अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-९

When Destiny Separate Two Lovers Before Confessing Their Feelings For Each Other. And After Few Years Destiny Brings Them Infront Of Each Other.

अस्तित्व एक संघर्ष

पर्व-२ अबोल प्रीत

भाग-९


इंदुमतीचं वय झालं असलं तरी तिचं वागणं आज ही तसंच होतं. शरद रागारागात घरी आला आणि पाय जोरजोरात आपटत त्याच्या रुममध्ये गेला. इंदुमती ही त्याच्या मागोमाग गेली. ती त्याच्या रुममध्ये पोहचेपर्यंत त्याने रुममधील बऱ्याच साऱ्या वस्तू रागाने फेकल्या होत्या.
इंदुमती: शरद, काय हा प्रकार...
शरद: आई, तू इथून निघून जा... आपण नंतर बोलू...
इंदुमती: अरे, पण एवढं भडकायला झालंय तरी काय...?
शरद: तो श्रीधर आणि ती श्रेया कोणत्या पाताळात जाऊन राहत आहेत काय माहिती... इतकी वर्षे शोधतोय पण हाती मिळालेली माहिती पण अपुरीच असते...
इंदुमती: हे तुझ्या आततायीपणामुळे झालं आहे... मी सांगितलं होतं तुला तेव्हा थोडा धीर धर... एकदा का श्रीधरचा पत्ता कट झाला असता तर जया तर होतीच तुझी, पण श्रेया पण तुझीच झाली असती... तिला व्हावंच लागलं असतं... आणि या पूर्ण प्रॉपर्टीचा मालक ही तूच झाला असतास...
शरद: हे बघ तू जा ग इथून... नको डोक्यात जाऊ...
इंदुमती: ठीक आहे पण तू डोक्यात राग घेऊन चुकीचं पाऊल उचलू नकोस... जेणेकरून गोत्यात अडकशील.
ती शरदला बोलून तिथून निघाली पण शरदचं लक्ष होतं कुठे तिच्याकडे.. तो अजूनही श्रीधर- श्रेयाचं नाव घेत वस्तू सगळ्या फेकत होता.
***

इंदुमती तिच्या रुममध्ये आली पण शरदच्या वागण्याने ती बेडवर पडून विचार करत होती... काय करु मी याचं... त्याच्या एका चुकीमुळे आज ज्या संपत्तीवर पूर्ण हक्क मिळवणार होतो त्या संपत्तीतल्या थोड्या पैशासाठी जयाच्या भरवशावर रहावं लागत आहे. विचार करता करता तिचा डोळा लागला. झोपेत तिला प्रतापसिंह तिचा गळा आवळून धरताना दिसले. ती झोपेतच जोरजोरात ओरडू लागली, "वाचवा वाचवा...." तिचा आवाज ऐकून शाम, शेवंता धावत रुममध्ये आले. शेवंताने तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडले. तशी इंदुमतीला जाग आली.
शेवंता: बाईसाहेब, ठीक आहात ना... स्वप्नं पडलं होतं का काही...?
इंदुमती: (खरं सांगणारच होती तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की ती शेवंता आणि शामबरोबर बोलतेय लगेच तिने तिचं बोलण्याचा रोख बदलला) तुला काय करायचंय... काय स्वप्न पडलं ते जाणून घेऊन... जा मुकाट्याने पटकन जेवणाचं बघा...
तिचं बोलणं ऐकून शेवंता आणि शाम दोघेही तिथून किचनमध्ये निघून गेले. ते दोघे गेल्यावर थोड्या वेळाने शरद तिच्या रुममध्ये आला.
शरद: काय ग आई, काय झालं मघाशी का ओरडत होतीस...?
इंदुमती: ते प्रतापसिंह....
शरद: पुन्हा तुला स्वप्नात तो माणूस दिसला... हे तुझ्या मनाचे फक्त खेळ आहेत. एकदा डॉ ला दाखवून ये.
इंदुमती: डॉ कडे दाखवून येऊ म्हणतोय.... पण जाऊन सांगू काय... माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाने मारुन टाकल्यापासून तो माझ्या स्वप्नात येतो म्हणून..
शरद: सांग ना कोणीतरी म्हातारा तुला स्वप्नात दिसतो म्हणून... आता तुला झोपायचं असेल तर झोप नाहीतर जेवून घे... मी मित्रांना भेटायला जातोय.... त्यांच्या बरोबरच जेवून येईन.
इंदुमती: शरद, कधीतरी माझ्या बरोबर पण बस जेवायला... मला ही बरं वाटेल... कित्येक महिने झाले आपण एकत्र बसून जेवलो सुद्धा नाही.
शरद: ए आई, तुझा हा ड्रामा बंद कर हा.. आणि इतकं एकटं वाटतं तर त्या शाम आणि शेवंताला बरोबर घेऊन बस जेवायला.
चल आता निघतो मी... तुला हवं असेल तर उद्या डॉ कडे नेऊन सोडतो. बोलता बोलता तो इंदुमती काय बोलतेय याची वाट न बघता निघूनही गेला.
***

इंदुमतीच्या रुममध्ये इंदुमती बेडवर अशीच डोळ्यांवर हात ठेवून पडून असते.
शेवंता: बाईसाहेब, जेवायला येताय ना...
इंदुमती: (डोळ्यांवरचा हात बाजूला करुन) मला भूक नाही आहे...
शेवंता: लहान तोंडी मोठा घास घेते आहे, पण बाईसाहेब तुम्ही काल पण काही खाल्लं नाही आहे आणि आज पण नाही.
इंदुमती: (रागाने) तुझं काम झालं असेल तर जा... आणि तुला आणि शामला भूक लागली असेल तर जेवून घ्या.
शेवंताला इंदुमतीचा राग ठाऊक होता त्यामुळे ती जराही न थांबता किचनमध्ये निघून गेली.
इंदुमती: (ती गेल्यावर खुर्चीत बसून स्वतःशीच पुटपटू लागली) ना शरदने मूर्खपणा केला असता ना जया, श्रीधर-श्रेया इथून निघून गेले असते... हातात येत असलेल्या सगळ्या गोष्टी निसटून गेल्या. मी त्याच्यासाठी जेवायचं थांबते पण त्याला त्याचं काहीच पडलेलं नसतं. का थांबावं मी तरी मग... त्याच्यासाठी... विचार करता करता ती खुर्चीतून उठून किचनमध्ये निघून गेली.
***

किचनमध्ये शाम-शेवंता जेवत होते. शेवंताला शाम प्रेमाने घास भरवत होता. इंदुमतीने त्या दोघांना असं जेवताना पाहिलं आणि तिला प्रतापसिंह आणि तिचे दिवस आठवू लागले. ते पण मला असंच कधीतरी प्रेमाने भरवायचे. अगदी शरदच्या लग्नाच्या आदल्या दिवशी ही त्यांनी मला असंच पुरी श्रीखंड भरवलं होतं. नकळत तिच्या ऊरात प्रतापसिंहच्या आठवणीने कालवाकालव झाली. शामचं अचानक तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने शेवंताला हाताने इशारा करून जेवायचं थांबवलं.
शाम: बाईसाहेब तुम्ही, काही हवं होतं का....?
इंदुमती: (भानावर येत) काही नाही रे, शेवंता इतकी प्रेमाने जेवायला बोलवायला आली होती आणि मी तिला नाही नाही ते बोलले म्हणून मग विचार केला की थोडं जेवून घेते म्हणजे तिला पण बरं वाटेल.
शेवंता: बाईसाहेब, मला वाईट नाही वाटलं... आम्ही नोकरमाणसं... आम्हाला तो अधिकार नाही. थांबा मी हात धुवून तुम्हाला जेवण वाढते.
इंदुमती: अग राहूदे, मी घेते.. तुम्ही दोघांनी जेवून घ्या.
इंदुमतीने तिला हवं असलेलं ताटात घेतलं आणि ती तिच्या रुममध्ये निघून गेली.
शाम: (इंदुमती गेल्यावर) आज बाईसाहेब एकदम वेगळ्याच वागत आहेत नाही...
शेवंता: म्हणजे हो...
शाम: अग म्हणजे इतक्या आपुलकीने त्या फक्त साहेब होते तेव्हाच वागल्या... आणि आज वागत आहेत चांगल्या...
शेवंता: होतो कधी कधी माणसांत बदल...
शाम: मला नाही वाटत त्या बदलू शकतात... मला तर राहून राहून कधी कधी वाटतं की साहेब जाण्यामागे पण बाईसाहेबांचा आणि शरद दादांचा हात असावा.
शेवंता: ओ हळू बोला, ऐकतील त्या... आणि तसंच काहीसं असलं तर हे ऐकल्यावर आपला पण जीव जाऊ शकतो... हे लक्षात ठेवा आणि गप्प बसा...
शाम: इतकी वर्षे तेच तर करत आलोय...
शेवंता: चला लवकर जेवून घ्या... आपला दीपक येईलच इतक्यात...
शाम: खरं सांगू, आपल्या दीपकच्या शिक्षणासाठी साहेबांनी खूप आधीच बोलून मदत करुन दिली आपल्याला म्हणून मला हे घर अजूनही सोडता येत नाही. नाहीतर कधीच या घराला राम राम ठोकला असता.
शेवंता: श्रीधर दादा, जया वहिनी, श्रेया वहिनी सगळे असते तर घर किती भरलेलं असतं ना...
शाम: शेवंता, नको तो विषय... चल आवर लवकर... तिने फक्त मानेने होकार दिला आणि दोघेही भरभर जेवून त्यांच्या पुन्हा कामाला लागले.
***

खुशी, खुशबू दोघीही आज कॉलेजमध्ये जाताना सतत श्रेयाने सांगितलेल्या गोष्टीचाच विचार करत होत्या. कोणीही आपापसात बोलत नव्हतं. खुशीला बाय बोलून खुशबू तिच्या कॉलेजच्या दिशेने निघून गेली. खुशी ही मग तिची बॅग सांभाळत, आयडी गळ्यात घालून तिच्या क्लासमध्ये निघून गेली. आज तिचं क्लासमध्ये मनच लागेना. जे आपल्याला सांगितलं ते खरंच आहे का की आपण अजूनही स्वप्नांत आहोत याचाच ती विचार करत होती. लेक्चर्स संपले असल्याचं ही तिच्या लक्षात आलं नाही. अमिषाने तिला हात लावून भानावर आणलं.
अमिषा: ओ खुशी मॅडम, निघायचं का...?
खुशी: संपले लेक्चर्स...?
अमिषा: अजून थोडा वेळ थांबलो ना... तर ज्युनिअर कॉलेजचं पण लेक्चर्स अटेंड करावं लागेल.... चल निघूया...
खुशी: हो चल...
दोघी क्लास मधून निघाल्या.
अमिषा: काय ग, आज तुझं अजिबात लक्ष नव्हतं कोणत्याच लेक्चरला... घरी काही आईबाबांशी वाजलं तर नाही ना...?
खुशी: नाही ग...
अमिषा: मग BF भांडला का...?
खुशी: नाही ग... मी सिंगल आहे... आणि फक्त अभ्यासावर फोकस आहे माझा...
अमिषा: प्रेम प्रेम असतं ग... असं ठरवून होतं नसतं... तुझं तुला ही कळणार नाही की तू कधी प्रेमात पडली ते...
खुशी: एक मिनिट, एक मिनिट... तू हे असं बोलते आहेस म्हणजे... तू...
अमिषा: (मानेनेच होकार देते)
खुशी: कोण आहे तो... जो मेरी खुबसुरत दोस्त को मुझसे भगा ले जाने की कोशिश कर रहा है...
अमिषा: (हसत) काही पळवणार बिळवणार नाही आहे, रीतसर मागणी घालणार आहे पण इतक्यात नाही... आधी डिग्री पूर्ण करु मग जॉब बघू मग थोडं सेटल झालो जॉब मध्ये की मग लग्नाचं बघू...
खुशी: ओह हो, बहुत लंबा प्लॅनिंग हुआ है तो...
अमिषा: (हसत) येस येस...
खुशी: बरं असतो कोणत्या कॉलेजला...?
अमिषा: सांगते सांगते, आपल्याच कॉलेजमध्ये आहे...
खुशी: व्हॉट... तू तर एकदम छुपी रुस्तम निघाली... मग माझी ओळख कधी करुन देते आहेस...?
अमिषा: देईन ना... आज तुला लायब्ररीमध्ये जायचं नाही आहे वाटतं...?
खुशी: जायचं आहे ग... तू विषय नको बदलू... सांग बरं ओळख कशी झाली..?
अमिषा: अग नाही ग बदलत आहे विषय.. देईन ओळख करुन... पण काही दिवसांनी करुन देईन... तो माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा...
खुशी: अरे वा.. भारी ग...ओळख नंतर करुन दे... आता चल मग मला लायब्ररीपर्यंत कंपनी दे..
अमिषा: जो हुकूम मेरे आका...
दोघीही हसत हसत लायब्ररीमध्ये गेल्या.
खुशीने लायब्ररीमधल्या मॅडमकडून तिला हवं असलेलं पुस्तक मागून घेतलं. त्या तिला पुस्तक देत असतानाच अमिषा कसला तरी विचार करु लागली.
खुशी: कसला एवढा विचार करतेय...?
अमिषा: रोमिओ ज्युलियट वाचायचा विचार करतेय...
खुशी: ओह हो...त्याने सांगितलं वाटतं वाचायला...?
अमिषाने मानेने होकार दिला.
खुशी: चल मग मॅडम कडे मागू...
अमिषा: मॅडम ते... रोमिओ ज्युलियटचं पुस्तक हवं होतं.... आहे का...?
मॅडम: आहे पण ते वरच्या सेक्शनमध्ये आहे. तिकडे जाऊन घेऊन ये. मी स्टॅम्प मारुन देते.
अमिषा: ओके...
अमिषा खुशीला घेऊन पुस्तक आणायला निघून गेली.
अमिषा: वरचा सेक्शन कोणता ग...
खुशी: वरचा सेक्शन म्हणजे... ते तिकडे शिडी लावली आहे ना... ते त्यासाठीच..
अमिषा: अरे देवा, शिडीवर चढायचं... मला नाही ग जमणार... पडले बिडले तर... (मग केविलवाण्या चेहऱ्याने तिने खुशीकडे पाहिलं. खुशीला तिच्या मनात काय चाललं आहे तिच्या लक्षात आलं)
खुशी: नाही हां, मी नाही हां चढणार...
अमिषा: प्लीज खुशी, प्लीज...
अनोळखी मुलगा: silence please...you are in library...
अमिषा: सॉरी... (मग पुन्हा तिने हात जोडून खुशीला मनवण्याचा प्रयत्न केला)
खुशी: ठीक आहे पण तू पकड हां... शिडीला त्या...
अमिषा: डोन्ट वरी, मी पकडेन शिडीला... आणि फार उंच नाही आहे ग थोडंसंच वरच्या बाजूला आहे... आपला हात नाही जाऊ शकत इतकंच... म्हणून आपल्यासाठी शिडी आहे आणि ती शिडी पण बघ ना किती सेफ आहे पडणार नाही आपण...
खुशी: बरं पकड आता... बकबक बंद कर आणि...
खुशी शिडीवर चढली. तिने अमिषाला हवं असलेलं पुस्तक घेतलं आणि तिच्या हातात दिलं. आमिषाने पुस्तक हातात घेतलं त्याच वेळी तिला तिचा BF समोरच्या पुस्तकांच्या लाईनमध्ये पुस्तकं बघत असलेला दिसला. त्याला पाहून तिच्या लक्षात आलं नाही की आपण इथे शिडी पकडून आहोत... ती पुस्तकं हातात घेऊन तशीच त्याच्या दिशेने निघून गेली. खुशीने अमिषाला हवं असलेलं पुस्तकं देऊन झाल्यावर तिला एक ती बरेच दिवस शोधत असलेलं पुस्तक नजरेस पडलं. एका लायब्ररीकार्ड वर एक आणि आयडी कार्ड वर एक पुस्तकं घेण्याची परवानगी असल्याने तिने तू पुस्तकं हातात घेतलं. खाली उतरता उतरता तिने अमिषाला आवाज दिला, "अमिषा, नीट पकड हां... मी खाली उतरतेय...!!" अमिषाचा आवाज येईना म्हणून तिने शिडीवरून उतरताना एकदा मागे पाहिलं... कुठे आहे ही... आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं... तिचा पाय शिडीवरुन सटकला. ती मागच्या मागे पडणार तेवढ्यात बाजूच्याच लाईनमधून फिरणाऱ्या विवेकने तिला अलगद पकडलं. विवेकने तिला खाली ठेवलं. अजूनही त्याचा हात तिच्या कमरेवर होता. विवेकची नजर खुशीवरच खिळून होती. तर खुशीच्या अचानक अशा तोल जाण्याने हृदयाचे ठोके वाढले होते. विवेकच्या तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट जाणवली. त्याने लगेच तिच्या कमरेवरचा हात काढून घेतला.
विवेक: (तिची भीती घालवण्यासाठी) ठीक आहेस ना... कुठे लागलं नाही ना...?
खुशीने मानेनेच नकार दिला. खुशीच्या चष्म्यातूनही उघडझाप होणारे डोळे विवेकच्या हृदयाच्या तारा छेडत होते. दोघेही अजूनही तसेच एकमेकांना पाहत उभे होते. तोपर्यंत अमिषाला आपण खुशीला शिडीवरचं सोडून आल्याचं लक्षात आलं. ती धावत त्या ठिकाणी आली. विवेक आणि खुशी दोघेही एकमेकांनाच पाहत उभे होते.
अमिषा: खुशी, I am sorry, मी नेमकं थांबले नाही आणि गोंधळ झाला.
अमिषाचा आवाज ऐकून दोघेही भानावर आले.
विवेक: (अमिषाला) काळजी घे... पुढच्या वेळी... प्रत्येक वेळी कोणीतरी मदतीला असेलच असं नाही ना...
अमिषा: सॉरी सॉरी... नाही होणार मिस्टेक पुन्हा...
विवेक: its ok... चल बाय...
विवेकने खुशीकडे एकवार पाहिलं पण खुशीच्या घशातून thank you बोलण्यासाठी ही आवाज निघेना. पण तिच्या पुन्हा डोळ्यांची होणारी उघडझाप विवेकला तिच्या मनात काय चाललं आहे ते सांगून गेली. त्याने हातानेच तिला बाय केलं आणि तो निघून गेला.
अमिषा: (तो निघून गेल्यावर खुशीला) काय ग, काय चाललं होतं तुमच्या दोघांचं... एकदम एकमेकांनाच पाहत उभे होतात... मी आल्याचं ही कळलं नाही तुम्हांला...
खुशी: (अमिषाला पाठीवर पुस्तक मारत) तुझा मूर्खपणा आणि काय... तू शिडी सोडून गेली नसती मग मी तोल जाऊन पडले नसते... आणि...
अमिषा: आणि त्या हॅन्डसम मुलाने तुला पकडलं नसतं... अरे उलट तू मला थँक यू म्हणायला हवं... एका हॅन्डसम मुलाने तुला वाचवण्याचा चान्स तुला मिळाला...
खुशी: पुरे आता... तू समजतेस तसं काही नाही आहे... तुझ्यामुळेच सगळं असं घडलं... नेक्स्ट टाइम मी नाही चढणार शिडीवर... तुलाच चढावं लागेल.
अमिषा: सॉरी बाबा, अजून किती बोलणार आहेस मला...
अनोळखी मुलगी: शु... हळू बोला... लायब्ररी मध्ये आहात...
अमिषा: (त्या अनोळखी मुलीला) सॉरी... (मग पुन्हा खुशीला) सॉरी यार... नाही होणार असं पुन्हा... चल निघूया आता...
खुशी: यावेळी माफ केलं नेक्स्ट टाइम नक्कीच मार खाशील... आणि मी लायब्ररीतच बसते... तू विसरलीस वाटतं.
अमिषा: अग हो... चल मग मी निघते आता... उद्या भेटू...
खुशी: येस बाय...
अमिषा खुशीला बाय बोलून लायब्ररीच्या मॅडम कडून पुस्तकावर स्टॅम्प घेऊन पुस्तक घेऊन निघून गेली. खुशी तिच्या नेहमीच्या जागेवर जाऊन अभ्यास करायला बसली.
***

जय: काय रे, कुठे होतास...
विवेक: अरे, ती बघ त्या दिवशी आपल्याला पायऱ्यांवर भेटली होती...
अखिलेश: ओह ती होय... (मग जयकडे इशारा करु लागला)
विवेक: हे असं करणार असाल तर काही सांगणार नाही... तुमच्या दोघांनी तुम्हाला हवी असलेली पुस्तकं घेतली ना... चला निघूया मग...
विवेक काहीसा चिडूनच निघू लागला. तसे जय आणि अखिलेश ही त्याच्या मागे जाऊ लागले.
लायब्ररीमधून बाहेर पडून...
अखिलेश: (विवेकला) ए भाऊ, कर ना माफ... चुकलं बघ आमचं... आम्ही असं तुला चिडवायला नको होतं...
जय: (हसून) हो चुकलंच आमचं. म्हणजे, काही असेल तर चिडवलंच असतं आम्ही... पण तसं काही नाही म्हणतोस तर जाऊ दे... पुन्हा नाही चिडवणार...
अखिलेश: भाऊ, कर ना माफ आता...
विवेक: हं...
जय: सांग ना आता काय झालं...
विवेक: काही नाही रे, मघाशी ती शिडीवर तोल जाऊन पडतच होते तेवढ्यात...
अखिलेश: तेवढ्यात आपले विकी भाऊ प्रकट झाले ना वाचवायला...
विवेकला त्याचं बोलणं ऐकून हसू येऊ लागलं. तसे जय आणि अखिलेश ही हसू लागले. तिघेही कॉलेजमधून बाहेर पडले. विवेक त्या दोघांना बाय बोलून त्याच्या ऑफिस मध्ये निघून गेला.
जय: (तो गेल्यावर) तुला काय वाटतं अखि, आपला विकी तिच्या प्रेमात पडेल का...?
अखिलेश: पडणार काय... मला तर वाटतं पडला ही असेल...
अमिषा: कोणा बद्दल बोलत आहात तुम्ही दोघे...?
जय: ही कोण...
अमिषाने अखिलेशकडे हसून पाहिलं. अखिलेश विनाकारण खाकरला.
अखिलेश: ही ते...
अमिषा: अखिची गर्ल फ्रेंड... राईट अखि...
जय: अखि भाऊ ओळख तर करुन द्या मित्रा बरोबर...
अखिलेश: हो हो, ही अमिषा... माझ्या पप्पांच्या मित्राची मुलगी...
जय: आणि त्यांची भावी सून...
अमिषा हे ऐकून लाजली.
जय: (अखिलेश काही बोलणार इतक्यात अमिषाच्या समोर हात पुढे करुन) मी जय... अखिलेशचा मित्र...
अमिषा हात पुढे करणार इतक्यात अखिलेशनेच जय बरोबर हात मिळवला. अमिषाला हे पाहून हसू येऊ लागलं.
जय: ओह हो भाऊ, आमचे खूप पझेसिव्ह झाले बाबा... हात पण मिळवता कामा नये तर...
अखिलेश: तसं काही नाही आहे...
जय: राहू दे राहू दे... माझी येईल ना... तेव्हा तिला पण हात मिळवू देणार नाही बघ तुला... त्याचं बोलणं ऐकून अमिषा, अखिलेश दोघेही हसू लागले.
अमिषा: तुम्ही दोघेच असतात का नेहमी बरोबर...
जय: नाही नाही, आमचा अजून एक मित्र आहे ना... त्याच्या बद्दलच तर आम्ही बोलत होतो आता... आणि तेवढ्यात तुमचं दुर्मिळ दर्शन झालं आम्हाला... आणि आमच्या अखिच भांड फुटलं.
अमिषा: तुम्ही समजतात तसं अखि काही लपवणार नव्हता... तो म्हणालेला त्याच्या मित्रांशी ओळख करुन देणार आहे म्हणून...
जय: (अखिकडे तिरकस नजरेने पाहत) भाऊ खरं बोलत आहेत का आमच्या भावी वहिनी, की उगाच आपल्या भावी पतीची बाजू घेत आहेत...
अखिलेश: (जयची मानगुटी पकडून) खरं बोलतेय ती... आता सांग तू तुझ्यावाली बरोबर कधी आमची ओळख करुन देतोय...
जय: (हसून) इतक्यात नाही... सही समय अभी तक हुआ नहीं... मी निघतो आता.. उगाच कबाब मध्ये हड्डी कशाला...
अखिलेश: ए गप्प हां...आता... मी तिला फक्त घरी सोडतो नेहमी...
जय: ओह तरीच मी कधी म्हटलं मला सोड, तर तू नाही म्हणतोस... चला वहिनीसाहेब, मी निघतो आता... तुम्ही जावा जोडीने घरी... जय त्या दोघांना बाय बाय बोलून निघून गेला. अखिलेश आणि अमिषा ही बाईकवरून निघून गेले.

क्रमशः

🎭 Series Post

View all