणि आपला बुडता बिझनेस वाचवण्यासाठी त्यांनी रियाशी लग्न केलं पण त्यांनी कधीच रियावर प्रेम केलं नाही. ते कायम रियाला त्यांचं तिच्यावर प्रेम नाही, तिची कंपनी त्यांना आवडत नाही हे सांगत आले. ती कोणाला सुखी ठेवू शकत नाही ही भावना रियाच्या मनात रुजवत आले. त्यामुळे रिया कायम डिस्टर्ब राहायला लागली. दुःखी राहायला लागली. रियाने अल्बर्टवर प्रेम केलं पण रियाच्या आई वडिलांनी ते प्रेम तिच्याकडून हिरावून घेतलं आणि त्यांनी ज्या व्यक्तीशी लग्न केलं त्याचंही तिच्यावर प्रेम नाही ही सल कायम तिच्या मनाला खात राहिली. त्यात भरीस भर म्हणून रोझी आणि आदित्य सिंघानिया यांचं नातं तिला त्रास देऊ लागलं. त्यामुळे रिया डिप्रेशनमध्ये गेली आणि तिला डिप्रेशनवरची औषधं सुरू झाली. दुसरीकडे आदित्य सिंघानिया यांच्या आई वडिलांनीही कधी सुनेला अंतर दिलं नाही. रियाला आपली मुलगीच मानलं. त्यांनी त्यांची सारी प्रॉपर्टी आपल्या सुनेच्या नावावर केली. त्यामुळे आदित्य आणि त्यांच्या भाऊ नीरज यांना एक बिझनेस सोडला तर काहीच मिळणार नव्हतं. नीरजला या गोष्टीचा राग आला आणि त्याने रियाला जीवे मारण्याची धमकी दिली.”

विक्रमचं वाक्य ऐकून सारेच अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागले. विक्रम पुढे बोलू लागला.

“पुढे अल्बर्ट पुन्हा रियाच्या आयुष्यात आला. रियाला तिच्या दुःखी आयुष्यात आनंद बनून आला. हरवलेलं प्रेम पुन्हा मिळालं. भेटीगाठी होऊ लागल्या. एकमेकांविषयी ओढ निर्माण झाली आणि एका बेसावध क्षणी त्यांच्या हातून चुक घडली. त्या रात्री मिस्टर सिंघानिया आणि त्यांचे आई बाबा घरात नसताना अल्बर्ट आणि रिया शरीराने एकत्र आले. पण त्यानंतर मात्र रियाला त्या गोष्टीचं गिल्ट येऊ लागलं. आपण आपल्या नवऱ्याला, सासूसासऱ्यांना फसवतोय असं वाटून ती अल्बर्टला भेटायचं टाळू लागली. भेटण्यास नकार देऊ लागली आणि त्यामुळे अल्बर्टचाही तिच्यावर राग होता. पार्टी सुरू असताना रियाने रोझी आणि अल्बर्टला सोबत बोलताना पाहिलं त्यानंतर तिने आदित्य सिंघानिया आणि रोझीला एकत्र पाहिलं. रिया खूप बैचेन झाली. रियाला वाटलं, अल्बर्टने त्याच्या आणि तिच्या नात्याबद्दल, दोघांत झालेल्या शारीरिक संबंधाबद्दल रोझीला सांगितलं आणि रोझीने आदित्य सिंघानिया यांना सांगितलं. ते ऐकून आता आदित्य सिंघानिया खूप चिडतील. तिच्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना सांगतील. तिला मारून टाकतील. त्यामुळे रिया खूप घाबरली. मी या सर्वातून तिला वाचवू शकेन असं तिला वाटलं. रियाला हे सर्व माझ्याजवळ कन्फेस करायचं होतं. या सर्वांपासून वाचण्यासाठी तिला माझी मदत हवी होती. पण मग तिला हे सर्व मलाच का सांगायचं होतं हा प्रश्न मला पडला? कदाचित मी एसीपी होतो म्हणून? तिला वाचवू शकलो असतो म्हणून? रिया मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण पार्टीतल्या गोंगाटामुळे मला ऐकू येत नव्हतं म्हणून तिने मला थोड्या वेळाने तिच्या खोलीत यायला सांगितलं पण मी मिस्टर शेख, पारेख यांच्याशी गप्पा मारण्याच्या नादात मी तिच्या खोलीत जायचं साफ विसरून गेलो. मी त्यांच्या सोबत एकच पेग ड्रिंक केली आणि जेवायला गेलो. त्यानंतर जेंव्हा मी तिच्या खोलीत पोहचलो तेंव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.”

विक्रम पुढे बोलू लागला.

“रिया बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या एका हातात पिस्तूल होतं आणि दुसऱ्या हातात कन्फेशन लेटर होतं. स्थानिक पोलीस येईपर्यंत मी तिथे निरक्षण करत होतो. रिया ड्रेसिंग टेबलवरच्या वस्तू अस्ताव्यस्त खाली पडल्या होत्या. म्हणजेच इथे झटापट झाली असावी. मी रियाच्या बॉडीजवळ आलो. तिच्या उजव्या कानपट्टीवर गोळी लागली होती पण पिस्तूल मात्र डाव्या हातात होतं. हे कसं शक्य आहे? दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रिया रक्ताच्या थारोळ्यात असूनही त्या लेटरवर एकही रक्ताचा डाग नव्हता. अशी मला शंका आली. मग ही आत्महत्या नसून खुन असावा असं मला वाटलं. मग आम्ही तसा शोध घ्यायला सुरुवात केली पण माझे फिंगरप्रिंट्स आणि काही वस्तू रियाच्या खोलीत सापडल्याने मला केसवरून काढून टाकलं आणि मला सस्पेंड करण्यात आलं. एसीपी सिद्धार्थ आणि देविका या केसवर काम करत होते. अनेक संशयितांची चौकशी करत होते. पहिला संशय आमचा नीरजवर होता. आम्ही त्यांना बोलवून चौकशी केली. मग आदित्य सिंघानिया, रोझी, अल्बर्ट आणि सिंघानिया यांच्या घरी घरकाम करणारी शांताबाई यांचीही चौकशी करण्यात आली. त्या दिवशीचे पार्टीचे सीसीटीव्ही फुटेजसुद्धा चेक केले पण आमच्या हाती काही लागत नव्हतं. आम्ही फक्त अंधारात तीर मारत होतो.”

विक्रम क्षणभर थांबला टेबलवरच्या बिसलरी बॉटल मधलं पाणी प्यायला आणि पुन्हा सांगू लागला.

“एसीपी सिद्धार्थ आणि देविका त्यांच्या परीने तपास करत होते. मी त्यांच्या तपासकार्यात भाग घेऊ शकत नव्हतो. त्यांना कसली मदत करू शकत नव्हतो. रियाच्या खोलीत सापडलेले पुरावे आणि माझे माझे फिंगरप्रिंट्स पाहून मी दोषी असल्याचं दिसत होतं. पण मी त्या गोष्टी रियाच्या खोलीत कशा आल्या हा विचार करत होतो. मी सिंघानिया यांच्या बंगल्यात जाऊ शकत नव्हतो म्हणून मग मी त्या बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर पाहिला. सिंघानिया यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूने वर जाण्यासाठी असलेला एक जिना मला दिसला. मी विचार करायला लागलो. इथले सीसीटीव्ही फुटेज आपल्याला दिसले नाहीत याचा अर्थ इथे कॅमेरा नसावा. म्हणूनच इथलं फुटेज आपल्याला दिसलं नाही. मग माझी नजर बंगल्याच्या पलीकडे असलेल्या ‘बँक ऑफ इंडिया’ बँकेकडे गेली. तिथे नक्कीच कॅमेरे असतील असा विचार मनात आला. मी माझ्या सोर्सेसकडून तिथले सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि मला त्या फुटेजमध्ये खरा गुन्हेगार दिसला.

विक्रमला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणाचा चेहरा दिसला? कोण आहे खरा गुन्हेगार? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all