अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १३

अनटोल्ड कन्फेशन्स..अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १३


दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विक्रम सकाळी लवकर उठला. कामावरून निलंबित केलं असलं तरी त्याच्यातला चाणाक्ष पोलीस त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याने स्वतःच्या परीने शोध घेण्याचा निर्णय घेतला होता आणि मनातली गोष्ट त्याने यामिनीजवळ बोलून दाखवली होती. तिनेही विक्रमच्या निर्णयाला साथ देण्याचं ठरवलं होतं. विक्रम तपासासाठी बाहेर जाण्याची तयारी करू लागला. यामिनीची सकाळची घाई सुरू होती. एकीकडे ती विक्रमची कॉफी, ब्रेकफास्ट तयार करत होती तर दुसरीकडे विक्रमचा टॉवेल, कपडे, रुमाल, घड्याळ, शूज साऱ्या वस्तू बाहेर काढून ठेवत होती. इतक्यात यामिनीने आवाज दिला.

“विकी, आवरलं का? अरे किती वेळ! सकाळचं तरी पटापट आवरून हॉलमध्ये येत जा.”

विक्रम पटकन बाथरूममधून बाहेर आला. स्वतःचं आवरून तो हॉलमध्ये येऊन बसला. यामिनीने त्याला ब्रेकफास्ट आणि कॉफी दिली. विक्रमने ब्रेकफास्ट केला आणि तो बाहेर जायला निघाला.

“चल यामिनी, मी येतो, मला घरी यायला उशीर होईल.”

तिने मान डोलावली. विक्रम घराबाहेर पडला. सोसायटीच्या पार्किंगमधून गाडी बाहेर काढली आणि तो त्याच्या गतीने गाडी चालवत, तपासाची दिशा मनात ठरवत निघाला. रिया सिंघानिया सुसाईड केसचे विचार मनातून काही केल्या जात नव्हते. वाटेत त्याला ‘हॉटेल ओबेरॉय’ लागलं आणि अचानक त्याने गाडी थांबवली.

“अरे, आदित्य सिंघानिया इथे? त्याच्यासोबत ती मुलगी कोण आहे?”

आदित्य कोण्या मुलीसोबत हॉटेलच्या दिशेने आत जाताना दिसला. विक्रमला थोडं विचित्र वाटलं. त्याने त्याची गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि तोही गुपचूप आत गेला. आदित्य सिंघानिया आणि ती मुलगी एका टेबलवर जाऊन बसले आणि विक्रम त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन उभा राहिला. त्या दोघांना हसूनखेळून बोलताना पाहून विक्रमला नवल वाटलं.

“दोन दिवसांपूर्वी मिसेस सिंघानिया यांच्यासाठी रडून गोंधळ घालणारा नवरा आज इतका नॉर्मल कसा? त्या मुलीसोबत तर छान गप्पा मारतोय. ही काय भानगड आहे?”

विक्रमने पटकन आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्या दोघांचे पटापट दोन चार फोटो काढून घेतले. थोडा वेळ थांबून आदित्य आणि ती मुलगी हॉटेलमधून बाहेर पडले. त्यानंतर लगेच विक्रम आत हॉटेलमध्ये गेला. हॉटेलच्या रिसप्शन टेबलवर जाऊन त्याने आपलं आय कार्ड दाखवत चौकशीला सुरुवात केली.

“हे आता बाहेर पडलेले साहेब..”

“हो ते आदित्य सिंघानिया सर ना? आमचे नेहमीचे कस्टमर आहेत. नेहमी येतात ते.”

विक्रमचं बोलणं मध्येच तोडत हॉटेलचा मॅनेजर म्हणाला.

“आणि त्यांच्या सोबत असलेल्या मॅडम?”

“हो त्याही नेहमी असतात.”

विक्रमने मोबाईल काढला आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवत त्याने मॅनेजरला विचारलं,

“आणि यांना कधी पाहिलंय?”

मॅनेजरने मोबाईलमध्ये निरखून पाहत म्हणाला,

“हो सर, या मॅडम सोबत एक दोनदा आले होते.”

मॅनेजरने विक्रमला उत्तर दिलं.

“तू इतका खात्रीने कसं काय सांगू शकतोस? इतक्यात येऊन गेलेत का?”

“हो, गेल्या आठवड्यात आले होते शिवाय कालही येऊन गेले. ही व्यक्ती माझ्या चांगली लक्षात राहिली कारण त्यांचं आमच्या इथल्या एका वेटरसोबत भांडण झालं होतं. मीच सोडवायला गेलो होतो.”

“अच्छा?”

विक्रम विचारात मग्न झाला. थोड्याच वेळात त्याला काही प्रश्न विचारून विक्रम तिथून निघाला.

“मला ही गोष्ट सिद आणि देविकाला सांगायला हवी. हे फोटोज दाखवायला हवेत त्यासाठी ऑफिसला जावं लागेल. नको, नको.. उगीच सस्पेंड असताना ऑफिसला आला म्हणून अजून नवीन रामायण घडेल. त्यापेक्षा त्यांना नेहमीच्या जागीच बोलवून घ्यावं.”

असा विचार करून विक्रमने सिद्धार्थ आणि देविकाला नेहमीच्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि तोही तिथे पोहचला. देविका आणि सिद्धार्थ आधीच तिथे आले होते. विक्रम घाईने त्यांच्याजवळ येत म्हणाला,

“सिद, आज मी आदित्य सिंघानिया यांना हॉटेल ओबेरॉयमध्ये पाहिलं.”

“हो मग? त्यात इतकं विशेष वाटण्यासारखं काय आहे? मिस्टर सिंघानिया हॉटेलमध्ये जाऊ शकत नाहीत का? की त्यांना हॉटेलमध्ये जाण्याला बंदी घातलीय?”

सिद्धार्थ हसून म्हणाला.

“हो जाऊ शकतात ना! त्यांना हॉटेलमध्ये जाण्यास मुळीच बंदी नाही पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांच्या सोबत जी मुलगी होती ती त्या पार्टीतही हजर होती.”

विक्रम शेजारी ठेवलेल्या खुर्चीत बसत म्हणाला.

“अरे विकी, डिपार्टमेंटमध्ये नवीन आल्यासारखा काय बोलतोयस? ती मुलगी त्यांच्या ओळखीची असू शकते ना? म्हणूनच पार्टीला आली असेल ना? काय तू पण!”

सिद्धार्थ त्याच्याकडे पाहून म्हणाला. विक्रमने त्याला मोबाईलमधले मिस्टर सिंघानिया आणि त्या मुलीचे काढलेले फोटोज दाखवले आणि म्हणाला,

“आणि हीच मुलगी पार्टीत ज्या मुलासोबत होती त्या मुलालाही पार्टीच्या आधी भेटली होती.”

त्याचं बोलणं ऐकताच देविकाने पटकन त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि आश्चर्याने उद्गारली.

“अरे हीच ती मुलगी! आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिली.”

“आणि ज्या मुलासोबत ती फुटेजमध्ये दिसतेय तो मुलगा मिसेस सिंघानिया यांच्या मृत्यूच्याआधी आणि नंतरही तिला भेटला होता.”

विक्रमने गोफ्यस्फोट केला. सिद्धार्थ आणि देविका आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले.

“देवी, मिस्टर सिंघानिया यांना ताबडतोब चौकशीसाठी बोलवून घे. तेच या मुलीबद्दल सांगू शकतील. आणि त्यानंतर या मुलीलाही बोलवून घे. मला सांग मिसेस सिंघानिया यांचे कॉल रेकॉर्ड्स आले का? आणि मोबाईलमधले कॉन्टॅक्ट्स?”

सिद्धार्थच्या बोलण्यावर देविकाने मान डोलावली आणि म्हणाली,

“हो, कॉल रेकॉर्ड्स आज संध्याकाळपर्यंत आपल्या हातात येतील आणि मी मिसेस सिंघानिया यांचा मोबाईल पाहिला त्याला पासवर्ड असल्याने ओपन झाला नाही. म्हणून मग मी फॉरेन्सिक लॅब मधल्या स्टाफकडून अनलॉक करून घेतला आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या मित्रमैत्रिणींना चौकशीसाठी बोलवलं आहे. थोड्याच वेळात येतील.”

“आणि शांताबाईलाही बोलवून घे.”

विक्रम देविकाला म्हणाला. सिद्धार्थने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. देविका काय समजायचं ते समजून गेली. तिने मान होकरार्थी मान हलवली.

पुढे काय होतं? खरा गुन्हेगार कोण असेल? पाहूया पुढील भागात…

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all