अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-६

When destiny separated two lover's before confessing their love feeling for each other.

अस्तित्व एक संघर्ष

पर्व-२-अबोल प्रीत

भाग-६


श्रीधर-श्रेया कारमध्ये शांतच होते. सगळ्या गोष्टी जशा घडल्या होत्या त्यानंतर दोघांना हे स्वीकारायला थोडं अवघडच होत होतं. कार चालवणाऱ्या माणसाने न राहवून बोलायला सुरुवात केली.

नमस्कार, मी अकबर शेख... सायनला राहतो... तुम्हाला कुठं जायचं आहे... म्हणजे तसं सोडेन मी...

श्रीधर: नमस्कार मी श्रीधर आणि ही माझी बायको श्रेया... आम्हाला तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे सोडा... 

अकबर: म्हणजे, अहो तुम्ही सांगाल तिथे सोडेन मी... मी धर्माने मुस्लिम आहे म्हणून जर तुम्ही घाबरत असाल तर मी फक्त जन्म मुस्लिम घरात घेतला आहे पण लहानाचा मोठा मी अस्सल मराठी लालबागच्या चाळीत झालो आहे... आणि आता दोन वर्षापूर्वी सायनला राहायला आलो.

श्रीधर: नाही नाही, तुम्ही समजतात तसं काही नाही आहे... आमच्या राहण्याची सोय आम्ही अजून काही केली नाही आहे...

इथे रक्ताचीच नाती विश्वासास पात्र ठरली नाही आणि तुम्ही देवासारखी मदत करत आहात आम्हाला... विचारात तो बोलून गेला. त्याचं बोलणं ऐकून श्रेयाच्या डोळ्यांत पाणी तरळलं. श्रीधरने तिचा हात हातात घेऊन थोपटत शांत राहायला सांगितलं. अकबरला त्यांच्या वागण्यावरुन ते दोघेही खूप मनाने दुखावले असल्याचं लक्षात आलं.

अकबर: तुमची हरकत नसेल तर तुमची दुसरीकडे कुठे सोय होत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या घरी राहू शकतात. माझी बायको फातिमा तुम्हाला भेटून नक्कीच खूश होईल आणि तुम्हाला पण एकदम घरच्या सारखं वाटेल आमच्याकडे.

श्रीधर: नको नको, तुम्ही बोललात तेवढंच पुरेसं आहे आम्हाला... आम्ही बघू काही होते आहे का सोय...

अकबर: अहो, मी तुमच्या बायकोला अक्का म्हणालो आहे मग मी त्यांचा भाईजान नाही का होत... मग त्याप्रमाणे मी माझ्या बहिणीच्या एवढंही कामी येता कामा नये का...? आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाडं देउन रहा मग तर झालं...

श्रीधर: हं चालेल.

अकबर हसला आणि त्याने कार त्याच्या घरच्या दिशेने वळवली. त्याने वर्णन केल्याप्रमाणे फातिमा त्यांना पाहून खरंच खूश झाली. त्यांचं घर एक मजली असल्याने अकबरने त्या दोघांच्या राहण्याची सोय त्यांच्या वरच्या खोलीत केली. ते दोघे शाकाहारी आहेत की कसं याचा अंदाज नसल्याने फातिमाने शाकाहारीच जेवण बनवणं पसंत केलं. जेवण बनवून झालं तसं तिने अकबरला आवाज दिला. तसा अकबर त्या दोघांना घेऊन जेवायला खालच्या खोलीत आला. चौघांनी शांतपणे जेवणाचा कार्यक्रम आटपला. फातिमा एकटीच काम करते आहे हे पाहून न राहवून श्रेया फातिमाला कामात मदत करु लागली. फातिमा खूपच बोलकी असल्याने श्रेयाच्या मनातून दुपारी घडलेला सगळा प्रसंग निघून गेला. ती ही तिच्याशी मिसळून काम करु लागली. अकबर वरच्या खोलीत श्रीधर बरोबर बोलत बसला होता.

अकबर: श्रीधर मिय्या, तुम्हाला काही काम मिळवण्यासाठी मदत हवी असेल तर सांगा... माझा छोटासा कपड्यांचा व्यवसाय आहे

श्रीधर: खरं तर मला कामाची गरज तर आहे पण काय करु ते समजत नाही आहे...

अकबर: मतलब, आपकी पढाई कितनी हुई है... वैसे मै आपके लिए कुछ हो सके तो देख लुंगा...

श्रीधर: अभी मै आपको कैसे कहूँ वही समझ में नहीं आ रहा..

अकबर: मिय्या, मेरे अल्लाह की कसम, आप इस बंदे पे एक बार जो भरोसा करोगे तो ये बंदा मरते दम तक इसे निभाएगा...

त्याचं बोलणं ऐकून श्रीधरने भावूक होऊन त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला.

अकबर: या अल्लाह, कितना सहा होगा अक्का ने... और आपने... अकबरने भावूक झालेल्या श्रीधरला मिठी मारली आणि तो त्याला म्हणाला, "आप और अक्का अब अकेले नहीं हो... मी आणि फातिमा नेहमीच तुमच्या बरोबर असू...!!"

आता तुम्ही कुठेही जायचं नाही इथेच रहायचं...

श्रीधर: पण आमच्यामुळे तुम्हाला काही त्रास...

अकबर: त्रास कसला त्रास... बेहन की मदत न कर पाए वो भाई किस काम का...?

श्रीधर: पण या रुमचं भाडं घ्यायचं बरं का...?

अकबर: (हसला) हो नक्की... आता उद्या पासून तुम्ही मला माझ्या कामात मदत करु शकता..

श्रीधर: हो पण मला श्रीधर म्हणून माझी ओळख नाही कळू द्यायची आहे.

अकबर: कबूल... यापुढे तुम्ही या घरासाठी भलेही श्रीधर देशमुख असाल पण जगासाठी तुम्ही अब्दुल खान आणि अक्का तुमची बेगम नूर खान असेल. तुमची खरी ओळख ही फक्त या भिंती पुरती मर्यादित असेल.

त्यांचं बोलणं मागून आलेल्या फातिमा आणि श्रेयाच्या ही कानांवर पडलं. श्रेयाने आधीच फातिमाला मदत करताना सगळं खरं सांगितलं होतं त्यामुळे फातिमाला ही तिच्या नवऱ्याचं म्हणणं पटलं. तिनेही मग त्यावर दुजोरा दिला.चौघांचं हे गुपित त्या चार भिंतीत ठरलं.

***

इंदुमती घरी आली आणि शरदला लागलेलं पाहून चवताळून उठली.

इंदुमती: शाम, शेवंता कुठे मेलात दोघे... आणि बाकी सगळे कुठे आहेत.

तिच्या आवाजाने शाम, शेवंता धावत आले. झोपलेला शरदही जागा झाला.

शेवंता: जी मालकीणबाई, तुम्ही बोलवलं...?

इंदुमती: (शरदकडे बोट दाखवून) कोणी केली ही अवस्था...?

शाम-शेवंता दोघांनी माना खाली घातल्या.

इंदुमती: काय विचारतेय मी...?

शाम: (काहीशी हिंमत करुन) आम्हाला शरद दादांनी बाहेर पाठवलं होतं आणि आम्ही आलो तेव्हा इथे शरद भाऊ बेशुद्ध अवस्थेत होते आणि मोठे मालक त्यांच्या खोलीत झोपले होते.

इंदुमती: निघा इथून... मला बोलायचं आहे शरदशी...

तिचा भडकलेला आवाज ऐकून शाम-शेवंता दोघांनी काढता पाय घेतला. ते दोघे निघून गेले तसं तिने शरदच्या बाजूला बसत त्याच्याकडे रागाने पाहिलं.

इंदुमती: शरद, तू यांना बाहेर का पाठवलं होतं....? आणि श्रीधर-श्रेया आणि जया कुठे आहेत...?

शरद: तिघेही घर सोडून निघून गेले...

इंदुमती: काय...? कसं काय...?

शरदने नशेत केलेला सगळा प्रकार तिला सांगितला. तसं ती रागातच त्याची कॉलर हातात पकडून म्हणाली, "मूर्खा, एकदा का त्या श्रीधरचं काम संपवू दिलं असतं तर दोघी तुझ्याच होत्या ना...?"

शरद: आई, चुकलं माझं...

तशी इंदुमतीने त्याची कॉलर सोडली.

इंदुमती: माफी मागून काही उपयोग नाही आता... काहीतरी विचार करायला हवा... म्हणत तिने जयाला कॉल केला. पण जयाने कॉल उचलला नाही. तिने पुन्हा तिला कॉल केला. शेवटी जयाने मोबाईल स्विच ऑफ केला. इंदुमतीला जयाच्या या वागण्याने प्रचंड राग येऊ लागला. ती स्वतःला शांत करत सोफ्यावर बसली.

शरद: आई, काय झालं, कोणाला लावला होता कॉल..?

इंदुमती: तुझ्या बायकोला...

शरद: ती गेली असेल तिच्या बापाकडे...

इंदुमती: तिला तू काय केलं ते माहीत आहे का शरद...?

शरद: (चाचरत) ते आई...

इंदुमती: (डोक्याला हात लावून) कठीण करून ठेवल्या आहेत तू गोष्टी सगळ्या...

शरद: आई, बघतो मी जयाचं काय करायचं ते...

इंदुमती: तिचं काय करायचं ते मी बघते... तू श्रीधर-श्रेयाला आधी शोधून काढ... आणि तुझ्या त्या बापाला माहीत आहे का... काय घडलं ते...?

शरद: हो, कळलं त्यांना... माझ्यात आणि श्रीधरमध्ये जेव्हा वाद वाढला तेव्हा ते रुमच्या बाहेर आले होते.

इंदुमतीने पुन्हा डोक्याला हात लावला.

शरद: आई मला वाटतं, आता म्हाताऱ्याने जेवढे दिवस जगायला हवे होते तेवढे त्याचे जगून झाले आहेत.

इंदुमती: म्हणजे...?

शरद: म्हणजे, आता त्याला देवाघरी पाठवायची वेळ झाली आहे.

इंदुमती: आजचा,उद्याचा दिवस जाऊदे मग परवा सकाळी बघू. यातलं जरा ही या कानाचं त्या कानाला कळता कामा नये... अगदी त्या शाम-शेवंताला ही नाही. असं वाटलं पाहिजे की म्हाताऱ्याचा प्राण झोपेतच गेला.

तसं शरद आणि ती क्रूर हसू लागली.

***

दुसऱ्या दिवशी जया मडगावला पोहचली. तिने आधीच तिच्या घरी ती येत असल्याचं कळवलं असल्याने मंगेशराव तिला घ्यायला आले होते. घरी जाताना दोघेही शांतच होते. त्यांना आपली मुलगी अशी अचानक आलेली पाहून परिस्थितीचं गांभिर्य जाणवत होतं. घरी आल्या आल्या ती आपल्या आईच्या मिठीत जाऊन रडू लागली. दोघांनी तिला कसंबसं शांत केलं. त्यांना सगळं खरं कळल्यावर त्यांच्या ही पायाखालची जमीन सरकली. पण लेकीकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरलं.

जया: आईबाबा, मी एक निर्णय घेतला आहे...

मंगेश: बेटा, तू जो कोणता निर्णय घेशील त्यात आमची तुला साथ असेल...

जया: आईबाबा, मी शरदला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला आहे.

आई बाबा: (तिच्या खांद्यावर हात ठेवून) तू करतेय ते योग्यच करते आहेस.

जया: आईबाबा, तुम्ही सपोर्ट कराल ना मला...? मी आपल्या बिझनेस मध्ये यापुढे तुम्हाला मदत करेन.

आईबाबा: हो बेटा, आता विसरुन जा जे झालं ते... आता यापुढे पुन्हा त्यांचा विषय नको.

तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. त्यांनी पाहिलं तर तो कॉल इंदुमतीचा होता.

मंगेश: हां बोला...(थोडा वेळ थांबून) वहिनी...

इंदुमती: भाऊजी, जयू आली आहे ना... मला बोलायचं आहे तिच्याशी...

मंगेशरावांनी जयाकडे पाहत खुणेनेच इंदुमतीचा कॉल आल्याचं सांगितलं. जयाने कॉल उचलला.

जया: (थोडा वेळ शांत राहून) हां बोला आई..

इंदुमती: जयू, तू कधी गेलीस तिकडे... तुला माहीत तरी आहे का... तू गेल्यावर इथे काय काय घडलं ते...? तो श्रीधर आपल्या शरदला मारुन आपल्या बायकोला घेऊन गेला.

जया: आई, मला माहिती आहे सगळं... आणि श्रीधरदादांनी केलं ते योग्यच केलं. त्यांच्या जागी कोणीही असतं तर त्याने तेच केलं असतं.

इंदुमती: म्हणजे तुला सगळं माहीत आहे तर... पण शरद तुझा नवरा आहे... हे विसरुन तुला चालणार नाही... तुझ्या पोटात देशमुख घराण्याचा वारस आहे लक्षात आहे ना तुझ्या... आणि स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं बोलताना जीभ कशी तुझी धरत नाही...

जया: आई, खरं तर तुम्हाला आई म्हणावं का हा ही प्रश्नच आहे म्हणा... शरद माझा नवरा होता... ते घर सोडतानाच मी आमचं नातं तोडून आली आहे आणि लवकरच मी घटस्फोटासाठी अर्ज देखील करणार आहे.

इंदुमती: जया, काय बोलतेस तू... तुझं तुला तरी कळतंय ना...? आणि लग्न तोडायच्या गोष्टी कोणाच्या जीवावर करतेस ग... तुझ्या आईबापाच्या... ते काय आज आहेत आणि उद्या असतीलच असं नाही...

जया: (रागाने) इंदुमती देशमुख, धमकी देताय तुम्ही मला... मी हा निर्णय माझ्या मर्जीने घेतला आहे... आणि असा नवरा असण्यापेक्षा मी विधवा म्हणून राहणं जास्त पसंत करेन...

इंदुमती: (रागाने) जया... 

जया: आता आपली भेट कोर्टातच होईल इंदुमती देशमुख...  असं म्हणत तिने मोबाईल बंद केला. इंदुमती मात्र जयाच्या वागण्याने भयंकर चवताळून उठली. तिने लागलीच ही गोष्ट शरदच्या कानावर घातली. शरदने मनाशीच काहीतरी ठरवून तसंच करायचं ठरवलं.

***

शरदने त्याच्या गुंड मित्रांच्या मदतीने श्रेयाच्या घरचा आधीचा चाळीतील पत्ता शोधून काढला आणि तो लागलीच त्या पत्त्यावर पोहचला. त्या घरात दुसरंच कोणी राहत असल्याचं पाहून शरदने रागानेच हात आपटला. तो असा रागात असतानाच तिथे त्याची भेट नेमकी मदनशेटशी झाली.

मदनशेट: या घराकडे तुमचं काय काम होतं...?

शरद: (रागात) तुम्ही कोण... आणि तुमचं याच्याशी काय देणंघेणं..?

मदनशेट: इथे माझी दिशा राहत होती... कोण कुठला तो श्रीधर देशमुख तिच्याशी लग्न करुन तिला इथून घेऊन गेला.

शरद: (कुत्सितपणे हसून) तुमची दिशा, बरं...

मदनशेट: पण तुम्ही तिला का शोधताय... 

शरद: मी त्या दोघांनाही शोधतोय... तो माझा सावत्र भाऊ आहे... त्याचाच गेम वाजवायचा आहे मला...

मदनशेट: मी तुम्हाला यात मदत केली तर मला काय मिळेल...?

शरद: तू फक्त आकडा बोल...

मदनशेट: मला दिशा हवी...

शरद: (काहीतरी विचार करून) बरं ठरलं तर मग...

दोघांनी आपापसात हात मिळवले आणि मदनशेट तिथून निघून गेला. जाणाऱ्या मदनशेटकडे पाहून शरद हसून मनात म्हणाला, एकदा का श्रेया भेटू दे... मग श्रीधर सारखाच तुझा पण गेम करतोय की नाही बघ...

त्याने भिंतीवर पुन्हा एकदा जोरात हात मारला आणि तिथून तो पुण्याला जायला निघाला.

***

श्रीधर अब्दुल बनून अकबर बरोबर श्रेयाचे आईवडील ज्या नवीन घरात राहत होते तिथे गेला. त्यांची भेट घेऊन त्याने त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्यांना सगळं ऐकून धक्का बसला. श्रीधरला त्या दोघांना तिथे ठेवणं धोक्याचं वाटत असल्याने ते दोघे त्या दोघांना घेऊन अकबरच्या घरी आले. श्रीधरने तो फ्लॅट विकायचं काम अकबरच्या मदतीने त्याच्या ओळखीच्या एका माणसाकडे दिलं. जेणेकरुन शरद त्यांच्या पर्यंत पोहचू शकणार नाही. स्वतःच्या आईवडिलांना भेटून श्रेया हुमसून हुमसून रडू लागली. फातिमाने त्या तिघांना शांत केलं.

श्रेया: फातिमा भाभी, आमच्या मुळे खूप त्रास होतोय ना तुम्हाला...?

फातिमा: भाभी आहे ना मी तुझी... मग मला तुझा आणि अम्मी-अब्बूचा कसा त्रास होईल...!!

तिचं बोलणं ऐकून श्रेया फातिमाला बिलगली.

गीता: आता आम्हाला फक्त एक लेक नाही... अकबर सारखा मुलगा ही आहे आणि फातिमा सारखी मुलीसारखी सून...

गीताचं बोलणं ऐकून आईवडील हयात नसलेल्या फातिमाच्या डोळ्यांतून आनंदाश्रु आले. गीताने तिला आणि श्रेयाला तर गणेशरावांनी अकबर आणि श्रीधरला त्यांच्या मायेच्या मिठीत घेतलं. त्या घरातलं ते चित्र आज खरंच खूप लोभनीय होतं. माणुसकीच्या नात्याने धर्माच्या पलीकडे जाऊन जगायला शिकवलं होतं.

***

शाम सकाळी प्रतापसिंह यांच्या रुममध्ये त्यांचा नाश्ता घेऊन गेला.

शाम: मालक, उठला नाही अजून... मी नाश्ता घेऊन आलो होतो. प्रतापसिंह उठत नाही पाहून शामने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हात लावला. त्यांचं शरीर थंड पडलेलं पाहून त्याने जोरात किंकाळी दिली, "मालक....!!"

त्याचा आवाज ऐकून शेवंता, इंदुमती आणि शरद धावत रुममध्ये आले.

इंदुमती: काय झालं शाम, तू किंचाळलास कशाला... आणि हे अजून उठले नाही....

शाम: (रडत रडत) माईसाहेब, आपले मालक... त्यांचं शरीर थंड पडलंय...

इंदुमती: (दरवाजा धरुन) काय... काय बोलतोय तू...

शरदने लगेच डॉ ना बोलावून घेतलं. काही वेळाने डॉ आले. त्यांनी प्रतापसिंह यांची नाडी आणि ह्रदयाचे ठोके दोन्ही चेक केले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. दुसऱ्या दिवशी श्रीधरला अकबर बरोबर शॉपमध्ये काम करत असताना जेव्हा न्यूज पेपरमध्ये त्याच्या वडिलांच्या जाण्याची बातमी वाचायला मिळाली तसा तो तिथेच कोसळून पडला. अकबरने त्याच्या तोंडावर पाणी मारुन त्याला शुद्धीवर आणलं. शुद्धीवर येताक्षणी तो अकबरला मिठी मारून रडू लागला. अकबरने त्याला हाताने खुणावत शांत राहून घरी जाऊन बोलायचा सल्ला दिला. तेव्हा श्रीधरला आपण शॉपमध्ये अब्दुल असल्याचं लक्षात आलं. अकबरने शॉपमधल्या कामाकडे त्याच्या हाताखाली असणाऱ्या माणसाला लक्ष द्यायला सांगून तो श्रीधरला घरी घेऊन आला. घरी आल्यावर श्रीधरने वाचलेली बातमी घरातील सगळ्यांना सांगितल्यावर श्रेया सकट सगळे दुःखी झाले. श्रेया गीताला मिठी मारून रडू लागली. फातिमा ही तिचं सांत्वन करु लागली. श्रीधर-श्रेयाला दोन्ही जोडप्यानी आधार दिला. श्रीधर मनातून पूर्ण तुटून गेला असल्याने त्याची अवस्था बघून अकबरने त्याला काही दिवस घरीच राहायला सांगितलं. जया आणि तिचं कुटुंब ही प्रतापसिंह यांच्या जाण्याने दुःखी झाले होते. त्यांना तर त्यांच्या जाण्यामागे राहून राहून इंदुमती आणि शरदचंच कारस्थान वाटत होतं. पण ते त्यांच्यावर संशय सांगून कोणती कारवाई ही करु शकत नव्हते कारण इंदुमती-शरद यातून निर्दोष सुटून त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला दगा फटका ही करायला थांबले नसते. त्यांनी देवावरच सगळा हवाला सोडून दिला होता. त्यांना खात्री होती की देव नक्की प्रतापसिंह यांच्या खुनींना शिक्षा देईल.

***

काही दिवस निघून गेल्यावर प्रतापसिंह यांचे वकील मित्र त्यांचं मृत्युपत्र घेऊन त्यांच्या घरी आले. इंदुमती, शरद मनातून आनंदित असले तरी वरवर ते खूप दुःखी असल्याचा आव आणून वकिलांच्या समोर आले.

वकील: वहिनी, खूप वाईट झालं...

इंदुमती: (रडतच) अहो आदल्या दिवशीच ते खूप खूश होते... नातू झाला की असं करु आणि नात झाली की तसं करु...

वकील: मी समजू शकतो पण त्यांचं मृत्युपत्र तुम्हाला वाचून दाखवणं मला भाग आहे.

शरद: (रडत) हो काका...

तसं वकिलांनी सगळा मजकूर वाचून दाखवला. सगळं ऐकून इंदुमती आणि शरदच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ लागली. पण त्यांना वकिलासमोर शांत राहणं भाग होतं.

वकील: वहिनी, येतो मी आता... काळजी घ्या.

इंदुमती रडतच साडीचा पदर तोंडाला लावून मानेनेच हो म्हणाली. वकील निघून गेले तसा शरद जोरजोरात बोलू लागला," म्हाताऱ्याने चांगलाच गेम खेळला आपल्या बरोबर... काय तर म्हणे अर्धी संपत्ती श्रीधर आणि त्याच्या फॅमिलीला आणि बाकीची संपत्ती त्या जयाला... आणि तिच्या मुलाला...!!"

इंदुमती: डोकं शांत ठेव आता... डोक्यात राग धरुन उपयोग नाही आहे... प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलणं गरजेचं आहे.

शरद: म्हणजे...

इंदुमती: म्हणजे त्या श्रीधर-श्रेयाला शोधायला सुरवात कर आणि तुझ्या त्या बायकोला मी सांगते तसं सांग..

शरद: बरं चालेल म्हणत त्याने तात्काळ जयाला कॉल केला. शरदचा कॉल बघून तो उचलावा की नाही असा विचार करत तिने कॉल उचलला.

शरद: काय ग ए, इतका वेळ का घेतलास उचलायला...?

जया: मला काही विचारायचा हक्क तुला कोणी दिला.

शरद: अजूनही हक्क आहे माझा तुझ्यावर आणि तुझ्या पोटातल्या बाळावरही...

जया: आज ना उद्या मला नक्की घटस्फोट मिळेल. मग माझा आणि माझ्या बाळाचा तुमच्याशी असलेला कागदोपत्री संबंध ही संपेल.

शरद: असं... तुला तुझा जीव प्यारा नसेल पण तुझ्या आईबापाचा आणि त्या पोटच्या जीवाचा तर नक्कीच प्यारा आहे... मग त्यांना काही झालं तर...

जया: शरद.... तू असं काहीही करणार नाही आहेस...

शरद: नको ना करायला मग माझं एक काम करायचं...

जया: कसलं काम...?

शरद: प्रत्येक महिन्यात देशमुख बिझनेसमध्ये जो काही फायदा होईल त्यातली 35% रक्कम माझ्या खात्यात जमा व्हायला हवी. आणि जर एखाद्या महिन्यात तू ती रक्कम जमा नाही करत तर समजून जा पुढे काय होईल ते...

जया: पण माझा आणि देशमुख बिझनेसचा काय संबंध...?

शरद: तुझा तो म्हातारा सासरा, अर्धी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करुन वर गेला... 

जया: काय बाबा...(म्हणत रडू लागली)

शरद: ए ही रडण्याची नाटकं नंतर कर... मला आधी सांग, प्रत्येक महिन्यात तू पाठवणार आहेस की नाही...

जया: मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे.

शरद: बरं दिला तुला उद्यापर्यंतचा वेळ... पण परवा माझ्या खात्यात पैसे आले पाहिजेत हे लक्षात ठेव... म्हणत त्याने कॉल ठेवला.

***

अशीच काही वर्षे निघून गेली. शरद-जया यांचा घटस्फोट झाला होता. जया ठरल्या प्रमाणे शरदच्या खात्यात पैसे जमा करत होती. त्यांचा मुलगा मंदार ३ वर्षाचा झाला होता. श्रीधर जयाला अधून मधून त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पब्लिक लँडलाईन वरुन कॉल करत असे. श्रेयाने तिचं पदवी शिक्षण पूर्ण

करुन ती फातिमाला ड्रेस शिवण्याच्या कामात मदत करु लागली. आजूबाजूची लोकं श्रीधरला अब्दुल खान म्हणूनच ओळखू लागली होती. श्रीधरच्या मदतीने अकबरचा बिझनेस बराच वाढला होता. आता हाताखाली माणसे ही वाढली होती. फातिमा-अकबरचा मुलगा अन्वर एक वर्षाचा झाला होता. प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी फातिमा श्रीधरला तर श्रेया अकबरला राखी बांधू लागली. श्रीधरला आता ओळखणं अवघडचं होतं. श्रीधरची मानेपर्यंत रुळणारी दाढी, डोक्यात सदैव टोपी, आणि अंगात सफेद पठाणी पोशाख... यामुळे तो श्रीधर आहे हे कोणीही ओळखू शकलं नसतं. श्रेया नेहमी बाहेर पडताना बुरखा घालूनच जात असे. तिने लेन्सच्या मदतीने डोळ्यांचा रंग बदलला होता तर केस तांबूस करुन घेतले होते. तिनेही स्वतःला पूर्णतः बदलून घेतलं होतं.

***

५ वर्षांनंतर हॉस्पिटलमध्ये...

अब्दुल-अकबर दोघेही बाकड्यावर बसून डॉ कधी बाहेर येत आहेत त्याचीच वाट पाहत होते. गणेश-गीता घरीच अन्वर सोबत देवाकडे प्रसूती सुखरूप व्हावी म्हणून प्रार्थना करत होते. तेवढ्यात घरचा फोन वाजला.

गणेश: हां बेटा बोलो...

अकबर: अब्बू, फातिमा और श्रेया दोनो को बेटी हुई है... बेटी...

गणेश: काय सांगताय... आताच देवासमोर साखर ठेवतो.

अकबर: हां अब्बू, अम्मीला पण सांगा...

गणेश: हो हो नक्की... म्हणत त्यांनी फोन ठेवला आणि ही गोड बातमी गीताला आणि अन्वरला ही सांगितली. अन्वर आपल्याला दोन बहिणी मिळाल्या हे ऐकून नाचूच लागला. गीताने देवासमोर साखर ठेवून दोघांनी त्याचे आभार मानले. काही दिवसांनी दोन्ही मुलींचं बारसं झालं... फातिमा-अकबरच्या मुलीचं नाव खुशबू तर श्रीधर-श्रेयाच्या मुलीचं नाव खुशी ठेवण्यात आलं. चौघांच्या आयुष्यात दोन्ही मुलींच्या जन्माने एक नवीन आनंदी पर्व सुरु झालं.

क्रमशः

🎭 Series Post

View all