Feb 26, 2024
नारीवादी

अवास्तव अपेक्षा - २

Read Later
अवास्तव अपेक्षा - २
पुढच्या आठवड्यात प्रांजलीच्या नणंदेची मोठी मुलगी काव्या तिच्याकडे रहायला येणार होती. काव्यासाठी स्थळ बघणे चालूच होते. सुशांतला लहानपणापासून ओळखत असल्यामुळे तो आपल्या काव्यासाठी अगदी सुयोग्य आहे , ती तिथे सुखाने संसार करेल असा विश्वास प्रांजलीला होता.आज सुशांतचे आईबाबा अनुराधाकडे येणार होते. म्हणूनच प्रांजली तिच्या नवऱ्यासोबत अनुराधाकडे चालली होती . ती आली तेव्हा अनुराधा , मृणाल( सुशांत ची आई) , केदार (सुशांतचे बाबा)आणि सुधाकर (अनुराधाचा नवरा) गप्पा मारत बसले होते . आतून काव्याचं नाव ऐकून प्रांजली दारातच थबकली. दरवाजा उघडा असल्यामुळे त्यांचं बोलणं बाहेरपर्यंत व्यवस्थित ऐकू येत होतं .

" मृणाल , अगं आता सुशांतच्या लग्नाचं आता बघायला हवं . नाही म्हणजे वेळेवर लग्न झालेलं बरं असतं. हो ना ?" अनुराधा म्हणाली . "अगदी बरोबर बोललात वहिनी. आमच्याही मनात तेच आहे. नाही म्हणजे त्याविषयीच बोलायला आम्ही दोघं इथं आलो आहोत, " केदार म्हणाला. " अरे वा ! म्हणजे एखादं स्थळ आलेलं दिसतंय सुशांतला . कधी जायचयं बघायला ? की तेच येणार आहेत तुमच्या घरी ?" , सुधाकर म्हणाला. " नाही ओ भावजी ! स्थळ आलेलं नाही , पण ... " मृणाल अडखळत बोलली . " काय गं ? काय झालं ? अशी अडखळत काय बोलतेस ? सगळं ठीक आहे ना ?" , सुधाकरनी विचारलं. "आपल्या सुशांतला एखादी मुलगी आवडते का ? तसं असेल तर काही हरकत नाही . अगं माझ्या धाकट्या मुलाचंही लव्हमॅरेजच आहे की ! त्यात काय एवढं ? तू नको काळजी करुस, " अनुराधा हसतच म्हणाली . " नाही नाही वहिनी , तुम्ही म्हणताय तसं काहीच नाहीये. खरं तर आपल्या सगळ्यांच्याच माहितीतली एक मुलगी आहे. तिचा आम्ही सुशांतसाठी विचार करतोय," मृणालने सांगितलं . " आपल्या माहितीतली मुलगी? कोण गं ? " अनुराधाने विचारले. " तुमची खास मैत्रीण आहे ना प्रांजली , तिची लाडकी भाची काव्या ! आपण लहानपणासूनच ओळखतो तिला . अगदी गोड आहे मुलगी ," केदार उत्तरला . "हो ना ! अगदी लाघवी पोरं आहे . स्वयंपाक उत्तम करते, व्यवहार चातुर्य आहे , दिसायला सुंदर आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या माहितीतली आहे . तुम्हाला काय वाटतं भावजी ? वहिनी आपण विचार करुया ना तिचा?" मृणालने विचारले . "मला तर मुलगी पसंत आहे . ती जर आपल्या घरची सून झाली तर बरंच होईल . हो ना अनुराधा?" सुधाकरने आनंदीत होऊन विचारलं. अनुराधा काही बोलणार तेवढ्यात " आम्हालाही जावई पसंत आहे," असं म्हणत प्रांजली आत आली. " सॉरी हां अनु , मी तुमचं बोलणं बाहेर थांबून ऐकलं . पण काय करू , काव्याचं नाव ऐकलं आणि म्हणलं बघावं तरी काय म्हणत आहेत हे सगळे ! आता वाटतय बरंच झालं ! आम्ही खरं तर याचविषयी बोलायला आम्ही दोघं आलो होतो . काव्या आणि तिच्या घरच्यांनाही सुशांत पसंत आहे. सुशांतकडेही अशीच परिस्थिती दिसतीये ," प्रांजली उत्साहित होऊन म्हणाली. " अगं हो हो, जरा श्वास तरी घे . किती तो उत्साह ! जरा बस तरी ," प्रांजलीचा नवरा शेखर हसत हसत म्हणाला.

"हा उत्साह किमान लग्न होईपर्यंत असाच राहणार , हो ना प्रांजली वहिनी ?'' सुधाकरही हसत म्हणाला. " म्हणजे काय भावजी ! आता मी आणि अनु विहीणी होणार एकमेकींच्या , मी तर किsssती खूष झाले आहे म्हणून सांगू ...." असं म्हणत तिने अनुराधाला घट्ट मिठी मारली. पण अनुराधा मात्र तशीच उभी होती. तिच्या चेहर्‍यावर किंचित आठी उमटली होती. बाकी कोणाच्या नाही , तरी सुधाकरच्या मात्र ते बरोबर लक्षात आलं. याविषयी तिच्याशी नंतर बोलायचं ठरवून तो तिला म्हणाला , "अशी बघत काय उभी राहिलीस ? तोंड गोड कर सगळ्यांचं . आमची अनु पण ना , एवढी आनंदाची बातमी ऐकली आणि तिला काही सुचेनासं झालंय ." ती मात्र काहीशा अनिच्छेनेच आत गेली. " वहिनी तुम्ही आधी बसा बरं ! शेखर काव्याच्या वडिलांना व्हिडीओ कॉल कर. आपण काही गोष्टींची बोलणी आत्ताच करूयात , " सुधाकर म्हणाला.

" अनुsss अगं किती वेळ झाला तुला आत जाऊन ? येताना जरा देवापुढे पण साखर ठेवून ये. पुढच्या आठवड्यात काव्यासोबत तिची फॅमिली पण इकडे येत आहे . मग सगळी बोलणी करूनच टाकूयात ," प्रांजली उत्साहित होऊन म्हणाली. " ही बघा आलीच , काय अनु किती वेळ ? असो, आधी ते लाडू दे बघू सगळ्यांना," नुकत्याच बाहेर आलेल्या अनुराधाला सुधाकर म्हणाला. " हो हो , देते ना ! हे घ्या भावजी ! " काहीशा नाराजीनेच अनुराधाने सगळ्यांना लाडू दिले.

" केदार , आपण हे सगळं ठरवतोय , पण ज्याच्यासाठी ठरवतोय त्याला मान्य आहे का हे सगळं? सुशांतला आमची काव्या पसंत आहे का? " शेखरने विचारले. " खरं तर याविषयावर अजून आमचं सुशांतशी बोलणं झालं नाही. पण तो आणि काव्या दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. सोशल मिडीयामुळे दोघं एकमेकांच्या संपर्कात आहेत. सुशांतच्या बायकोकडून ज्या अपेक्षा आहेत, त्यामध्ये ती अगदी फिट्ट बसते जसं की, उच्चशिक्षित , चांगल्या पगाराची नोकरी असणारी , उत्तम स्वयंपाक करणारी, घरातले आणि बाहेरचे दोन्ही व्यवहार सांभळणारी , लांब केस असणारी, फार जाडही नाही की फार बारीकही नाही , गोरीपान , देखणी ,सुंदर रांगोळी काढणारी , इत्यादी इत्यादी ! ती तर या सगळ्यात एक्सपर्ट आहे . याच्याशी याविषयावर घरी गेल्यावर बोलू . तो काय आमच्या शब्दाबाहेर नाही ," केदारने शेखरला आश्वस्त केले. "चला मग तर प्रश्नच मिटला , " प्रांजली म्हणाली.

" हॅलो ! बोला ना सर! तुम्ही घरी आलात का? दोनच मिनिटांत येतो , प्राजू माझे काही कलिग्स आलेत आपल्या घरी ! चल आपण निघूया . केदार , मृणाल वहिनी मी संध्याकाळी काव्याच्या बाबांशी बोलून बाकीच्या डिटेल्स तुम्हाला कळवतो," असं म्हणत घाईघाईने प्रांजली आणि शेखर घराबाहेर पडले.

ती दोघं गेल्याची खात्री करुन सुधाकरनी अनुराधाला चांगलंच फैलावर घेतलं . " काय चाललंय तुझं अनु ? सुशांतच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा किती खूष होतीस , पण काव्याचं नाव निघाल्यापासून तुझा चेहरा पडलाय . तुला ती पसंत नाही का सून म्हणून? तुझ्या मनात दुसरी कोणती मुलगी आहे का ? " "नाही ! दुसरी कोणती मुलगी नाही माझ्या मनात , पण काव्या नको सुशांतसाठी , " अनुराधा उत्तरली . "का हो वहिनी ? काव्या तर तुमची लाडकी आहे ना? दरवेळेला प्रांजली वहिनींकडे आली की तुमच्याकडे आल्याशिवाय जात नाही. तुम्ही सुद्धा तिचं किती कौतुक करत असता! मग ती सून म्हणून का नको ? " केदारने आश्चर्यचकित होऊन विचारले. "वहिनी तिच्यात काही प्रॉब्लेम आहे का? आणि तसं असेल तर तो दूर करण्याचा काही उपाय मिळते का तेही पाहूया. पण काव्या किती चांगली मुलगी आहे ! तुम्हाला काही माहिती आहे का तिच्याविषयी जे आम्हाला माहित नाही ? आणि म्हणूनच तुम्ही नकार देत आहात ?" मृणालने विचारलं. " नाही , मी जरा स्पष्टच बोलते. काव्या तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे . ते दोघं आत्ता धडधाकट आहेत , म्हणून ठिक आहे . पण पुढे जाऊन काव्यालाच त्यांच्याकडे बघायला लागणार. न जाणो उद्या काही बरेवाईट झालं तर सगळी जबाबदारी तिच्यावरच येणार. ती त्या दोघांना कायमची तुमच्या घरी घेऊन आली तर , आयुष्यभर सांभाळणार आहात का त्यांना? " अनुराधा म्हणाली.

" काहीही काय बोलतेस गं ? तुझ्या जिभेला काही हाड आहे का ?" तिचं बोलणं ऐकून सुधाकर उसळून म्हणाला. "अहो भावजी , बरोबर बोलत आहेत वहिनी ! आम्ही या गोष्टीचा विचारच केला नव्हता . केदार तुम्हाला काय वाटतं?" मृणालने विचारलं. " मला पण हे पटतंय. दादा तू पण नीट विचार . अरे आमच्या घरापासून तिचं माहेर तासाभराच्या अंतरावर आहे. त्यामुळे तिचं तिकडे सारखं जाणं-येणं होईलच . मग घरात कधी लक्ष देणार ? आमच्याकडे तर ती बघणारही नाही . आधीच मृणालचे गुडघे दुखतात , जास्त वेळ उभं राहिलं की तिला त्रास होतो. ती सतत माहेरी गेली, तर सगळी कामं हिला करावी लागतील. सुशांत आमचा एकुलता एक मुलगा आहे . त्याच्यावर आमची जबाबदारी आहे. लग्न झाल्यावर बायको आणि पुढे जाऊन मुलाबाळांचीही जबाबदारी त्याच्यावर येईल. त्यात तिच्या आईवडिलांची पण जबाबदारी घ्यायची , कसं शक्य होईल ? काही नको , आपण काव्याच्या बाबांना नकार कळवून टाकूया ," केदार म्हणाला. " अरे काय बडबडताय तुम्ही सगळे ? डोकी ठिकाणावर आहेत का तुमची ? दहा मिनिटांपूर्वी ज्या मुलीचं कौतुक करताना तुम्ही थकत नव्हतात , त्याच मुलीला असल्या फडतूस कारणावरुन नकार देताय ? काय उत्तर देणार आहात तिच्या घरच्यांना ? अनु , अगं तू एवढी शिकली सावरलेली असूनही ह्या गोष्टी तुझ्या डोक्यात येतातच कशा?" सुधाकरने चिडून विचारले.

"अहो , तुम्ही जरा थांबा . तुम्हाला यातलं काहीच कळत नाही . तुम्ही नका मध्ये पडू आणि राहता राहिला प्रश्न काव्याच्य घरच्यांचा , तर त्यांना सांगू की सुशांतला ती बायको म्हणून आवडली नाही . तो तिला फक्त मैत्रिण मानतो. नाहीतर बहिणच मानतो असं सांगूया , म्हणजे प्रश्नच सुटेल. असच मी उद्या प्राजूला सांगते आणि सॉरी पण म्हणून टाकते . फार फार तर दोन-चार दिवस चिडेल , अबोला धरेल पण नंतर मात्र बोलेल . ती माझ्यावर फार वेळ रुसून बसू शकत नाही," असं म्हणून अनुराधा मागे वळली.

" प्राजू तू ? इथे कशी काय ? न... नाही म्हणजे, ते.... तू ," मागे उभ्या असलेल्या प्रांजलीला बघून अनुराधा चांगलीच सटपटली . तिने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना ह्या विचाराने तिला घाम फुटला . " खरं तर मी तुझे आभार मानायला आले होते. कारण; तुझ्यामुळे आमच्या काव्याला सुशांतसारखा इतका छान जोडीदार मिळाला . पण , तुझं बोलणं ऐकलं आणि ..... असो ! परमेश्वराची कृपा म्हणून तुझे हे असले गलिच्छ विचार वेळेत कळले . अगं प्राध्यापिका आहेस ना तू ! कित्येक मुलांचं भविष्य घडवलं आहेस. मग तुझ्या मनात माझ्या काव्याचं भविष्य असं उध्वस्त करण्याचा विचार तरी कसा आला ? या एवढ्याशा फडतूस कारणामुळे तू त्या सोन्यासारख्या मुलीला नाकारतेस ? लाज वाटायला पाहिजे तुला ! " संतापून प्रांजली म्हणाली. "प्राजू, अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय . माझ्या म्हणण्याचा चुकिचा अर्थ घेतेयेस तू ," अनुराधा म्हणाली. "हो , माझा गैरसमज झाला होता. काव्या माझी फक्त भाची नाही तर लेक मानते मी तिला . माझ्या बेस्ट फ्रेंडच्या भरोशावर मी माझ्या लेकिचं लग्न लावून देणार होते. पण तू तर... शीssss ," प्रांजलीला हे सगळं सहन होत नव्हतं .

"लेक आहे ना ती तुझी ? मग तुझ्या लेकीच्यासुद्धा काहीतरी अपेक्षा असतील ना होणाऱ्या नवऱ्याकडून ? त्यात ती आजच्या काळातली मुलगी आहे . हल्लीच्या मुली त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याकडून किती अपेक्षा ठेवतात ! तशीच ही आमची अपेक्षा आहे होणाऱ्या सुनेबद्दल! की मुलगा आहे म्हणून एखादी छोटीशी अपेक्षा सुध्दा ठेवायची नाही आम्ही? " अनुराधाने विचारले. " माणसाने अपेक्षा ठेवावी गं , पण ती वास्तविक असावी. अवाजवी अपेक्षा काय कामाची ? तू ह्याला छोटीशी अपेक्षा म्हणतेस , मग मगाशी तुझ्या जावेने वाचलेला अपेक्षांचा पाढा कुठे गेला ? की त्या वरपक्षाच्या अपेक्षा नव्हत्या ? आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी स्वतःकडे बघ आणि मगच बोल. निघते मी .आणि हो , सुशांत आमच्या काव्याला नाही तर काव्याच त्याला नकार देतीये," डोळ्यातलं पाणी अडवत प्रांजली घरी निघून गेली.


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//