Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

अनाकलनीय

Read Later
अनाकलनीय

कथेचे नाव:- अनाकलनीय
विषय:- स्त्रीला समजून घेणं खरंच कठिण असतं का ओ?
फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

लग्नानंतर सहा महिन्यांनी माहेरी आलेल्या वसुधाची भांडणाच्या आवाजाने झोपमोड झाली तशी ती डोळे चोळत बेडवर उठून बसली आणि गालातल्या गालात हसू लागली.

‘माझ्या लग्नानंतरही इथे काही बदलेलं नाहीच. आई-बाबांची भांडणं कधी संपणार देव जाणो. यांच्या कुरबुरीचा आजचा विषय काय ते बाहेर जाऊन पहावंच लागेल.’- मनाशी बोलत वसुधा बाहेर आली होती.

‘मी काय म्हणते, तुम्हाला जर आज डब्यात फक्त चपात्याच हव्या होत्या तर तुम्ही मला काल झोपण्यापूर्वीच तसं का नाही सांगितलं? का सांगाल? लग्न करून मोलकरीण आणली आहात न. मग काय ती सकाळी लवकर उठून कितीही राबो, तिची कितीही एनर्जी वाया जावो, आपल्याला काय त्याच? नाही का? आता हा भात कोणी खावा? काल रात्रीही असेच नखरे केलेत आणि भात खाल्ला नाहीत. तो आधीच माझ्या गळ्यात पडला आहे आणि आता हा उरलेला भात पण मीच रात्री खायचा. म्हणजे घरचं शिळं अन्न खाण्याचे भोग काय मीच भोगायचे आहेत का?’- शांती म्हणजे वसुधाची आई तावातावाने नवऱ्याशी भांडत होती.

‘ऐकलं का जिव्हाकाकू? ऐकलं न, तुमचे लाड करायला गेलो तर किती ऐकवते ही बाई. तरी आल्या आल्या यांना प्रामाणिकपणे सांगितलं होतं की पाऊस पडत होता, छान माहोल बनला होता त्यामुळे मित्रांसोबत वडापाव हादडले आणि पोटोबा रुसले. आता त्याला आम्हीं काय करावं?’-  शशांक वातावरण हलके करण्यासाठी जीभ आणि पोटाकडे बोट दाखवत, शक्य तितके विनोदी अंगविक्षेप करण्याचा प्रयत्न करत होता.

‘हि विदूषकी नाटकी ऑफिसमध्ये बॉससमोर करा, माझ्यासमोर नको. म्हणे माहोल बनला होता. चोचले तुमच्या जीभेचे आणि भोगायचं मी? जा आवरा तुमची काम नाहीतर त्यासाठीपण मलाच यावं लागेल. पोरीच लग्न झालं पण हा माणूस कधी सुधारणार कोणाला माहिती?’- वसुधा किचनमध्ये काम करता करता घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावरून उपडा हात फिरवत पुटपुटली.

‘या बाईच फक्त नावच शांती आहे. बाकी स्वभावात सगळी अशांतीच भरली आहे.’- शशांक बाहेर पडताना टोमणा मारूनच निघाला.

‘काय बोललात? जरा मोठ्याने बोला न.’- शांतीने न राहवून आवाज दिलाच.

‘काही नाही. तू तुझं काम कर. मी माझ्या तयारीला जातो.’- जाता जाता सवयीप्रमाणे शशांकने खांद्यावरचा टॉवेल हॉलमध्ये भिरकावला होता.  लागलीच किचनमध्ये गॅसपेक्षा शांतीच्या रागाचाच भडका मोठा उडाला होता. 

इतके वर्षे आई- वडिलांच्या कुरबुरी पाहून वसुधाला झाला प्रकार लक्षात आला तशी ती वडिलांच्या मागे निघाली.

‘जा.. जा, पापा की परी जा.. बाबांच्याच मागे मागे करा. आई इतके किचनमध्ये मरमर करतेय तर तिच्याशी कधी बोलावसं वाटत नाही न तुला?’- नवऱ्यावरून शांतीची गाडी लेकीवर घसरली होती.

‘मला दोन दिवस दे आई. तुझी मनस्थिती मला आता कुठे चांगली उमगली आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला सगळं सुरळीत करून देते.’- आईच्या कपाळावरचा घाम आपल्या ओढणीने अलगद पुसत वसुधा उद्गारली तसं शांतीने तिच्याकडे चमकून पाहिलं.

‘तू काय करणार? इतक्या वर्षांत हा माणूस कधी सुधारला नाही तर दोन दिवसांत काय कप्पाळ सुधरेल? मी होती म्हणून इतकी वर्षे टिकून आहे. दुसरी कोणी असती ना तर..’- शांतीची बडबड चालूच होती पण वसुधा त्याआधीच किचनमधून बाहेर पडली होती.

‘गेली पण मेली. काय बडबडून गेली तेही डोक्यात शिरलं नाही. जळलं माझी कोणाला किंमतच नाही. दोन दिवसांत काय एवढे दिवे लावते ते पाहते ना आता.’- शांतीचा पारा काही खाली उतरायचा नाव घेत नव्हता.

‘बघितलं? तुझी आई कशी वागते? तिला कायमच माझ्यावर चिडायला आवडतं. तिला माझी काही काळजी नाहीच’- शशांक वसुधाला समोर पाहून बोलत होता.

'बाबा, काही विचारू का? तुम्हाला थोडा उशीर झालेला चालणार असेल तर?'- वसुधाने वडिलांना शांत स्वरात विचारलं.

'हा बोल ना बेटा. तुला कधीपासून माझ्या परवानगीची गरज लागायला लागली?'- लेकीच्या डोक्यावर हलकी टपली मारत शशांक उत्तरला.

‘बाबा, आईला मागच्या वेळी कधी फिरायला घेऊन गेला होतात? फक्त ती आणि तुम्हीच!’- वसुधाने शांतपणे वडिलांना विचारलं.

‘म्हणजे? असं का विचारतेस? तसं तर त्याला खूप दिवस झाले असतील.’- शशांकने डोकं खाजवत उत्तर दिलं.

‘खूप दिवस? कदाचित खूप वर्षेही झाली असतील ना?’- वसुधा.

‘हो. ऍकच्युअली!’- शशांकने वास्तव मान्य केलं होतं.

‘तिला आय लव्ह यु असं म्हटल्याचे कधी आठवतंय?’- वसुधा

‘नाही.. मिन्स मागचे पंधरा-वीस वर्षे तर नाहीच. पण तसं तिनेही इतक्या वर्षांत कधी म्हटलं नाहीये.’- शशांक शक्य तितका प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू लागला होता.

‘पण मी तुमचं विचारतेय तर तुमच्याबद्दलच बोला.’- वसुधा शांतपणे बोलत होती.

‘आज हा रॅपिड राऊंड का पण?’- शशांक उसनं अवसान आणत बोलला.

‘ती दिवसभर घरातच असते. अगदी एकटीच. मला आठवतं की माझ्या लग्नाआधीही आपण कामावरून घरी आल्यावर आपापल्या मोबाईलमध्ये बिझी होऊन जायचो नाहीतर टीव्ही पाहत बसायचो. ती अधूनमधून उत्सुकतेने टिव्ही पहायला यायची तेव्हा आपण तिच्यावरच खेसकायचो. पटापट काम आवरत जा आणि हवा तेवढा टीव्ही बघ म्हणून सुनवायचो. आधी ती निमूटपणे मान खाली घालुन जायची पण हळूहळू तीही धुसफूस करायला लागलीच होती. मला खात्री आहे की अजूनही हे असं चालूच असेल? बरोबर ना, बाबा?’- प्रश्न विचारता विचारता वसुधाच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या झाल्या होत्या.

‘हो. चालू तर तसंच आहे. पण ती अशी का वागत असेल? आजकल तर कशावरूनही चिडचिड करते. काहीच कळेनासं झालंय मला.- शशांक स्वर चिंतित झाला होता.

‘कारण तिला कळलंय की आपण तिला गृहीत धरतोय. तिच अस्तित्व, तिची स्वतःची अशी वेगळी स्पेस आपण ठेवलीच नाहीये.’- वसुधा एक एक मुद्दा मांडत होती.

‘म्हणजे? म..मला कळलं नाही.’- शशांक चाचपडू लागला होता.

‘तुमचे अडखळते शब्दच सांगत आहेत की तुम्हांला मी काय म्हणतेय ते अचूक कळतंय पण नेमका पुरुषी अहंकार आड येतोय आणि तुम्ही स्वतःला अनभिज्ञ दाखवताय.’- वसुधा हलकं स्मित करत बोलली.

‘खरंतर मी एवढा विचार कधीच केला नाही ग.’- शशांकला वसुधाच्या बोलण्याचा रोख हळूहळू कळू लागला होता.

‘हेच. तुम्ही तिचा कधी विचार केला नाहीत याचाच तिला राग आहे. मलाही तिची आधी कदर नव्हती. पण या सगळ्या गोष्टी कधी जाणवतात सांगू? लग्नानंतर जेव्हा इतरांना गरमागरम जेवण करून दिल्यावर स्वतः वर मात्र थंडगार जेवायची वेळ येते तेव्हा जाणवतं. लोक हॉलमध्ये खिदळत असतात, हसत असतात पण मी कुकुरच्या शिट्या एकटीने मोजत असते तेव्हा जाणवतं. दिवसभर ऑफिसमध्ये बैठे काम करूनही थकणाऱ्या नवऱ्याने घरात वस्तू किंवा कपडे अस्तव्यस्त करावेत पण ऑफिस, घर सांभाळूनही मला ते सर्व जागेवर ठेवावे लागताना आईची मनस्थिती जाणवली. रविवार तुमच्यासाठी सुट्टीचा दिवस पण आमच्यासाठी तुमच्या संडे स्पेशल फर्मायशी पुर्ण करायचा दिवस. मला सांगा बाबा, बाई कधी थकतच नसेल का ओ?’- वसुधाचा कंठ भरून आला तशी ती बोलायची थांबली.

‘मला कळलं बेटा, तुला नेमकं काय म्हणायचंय ते.’- शशांक लेकीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला.

‘आणि तिला तुमची पक्की काळजी आहे बरं. खोटं वाटतं तर आज पोटात दुखतं म्हणून ऑफिस जाणं रद्द करा.’- वसुधा भरलेले डोळे पुसत, हसून बोलली.

‘असं म्हणतेस? चल हे ही करून पाहूया.’- शशांक अंगावरील ऑफिसचे कपडे उतरवत म्हटला.

‘हे काय? आता उशीर होत नाहीये का? पोरगी रहायलाच आली आहे, लगेच पळून जाणार नाहीये ती. वेळेर निघा, पावसाचे दिवस आहेत नाहीतर परत उशीर झाला म्हणून पळापळ करत बसाल.’- वसुधाची बडबड सुरूच होती.

‘आई, बाबांच्या पोटात दुखतंय म्हणून आज ते ऑफिसला जाणार नाहीत.’- शशांकच्या आधी वसुधानेच बोलून टाकलं.

‘काय? असं कसं पोटात दुखेल? हा, कालचे वडापाव बाधले असणार बघा नक्की. थांबा मी औषध घेऊन येते. गरम पाणी आणू का? जास्त दुखतंय का?’- नुसत्या विचाराने सैरभैर झालेली शांती प्रश्नांच्या फैरी झाडणे मात्र काही थांबवत नव्हती.

‘ऐक ना, एवढं काही फार दुखत नाहीये. आपण दोघे दुपारी  डॉक्टरकडे जाऊन येऊ. तू माझी बॉडीगार्ड म्हणून सोबत चल. येशील न?’- आपल्याप्रतीची तिची काळजी पाहत सुखवलेल्या शशांकने तिचा हात धरून विचारलं.

‘अंम.. मी? मी.. कशाला? बरं येते.’- गडबडीत शांतीने होकार दिला होता.

वसुधाकडून काही टिप्स घेऊन शशांक शांतीला घेऊन बाहेर पडला होता तोच मुळात एका नव्या सुरुवातीच्या उद्देशाने.

 संध्याकाळी दोघांना परतताना अंमळ उशीरच झाला होता. शांती नाही नाही म्हणताना शशांकने तिला चौपाटीवर नेलं होतं. आजच्या नाटकाचं सत्य त्याने तिच्या कानावर टाकलं तशी तीही खुलली होती. खूप वर्षानी दोघांना एकमेकांबद्दलची ओढ नव्याने जाणवू लागली होती. दोघे घरी येईपर्यंत वसुधाने जेवण तयार करून ठेवलं होतं.

हातपाय धुवून झाल्यावर शशांकने सवयीप्रमाणे आजही ओला टॉवेल सोफ्यावर टाकला होताच पण आज त्याला कसलीच चिडचिड ऐकू आली नव्हती. त्याने चमकून बायकोकडे पाहिलं तर ती गालातल्या गालात हसत उभी होती. जणूकाही हा कधी सुधारणार नाहीच या विचारात.

सरतेशेवटी नवी सुरुवात म्हणून त्याने तो ओला टॉवेल उचलला अन बाजूलाच बसलेल्या लेकीकडे पाहत त्याने विचारलं-‘ काय ग, स्रियांना समजणं एवढं अवघड असतं का?’.

‘एवढंही अवघड नसतं बाबा. त्यांनाही माणूस समजून वागवलं तर त्यांच्या एवढं प्रेम तुम्हांला इतर कोणीच देणार नाही. त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट तेवढा होऊन देऊच नये, बाकी तुम्हीं सुज्ञ आहातच.’- वसुधा हसता हसता बोलली.


समाप्त
©मयुरेश तांबे
जिल्हा - रायगड - रत्नागिरी

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..

//