अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १५

अनटोल्ड कन्फेशन्स..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १५


“हा माझा कझीन अल्बर्ट..”

“मग हा पार्टीत काय करत होता? तो तुझ्यासोबत आला होता का?”

“नाही मॅडम, अल्बर्ट माझ्या आधीच पार्टीत आला होता. मलाही आश्चर्य वाटलं म्हणूनच मी त्याला विचारत होते. तो मला म्हणाला की, एक जुना हिशोब चुकता करायला आलोय. मला नीटसं समजलं नाही. त्यानंतर मी माझ्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत होते. आम्ही मित्रमैत्रिणीं मिळून खूप ड्रिंक्स केली होती. मला थोडी जास्तच झाली होती.”

रोझीने शरमेने मान खाली घातली.

“हं.. ठीक आहे. अल्बर्टचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दे आणि जा. पुन्हा काही वाटलं तर बोलवून घेईन. समजलं?”

रोझीने मान डोलावली आणि ती तिथून निघून गेली.

रोझी निघून गेल्यावर देविकाने अल्बर्टला कॉल केला आणि त्याला ऑफिसला यायला सांगितलं. तो थोड्याच वेळात ऑफिसला पोहचणार होता.

“नेमकं काय झालं असेल? अल्बर्टचा या सगळ्यात काय संबंध? तो कोणता जुना हिशोब चुकतं करण्याबद्दल बोलत होता? मिसेस सिंघानिया आणि अल्बर्टचं अफेअर? मग विकीचे फिंगरप्रिंट्स तिथे कसे?”

अनेक प्रश्न तिच्या मनात रुंजी घालत होते. इतक्यात राघवसर तिथे आले. त्यांना समोर पाहून देविका उठून उभी राहिली.

“गुडमॉर्निंग सर..”

“व्हेरी गुडमॉर्निंग देविका.. काय नवीन अपडेट्स?”

देविका बोलायला सुरुवात करणार इतक्यात सिद्धार्थ तिथे आला. दोघांनीही राघव सरांना केसचे अपडेट दिले.

“हं.. अजूनही हत्या की आत्महत्या हे कोडं सुटलेलं नाहीये.”

दोघांनीही खाली मान घातली.

“आता पुढे?”

“सर, अजून एक संशयित आहे. मिस्टर अल्बर्ट, रोझीचा भाऊ. मी त्याला कॉल करून बोलवलं आहे. त्याच्याकडे नक्कीच काहीतरी महत्वाची माहिती असेल.”

देविकाने पटकन उत्तर दिलं.

“ठीक आहे, तो आला की मला बोलवा. मी आत केबिनमध्ये आहे.”

असं म्हणून राघवसर त्यांच्या खोलीत गेले. देविका पेपर्स तपासून पाहत होती. सगळ्या गोष्टींची लिंक लावण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात सिद्धार्थ म्हणाला,

“देवी, आपण इतका शोध घेतोय. इतक्या संशयितांच्या उलट तपासण्या घेतल्या पण त्यांच्या विरुद्ध आपल्याला एकही ठोस पुरावा सापडला नाही. सगळे पुरावे विकीच्या विरुद्ध साक्ष देत आहेत. आता तर मला संशय येऊ लागलाय की, विकीच खरा गुन्हेगार नसेल ना?”

“तू म्हणतोयस ते बरोबर आहे रे.. पुरावे तर दिसताहेत पण मन मात्र ऐकत नाहीये. आता तो अल्बर्ट आल्यावर पाहूया अजून कोणती कहाणी समोर येतेय.”

देविका पेपर्स गोळा करत म्हणाली. इतक्यात ऑफिसच्या शिपायाने अल्बर्ट आल्याचं सांगितलं.

“त्याला पटकन माझ्या केबिनमध्ये घेऊन ये..”

असं म्हणून तिने राघव सरांना कॉल करून अल्बर्ट आल्याची बातमी दिली. राघवसर पटकन तिच्या केबिनमध्ये आले. आणि पाठोपाठ अल्बर्टही आला. एसीपी देविका, सिद्धार्थ आणि डीसीपी राघव शास्त्री या तिघांनी अल्बर्टला चारी दिशांनी वेढलं होतं आणि तो मधोमध खुर्चीत बसला होता.

“हं, बोल अल्बर्ट, मिस्टर आणि मिसेस सिंघानिया यांच्या पार्टीत तू काय करत होतास? तुला पार्टीचं आमंत्रण होतं का?”

डीसीपी राघव सरांनी प्रश्न विचारला.

“तू त्या दिवशी रोझीला म्हणालास की, जुना हिशोब चुकता करायला आला आहेस? म्हणजे काय? तू नेमकं कशाबद्दल बोलत होतास?”

देविकाने प्रश्न विचारला.

“तू आणि मिसेस सिंघानिया तुमचा एकमेकांशी काय संबंध आहे? तू त्यांच्या बंगल्यावर कशासाठी जात होतास? बोल पटकन..”

सिद्धार्थ त्याच्यावर खेकसत म्हणाला. सर्वांनी असा घेराव घातल्याने अल्बर्टची पाचावर धारण बसली आणि एक सत्य त्याने सर्वांसमोर उघडकीस आणलं. अल्बर्ट बोलू लागला.

“मी अल्बर्ट डिकोस्टा, सध्या एका ऍडव्हरटायझिंग फर्ममध्ये काम करतो. चार वर्षांपूर्वी जेंव्हा मी छोट्या गावातून शहरात आलो तेंव्हा माझी परिस्थिती फारच हलाखीची होती. रियाच्या बंगल्याच्या समोर सोसायटीमध्ये मित्रांसोबत मी राहायला लागलो होतो. मित्रांच्या मदतीने राहण्याची तर सोय झाली होती पण पोटापाण्याचं काय? शहरात नवीन असल्याने लगेच नोकरी मिळणं कठीणच होतं. मी वणवण भटकत होतो. मग कोणीतरी मला सांगितलं की, ”रियाच्या वडिलांच्या फर्ममध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये जागा आहेत. तुमच्या समोरच्या बंगल्यात राहतात तर एकदा भेटून बोलून घे.” मला नोकरीची गरज होती म्हणून मी लगेच त्यांच्या घरी जाण्याचं ठरवलं. दुसऱ्याच दिवशी मी माझा बायोडेटा आणि सर्टिफिकेट्स घेऊन त्यांच्या बंगल्यावर गेलो. आणि तिथे पहिल्यांदा माझी ओळख रियाशी झाली. रिया दिसायला खूप सुंदर होती. पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडावं अशीच होती ती. ती मला आवडली होती. तिचं सौन्दर्य पाहून मी भान हरपून गेलो होतो. तिने मला आत बोलवलं. तिथे येण्याचं कारण विचारलं. मी तिला माझी परिस्थिती समजावून सांगितली. तिला माझी दया आली आणि तिने तिच्या वडिलांना सांगून मला नोकरी मिळवून दिली. हळूहळू आमची ओळख वाढू लागली. ती कामानिमित्त तिच्या कंपनीत यायची आवर्जून माझ्याशी बोलायची. हळूहळू आमच्यात घट्ट मैत्री झाली आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं किंबहुना माझ्यापेक्षा तिचंच माझ्यावर खूप प्रेम होतं. ती माझ्यासोबत खूप खूष असायची. आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेतल्या होत्या. कधीच एकमेकांना सोडून जाणार नाही असं वचन दिलं होतं. आम्ही लवकरच आमच्या घरच्यांना सांगून विवाह बंधनात बंधण्याचा निर्णय घेणार होतो.”

तो क्षणभर थांबला. एक दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाला,

“पण इतकं सरळ रेषेतलं साधं सोप्पं आयुष्य असतं तर काय सगळंच छान झालं असतं. आम्ही आमच्या भावी आयुष्याची स्वप्नं पाहत होतो पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच सुरू होतं.”

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all