अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १७

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १७


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १७

“सॉरी सर, मी असा अचानक……”

“विक्रम…

डीसीपी राघव विक्रमवर चिडले.

“तुला कळत नाही का इथे इन्व्हिस्टिगेशन सुरू आहे.”

“सॉरी सर.. प्लिज एक मिनिट..”

विक्रमने राघव सरांना खुणावलं. राघवसर उठून बाहेर आले. देविका आणि सिद्धार्थ अल्बर्टला प्रश्न विचारत होते. थोड्या वेळाने चौकशी झाल्यावर अल्बर्टला सोडण्यात आलं. विक्रम राघव सरांच्या केबिनमधून बाहेर पडला.

“विकी काय झालं? असा घाईघाईत?”

सिद्धार्थने प्रश्न केला.

“काही नाही रे.. तू सांग.. काही तपास लागला का? केसमध्ये काही लीड?”

“चालू आहे. अल्बर्ट डिकोस्टा, मिसेस सिंघानियांचा एक्स बॉयफ्रेंड. त्याची जबानी झाली. बऱ्याच गोष्टी समोर आल्या.”

“अच्छा?”

विक्रमने आश्चर्य व्यक्त केलं. थोडावेळ देविका आणि सिद्धार्थशी केस संदर्भात बोलून तो घरी जाण्यासाठी निघाला.

“चल सिद निघतो मी..”

असं म्हणून त्याने सिद्धार्थच्या हातात हात मिळवला आणि दोघांचा निरोप घेऊन तो ऑफिसच्या बाहेर पडला. इतक्यात राघवसर केबिनमधून बाहेर आले.

“सिद्धार्थ, तू एक काम कर. त्या दिवशी पार्टीत हजर होते त्या सर्वांना सिंघानिया यांच्या बंगल्यावर बोलवून घे.”

“येस सर, मी लगेच सर्वांना कळवतो.”

विक्रम विचारांच्या नादातच घरी पोहचला. यामिनीने दार उघडलं. विक्रम आत येत म्हणाला,

“आपल्याला मिस्टर सिंघानिया यांच्या बंगल्यावर जायचंय.”

“काय झालं विकी? कशासाठी तिकडे जायचंय?”

नॅपकिनला हात पुसत तिने विचारलं.

“अगं, राघव सरांनी अर्जंट बोलावलंय.”

“अच्छा, ठीक आहे.”

ती नाखुषीनेच तयारी करायला बेडरूमच्या दिशेने निघाली. यामिनीच्या चेहऱ्यावरची नाराजी विक्रमला जाणवली.

“काय झालं यामी, अशी उदास का झालीस?”

“मग काय करू विकी? किती दिवस झाले घरात एकच विषय चालू आहे. मिसेस सिंघानिया सुसाईड केस. दुसरा कोणताच विषय नाही. आपल्याला आपलं स्वतःचं असं काही खाजगी आयुष्य आहे की नाही? की फक्त काम एके कामच असणार आहे? आज मी विचार केला होता, आज थोडं बाहेर फिरायला जाऊ. मग चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन डिनर करू पण नाहीच. इथे आपलं काहीतरी वेगळंच. तुला माझ्यासाठी कुठे वेळ आहे?”

यामिनी नाराजीच्या सुरात म्हणाली.

“नको नं रागावू प्लिज. आता लवकरच ही केस संपेल. मग आपण चार दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. मग फक्त तू म्हणशील तसं. या इतक्या गोड चेहऱ्यावर हसू फुलवायला काय काय करायला लागेल रे देवा! पण मी सगळं करेन. फक्त तुझ्यासाठी! ”

“हो का? तू नाहीतर मग कुणी अल्बर्ट येणार आहे का माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवायला?”

यामिनी खोट्या रागाने त्याची कॉलर धरत म्हणाली.

“बरं बरं राणी सरकार.. तुमच्याशी पंगा कोण घेणार? बरं चल आता आवर पटकन, उशीर होतोय आपल्याला.”

विक्रमच्या बोलण्यावर यामिनी हसत हसत तयारी करायला निघून गेली. थोड्याच वेळात विक्रम आणि यामिनी सिंघानिया यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. थोड्याच वेळात राघवसर, सिद्धार्थ, देविका आपल्या टीमसह बंगल्यावर पोहचले. मागोमाग विक्रम आणि यामिनीही तिथे आले. हळूहळू त्या दिवशी पार्टीत हजर असलेले सर्व पाहुणे बंगल्यावर पोहचले. मिस्टर सिंघानिया, त्यांचे आईबाबा, आदित्यचा भाऊ नीरज, मिसेस रिया सिंघानिया यांचे आईवडिल, रोझी, अल्बर्ट, मिसेस पारेख, मिसेस परांजपे, मिसेस सिंग, मिसेस केळकर, मिसेस शेख आपापल्या कुटुंबियांसोबत आले होते. खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा आज समोर येणार होता. सर्वांचं लक्ष डीसीपी राघव शास्त्री यांच्याकडे होतं. वातावरण फारच तणावाचं झालं होतं. विक्रमने राघव शास्त्री यांच्याकडे पाहिलं. त्यांनी विक्रमला खुणेनेच बोलण्याची परवानगी दिली. विक्रमने एकदा चौफेर नजर फिरवली आणि बोलायला सुरुवात केली.

“फ्रेंड्स, त्या दिवशी जसं आपण पार्टीला जमलो होतो तसंच आजही जमलोय पण दोन्ही वेळची कारणं, औचित्य वेगवेगळं आहे. तो आनंदाचा क्षण साजरा करायला आपण जमलो होतो आणि आज मिसेस सिंघानिया यांच्या दुःखद मृत्यूचं रहस्य जाणून घ्यायला आलो आहोत.”

विक्रम क्षणभर थांबला. त्याची नजर सर्वांचे हावभाव टिपत होती. अल्बर्ट, रोझी, नीरज भेदरलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होते.

“अरे, राघवसर समोर असताना विकी केससंदर्भात कसं काय बोलतोय? तो तर सस्पेंडेड आहे ना? आणि राघव सर त्याला अडवतही नाहीत. आश्चर्य आहे! नक्कीच त्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं असेल नाहीतर राघवसर असे शांत बसले नसते.”

देविकाच्या मनात विचार चमकून गेला. विक्रमला सर्वांसमोर बोलताना पाहून सिद्धार्थलाही थोडं नवल वाटलं पण राघव सर विक्रमला काहीच बोलले नाहीत हे पाहून दोघेही शांत बसले होते. विक्रमने बोलायला सुरुवात केली.

“आदित्य सिंघानिया आणि रिया सिंघानिया यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस होता. आदित्य सिंघानिया यांनी ग्रँड पार्टी ठेवली होती. सगळे किंबहुना गुन्हेगारही पार्टीत छान एन्जॉय करत होते. आपण पार्टीत मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत होतो. आपलं खाणंपिणं सुरू होतं पण त्या व्यक्तीच्या डोक्यात मात्र त्याने रचलेला कट कसा यशस्वीरित्या पूर्ण करायचा हाच विचार घोळत होता. खरंतर त्या व्यक्तीने खूप छान कट रचला होता. एकदम मास्टर प्लॅन केला होता पण क्राईम ब्रँच ऑफिसर्स किती हुशार आहेत आणि त्याच्या बुद्धीच्याही पुढे जाऊन काय विचार करतील हे त्याला बहुतेक माहित नसावं म्हणूनच तर स्वतःनेच रचलेल्या सापळ्यात ती व्यक्ती स्वतःच कधी अडकत गेली हे तिलाच कळलं नाही. खरंतर ही हत्या की आत्महत्या हा पेच आमच्या टीमसमोर उभा राहिला होता. आमची टीम शोध घेण्याचा प्रयत्न करत होती. तपास सुरू होता. मिसेस सिंघानिया यांच्या हातात सापडलेलं कनफेशन लेटर पाहून प्रथमदर्शनी त्यांनी आत्महत्या केली असं वाटलं आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला. मग टीमने मिसेस सिंघानिया यांच्या आईवडीलांच्या घरी चौकशी केली. तेंव्हा बऱ्याच गोष्टी समोर आल्या.”

विक्रमने रियाच्या आईवडिलांकडे पाहिलं आणि पुढे बोलायला सुरुवात केली.

“रिया, आईवडिलांची एकुलती एक मुलगी. लाडाकोडात वाढलेली. दिसायला अतिशय सुंदर. लग्नाचं वय झाल्यावर रियाच्या आईवडिलांनी तिच्यासाठी चांगलं स्थळ पहायला सुरुवात केली पण रियाच्या आयुष्यात अल्बर्ट आला. अल्बर्ट रियाच्या वडिलांच्या कंपनीत काम करणारा साधा एम्प्लॉयी. रिया आणि अल्बर्ट एकमेकांवर खूप प्रेम करत होते. लग्नही करणार होते. रियाच्या आईवडिलांना जेव्हा ही गोष्ट समजली तेंव्हा त्यांनी अल्बर्टला कामावरून काढून टाकलं. गुंडांकरवी अल्बर्टला बेदम मारलं आणि त्याला शहर सोडून जाण्यास भाग पाडलं. अल्बर्टच्या जाण्याने रिया सैरभैर झाली. पुढचा मागचा कसलाही विचार न करता तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न आदित्य सिंघानिया यांच्यासोबत लावून दिलं. हे करून एकाअर्थी त्यांनी सिंघानिया कुटुंबावर उपकारच केले होते कारण तेंव्हा आदित्य सिंघानिया यांचा बिझनेस खूपच नुकसानीत चालला होता. त्यांच्या कंपनीच्या शेअर्सचे भाव खाली पडत चालले होते. रियाच्या आईवडिलांनी सिंघानिया एम्पायरचे, तोट्यात चाललेल्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले. बुडत्या कंपनीचे बिझनेस पार्टनर झाले. त्यांनी सिंघानिया एम्पायरला आर्थिक संकटातून बाहेर काढलं. त्यानंतर त्यांनी आपली सारी संपत्ती आपल्या मुलीच्या, रियाच्या नावावर केली पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. हो ना मिस्टर सिंघानिया?”

पुढे काय होतं? कोण आहे खरा गुन्हेगार? पाहूया पुढील भागात…

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all