अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १२

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १२


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १२

सीसीटीव्ही फुटेज चेक करता करता देविका एकदम शॉक झाली आणि तिने सिद्धार्थला कॉल केला.

“सिद, तू कुठे आहेस आता?”

“मी ऑफिसमध्ये.. का गं?”

“तिथेच थांब. मी आता ऑफिसला पोहचतेय. तुला एक महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. आल्यावर बोलू.”

“का काही लीड मिळालीय का?”

“सीसीटीव्ही फुटेजमध्ये मला एक गोष्ट दिसली. मला थोडं ऑड वाटलं. तिथे येऊन दाखवते. चल बाय..”

देविकाने कॉल कट केला. थोड्याच वेळात ती ऑफिसवर पोहचली. देविकाने त्याला पुन्हा एकदा ते फुटेज दाखवले. थोड्या वेळापूर्वी तिने पाहिलेल्या व्हिडिओवर येऊन ती थांबली.

“हे बघ सिद, या व्हिडिओमध्ये हे काय दिसतंय. ही मुलगी कोण आहे? सारखी ड्रिंक काउन्टरजवळ दिसतेय. जास्त प्यायलेली दिसतेय आणि तिच्यासोबत हा मुलगा कोण आहे? किती क्लोज्ड आहे बघ! तो बराच वेळ तिच्याशी बोलताना दिसतोय. आणि हा फुटेज पण बंगल्याच्या आतल्या बाजूचा आहे. जिथे माणसांची जास्त वर्दळ नाहीये. पार्टीतल्या पाहुण्यांपासून दूर थांबलेत हे. कोण असावेत हे? पुन्हा ही मुलगी दुसऱ्या फुटेजमध्येही आहे. मिस्टर सिंघानिया यांच्या ऑफिस स्टाफसोबतचा व्हिडिओ बघ. ती पुन्हा मिस्टर सिंघानिया यांच्याशी पण बोलताना दिसतेय पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येतेय का? तो मुलगा अजून एका फुटेजमध्ये मिसेस सिंघानिया यांच्याशी बोलतोय. त्यानंतर मात्र परत कुठेच दिसला नाही. तो अचानक कुठे गायब झाला. सिद, आपल्याला त्या दोघांची चौकशी करावी लागेल. ते दोघे कोण आहेत ते शोधून काढायला हवं. बरोबर ना?”

देविकाने सिद्धार्थकडे पाहिलं.

“हं.. बरोबर बोलतेयस तू देवी, तू एक काम कर; सर्वात आधी मिसेस सिंघानिया यांचे कॉल रेकॉर्ड्स काढून आण. त्यावरून आपल्याला काहीतरी माहिती मिळेल. दुसरी गोष्ट इन्स्पेक्टर नार्वेकरांनी फोरन्सिक लॅबमधून ज्या वस्तू आपल्याला आणून दिल्या; त्यात मिसेस सिंघानिया यांचा मोबाईलही होता. त्यातून आपल्याला मिसेस सिंघानिया यांचे मित्रमैत्रिणीचे नंबर असतील; त्यांना चौकशीसाठी बोलवून घे. त्याआधी आपल्याला राघव सरांना केसचे अपडेट द्यावे लागतील. अजूनही विकी निर्दोष आहे असा एकही पुरावा सापडलेला नाही. आपण फक्त हवेतच तीर मारतोय.”

“पण तो दोषी आहे हे सांगणाराही पुरावा आपल्याला सापडलेला नाहीये.”

“हं.. चल आपण राघवसरांना अपडेट देऊया. मग पुढच्या कामाला लागू.”

सिद्धार्थच्या बोलण्यावर देविकाने मान डोलावली आणि ते डीसीपी राघव शास्त्री यांच्या केबिनजवळ आले. सिद्धार्थने केबिनच्या दारावर टकटक केलं आणि विचारलं.

“मे आय कम ईन सर?”

“येस प्लिज..”

सिद्धार्थ आणि देविका आत आले.

“हं.. सिद्धार्थ, काय अपडेट्स आहेत? काही लीड मिळाली की नाही?”

“हो सर तेच सांगायला आलोय.”

त्यानंतर सिद्धार्थ आणि देविकाने आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना, केलेला तपास डीसीपी राघवसरांच्या कानावर घातला. स्वतः जवळचा लॅपटॉप उघडून त्याने देविकाने आणलेले फुटेज दाखवायला सुरवात केली. क्षणभर दीर्घ श्वास घेऊन सिद्धार्थ पुढे म्हणाला,

“सर आतापर्यंतच्या तपासात आपल्याला संशयित सापडलेत; तेही आपण नुसता अंदाज बांधतो आहोत पण विकीच्या बाबतीत तसं नाहीये. तो त्या खोलीत होता याचे पुरावे आपल्याला त्या खोलीत सापडलेत जसे की, त्याचे फिंगरप्रिंट्स, त्याच्या काही वस्तू.. त्याचप्रमाणे लोकांनी त्याला आणि रियाला बोलताना पाहिलं होतं जे की, त्यानेही ही गोष्ट मान्य केलीय आणि आता देविकाने आणलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो मिसेस सिंघानियांशी एका कोपऱ्यात बोलताना दिसतोय. काय बोलतोय ते माहित नाही पण त्यांच्यात नक्कीच काहीतरी वेगळं बोलणं झालंय. मिसेस सिंघानिया यांच्या भेदरलेला चेहरा पाहिला का सर तुम्ही? मी असं म्हणत नाही की, विकी दोषी आहे पण त्याच्याजवळ नक्कीच काहीतरी वेगळी बातमी आहे; जी तो आपल्याला सांगत नाहीये. सर, मला असं वाटतंय की, तुम्ही स्वतः विकीशी बोलून घ्यावं. तो जर असा शांत राहिला तर तोच अडकेल आणि नाहक त्याचा बळी जाईल. सर, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही एकदा त्याच्याशी बोला आणि मिसेस सिंघानिया यांच्याशी त्याचं नेमकं काय बोलणं झालं ते काढून घ्या, जेणेकरून आपल्याला तपासाची एक योग्य दिशा मिळेल.”

सिद्धार्थने त्याचं बोलणं संपवलं आणि त्याने डीसीपी राघवसरांकडे पाहिलं. ते खुर्चीत बसून कसलातरी विचार करत होते.

“सर, एसीपी सिद्धार्थ यांचं बोलणं मला पटतंय. मला खात्री आहे की एसीपी विक्रम तुमच्याशी नक्की बोलतील आणि आपल्याला तपासात मदत करतील.”

देविकाने सिद्धार्थच्या बोलण्याला दुजोरा दिला.

“ठीक आहे. मी विक्रमशी बोलतो. तुम्ही तुमच्या कामाला लागा.”

दोघांनी माना डोलावल्या आणि ते केबिनच्या बाहेर पडले. देविका तिच्या डेस्कजवळ आली. खुर्चीत बसत टेबलावरची पाण्याची बॉटल तोंडाला लावली. डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं.

“विकी असं करणार नाही. नक्कीच वेगळं काहीतरी आहे. जे मला दिसत नाहीये. विकीच्या वस्तू, फिंगरप्रिंट्स सापडल्याने त्याच्यावर जास्त दाट संशय निर्माण होतोय पण विकी खुन करू शकत नाही. त्या दिवशी विकी मला कोण्या रोझी बद्दल म्हणाला होता. फुटेज मधली मुलगीच रोझी नसेल? तो मुलगा कोण होता? तो नंतर कुठे गेला? काहीच कळत नाहीये. विचार करून डोक्याचा भुगा झालाय नुसता..”

ती स्वतःशीच पुटपुटली.

पुढे काय होतं? विक्रम खरंच खुनी आहे का? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all