Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-५

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-५
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

पर्व-२- अबोल प्रीत

भाग-५


श्रेयाने श्रीधरला कॉल करुन लवकर घरी यायला सांगितलं.

श्रीधर: काय झालं, असं अचानक लवकर घरी या असं का म्हणत आहेस...?

श्रेया: ते बाबांना तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे..

श्रीधर: ठीक आहे येतो मी... म्हणत त्याने कॉल ठेवला.

"असं काय महत्त्वाचं बोलायचं असेल बाबांना...?" तो विचार करत ऑफिसमधून घरी यायला निघाला.

***

 

जेवण उरकलं पण रुममध्ये आल्या पासून शरद ड्रिंक करत बसला होता.

जया: अहो, किती घेताय... पुरे आता...

शरद: हे बघ, तू गप पणे झोप... मला काय करायचं ते करु दे.... त्याला बोलण्याची ही शुद्ध राहिली नव्हती. 

जयाला त्याचं वागणं विचित्रच वाटत होतं. तिला राहून राहून आज काहीतरी विपरित घडणार असं वाटत होतं. विचार करता करता तिचा डोळा लागला. शरदवर दारु हावी झाली होती. जयाला झोपलेलं पाहून तो स्वतः शीच हसत म्हणाला, "आता सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होणार...." तो तसाच अडखळत चालत श्रीधरच्या रुममध्ये जायला निघाला. श्रेयाने श्रीधर आणि तिच्या कपड्यांची बॅग भरुन तयार ठेवली होती. न विसरता तिने भिंतीवरचा त्यांचा फोटो ही बॅगेत भरुन ठेवला. प्रतापसिंह यांना दिलेल्या वचनापायी तिने हा निर्णय घेतला होता पण जया आणि प्रतापसिंह यांना तसंच त्या दोघांच्या तावडीत सोडून जायचा निर्णय आपला योग्य आहे का हे तिला अजूनही समजत नव्हतं. तिने बॅग बाजूला नेऊन ठेवली आणि ती अशीच बेडवर पडून होती. शरद स्वतःचा तोल सावरत सावरत श्रीधरच्या रुमपाशी आला. जर श्रीधर येइपर्यंत झोप लागली तर म्हणून श्रेयाने रूमचा दरवाजा लॉक केला नव्हता. शरदने हळूच दरवाजा उघडला आणि तो आत शिरला. झोपलेल्या श्रेयावरुन त्याची नजर फिरु लागली... "किती सुंदर दिसते ही..." तो स्वतःशीच पुटपुटला आणि हळूहळू तिच्या दिशेने जाऊ लागला.

 

जया ला झोपेतून जाग आली. तिने आजूबाजूला पाहिलं. तिला शरद कुठेही दिसेना. तिच्या मनात राहून राहून श्रेयाचा विचार येऊ लागला. तिने तातडीने श्रीधरला कॉल केला. श्रीधर अर्ध्या रस्त्यात पोहचलाच होता. त्याने ब्लूटूथने जयाचा कॉल उचलला.

जया: हॅलो दादा, कुठे आहात... घरी याल का लवकर...?

श्रीधर: हो हो, ऑन द वे आहे... मी ड्राईव्ह करतोय... येतो थोड्या वेळातच...

जया: हां ठीक आहे म्हणत तिने कॉल ठेवला.

श्रीधर विचार करु लागला, जयाने सुद्धा कॉल केला म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं आहे... त्याने कारचा वेग थोडा वाढवला.

***

 

जयाच्या मनात विचारांनी थैमान घातलं होतं. तिने एकदा श्रेयाच्या रुममध्ये जाऊन यायचा विचार केला. तिचा घसा ही कोरडा पडला होता. तांब्यातलं पाणी संपलेलं होतं. तिने शेवंता, शामला आवाज दिला. पण शरदने आधीच काहीतरी कारण देऊन त्यांना बाहेर पाठवलं असल्याने कोणीही ओ देईना. ती कशीबशी बेडवरुन उठली आणि किचनमध्ये जायला निघाली.

***

 

शरद श्रेयाच्या जवळ आला आणि तिच्या केसांवरुन हात फिरवू लागला. अचानक झालेल्या विचित्र स्पर्शाने ती खाडकन उठली. शरदला तिच्या इतक्या जवळ पाहून ती काहीशी गांगरून गेली. तरी कशीबशी हिंमत एकवटून तिने त्याला विचारलं, "भाऊजी, तुम्ही इथे काय करताय...?"

शरद: (त्याचे वासनांध डोळे तिलाच पाहत होते) त त ते मी, तुला काही हवं आहे का पाहायला आलो...

श्रेया: (नाकाला हात लावून) शी, तुम्ही दारु प्यायलात... आताच्या आता इथून बाहेर जा...

शरद: (अडखळत बोलतो) मी, इथे बाहेर जायला नाही आलो काही... (मग तिच्या चेहऱ्यावरुन बोट फिरवत) हा नशा करायला आलो आहे.

श्रेयाने मोठ्या हिंमतीने शरदला ढकललं. शरद बेडवर पडला. तिने दरवाजा उघडला आणि बाहेर जाणार इतक्यात त्याने तिचा पदर पकडला.

श्रेया: भाऊजी, पदर सोडा माझा... जाऊ द्या मला... तुम्हाला कळत नाही आहे तुम्ही काय करताय ते...

शरद: चूप एकदम चूप, मला माहित आहे मी काय करतोय ते... याच संधीची तर मी इतके महिने वाट पाहत होतो. त्याने तिला धरलं आणि बेडच्या दिशेने ढकललं.

श्रेया: खबरदार, एक पाऊल तरी पुढे टाकलं तर...

शरद: तर काय करणार आहेस, कोण येतंय तुला वाचवायला तेच बघूया. त्याने तिचा हात इतका जोरात पकडला की तिच्या हातातल्या काही बांगड्या तुटल्या.

श्रेया त्याच्या हाताला जोरात चावली. त्याने तिचा पकडलेला हात सोडला. ती पुन्हा दरवाजापाशी धावत आली. आता शरद पुरता चवताळला होता. श्रेयाने दरवाजा उघडला आणि बाहेर पडून आवाज दिला, " जया, शाम, शेवंता कुठे आहात सगळे...?"

जया तिचा आवाज ऐकून किचन मधून बाहेर आली. तिने श्रेयाला पाहिलं, तिचे केस विस्कटले होते. जयाला पाहून श्रेया वरच्या रूमकडे पाहत पायऱ्यांवरून धावत येऊ लागली. शरद ही तिच्या मागोमाग येऊ लागला. जया हे सगळं पाहून काय समजायचं ते समजली. जयाने श्रेयाला तिच्या मागे उभं केलं.

शरद: जया, माझ्या वाटेतून बाजूला हो...

जया: नाही होणार, भावाच्या बायकोवर वाईट नजर ठेवायला लाज नाही वाटत.

शरद: (जोरजोरात हसून) कोण भाऊ, कसला भाऊ... बऱ्या बोलाने बाजूला हो, नाहीतर...

जया: नाहीतर काय...

शरदने तिचा हात पकडला आणि तिला सोफ्याच्या दिशेने ढकललं. जयाने कसंबसं स्वतःला पोटावर पडण्यापासून वाचवलं. पण अनपेक्षित घडलेल्या प्रकाराने तिला लगेच उठता येईना.

शरद श्रेयाच्या जवळ यायचा प्रयत्न करु लागला. श्रेया स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागली. शरदने तिच्या साडीचा पदर पकडून जोरात ओढल्यामुळे तो फाटला. तिला आता स्वतःचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. ती मागे वळून पाहत धावत वाड्याच्या दारापाशी आली आणि नुकत्याच आलेल्या श्रीधरला आपटली. श्रीधरला पाहून ती रडतच त्याच्या मिठीत गेली. श्रीधरने एकवार श्रेयाच्या अवस्थेकडे पाहिलं आणि शरदकडे पाहून त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. त्याने श्रेयाला स्वतःपासून बाजूला केलं आणि स्वतःचा सूट तिला घालायला दिला. सगळ्या आवाजाने प्रतापसिंह ही व्हीलचेअर सरकवत रूम मधून बाहेर आले. त्यांना सगळं पाहून सहन होईना. त्यांनी चेअरवरुन उठण्याचा प्रयत्न केला पण त्यांना उठायला जमेना.

श्रीधर रागात शरदजवळ गेला. त्याने जोरात त्याच्या कानशिलात वाजवली.

शरद: तू तू तुझी इतकी हिंमत की तू माझ्यावर हात उचललास...

श्रीधर: (त्याची कॉलर पकडून) तू चुकणार असशील तर माझा हात एकदा नाही हजार वेळा उचलला जाईल.

शरद: (त्याची कॉलर पकडून) श्रीधर... आजपर्यंत माझी आई कधी माझ्यावर ओरडून बोलली नाही आणि तू... 

श्रीधर: (स्वतःची कॉलर सोडवत पुन्हा त्याच्या एक कानशिलात वाजवून) आता तू भाई वरुन श्रीधरवर आलास तर...

शरदने त्याला जोरात बुक्की दिली. दोघांमध्ये मारामारी सुरु झाली. एक क्षण असा आला की शरदने डायनिंग टेबलवरची सुरी हातात घेतली.

श्रीधर: खाली टाक शरद...

शरद: का घाबरलास आता... तो सुरी दाखवत श्रेयापाशी आला.  त्याने तिच्या गळ्याला सुरी टेकवली. श्रीधर पुढे यायचा प्रयत्न करु लागला तसं शरदने तिच्या गळ्याला अजून घट्ट सुरी लावली. सुरीला असलेली धार तिला थोडी लागून ती कळवळली, "आई ग..."

श्रीधर: (घाबरुन) शरद, काही नको करुस तिला... तुला पैसे ही प्रॉपर्टी जे काही हवं ते घे पण तिला काही करु नकोस.

प्रतापसिंह: हो शरद, तुला हवं ते घे.. पण त्या दोघांना सोड...

शरद: तसं ही हे सगळं माझंच होणार आहे आज ना उद्या...

त्याचं बोलणं ऐकून श्रेयाला प्रतापसिंह यांच्या मेसेजची आठवण झाली.

श्रीधर: (हळूहळू पुढे येत) काय बोलतोय तू...

शरद: (सुरी त्याला दाखवत) बायको हवी आहे ना तुला तुझी परत जिवंत... मग पुढे यायचं नाही... एकदा accident मधून तिने वाचवलं म्हणून प्रत्येक वेळी वाचणार नाही आहेस तू... (आणि जोरजोरात हसू लागला)

श्रीधर: (त्याच्यावत्याचं accident कसं झालं ते सगळं लक्षात आलं) तुला सगळं हवं ते घे... पण तिला सोड...

शरद: सोडेन सोडेन घाई काय आहे... (मग तिच्या केसांचा सुवास घेत) एका रात्रीचा आनंद तर घेऊ दे...

श्रेया त्याच्या स्पर्शाने थरथर कापत होती. श्रीधरला ही पुढे काय करावे ते कळेना. तेवढ्यात शरदच्या डोक्यावर जयाने जोरात तीनदा फ्लॉवर पॉट मारला. तो त्याला इतक्या जोरात मारला की तो बेशुद्ध होऊन खाली पडला. जयाने रडत रडत फ्लॉवर पॉट खाली टाकला. श्रेया आणि जया एकमेकींना बिलगून रडू लागल्या. श्रीधरने शरदला उचलून एका खुर्चीवर बांधून ठेवलं.

प्रतापसिंह: श्रीधर, काय करतोय...?

श्रीधर: आई आल्यावर तिला शरदने काय केलं हे सगळं कळलंच पाहिजे. माझ्या accident मागे त्याचा हात होता हे जर तिला कळलं तर ती त्याला कधीच माफ करणार नाही..

प्रतापसिंह: श्रीधर, तुझ्या accident मागे त्याचा नाही तुझ्या आईचा हात होता... अशा बाईला मला आई म्हणायला ही लाज वाटते.

श्रीधर: बाबा, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल... आई, असं का करेल...?

प्रतापसिंह: मला काहीही गैरसमज झालेला नाही असं म्हणत त्यांनी त्या दिवशी घडलेला सगळा प्रसंग त्याला सांगितला.

सगळं ऐकून श्रीधर खाली कोलमडून बसला आणि रडू लागला. श्रेयाने त्याला जवळ घेऊन आधार दिला.

प्रतापसिंह: आता तुम्ही तिघांनी इथे जास्त वेळ थांबण योग्य नाही.

जया: बाबा, आम्ही तुम्हाला सोडून कसे जाऊ...? माझे आईबाबा, मला काय म्हणतील...

प्रतापसिंह: जया बाळा, माझे फार दिवस नाही उरले... आणि आजच योग्य वेळ आहे तुम्ही इथून जाण्याची... मला वाटलं नव्हतं शरद तुझ्या बाबतीतही असा वागेल. मला आधीच हे सगळं माहीत असतं तर तुझं लग्न मी कधीच त्याच्याशी लावून दिलं नसतं.

जया: बाबा, जाऊ दे नका विचार करुन स्वतःला त्रास करुन घ्या. कदाचित हेच माझ्या नशिबात होतं. 

प्रतापसिंह: तुम्हां तिघांना शपथ आहे माझी, तुम्ही आताच्या आता इथून निघून जा... आणि वेळ आलीच तशी तर कायदेशीर रित्या इंदुमतीशी लढा... पण इथे राहण म्हणजे तुमच्या जीवाला धोका आहे.

तिघे ही प्रतापसिंहना बिलगले. चौघांना खूप भरुन आलं होतं. प्रतापसिंहनी तिघांना आशीर्वाद देत मन भरुन बघून घेतलं. जणू ही त्यांची शेवटची भेट होती.

श्रीधर-श्रेया जया तिघेही आपापलं सामान घेऊन एकवार वाड्याकडे पाहत बाहेर पडले.

श्रीधर: जया, तू आमच्या बरोबर चल..

जया: नको दादा, मी आईबाबांकडे जायचं ठरवलं आहे. मी शरदला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मी आईबाबांकडे जाणचं योग्य ठरेल.

श्रीधर: बरं आम्ही येतो तुला सोडायला...

जया: नको दादा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि एकवेळ आई... (मग थोडा वेळ थांबून) सॉरी इंदुमती मला काही करणार नाही कारण माझ्या पोटात त्यांचा वारस वाढतो आहे पण तुम्हाला त्यांच्या पासून सुरक्षित राहणं गरजेचं आहे.

श्रेया: बरं मग आम्ही तुला स्टेशनवर तरी सोडायला येतो...

जया: हं चालेल.

तसे तिघेही स्टेशनवर जायला निघाले. कारमध्ये कोणीही कोणाशी बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. श्रेया जयाचा हात घट्ट पकडून होती. कधी कधी जे शब्दात बोलता येत नाही ते एक मायेचा स्पर्श सांगून जातो. जया तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. श्रेयाने तिचा चेहरा हातांच्या ओंजळीत घेऊन तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले.

श्रेया: बस आता, यापुढे रडायचं नाही... आपण या संकटाला धीराने सामोरं जायचं आहे.

जयाने तिला घट्ट मिठी मारली. काही वेळाने दोघीही वेगळ्या होऊन पुन्हा शांत होऊन बसल्या. काचेतून पाहणाऱ्या श्रीधरचेही डोळे भरून आले होते. कार स्टेशनवर पोहचली तशी त्याने ती साईडला पार्क केली. जयाने कारमधून उतरुन दोघांचा ही निरोप घेतला. ती बॅग हमालाकडे देऊन लेडीज कम्पार्टमेंट जिथे येतो तिथे जायला निघून गेली. ती दिसेनाशी झाली तसं श्रीधरने कार तिथेच पार्क करुन त्याने एका माणसाला विनंती करत त्यांना मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर सोडायला सांगितलं.

***

 

शेवंता-शाम दोघेही घरी आले तर त्यांना शरद बेशुद्ध अवस्थेत बांधलेला दिसला. शामने त्याला सोडवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला जाग केलं. तो उठला तोच डोक्यावर हात ठेवून कण्हू लागला. दारूची नशा आता बरीच उतरली होती. त्याला सगळं आठवलं आणि शामच्या हातातलं ग्लास जमिनीवर जोरात फेकत तो म्हणाला, "श्रीधर-श्रेया, मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही..."

शाम-शेवंता हे ऐकून दचकून मागे गेले. शरद डोक्यावर हात धरुन कसाबसा खुर्चीतून उठू लागला पण पुन्हा बेशुद्ध झाला. शामने धीर करुन डॉ ना घरी बोलावलं. शेवंता प्रतापसिंह त्यांच्या रुममध्ये झोपले आहेत की जागे आहेत ते पाहायला निघून गेली. शाम-शेवंता प्रतापसिंह यांच्याशी इतकी वर्ष प्रामाणिक वागत असल्याने प्रतापसिंह यांनी घडलेला प्रकार तिला सांगितला. सगळं ऐकून तिच्याही पायाखालची जमीन सरकली.

शेवंता: मालक, हे काय होऊन बसलं... हसतं खेळतं घर होतं ते होत्याचं नव्हतं झालं...

प्रतापसिंह: संपत्तीची हाव माणसावर हावी झाली की तो नाती विसरुन जातो... नको रडूस... शांत हो... तू आणि शाम आता इथे काम करणं थांबवा...

शेवंता: नाही मालक, आम्ही पण गेलो तर तुम्हाला कोण बघणार...? आम्ही असू तुमच्या बरोबर...

तेवढ्यात शामने तिला आवाज दिला. तशी ती त्यांच्या रूममधून डोळे पुसत बाहेर पडली.

***

 

मुंबई-पुणे हायवेवर श्रेया-श्रीधर दोघेही त्या माणसाचे आभार मानत उतरले. 

श्रेया: आता कसं जायचं आहे...?

श्रीधर: कोणी मुंबईच्या दिशेने जाणार दिसतंय का पाहू...

दोघेही अधून मधून येणाऱ्या गाड्यांना हात दाखवू लागले.  कोणीही कार थांबवेना. श्रीधर थकून एका झाडापाशी बसला. श्रेयाने समोरुन येणाऱ्या कारकडे हात दाखवत थांबायला सांगितलं. ती कार येऊन तिच्या जवळ थांबली. कारमधल्या मुस्लिम व्यक्तीला पाहून श्रेयाची काही बोलायची हिंमत होईना. तिच्या मनात काय चाललं आहे हे लक्षात येऊन ती व्यक्ती तिला म्हणाली, अक्का, घाबरून जायची गरज नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता.

श्रेयाने झाडापाशी बसलेल्या श्रीधरकडे बोट दाखवत म्हटलं, "आम्हा दोघांना मुंबईला जायचं आहे.." त्या माणसाने लगेच होकार देताच श्रेयाने श्रीधरला आवाज दिला. दोघेही त्या व्यक्तीच्या कारमध्ये बसले तशी त्याने कार मुंबईच्या दिशेने वळवली.

 

क्रमशः

 

(वेळे अभावी भाग छोटाच पोस्ट करत आहे याबद्दल क्षमस्व)

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...