अस्तित्व एक संघर्ष-पर्व-२-अबोल प्रीत-भाग-३

It is a story of two lovers when they want to confess their love But before confession they get separated by destiny and again meet each other just because of destiny.

अस्तित्व एक संघर्ष

पर्व-२- अबोल प्रीत

भाग-३


प्रतापसिंह त्यांच्या रुममध्ये आले. त्यांनी लगेच श्रीधरला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मोबाईलला रेंज नसल्याने कॉल लागेना. त्यांनी त्याला सगळं काही कळायला हवं म्हणून तातडीने टेक्स्ट मेसेज केला. जेणेकरून त्याच्या मोबाईलला जेव्हा कधी रेंज मिळेल तेव्हा तो मेसेज वाचून स्वतःला वाचवू शकेल. प्रतापसिंह यांनी श्रीधरला मेसेज करुन झाल्यावर तातडीने त्यांच्या वकील मित्राला फोन करुन त्यांच्या मृत्यूपत्रात वाड्याचा, कंपनीचा आणि त्यांच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा हक्क इंदुमती आणि शरद यांना न मिळता त्याचा अर्धा हक्क जया आणि तिच्या- शरदच्या बाळाला आणि श्रीधरला आणि भविष्यात त्याने लग्न केल्यास त्याच्या बायकोच्या आणि बाळाच्या नावे करायला त्यांनी सांगितले. वकिलांनी ही तातडीने सगळ्या गोष्टी करेन असं कबूल करत फोन ठेवला. प्रतापसिंह फोन ठेवून बेडवर पडून होते. आता त्यांच्या मनात फक्त श्रीधरचाच विचार चालू होता.

***

इंदुमती दुपारी प्रतापसिंहना जेवायला बोलवण्यासाठी म्हणून रुममध्ये आली. ते झोपेतच पण प्रचंड घामाघूम झाले होते.

इंदुमती: (त्यांना हात लावून जागं करण्याचा प्रयत्न करत) अहो, चला जेवायला. प्रतापसिंहच्या पकडलेल्या हाताची काहीही हालचाल होईना. मग त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तिने तात्काळ डॉ ना कॉल करुन घरी बोलावलं.  डॉ नी येऊन त्यांचं चेकअप केलं.

इंदुमती: डॉ, काय झालंय यांना...? असं काय करत आहेत हे...?

डॉ: मिसेस देशमुख, त्यांना पॅरालिसिस अटॅक आला आहे.

इंदुमती: म्हणजे डॉ...?

डॉ: म्हणजे त्यांच्या शरीराची एक बाजू लुळी पडली आहे.

इंदुमती: पण मग हे ठीक होतील ना...?

डॉ: हो नक्की होतील, पण काही वेळ द्यावा लागेल. मेडिसिन आणि फिजिओथेरपीने त्यांना फरक पडेल. चला येतो मी, काही गरज लागल्यास कॉल करा म्हणत डॉ तिथून निघाले.

***

दुसऱ्या दिवशी श्रीधर शुद्धीवर आला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की तो हॉस्पिटलमध्ये आहे. मी हॉस्पिटलमध्ये कसा, त्याने मनात विचार करत आठवण्याचा प्रयत्न केला... त्याला आदल्या दिवशी घडलेला प्रसंग आठवला. पाणी पिण्यासाठी त्याने बाजूला हात लावला तोच दरवाजातून दिशा डॉ नी दिलेल्या मेडिसिन घेऊन आली. त्याची पाणी पिण्यासाठी चाललेली हालचाल पाहून ती मेडिसिन टेबलवर ठेवून लगेच त्याला पाणी द्यायला धावली.

दिशा: (तांब्यातून पेल्यात पाणी घेत) अहो, काय करताय... नर्स ना आवाज द्यायचा होता ना, नाहीतर ही इकडे बेल आहे ती वाजवली असती तर त्या आल्या असत्या. तरी बरं नेमकी मी आले नाहीतर... ती बडबड करत होती आणि श्रीधर तिला न्याहाळत होता. गोल चेहरा, एखाद्याला भूरळ पाडतील असे लुकलूकणारे घारे डोळे, ना कमी ना जास्त असा मध्यम बांधा, पाठीवर रुळणारी केसांची पोनी आणि बोलताना होणाऱ्या नाजूक ओठांची हालचाल. काही क्षणांतच त्याला तिचे हावभाव वेड लावून गेले.

दिशा: (त्याला तिच्याकडे पाहताना बघून) काही हवं आहे का अजून...? तोपर्यंत नर्स त्या रुममध्ये आली.

नर्स: मिस दिशा, पेशंटचा BP आणि Temperature आहे का चेक करायचं आहे. तुम्ही इथे थांबता की बाहेर जात आहात.

दिशा: सिस्टर, थांबते मी बाहेर, तुम्ही काल सांगितलेल्या मेडिसिन मी घेऊन आले आहे. त्या तिथे टेबलवर ठेवल्या आहेत.

दिशा नर्सला सांगून श्रीधरकडे हसून पाहत गेली. नकळत त्याच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं.

श्रीधर: (BP चेक करणाऱ्या नर्सला) सिस्टर, त्या आता बाहेर गेल्या त्या कोण होत्या...?

नर्स: ओह तुम्ही मिस दिशा बद्दल बोलत आहात... त्यांनीच तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलं. मानलं पाहिजे हां तिला. आजकाल कोण इतकं अनोळखी लोकांना मदत करायला पुढे येतं. नर्सने त्याचं temperature, bp दोन्ही पेपरवर लिहून घेतलं आणि ती दिशाने आणलेले मेडिसिन घेऊन निघून गेली. थोड्या वेळाने दिशा आणि तिचे बाबा गणेश पाटील रुममध्ये आले.

गणेश: नमस्कार, मी दिशाचे बाबा.

श्रीधरचा एक हात fracture असल्याने त्याने तोंडानेच हसून नमस्कार म्हटलं.

गणेश: काही हवं असेल नसेल तर निःसंकोचपणे सांगा. आज रविवार असल्याने आम्हाला दोघांना येता आलं. पण उद्या पासून आमची दिशाच येईल कॉलेज झालं की, काही हवं असेल नसेल पाहायला....

श्रीधर: (हसून) बरं... त्याने बोलताना पुन्हा एकदा दिशाकडे पाहिलं.

गणेश: तुमच्या घरी कोणाला कळवायचं असेल तर सांगा... आम्ही कळवतो.

श्रीधर: नको ते उगाच काळजी करु लागतील.

गणेश: बरं, जशी तुमची इच्छा. घरी कोण कोण असतं तुमच्या...?

श्रीधर: मी पुण्याला राहतो. आईबाबा, भाऊ-वहिनी आणि मी. माझं काम होतं इथे म्हणून आलो होतो. पण मध्येच कारचे ब्रेक लागेनात आणि पुढचं तर तुम्हाला माहितीच आहे.

गणेश: हं

त्यांचं बोलणं चालू असताना पोलीस आणि डॉ दोघेही तिकडे हजर झाले. तसे दिशा आणि तिचे बाबा पुन्हा तिथून बाहेर पडले. पोलिसांनी श्रीधरची विचारपूस करुन घडलेला सगळा प्रकार जाणून घेतला आणि त्याचा जबाब लिहून घेऊन ते तिथून निघाले. डॉ नी श्रीधरचं चेकअप केलं.

डॉ: (चेकअप करता करता) तुमचं काही मेडिक्लेम वगैरे आहे का...?

श्रीधर: हो डॉ आहे.

डॉ: तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा त्या डिटेल्स सिस्टरना द्या. खरं तर तुम्हाला सांगावं की नाही हे मला कळत नाही आहे.

श्रीधर: कशा बद्दल बोलत आहात डॉ...?

डॉ: तुमच्या ट्रीटमेंट साठी भरायची रक्कम ही मिस दिशाच्या वडिलांनी भरली आहे. पण मला त्या फॅमिलीची एकंदरीत परिस्थिती बिकट वाटते आहे म्हणून मी तुम्हाला मेडिक्लेम बद्दल विचारलं. डोन्ट वरी तुम्ही लवकर ठीक व्हाल म्हणत डॉ तिथून निघाले.

***

दुपारी दिशा ची आई गीता हॉस्पिटलमध्ये डब्बा घेऊन आली. दिशा आणि तिचे बाबा त्यावेळी श्रीधरच्याच रुममध्ये होते. श्रीधर जागा असला तरी डोळे बंद करुन होता. त्या दोघांना याची पुसटशी ही कल्पना नव्हती. गीताने रुममध्ये आल्या आल्या श्रीधर झोपलेला आहे हे पाहून गणेशना विचारलं, "तुम्ही विचारलं का, त्यांना की ते आपले पैसे देतील का...?"

गणेश: अग हळू बोल, उठतील ते...

गीता: उठले तर उठू दे... तुम्हाला माहित तरी आहे का, तो मदनशेट सकाळी तुम्ही इथे आल्यावर येऊन गेला. पैसे तयार ठेवा आणि नसतील तर मुलीच्या लग्नाची तयारी करायला घ्या बोलून गेला.

दिशा: आई, शांत हो, असं काही नाही होणार... निघेल काहीतरी मार्ग.

गीता: तुम्ही दोघांनी सांगितलं का यांच्या घरी तरी... ते लोक तरी आपल्याला आपण भरलेले पैसे परत देतील.

गणेश: गीता, शांत हो, आपण घरी जाऊन बोलूया.

गीता: आधी तुम्ही दोघांनी दोन घास खाऊन घ्या मग जाऊ एकत्रच घरी आणि यांचं झालं का जेवून नाहीतर उठवून त्यांना पण देऊ यातलं जेवण..

दिशा: अग आई त्यांना दिलं हॉस्पिटल मधून जेवायला.

गीता: बरं, तर मग आता तुम्ही दोघांनी उरकून घ्या आता.

तिचं बोलणं ऐकून दिशा-गणेशने जेवून घेतलं. श्रीधर मात्र डोळे मिटून सगळं शांतपणे ऐकत होता.

***

दुसऱ्या दिवशी दिशा कॉलेजमधून घरी जाऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. श्रीधर तिची आतुरतेने वाट पाहत होता. तिने येताक्षणी त्याची विचारपूस केली आणि बाजूलाच खुर्चीत बसली. तो तिला तिच्या कॉलेजबद्दल काही ना काही विचारत गेला आणि ती त्याला सांगत गेली. बराच वेळ दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या. असेच भरभर काही दिवस निघून गेले. इतक्या दिवसात श्रीधरला दिशा आवडू लागली आणि दिशाला ही तो नकळत आवडू लागला होता. ठीक झाल्यावर रीतसर तिच्या आईबाबांकडे तिच्याशी लग्नाची परवानगी घ्यायचं त्याने मनाशी पक्कं केलं.

आज श्रीधरला डिस्चार्ज मिळणार होता. नर्सने औषध कशी घ्यायची हे सगळं त्याला समजावून सांगितलं. त्याचं हॉस्पिटलचं बिल मेडिक्लेमने भरलं जाणार असल्याने त्याची सगळी डिस्चार्ज प्रोसेस होऊन गेली. तो आता दिशाच्याच येण्याची वाट पाहत होता. अचानक त्याला त्या दिवशी तिच्या आईचं तिच्या बाबांशी झालेलं बोलणं आठवलं. आठवडा होऊन गेला म्हणजे... म्हणजे तो माणूस पुन्हा नसेल ना गेला त्यांच्या घरी... तिचं त्या माणसाशी लग्न करुन दिलं तर... या विचारानेच त्याच्या ह्रदयात कालवाकालव झाली. तू पण ना श्रीधर, इतक्या दिवसात का त्यांचे पैसे परत करण्याचा विचार केलास... त्यांच्या विचारण्याची वाट पाहत होतांस का...? तो स्वतःला मनात दोष देऊ लागला. आता स्वतःशीच बडबडण्यात काही फायदा नाही, काहीही करुन आज तिच्या घरीच गेलं पाहिजे. पण मला तिचा घरचा पत्ता कुठे माहिती आहे. हां ऍडमिट करून घेताना कदाचित हॉस्पिटलमध्ये तिचा पत्ता लिहून घेतला असेल तर...? त्याने मनाशीच विचार करत हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्ट कडे त्याबाबत चौकशी केली. तिने काही वेळातच त्याला हवी असलेली माहिती त्याच्याकडे सुपूर्त केली. तिच्या घरचा पत्ता मिळालेला पाहून त्याच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू उमटलं.

***

गणेश: मला माझ्या लेकीचं लग्न त्या मदनशेटशी नाही करायचं आहे. 

गीता: आपण इतक्या मेहनतीने 5 लाख जमा केले होते. तुम्ही का त्यातले 1 लाख रुपये त्या हॉस्पिटलमध्ये वापरले. आणि वापरले ते वापरले त्यांच्याकडून नंतर मागूनही नाही घेतले. आज अशी आपल्यावर वेळ तर नसती आली.

दिशा: आई, शांत हो... त्यावेळी श्रीधर यांना तसं सोडून जाणं मला योग्य वाटलं नाही आणि तुम्हीच दोघे म्हणतात ना, की अडल्या नडल्याला मदत करावी म्हणून...

गीता: अग पण आपण कोणत्या परिस्थितीतून जातो आहोत हे तरी विचार करायचा होता. उद्या लग्न आहे तुझं त्या माणसाशी.

दिशा: आई, आपण कितीही प्रयत्न केला ना पण देवाला जर हेच मंजूर असेल तर ते तसंच होईल. आणि माझ्या नशिबात हे असं होणं लिहिलं नसेल तर तोच मला यातून बाहेर काढेल.

गीता: (काळजीने) दिशू, तुझी आई आहे मी, तुझ्या शिवाय आमच्या आयुष्यात कोणी नाही, तुझ्या सारखं सगळं देवावर सोपवून मी नाही जगू शकत. मी काय म्हणते तू इथून पळून जा... म्हणजे तुझं मदनशेटशी लग्न करण्याचा संबंध येणार नाही.

दिशा: तुम्हाला असं त्याच्या तावडीत सोडून मी पळून जाणार नाही. 

गीता: (गणेशला) अहो समजवा हिला.. का ऐकत नाही आहे ही माझं...? मी हिच्या भल्यासाठीचं बोलते आहे ना...!!

त्यांचं बोलणं चालू असतानाच त्यांच्या दरवाजावर ठाप ऐकू आली, "कोणी आहे का घरात..?"

तिघांनी घाबरुन एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. शेवटी हिंमत करुन गणेशने दरवाजा उघडला. समोर श्रीधरला पाहून ते चपापून गेले.

गणेश: त...तू...तुम्ही इकडे कसे काय..?

श्रीधर: (हसून) काका, मी घरात आलं तर चालेल का..?

गणेश: (संकोचून) हां या ना आत.. अग हे बघ श्रीधरराव आले आहेत.

श्रीधर: काका, मला फक्त श्रीधरचं म्हणा... चालेल मला. त्याचं बोलणं ऐकून गणेश हसले. त्यांनी हसतच एका खुर्चीवर त्याला बसायला सांगितलं. तोपर्यंत गीता त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. मागोमाग दिशा ही बाहेर आली. श्रीधर पाणी प्यायला आणि त्याने ग्लास गीताच्या हातात दिला.

गणेश: माफ करा हा, आज तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे हे आमच्या लक्षातचं नव्हतं. 

श्रीधर: (दिशाकडे हळूच पाहून) काही हरकत नाही काका, समजू शकतो मी... खरं तर एका अनोळखी मुलासाठी तुमच्या फॅमिलीने खूप काही केलं आहे. म्हणूनच मी हॉस्पिटलमधून तुमचा पत्ता घेऊन तुम्हां सगळ्यांना भेटायला आलो.

गीता: मग आता तुम्ही, लगेच तुमच्या घरी जायला निघणार का..?

श्रीधर: अं नाही, माझं मुंबईच्या ऑफिसमधलं काम अजून पूर्ण करायचं आहे ते करेन मग जायचा विचार आहे.

गणेश: मग आता राहायला कुठे, म्हणजे इथे कोणी तुमचे नातेवाईक राहतात का...?

श्रीधर: नाही मी एका हॉटेलमध्ये उतरणार होतो. काका, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.

गणेश: हां बोला ना...

श्रीधर: (हातातलं पाकीट त्यांच्याकडे देऊन) हे द्यायचं होतं, प्लीज नाही म्हणू नका.

गणेश: यात काय आहे..?

श्रीधर: डिपॉझिट म्हणून तुम्ही माझ्यासाठी भरलेली रक्कम...

गणेशने पाकीट खोलून पाहिलं. पैसे पाहून गणेश आणि गीताच्या डोळ्यात पाणी आलं. दिशा स्वतःला थांबवू नाही शकली म्हणून ती आत गेली. एकीकडे मदनशेटच्या तावडीतून सुटकेचा आनंद होता पण डोळ्यांत पाणी मात्र आज श्रीधरला शेवटचं भेटणं याचा होता. कसं लपवणार होती ती, तिला जे इतक्या दिवसात त्याच्या बद्दल नकळत वाटू लागलं. आता तर त्याच्या समोर जायची ही भीती वाटत होती.

गीता: मी सांगू शकत नाही शब्दात तुम्ही पैसे परत करुन आज आमची किती मोठी मदत केली आहे हे...!!

श्रीधर: म्हणजे काकू, काही कळलं नाही मला...

गणेश: (विषय बदलण्यासाठी) गीता, आत जाऊन काहीतरी त्यांच्या साठी खायला घेऊन ये. तशी ती आत गेली. 

श्रीधर: काका, तुम्हाला मी काही विचारलं तर हरकत नाही ना...?

गणेश: अरे विचार ना...

श्रीधर: हा मदनशेट कोण आहे..?

गणेश चपापून त्याच्याकडे पाहू लागले. मग काही वेळाने स्वतःला सावरुन त्यांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठरवलं.

गणेश: काही वर्षापूर्वी माझा आणि माझ्या एका मित्राचा पार्टनरशिप मध्ये एक छोटा व्यवसाय सुरू होता पण मित्र दगेबाज निघाला आणि झालेला नफा घेऊन पसार झाला. मग बँकेतून घेतलेलं लोन फेडण्यासाठी मला आमचं राहतं घर विकून पैसे द्यावे लागले आणि या चाळीतलं घर विकत घेण्यासाठी मी मदनशेट कडून कर्ज घेतले आणि त्यावेळी मला कल्पना ही नव्हती की त्याची माझ्या मुलीवर वाईट नजर आहे हे. आता तर कर्ज देणं शक्य नसेल तर आमच्या दिशूच लग्न आम्ही त्याच्याशी करुन द्यावं अशी त्याने आम्हाला अट घातली आहे आणि उद्याचं त्याने लग्नाचा मुहूर्त काढला आहे. बोलता बोलता गणेश ओक्साबोक्शी रडू लागले. श्रीधरने त्यांना कसंबसं शांत केलं. किचनमधून दिशा आणि गीता ही हे बोलणं ऐकत होत्या.

श्रीधर: काका, आपण आताच जाऊ चला, आणि त्या मदनशेटला त्याचे पैसे परत करु.

गणेश: त्याने दिलेली रक्कम जरी पूर्ण झाली असली तरी व्याजाचे पैसे माझ्याकडे अजून ही कमी पडत आहेत.

श्रीधर: इतकंच ना काका, मी तुम्हाला ती रक्कम देतो पण आपण हे लग्न काहीही करून थांबवायला हवं. दिशा अशा माणसाशी लग्न करुन कधीही सुखात राहणार नाही.

गणेश: पण तुमचे पैसे... परत करायचे असतील तर मी कधी आणि कसे परत करु...?

श्रीधर: (हसून) काका, मी तुम्हाला मुला सारखा आहे ना..?

गणेश: हो.

श्रीधर: मग तुमच्या मुलाने अशी केलेली मदत तुम्ही नाकारणार आहात का...?

त्याचं बोलणं ऐकून गणेशने त्याला मिठी मारली.

श्रीधर: काका, चला वेळ नका दवडू. आपल्याला निघायला हवं.

गणेश: गीता, दिशू मी श्रीधर बरोबर जाऊन मदनशेटचे सगळे पैसे देऊन येतो म्हणत दोघेही तिथून निघाले. ते दोघेही निघून गेले तसं दिशा आणि गीता दोघींचा जीव भांड्यात पडला. आता फक्त त्या दोघी आतुरतेने त्या दोघांच्या येण्याची वाट पाहू लागल्या. एक-दीड तासानंतर दोघेही परत घरी आले. गीता त्या दोघांसाठी पाणी घेऊन आली.

गीता: झालं ना आता सगळं ठीक...?

गणेश: (पाणी पिऊन झाल्यावर) मदनशेटने पैसे तर घेतले आहेत पण का कोण जाणे मला राहून राहून वाटतं आहे तो उद्या काहीतरी गडबड नक्की करायला बघेल.

गीता: म्हणजे...? आपण सगळे पैसे दिले ना आता त्याचे, मग आता का तो आपल्याला त्रास देईल.

गणेश: मला तरीही संशय येतोय... तो वाटतो तितका सरळ माणूस नाही आहे.

श्रीधर: काका नका इतका विचार करु, मी आहे ना तुमच्या सोबत.

गीता: श्रीधरराव, तुमची हरकत नसेल तर तुम्ही आज आणि उद्याच्या दिवस आमच्याकडेच राहाल का...? म्हणजे मदनशेटने काही गोंधळ केला तर तुम्ही आमच्या मदतीला असाल.

गणेश: गीता तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आपल्या पायी कशाला त्यांना त्रास.... 

श्रीधर: (गणेशचे हात हातात घेऊन) काका, माझी काही हरकत नाही. मी असेन तुमच्या सोबत. मी आज आणि उद्या दोन्ही दिवस तुमच्याकडे राहीन.

गीता, श्रीधर हे ऐकून खूश झाले. किचनमध्ये उभ्या असलेल्या दिशाच्या ही कानावर पडलं आणि ती ही खूश झाली. रात्री चौघांनी मिळून हसत गप्पा मारत जेवणाचा कार्यक्रम आटपला. 

***

दुसऱ्या दिवशी मदनशेटने ठरवल्या प्रमाणे काही बायका आणि माणसे गणेश राहत असलेल्या चाळीत आली आणि त्यांनी त्यांच्या घरचा दरवाजा ठकठकवला. गणेशने दरवाजा उघडला तशी ती माणसे आणि बायका सगळ्या चाळीतील लोकांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात आरडाओरड करुन बोलू लागली, "अहो, लग्न मोडताना एकदा तुमच्या मुलीचा तरी विचार करायचा होता... आता अशा मुलीशी कोण लग्न करणार...?" अजूनही वेळ गेलेली नाही मदनशेट तुमच्या गेलेल्या अब्रूला सांभाळून घेतील. त्यांच्या आवाजाने गीता, श्रीधर ही बाहेर आले. आजूबाजूचे चाळीतले लोक ही दरवाजा उघडून काय झालं हे पाहायला लागले....आणि आपापसात कुजबुज करु लागले.... "अब्रूला सांभाळून घेतील म्हणजे... म्हणजे नक्की काय केलं आहे यांच्या मुलीने...?" लोकांची चाललेली आपापसात कुजबूज गणेशला सहन होईना. त्यांनी न राहवून ओरडून सांगितलं... माझ्या मुलीने असं काहीही केलेलं नाही आहे की ज्याने आमची अब्रू जाईल. मदनशेटने पाठवलेली बायकामाणसे पुन्हा मोठ्याने बोलू लागली, "अहो किती ही लपवायचं ठरवलं तरी लपणार आहेत का गोष्टी...?" गणेश यावर काही बोलणार इतक्यात चाळीतील काही बायका माणसे त्यांच्याकडे येऊन म्हणाले, "गणेशराव, मदनशेट सारखा माणूस स्वतःहून तुमच्या मुलीचा हात मागतो आहे तर लग्नाला तयार व्हा... नाहीतर कोण करेल अशा मुलीशी लग्न ..?" झाकली मूठ सव्वा लाखाची. मदनशेटची माणसं तीर बरोबर निशाण्यावर लागतोय हे पाहून आरडाओरडा करु लागले, "हो हो, त्यांच्यासारखा भला माणूस शोधूनही सापडणार नाही... गणेशराव, आता तुम्ही लग्नाला तयार करा तुमच्या मुलीला...

गीता: आम्हाला आमची मुलगी जड नाही झाली की मदनशेट सारख्या माणसाशी तिचं लग्न करुन देऊ.

घोळकातल्या बायका: अहो, मग आम्हाला पण कळू दे, कोण असल्या मुलीशी लग्न करायला आता तयार होत आहे ते... आताच विचारा कोण आहे का या चाळीत तुमच्या मुलीशी लग्न करायला...?

गणेश-गीता दोघेही हतबल होऊन एकमेकांना पाहू लागले. घरात बसलेल्या दिशाच्या ही डोळ्यांत पाणी उभं राहिलं. तिला वाटू लागलं मदनशेटशी लग्न करण्याव्यतिरिक्त आता तिच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही. तेवढ्यात तिला बाहेरुन आवाज ऐकू आला, "मी दिशाशी आताच लग्न करायला तयार आहे, पण तिचा आणि तुमचा ही या लग्नासाठी होकार असेल तर...!!"

कोण असेल ती व्यक्ती... जी हो म्हणाली... दिशा मनात विचार करु लागली. तिने हळूच दरवाजा उघडून पाहिला. पण आईबाबा दरवाजापाशीच उभे असल्याने तिला ती व्यक्ती कोण असेल याचा अंदाज येईना. तिने डोळे मिटून दरवाजा बंद करुन घेतला. हळूहळू चाळीतील लोकं ही आपापल्या घरी निघून गेली. मदनशेटने पाठवलेली माणसं-बायका ही दात-ओठ खात निघून गेली. जे लोक गणेश पाटील यांच्या फॅमिलीला ओळखत होते त्यांनी गणेश आणि गीताला आधार दिला आणि लग्नासाठी तयार झालेल्या मुलाची त्यांनी आनंदाने पाठ थोपाटली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सरफरे काकू म्हणू लागल्या," हा मुलगा नक्कीच आपल्या दिशूला सुखात ठेवेल...!!" आता एक काम करा दिशाशी पण बोलून घ्या. पोरगी या सगळ्या प्रकाराने घाबरुन गेली असेल. त्यांचं बोलणं ऐकून गणेश-गीता ही भानावर आले आणि सरफरे काकूंचा निरोप घेत ते घरात आले.

***

दिशा शांतपणे डोळे मिटून एका कोपऱ्यात बसून होती. गीताने तिला असं पाहिलं आणि तिला येऊन बिलगली.

दिशा: आई, का घडत आहे असं माझ्या बरोबर...

गीता: (रडणाऱ्या दिशाला जवळ घेऊन) शांत हो दिशू, काही नाही होणार तुला, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर...

गणेश: आणि आता तर श्रीधर ही आहेत आपल्या बरोबर.

दिशाला तिचे बाबा नक्की असं का बोलले त्याचा अंदाज येईना. तिने चमकून त्यांच्याकडे पाहिलं.

गीता: हो दिशू, श्रीधररावचं आहेत ते जे सगळ्यांसमोर तुझ्या बरोबर लग्न करायला हो म्हणाले.

श्रीधर: पण दिशा ही या लग्नाला तयार असेल तर...

गणेश: दिशू, तुला आता हे असं विचारणं कितपत योग्य मला नाही माहीत पण तुला लग्नासाठी श्रीधर पसंत आहेत का...? तिच्या बाबांचं बोलणं ऐकून तिने एकवार श्रीधरकडे पाहिलं. जणूकाही श्रीधरला ही तिच्या मनात काय चाललं आहे ते कळलं असावं तो लगेच म्हणाला, मला लग्नानंतर तू तुझं शिक्षण पूर्ण केलं तरी काही हरकत नाही आणि मला खात्री आहे की माझ्या फॅमिलीला ही त्याचा काही प्रॉब्लेम नसेल.

गीता: बघ दिशू, त्यांनी तुझ्या शिक्षणासाठी सुद्धा होकार दिला. तुला जर ते पसंत नसतील तर तसं सांग आपण हा विषय इथेच थांबवू.

दिशा: (हळूच मान खाली झुकवून म्हणाली) आईबाबा, मी श्रीधररावांबरोबर लग्नाला तयार आहे.... हे ऐकून तिघेही आनंदित झाले. दिशाने लाजून गीताच्या कुशीत स्वतःला लपवलं.

गणेश: पण श्रीधर, तुम्हाला तुमच्या घरी ही याबद्दल सांगायला हवं ना...? त्यांचा ही या लग्नाला होकार असायला हवा.

श्रीधर: माझ्या घरुन या लग्नाला कधीच नकार नसेल. पण काका मला एक विचारायचं होतं म्हणजे तुम्हाला माझ्या बद्दल फार काही माहिती नाही म्हणजे मी कोणाचा मुलगा आहे,  काय करतो, घरचे लोक कसे आहेत तरी तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलीचा हात माझ्या हातात द्यायला तयार कसे झालात...?

गणेश: (हसून) इतक्या वर्षात हे जे काही काळ्याचे पांढरे झाले ते उगाच नाही. तुझ्या डोळ्यात तुझा खरेपणा दिसून येतो. तू स्वतःहून येऊन आम्हाला वेळेला मदत केली. तू भले चार पैसे कमी ही कमवत असशील पण मला खात्री आहे माझ्या मुलीला तू राणी सारखं जपशील.

श्रीधर: काका, तरीही मला माझ्या बद्दल तुम्हाला खरं खरं सगळं सांगायचं आहे. तुम्ही प्रतापसिंह देशमुख हे नाव नक्कीच ऐकलं असेल...

गणेश: अरे त्यांना कोण नाही ओळखत त्यांचा खूप मोठा उद्योग आहे. त्यांना कधी पाहिलं नाही पण कित्येक वेळा त्यांच्याबद्दल, कंपनी बद्दल आणि त्यांच्या फॅमिली बद्दल काही ना काही येत असतं. (मग काहीसं आठवून) म्हणजे तू...

श्रीधर: हो काका, मी श्रीधर देशमुख, प्रतापसिंह देशमुख यांचा मोठा मुलगा...

गणेश, गीता दोघेही आ वासून एकमेकांना पाहू लागले.

गणेश: तुम्ही खूप मोठी माणसं आहात, आमच्या गरीबाकडून काही चूक वगैरे झाली असेल तर माफ करा.

श्रीधर: काका, काय बोलताय तुम्ही असं. आता मी तुमच्या मुला सारखाच आहे... आणि लवकरच दिशा पाटील दिशा श्रीधर देशमुख नाव जोडणार आहे. मी म्हणतो, मदनशेटने ठरवलेल्या मुहूर्तावरचं आपण हे लग्न इकडच्या शंकर मंदिरात करुया. त्याचं बोलणं ऐकून गीता-गणेश यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. दिशा लाजून आत पळाली.

***

संध्याकाळी गीता-गणेश आणि आजूबाजूच्या काही शेजाऱ्यांच्या उपस्थित श्रीधर-दिशा यांचा ठरलेल्या मुहूर्तावर विवाह संपन्न झाला आणि ती दिशा गणेश पाटीलची श्रेया श्रीधर देशमुख झाली. दुसऱ्याच दिवशी श्रीधरने त्याच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन झालेला प्रॉब्लेम solve केला आणि पुन्हा मदनशेटमुळे दिशाच्या आईवडिलांना काही त्रास होऊ नये म्हणून त्याने एका ब्रोकरशी संपर्क करुन त्यांच्यासाठी दुसऱ्या ठिकाणी फ्लॅट विकत घेऊन चाळीतील घर विकायला सांगितलं जेणेकरुन आजूबाजूच्या लोकांना ही पाटील फॅमिलीबद्दल काही माहिती कळता कामा नये. नवीन घरात आल्या आल्या त्याने त्याच्या कंपनीच्या वकिलाच्या ओळखीवरुन त्याचं मॅरेज सर्टिफिकेट बनवायला सांगितलं. आईबाबा, श्रीधर बरोबर दिशा उर्फ श्रेयाला आता आकाश ठेंगण झालं होतं. काही दिवस आईबाबाबरोबर राहून आणि मुंबईच्या ऑफिस मधली सगळी कामे व्यवस्थित पार पाडत श्रीधर-श्रेया ट्रेनने पुण्याला त्यांच्या घरी जायला निघाले.

क्रमशः

(इंदुमती श्रीधरला जिवंत आणि लग्न करुन आलेलं पाहून पुढचं पाऊल काय उचलेल. शरद ही यापुढच्या कटात इंदुमती बरोबर सामिल होईल का...? श्रीधर तो मेसेज केव्हा वाचेल आणि श्रेया-श्रीधर यातून कसे बाहेर पडतील जाणून घ्यायला विसरु नका वाचायला अस्तित्व एक संघर्ष पर्व-२ अबोल प्रीत मध्ये)

🎭 Series Post

View all