तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..
अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १६
अल्बर्ट आपली कहाणी सांगत होता. सिद्धार्थ, देविका आणि आणि डीसीपी राघवसर त्याचं बोलणं ऐकत होते. तो खूप भावुक झाला होता. अल्बर्ट पुढे बोलू लागला.
“एक दिवस रिया माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली,
“अल्बर्ट, आता आपल्याला आपल्या लग्नाचा खूप सिरीयसली विचार करावा लागेल. माझे घरचे माझ्यासाठी मुलगा बघताहेत. कालच मला आदित्य सिंघानिया यांचं स्थळ सांगून आलंय. आईबाबांना मुलगा आवडलाय. त्यामुळे ते माझ्या लग्नाची घाई करतील. आपण घरी बोलूया का?”
मी म्हणालो,
“माझी काही हरकत नाही. तुझ्यासारखी इतकी चांगली मुलगी सुन बनून आमच्या घरी येणार असेल तर कोणाला का नाही आवडणार? माझ्या घरचे तयार होतील पण तुझ्या घरच्यांचं काय? त्यांना तुमच्याच कंपनीत काम करणारा माझ्यासारखा गरीब मुलगा आवडेल?”
रिया शांत बसून होती. डोळ्यातलं पाणी झरझर झरू लागलं. डोळ्यातलं पाणी टिपत ती म्हणाली,
“अल्बर्ट माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. माझ्या आईवडिलांनी आपल्या लग्नाला परवानगी नाही दिली तर आपण पळून जाऊन लग्न करू.”
मी तिच्या बोलण्याला होकार दर्शवला. अपेक्षेप्रमाणे जे वाटलं होतं तेच घडलं. रियाच्या आईबाबांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली नाही. रियाला घरात डांबून ठेवण्यात आलं. मला नोकरीवरून काढून टाकलं. शहर सोडून जायला सांगितलं नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. मग माझा नाईलाज झाला आणि मी माझं सामान भरून माझ्या गावी जायला निघालो. इतक्यात रियाचा फोन आला आणि तिने मला आमच्या नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलवलं होतं. ती माझ्यासोबत घरातून पळून येणार होती. मी आमच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन थांबलो. मी तिची वाट पाहत होतो. बराच वेळ झाला तरी ती आली नाही. इतक्यात चार पाच गुंड तिथे आले आणि त्यांनी मला बेदम मारलं. मी बेशुद्ध झाल्यावर ते सगळे तिथून पसार झाले. मी तसाच जागी निपचित पडून होतो. नंतर पुढे काय झालं आठवत नव्हतं. डोळे उघडले तेंव्हा एका हॉस्पिटलमध्ये होतो. समोर पोलीस उभे होते. जवळपासच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये आणलं हे मला पोलिसांनीच सांगितलं. माझ्याकडून माझ्या मित्रांचे कॉन्टॅक्ट घेऊन त्यांना कळवण्यात आलं. तीन महिने मी हॉस्पिटलमध्ये होतो. आणि माझ्या मित्रांकडूनच रियाच्या लग्नाची बातमी मला समजली. मी फार तुटून गेलो. मित्रांनी मला रियाबद्दल भडकावलं. श्रीमंत घरातल्या मुली अशाच असतात. आपल्या सारख्या गरीबमुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि गरज संपली की असं फेकून देतात. माझ्या आणि रियाच्या निश्चित केलेल्या भेटण्याच्या जागेबद्दल तिच्या घरच्यांना कसं समजलं असा त्यांनी प्रश्न केला.
मीही विचार करू लागलो. आमची नेहमीची भेटण्याची जागा रियाशिवाय कोणालाच ठाऊक नव्हती. मला माझ्या मित्रांचं म्हणणं पटू लागलं. माझ्या मनात रियाविषयी असलेल्या प्रेमाची जागा आता द्वेषाने घेतली होती. मी बरा झाल्यावर हॉस्पिटलमधून घरी आलो. थोड्याच दिवसांत मी ते शहर सोडलं आणि या नव्या शहरात आलो. चांगली नोकरी मिळवली. दोन तीन वर्षात स्वतःचं घर झालं. सगळं छान झालं होतं पण रियाचा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. तिने मला फसवलं ही भावना सारखी मला बोचत होती. मी तिला शोधायचं ठरवलं. तिला शोधणं तसं फारसं अवघड नव्हतं. आदित्य सिंघानियासोबत तिचा विवाह झाला होता. त्यामुळे तिचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळवणं मला सोप्पं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी कझीन रोझी आदित्यच्या कंपनीत काम करतेय हे मला इथे आल्यावरच समजलं. अखेर मी तिचा पत्ता शोधला आणि तिला भेटायला गेलो. मला समोर पाहून ती खूप रडली. मी तिला जाब विचारायला गेलो होतो पण मलाच तिची कहाणी ऐकून वाईट वाटलं. रिया आणि माझं फोनवरचं बोलणं तिच्या बाबांनी ऐकलं होतं आणि म्हणून त्यांनीच मला मारायला गुंड पाठवले होते.”
अल्बर्ट बोलता बोलता थांबला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. देविकाने टेबलवरचा पाण्याचा ग्लास त्याच्यापुढे सरकवला. तो पाणी पीत होता.
“अल्बर्ट, पुढे काय झालं? तुझं आणि मिसेस सिंघानिया यांचं अफेअर….”
देविकाला मध्येच थांबवत तो म्हणाला,
“मॅडम, माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. त्याला अफेअरचं नाव देऊ नका.”
“अरे पण एका लग्न झालेल्या स्त्रीसोबत प्रेम म्हणजे अफेअरच ना? तुझ्यात आणि मिसेस सिंघानिया यांच्यात काही फिझिकल रिलेशन?”
सिद्धार्थने प्रश्न केला तसं त्याने शरमेने खाली मान घातली आणि तो बोलू लागला.
“रियाच्या वडिलांनी जबरदस्ती तिचं लग्न आदित्य सिंघानियाशी लावून दिलं. त्याला ती कधीच आवडली नव्हती. त्याचं तिच्यावर तीळमात्रही प्रेम नव्हतं. बुडता बिझनेस वाचवण्यासाठी आणि आपल्या आईवडिलांच्या हट्टापायी आदित्यने रियाशी लग्न केलं पण त्याने तिला कधीच बायको म्हणून प्रेम दिलं नाही. रियाला आदित्य आणि रोझीच्या नात्याबद्दल समजल्यानंतर ती खूप डिप्रेस झाली. एकतर माझं प्रेम तिला मिळालं नाही आणि इकडे नवराही तिच्यावर प्रेम करत नाही या भावनेने तिच्या मनाचं खच्चीकरण होत होतं. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली. डिप्रेशनवरची औषधं सुरू होती. माझ्या येण्याने रियाच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागलं. जुनं प्रेम नव्याने फुलू लागलं. तिच्या लग्नाला तीन वर्ष होत आली होती तरी अजूनही त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरू झालं नव्हतं. ती त्या स्पर्शसुखाला आसूसलेली होती. आणि मग एक दिवस आदित्य आणि त्याचे आईवडील घरी नसताना मी तिच्याकडे गेलो. ती खूप हळवी झाली. सगळी बंधन गळून पडली आणि नकळतपणे आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. पुन्हा एक दोनदा आमच्यात शारीरिक संबंध आले. मलाही तिच्या स्पर्शाची ओढ वाटू लागली. तिचा सहवास हवाहवासा वाटू लागला. तिने सारखं जवळ असावं असं वाटू लागलं.”
अल्बर्टने एक आवंढा गिळला आणि तो पुढे सांगू लागला.
“पण नंतर रिया विचित्र वागू लागली. ती मला टाळू लागली. अचानक तिच्यातली पतिव्रता स्त्री जागी झाली. आमच्यात जे झालं ते तिला चुकीचं वाटू लागलं आणि ती मला भेटायला नकार देऊ लागली.”
“अच्छा, म्हणून मग तू रोझीला म्हटल्याप्रमाणे जुना हिशोब चुकता केलास. मिसेस सिंघानिया यांचा खुन केलास. बरोबर ना?”
देविका चिडून म्हणाली.
“नाही मॅडम, मी रियाचा खुन नाही केला. मी त्या दिवशी पार्टीत होतो. मला तिला शेवटचं भेटायचं होतं. तिच्याशी बोलायचं होतं. मी पुन्हा कधी तिला भेटणार नाही. तिचा निर्णय मला मान्य आहे हेच सांगायचं होतं पण माझं तिच्याशी बोलणं झालं नाही. तिला तिच्या नवऱ्याची भीती वाटली. तिने मला तिथून जायला सांगितलं आणि मी तिथून निघून गेलो. बसं इतकंच.. प्लिज माझ्यावर विश्वास ठेवा.”
अल्बर्ट मान खाली घालून रडू लागला. सर्वजण विचार करू लागले. इतक्यात केबिनच्या दारावर टकटक झाली. दारात विक्रम उभा होता.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा