तिसरी फेरी :- रहस्यकथा
कथेचे नाव :- अनटोल्ड कन्फेशन्स..
अनटोल्ड कन्फेशन्स.. भाग ११
विक्रम आणि देविका एका चाळीसमोर येऊन उभे राहिले.
“अरे विकी, कुठे आलोत आपण?”
देविकाने प्रश्न केला.
“शांताबाईंच्या घरी..”
“या कोण?
“शांताबाई या मिसेस सिंघानिया यांच्या घरी साफसफाईच्या कामाला जातात.”
“पण तुला त्यांचं घर कसं काय माहित पडलं?”
“मी यामिनीला कॉल केला होता. तिला सांगितलं की, मिसेस सिंग यांना कॉल करून आपल्या घरी कामाला बाई पाहिजे असं सांग आणि शांताबाईचा नंबर मिळवून घे. यामिनीने आपलं काम केलं. मोबाईल नंबर, ऍड्रेस सगळंच पाठवून दिलं. आता आपल्याला त्यांच्याकडून काही माहिती मिळतेय का ते पाहू”
देविकाने होकारार्थी मान डोलावली आणि हसून म्हणाली,
“व्वा! एसीपी विक्रमची बायको शोभते बरं!”
विक्रम गालातल्या गालात हसला. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि देविकासोबत आत चाळीत शिरला. देविकाने शांताबाईचं दार ठोठावलं. शांताबाईनी दार उघडलं. प्रश्नार्थक नजरेने पाहत त्यांनी विचारलं.
“कोण पायजेल?”
“शांताबाई?”
देविकाने प्रश्न केला.
“व्हय म्याच हाव.. बोला, काय काम हाय?”
शांताबाईने प्रश्न केला.
“मी एसीपी देविका, मिसेस सिंघानिया सुसाईड केस संदर्भात चौकशीला आले आहे. तुमच्याशी बोलायचं आहे. जे काही असेल ते खरं सांगा आणि पोलिसांना सहकार्य करा.”
“हे बघा बाईसायेब, आमी गरीब लोक हावोत. आमला कंच्याबी लफड्यात पडायचं नाय. आमाला माफी द्या..”
असं म्हणत शांताबाई दार लावू लागली.
“एक मिनिटं शांताबाई, पोलिसांना सहकार्य केलं नाही म्हणून तुम्हाला अटक होऊ शकते. तेंव्हा तुम्ही खरं काय ते सांगा लवकर. नाहीतर..”
देविकाच्या ठणकावून बोलण्याने शांताबाई जरा घाबरली आणि तिच्या तोंडून एक सत्य बाहेर आलं. शांताबाई बोलू लागली.
“म्या मागल्या दोन वरसापास्नं त्यांच्यापशी कामाला हाय. समदं झ्याक हुतं. सायबाची माय बा बाईसायबास्नी लै जीव लावत हुते. दोघं नवराबायकू जादा बोलली नाय कवा. सायेब जरा गपगपच ऱ्हात हुतं. आन मधीच बाईसायबास्नी डोसक्याची बिमारी झाली नव्हं. कंच्या कंच्या गोळ्या चालू हुत्या, देवालाच ठावं! बाईसायब कवाकवा लई चिडचिड करायच्या. लई रडायच्या. बाईसायबास्नी भेटाय येक पोरगं येत हुतं, त्येबी सायेब आन त्यांचं माय बा नस्तानी येत हुतं नव्ह. त्यो आला की बाईसायेब त्याला त्यांच्या खोलीत घिवून जायच्या आन मग घटका दोन घटका बसून त्यो निघून जायचा. त्यो आल्यावर बाईसाहेब लई खूष ऱ्हायच्या. मला तर पक्कं वाटतंय बगा, बाईसायबांचं त्या पोरासंगट कायतरी झंगाट हाय.. आईच्यान..”
“त्या व्यक्तीला तू ओळखतेस?”
“नाई बाईसायेब, पर म्होरं आला की वळखीन.”
“हं.. ठीक आहे. गरज लागली तर पुन्हा येईन समजलं?”
“व्हय जी..”
शांताबाईने मान डोलावली. विक्रम शांताबाईचं बोलणं शांतपणे ऐकत होता. थोड्या वेळात देविका आणि विक्रम तिथून निघाले. देविका विचार करू लागली.
“विकी, आता काय वाटतं तुला? मिसेस सिंघानिया?”
“थांब देवी, कोणत्याही निकषावर पोहचण्याची घाई करू नकोस. तुला पुन्हा एकदा मिसेस सिंघानिया यांच्याबद्दल अजून माहिती गोळा करावी लागेल. त्यांच्या आईबाबांव्यतिरिक्त अजून तिच्या मैत्रिणी, जवळचे नातेवाईक, परिसरातील लोक यांची चौकशी करावी लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुला मिस्टर सिंघानिया यांच्या ऑफिसवर जाऊन चौकशी करावी लागेल कारण त्या दिवशी मिस्टर शेख आदित्यची सेक्रेटरी रोझी बद्दल बोलत होते. त्यांच्या ऑफिसला गेल्यावरच तुला सत्य समजेल.”
विक्रम देविकाकडे पाहत म्हणाला.
विक्रम देविकाकडे पाहत म्हणाला.
हं.. विकी, पुन्हा एकदा रियाच्या घरी आणि आदित्य सिंघानिया यांच्या ऑफिसवर जाऊन येते. आता तू जा. मी आदित्य सिंघानिया यांच्या बंगल्यावर जाते आणि सीसीटीव्ही फुटेज पाहते. तिथे आपल्या दोघांना एकत्र कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. हवंतर त्याचा बॅकअप घेवून तुला मोबाईलवर शेअर करते. पण तू आता जा. मी कॅबने जाईन.”
देवीका कळवळून म्हणाली. विक्रमने तिचं म्हणणं ऐकावंच लागलं. देविकाने कॅब बुक केली. कॅब आल्यावर देवीकाने विक्रमचा निरोप घेतला. कॅब ड्राईव्हरला लोकेशन शेअर केलं. गाडी आता आदित्यच्या बंगल्याच्या दिशेने धावू लागली. देविका गेल्यानंतर विक्रमही घरी जाण्यास निघाला.
अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासानंतर विक्रम घरी पोहचला. यामिनी त्याची वाट पाहत बसली होती. दारावरची बेल वाजताच तिने पटकन उठून दरवाजा उघडला. समोर विक्रम उभा होता.
“अरे विकी, किती उशीर! मी कधीची तुझी वाट पाहतेय. कसा होता तुला आजचा दिवस? ऑफिसमध्ये काय काय झालं? रियाच्या केसची पुढे काही कारवाई झाली का?”
अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासानंतर विक्रम घरी पोहचला. यामिनी त्याची वाट पाहत बसली होती. दारावरची बेल वाजताच तिने पटकन उठून दरवाजा उघडला. समोर विक्रम उभा होता.
“अरे विकी, किती उशीर! मी कधीची तुझी वाट पाहतेय. कसा होता तुला आजचा दिवस? ऑफिसमध्ये काय काय झालं? रियाच्या केसची पुढे काही कारवाई झाली का?”
“अगं हो, हो.. किती घाई! किती ते प्रश्न! मला श्वास तरी घेऊ देशील की नाही?”
विक्रम आत येत म्हणाला.
“सॉरी रे! रियाबद्दल जाणून घेण्याची घाई झाली होती म्हणून बोलले. बरं, तू फ्रेश होऊन ये. मी तुझ्यासाठी कॉफी बनवते.”
असं म्हणत यामिनी किचनकडे जाण्यासाठी वळणार इतक्यात विक्रम तिला जवळ ओढलं. तिच्या खांद्यावर ओठ टेकवत तिच्या कानात कुजबुजला.
“आय लव्ह यू शोना, थोडा चिडलेला होतो पण मला कळायला हवं ऑफिसचं टेन्शन घरी घेऊन नाही यायचं. विनाकारण तुला रागावून बोललो. सॉरी न बेबी..”
“अरे, वेडा आहेस का? सॉरी काय त्यात? आणि आपण आपल्याच माणसांवर राग काढतो ना! माझंही चुकलंच तू आला नाहीस की मी प्रश्नांचा डोंगर तुझ्यासमोर रचला. मीच सॉरी म्हणते. आणि जा बरं आता, शॉवर घेऊन ये.. शीईई.. घामाचा किती घाण वास येतोय बघ. जा, फ्रेश होऊन ये.”
“हो राणी सरकार!”
असं हसून म्हणत तो पटकन बाथरूमच्या दिशेने पळाला. विक्रम फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये वर्तमानपत्र चाळत बसला होता. यामिनी दोघांसाठी कॉफी घेऊन आली. तिने विक्रमच्या हातात कॉफी कप दिला आणि स्वतःचा कॉफीचा कप घेऊन सोफ्यावर बसली.
“हं.. आता सांग, ऑफिसमध्ये काय झालं? तू का इतका चिडला आहेस?”
कॉफीचा घोट घेत यामिनी बोलली.
“यामी, मिसेस सिंघानिया सुसाईड केसवर मी काम पाहत नाही. मला सस्पेंड केलंय.”
“काय? अरे पण का?”
“कारण मी संशयित आहे. मिसेस सिंघानियाच्या खोलीत माझे फिंगरप्रिंट्स सापडलेत.”
निराश होऊन विक्रम म्हणाला.
“अरे, हे कसं शक्य आहे? काहीतरी चुकतंय असं नाही वाटतं तुला?”
“हो कळतंय मला. माझे फिंगरप्रिंट्स तिथे आलेच कसे हेच समजत नाहीये. आता ही केस एसीपी सिद्धार्थ लीड करतोय आणि देविका त्याला असिस्ट करतेय.”
“तुला काही होणार नाही ना?”
“नाही गं, तू टेन्शन घेऊ नकोस. पण एक सांगू का? गुन्हेगार कितीही हुशार असू देत. तो अशी एखादी चुक करतो की तो बरोबर पोलिसांच्या तावडीत कधी ना कधी सापडतोच. त्यामुळे तू काळजी करू नकोस. लवकरच आपल्याला खरा गुन्हेगार कळेल.”
कॉफीचा शेवटचा घोट घेत विक्रम म्हणाला.
इकडे देविका मिस्टर सिंघानिया यांच्या बंगल्यावर पोहचली. बंगल्याच्या सिक्युरिटीच्या केबिनमध्ये पोहचली आणि त्याच्याकडून पार्टीचे फुटेज आणि विझिटर्स रजिस्टर मागवून घेतलं. सीसीटीव्ही फुटेजचा बॅकअप घेऊन एसीपी सिद्धार्थ आणि विक्रमला पाठवून दिला. देविका सीसीटीव्ही फुटेज पाहत होती. अचानक ती एका ठिकाणी येऊन थांबली तिने व्हिडीओ रिवाईंड करून, झूम करून पाहिलं. जे पाहिलं यावरून ती खूप शॉक झाली.
देविकाने फुटेजमध्ये काय पाहिलं. तिला शॉक का बसला? पाहूया पुढच्या भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)