अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १४

अनटोल्ड कन्फेशन्स..



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १४

देविकाने चौकशीसाठी आदित्यला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं.

“एसीपी देविका, तुम्ही एका प्रतिष्ठित व्यक्तीला असं गुन्हेगारांसारखं चौकशीला बोलवू शकत नाही. मी तुमच्या अब्रूनुकसानीचा दावा करू शकतो. तुम्ही थांबा, माझा वकिलच तुमच्याशी बोलेल.”

“एक मिनिट मिस्टर सिंघानिया, आम्हाला आमचं काम शिकवू नका. आम्हाला चांगलं माहित आहे तुम्ही समाजातले प्रतिष्ठित व्यक्ती आहात म्हणून आम्ही आतापर्यंत सभ्य शब्दातच तुमच्याशी बोलतोय. आता निमूटपणे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. समजलं?”

देविकाचा पारा चढला होता. मोबाईलमधले फोटोज त्यांच्या समोर धरत तिने विचारलं,

“या फोटोत तुम्हीच आहात ना?”

आदित्य मोबाईलमधला फोटो पाहून चपापला.

“बोला.. आता गप्प का? दातखिळी बसली? तुम्हीच आहात ना?”

देविकाने दरडावून विचारलं. अंगात उसणं अवसान आणून तो म्हणाला,

“हो.. मीच आहे. मग काय? त्यात काय एवढं?”

“त्यात इतकं काही नाही? बरं, मग तुमच्यासोबत ही मुलगी कोण आहे?”

“रोझी, माझी सेक्रेटरी.. आम्ही बिझनेस मिटिंगसाठी बऱ्याचदा भेटतो. त्यात वावगं काय आहे?”

आदित्य बेफिकीरपणे म्हणाला.

“अच्छा, ही रोझी आहे तर! तिलाही बोलवून घेणारच आहे. लवकरच सत्य बाहेर येईलच. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही दोघे बिझनेस मिटिंगसाठी भेटता. त्यात वावगं काहीच नाही पण बायकोचा मृतदेह पाहून आकांडतांडव करणारे ‘द आदित्य सिंघानिया’ दोन दिवसांत नॉर्मल होतात. आपल्या सेक्रेटरीशी इतकं हसून खेळून बोलतात हे थोडं विचित्र वाटलं, वावगं वाटलं. मला हेही माहित आहे की, तुमचं आणि रोझीचं अफेअर सुरू होतं. ते मिसेस सिंघानिया यांना समजलं. त्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. त्या डिप्रेशनची औषधं घेत होत्या. तुमच्या प्रेम प्रकरणाचा धक्का त्या पचवू शकल्या नाहीत आणि तुमच्या याच वागण्यामुळे मिसेस सिंघानिया यांनी आत्महत्या केली.”

आदित्य छदमी हसला.

“छान स्टोरी बनवलीत तुम्ही मॅडम, पण तुमच्या कल्पनेप्रमाणे असं काहीही घडलेलं नाही. रोझी माझी सेक्रेटरी आहे आणि माझी खूप चांगली मैत्रीणही. त्या व्यतिरिक्त आमच्यात काहीही नातं नाही. तुम्हाला तपास करता येत नाही म्हणून तुम्ही आता मलाच गुन्हेगार म्हणून उभे करत आहात. कमाल आहे! उगीच तुम्ही कल्पनेचे सेतू बांधू नका. समजलं? आणि यापुढे मला बोलावण्याआधी माझ्या वकिलांशी बोलून घ्या.”

आदित्य चिडून म्हणाला आणि जाण्यासाठी जागेवरून उठून उभा राहिला. इतक्यात डीसीपी राघव तिथे आले. आदित्यचं बोलणं त्यांनी ऐकलं.

“मिस्टर सिंघानिया, उगीच एखादी गोष्ट जास्त ताणू नका. पोलिसांना सहकार्य करा. तुम्ही मिसेस सिंघानिया यांना मारलं की नाही हे सध्यातरी माहित नाही पण आतापर्यंतच्या तपासावरून मिसेस सिंघानिया यांना मारण्यासाठी तुमच्याकडेच एक स्ट्रॉंग मोटिव्ह होता असं दिसतंय. त्यामुळे तुम्ही आमच्या दृष्टीने संशयितच आहात.”

डीसीपी राघव आदित्यकडे पाहत म्हणाले.

“स्ट्रॉंग मोटिव्ह? आणि माझ्याकडे? कसला स्ट्रॉंग मोटिव्ह?”

आदित्यने आश्चर्य व्यक्त केलं.

“तुमच्या आईवडिलांनी त्यांची सारी प्रॉपर्टी मिसेस रिया सिंघानिया यांच्या नावावर केली होती. तुमच्या आणि तुमच्या भावाच्या नावावर एक बिझनेस सोडता तुमच्या नावावर कोणतीही संपत्ती नव्हती. मिसेस रिया सिंघानिया या साऱ्या संपत्तीच्या एकमेव मालक होत्या त्यामुळे तुमच्या मनात त्यांच्याबद्दल राग वाटू शकतो आणि त्या असुयेमुळे तुम्ही त्यांचा खुन करू शकता. हो की नाही?”

राघव शास्त्रींनी उत्तराच्या अपेक्षेने प्रश्न केला.

“सर, मी खरंच सांगतोय. मी रियाचा खुन केलेला नाहीये. तुम्ही प्लिज माझ्यावर विश्वास ठेवा.”

“मिस्टर सिंघानिया, आम्ही लवकरच या सर्व गोष्टींचा छडा लावून खऱ्या आरोपी पर्यंत पोहचू. तुम्ही आता जाऊ शकता पण आमच्या संमतीशिवाय तुम्हाला शहराबाहेर जाता येणार नाही.”

डीसीपी राघव शास्त्रीनी आदित्यला सोडून दिलं. आदित्यशी बोलणं सुरू असतानाच एसीपी देविकाने शांताबाई आणि रोझीला चौकशीसाठी बोलवलं होतं. आदित्य बाहेर पडला आणि शांताबाईनी ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्या येताच देविकाने मोबाईलमधला त्या मुलाचे फुटेज दाखवले आणि विचारलं,

“शांताबाई, हे फोटो नीट पहा. तुम्ही यांना ओळखता का?”

शांताबाई फोटो नीट निरखून पाहत म्हणाली,

“अरे, या तर रोझी मॅडम हाईत. आमच्या सायबांसंगट बंगल्यावर कंदीमंदी येत हुत्या. रिया बाईसाहेबास्नी रोझी मॅडमचं घरी येणं आवडायचं नाय. मंग त्या चिडचिड करायच्या. सायेब त्यास्नी कसलीतरी गोळी द्यायचे मंग बाईसायेब शांत व्हायच्या.”

“आणि यांना ओळखता?”

“अरेच्या! बाईसायेब ह्ये त्येच पोरगं हाय. जे कंदीमंदी बंगल्यावर येत हुतं.”

शांताबाई त्या मुलाचा फोटो पाहून जवळजवळ किंचाळलीच.

“नक्की ना शांताबाई? हीच व्यक्ती होती ना?”

देविकाने पून्हा विचारलं.

“व्हय जी, ह्योच हुता..”

शांताबाई निक्षुन म्हणाली.

“ठीक आहे शांताबाई.. आता तुम्ही जाऊ शकता. पोलिसांना खूप सहकार्य केलंत. धन्यवाद.”

देविका हसून म्हणाली. शांताबाई देविकाला नमस्कार करून तिथून निघून गेल्या.

थोड्याच वेळात रोझी ऑफिसमध्ये हजर झाली. आता देविकाने तिचा मोर्चा रोझीकडे वळवला.

“रोझी, तू आदित्य सिंघानिया यांना कसं ओळखतेस?”

“ते माझे बॉस आहेत आणि मी त्यांची सेक्रेटरी.”

“बस्स इतकंच? फक्त बॉस आहेत की अजून काही?”

“आदित्य सिंघानिया यांनी तर आम्हाला वेगळंच काही सांगितलं.”

“काय सांगितलं मॅडम?”

“की तुझं आणि त्यांचं गेली कित्येक वर्ष..”

देविकाच्या बोलण्यावर रोझी गांगरून गेली. चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले.

“बोल रोझी, नाहीतर मग पोलिसी भाषा तुला माहित असेलच.”

देविकाची खेळी कामी आली. आदित्यचं बोलणं फिरवून सांगितल्याने रोझी घाबरली आणि त्या भीतीच्यापोटी तिने सगळं सांगून टाकलं.

“मॅडम, मी तुम्हाला सगळं खरं सांगते. मी आदित्य सिंघानिया यांच्यासोबत गेली तीन चार वर्षांपासून काम पाहतेय. त्यांना मी आवडत होते म्हणजे तसं त्यांनी मला बोलूनही दाखवलं होतं पण आदित्य सरांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न रिया मॅडमशी ठरवलं. आदित्य सर या लग्नामुळे खूष नव्हते. त्यांना रिया मॅडमशी लग्न करायचं नव्हतं पण आई वडिलांच्या निर्णयामुळे त्यांना रिया मॅडमशी जबरदस्ती लग्न करावं लागलं. लग्नानंतरही ते रिया मॅडमसोबत जास्त राहायचे नाही. बराचदा ते माझ्या सोबतच असायचे. माझी कंपनी त्यांना आवडायची.”


“हं.. म्हणून मग तू आणि आदित्य सिंघानिया दोघांनी मिळून त्यांचा खुन केला. हो ना?”

देविकाने दरडावून विचारलं.

“नाही मॅडम, मी असं काहीच केलं नाही.”

“हा तुझ्यासोबत मुलगा कोण आहे?”

देविकाने फुटेज दाखवत तिला विचारलं.


पुढे काय होतं? तो अनोळखी मुलगा कोण होता? विक्रम गुन्हेगार असेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all