अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १०

अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १०अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..


अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग १०

इकडे विक्रमला निलंबित केल्याने तो खूपच वैतागला होता. इतक्या वर्षाच्या त्याच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला होता. आजवरच्या त्याच्या करियरवर डाग लागला होता. विक्रम ऑफिशली या केसवर काम पाहणार नव्हता पण तरीही स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तो केसच्या बाहेर राहून एसीपी सिद्धार्थ आणि देविकाला मदत करणार होता. त्याने पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे जबाब चेक केले. त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही. त्याने चिडून सिद्धार्थला कॉल केला. सिद्धार्थने कॉल घेतला.

“सिद, मी केसच्या बाहेर आहे त्यामुळे मला काहीच करता येत नाहीये. मी काय करू आता? स्वतःला निर्दोष कसा सिद्ध करू?”

विक्रम चिडून म्हणाला.

“अरे विकी, शांत हो. मला एक नवीन बातमी समजलीय. तू आपल्या नेहमीच्या ठिकाणी ये आणि देविकाला बोलवून घे. मीही तिथे पोहचतोच. भेटून सविस्तर बोलू.”

असं म्हणून सिद्धार्थने कॉल कट केला. विक्रमने एसीपी देविकाला कॉल केला.

“हाय विकी, काय म्हणतोयस?”

“काही नाही गं. तू एक काम कर. आपल्या नेहमीच्या ठिकाणी ये. सिद पण येणार आहे. भेटूनच बोलू.”

“बरं ठीक आहे. मी निघतेच आता. आल्यावर बोलू.”

विक्रमने कॉल कट केला आणि सिद्धार्थ आणि देविकाला भेटण्यासाठी निघाला. त्याने ऑफिसच्या पार्किंगमधून गाडी बाहेर काढली आणि गाडी स्टार्ट केली. गाडी चालवत असतानाही त्याच्या मनात विचारचक्र सुरू होतं. पार्टीतला घटनाक्रम जुळवण्याचा तो प्रयत्न करत होता. स्वतःला पडलेल्या प्रश्नांना तो स्वतःच उत्तर देण्याचा प्रयत्न करत होता.

“मिस्टर अँड मिसेस सिंघानिया यांची पार्टी. रिया यामिनीची मैत्रीण असल्याने मी पार्टीत सामील झालो. तिथे सर्वांसाठीच मी अनोळखी होतो. पहिल्यांदाच ओळख झाली होती. मग रियाने मला भेटायला बोलवलं. तिला मला काय सांगायचं होतं? मी त्या खोलीत गेलोच नाही मग माझे फिंगर प्रिंट्स तिथे कसे आले? की कोणी प्लॅन केले?”

प्रश्नांचा ससेमिरा काही संपत नव्हता. विचारांच्या तंद्रितच तो कॅफेजवळ पोहचला. देविका आणि सिद्धार्थ आधीच पोहचले होते. विक्रम येऊन त्यांना जॉईन झाला. सिद्धार्थने देविकाला विचारलं,

“हं देवी, काय खबर आहे?”

देविकाने बोलायला सुरुवात केली.

“सिद, मी मिसेस सिंघानिया यांच्या आई बाबांच्या चौकशी केली. तेंव्हा मला त्यांच्याकडून एक महत्वाची गोष्ट समजली. रिया ही त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांची सारी प्रॉपर्टी त्यांनी रियाच्या नावावर केली होती. त्यांच्यात आणि सिंघानिया यांच्यात कौटुंबिकच नाही तर बिझनेस रिलेशन सुद्धा आहेत. त्यामुळेच मिस्टर सिंघानिया यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलाचं लग्न रियाशी लावून दिलं असेल आणि त्यांच्या साऱ्या प्रॉपर्टीसाठी खुनही.”

देविका क्षणभर थांबली आणि तिने त्या दोघांकडे पाहिलं. तिचं बोलणं संपल्यावर सिद्धार्थ म्हणाला,

“नाही, तसं होऊ शकत नाही. मला एक इंटरेस्टिंग न्यूज समजलीय. आदित्य सिंघानिया यांच्या आई वडिलांनीही त्यांची सारी प्रॉपर्टी आपल्या सुनेच्या म्हणजेच रिया सिंघानिया यांच्या नावावर केली होती. ज्या रात्री पार्टी होती त्याच दिवशी सकाळी मिस्टर सिंघानिया यांचा धाकटा भाऊ त्यांच्या बंगल्यावर गेला होता. त्याच्यात आणि त्याच्या आईवडीलांमध्ये प्रॉपर्टीवर वाद झाला होता आणि तेंव्हा त्याने रियाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आपल्याला सर्वात आधी नीरजला आपल्या कस्टडीत घेतला पाहिजे. मी आताच त्याला कॉल करून आपल्या ऑफिसला बोलवून घेतो.”

“अरे पण त्या सुसाईड नोटचं काय? त्यांनी कोणत्या गिल्ट मध्ये येऊन पत्र लिहलं असेल? की, हा खुन असून आपल्याला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला जातोय?”

विक्रमचं बोलणं सिद्धार्थ पटण्यासारखं वाटलं. थोडा विचार करून तो म्हणाला,

“देवी, तू एक काम कर. मिस्टर सिंघानिया यांच्या बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक कर आणि काही संशयास्पद वाटलं तर मला कळव. मी मिस्टर नीरज कडून काही खबर मिळते का ते पाहतो.”

देविका मान डोलावत म्हणाली,

“ओके मग, मी निघते आणि मिस्टर सिंघानिया यांच्या बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करते.”

“थांब देवी, मी तुला ड्रॉप करतो.”

“विकी, विसरू नकोस की, तू ऑफिशली ही केस हॅन्डल करू शकत नाहीस. तू तुझ्या परीने काय करायचं ते बघ पण तुला मिस्टर सिंघानिया यांच्या बंगल्यात जाता येणार नाही. तो एक प्रकारचा गुन्हाच आहे. डीसीपी राघव शास्त्री मला रागवतील आणि मलाच सस्पेंड करतील. प्लिज माझी नोकरी धोक्यात येईल असं काहीही वागू नकोस. कायदा हातात घेऊ नकोस.”

“हो रे बाबा.. मी आत जाणार नाही. देवीच तपास करेल. मी तिला फक्त बंगल्याबाहेर ड्रॉप करतो आणि माझ्या घरी निघून जातो. चालेल?”

सिद्धार्थने मान डोलावून संमती दिली. देविका आणि विक्रम कॅफेबाहेर पडले. सिद्धार्थने तिथूनच मिस्टर नीरज सिंघानिया यांना कॉल केला. नीरजने कॉल घेतला.

“हॅलो, नीरज? मी एसीपी सिद्धार्थ, क्राईम ब्रँच. आपल्याला मिसेस सिंघानिया सुसाईड केसच्या चौकशीसाठी सीबीआय ऑफिसला यावं लागेल.”

“पण का? मी काय केलंय?”

“ते तुम्ही तिथे आल्यावरच समजेल. समजलं? लवकरात लवकर ऑफिसला या की मी तिकडे येऊ?“

सिद्धार्थ थोडं चढ्या आवाजात म्हणाला तसा नीरज वरमला.

“नाही सर मीच येतो. अर्ध्या तासात पोहचतो.”

सिद्धार्थने कॉल ठेवला. थोड्याच वेळात नीरज सीबीआय ऑफिसला आला. सिद्धार्थ आधीच पोहचला होता. एसीपी सिद्धार्थने प्रश्न केला.

“हं मिस्टर नीरज, सांगा तुम्ही रिया सिंघानिया यांना का मारलंत?“

“मी? काहीही काय! मी तिला का मारेन?”

“हो तुम्हीच.. त्यांच्या प्रॉपर्टीसाठी, संपत्तीसाठी आणि आम्हाला समजलंय की, त्या दिवशी तुम्ही मिसेस सिंघानिया यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती? ही गोष्ट खरी आहे न?”

सिद्धार्थ न राहवून म्हणाला.

“सर, तेंव्हा मी रागात होतो म्हणून तसं बोललो. माझ्या आईवडिलांनी आपली सारी प्रॉपर्टी रियाच्या नावावर केली होती. आम्हाला फक्त एक बिझनेस नावावर करून दिला होता. मी त्यांना त्यांचं मृत्यूपत्र चेंज करण्याबद्दल बोलत होतो आणि ते ऐकत नव्हते. इतकंच झालं. रागात मी रियाला बोललो पण याचा अर्थ असा नाही की मी लगेच तिचा खुन करेन. तुम्ही एका प्रतिष्ठित नागरिकाशी बोलताय हे विसरू नका. मी असं काहीही केलेलं नाही.”

नीरजने स्पष्टपणे सांगितलं.

“आम्ही काही विसरलेलो नाही. तुम्ही एक प्रतिष्ठीत नागरिक आहात म्हणून आम्ही इतक्या सभ्यपणे बोलतोय नाहीतर तुम्हाला आमचा पोलीसी खाक्या अजून दाखवलाय कुठे?”

सिद्धार्थ त्याच्यावर गरजला. एसीपी सिद्धार्थ प्रश्न विचारत होता आणि नीरज उत्तर देत होता. थोड्या वेळाने चौकशी पूर्ण झाल्यावर त्याला सोडण्यात आलं. अजूनही सिद्धार्थच्या मनातून नीरजबद्दलचा संशय कमी होत नव्हता.

इकडे विक्रमच्या डोक्यात विचार सुरू झाला होता. तो देविकाला म्हणाला,

“देवी मला काय वाटतं, सुसाईड नोटच्या मागचं कारण समजल्याशिवाय आपल्याला आपली पुढची प्रक्रिया ठरवता येणार नाही आणि त्यासाठी आपल्याला मिसेस सिंग यांच्या मोलकरीणीशी बोलावं लागेल.”

“ती कुठे भेटेल?”

देविकाने प्रश्न केला.

“तू चल, मी तुला घेऊन जातो.”

विक्रम हसून म्हणाला आणि गाडी त्याने डाव्या बाजूला वळवली. कार एका चाळीसमोर येऊन थांबली.

विक्रम देविकाला कुठे घेऊन आला होता? कोण असेल रियाचा गन्हेगार? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all