तिच्या सकारात्मकतेने तिने परिस्थितीवर केलेली मात - समाप्त

I am an academician by profession. I have keen interest in reading. I have deep concern for underprivileged people and I want to do something for unprivileged people. I love to live life fully.

मी मध्ये अनु च्या घरी गेले होते. तिची वही होती समोर, सहज उघडून पाहिलं, तर तिचं अक्षर जसं शाळेत होतं तसंच अगदी. मी म्हटलं, अनुला माझ्या वहीवर नाव घालून द्यायचीस तसंच अक्षर अजूनही. माझं तर सारखं बदलत राहत. वयानुसार माणसं बदलतात, पण आमची अनु तशीच राहिली. तिचं भावविश्व बदललं नव्हतं. दुसऱ्याच्या सुखदुःखाशी समरस होणं, तिला सहज जमतं. तिच्या रॉक्सी ला इन्फेक्शन व्हायचं तर सगळे सांगायचे, त्याच्या जवळ जाऊ नकोस. पण ही त्याच्या बाजूला बसून अभ्यास करायची. आजारपणात त्याला एकटं वाटायला नको. आणि आपल्याला काही होईल, या भीतीने जो जीव आता त्रासात आहे, त्याला एकटं सोडण कधीच तिला पटलं नाही. रॉक्सी वर तिचं इतकं प्रेम की ती म्हणते, त्याच्या आठवणी कुणाच्याही सहवासा पेक्षाही सुखद आहेत. ती म्हणते, निःस्वार्थी प्रेम आणि निखळ आनंद काय असतो, हे त्याच्यामुळे कळलं मला. पण तिच्या हक्काचा आनंद तिला मिळाला नाही. ती म्हणते, माझ्या प्रत्येक यशाला पण वेदनेची किनार आहे. अनु बी. एस्सी. ला मेरीट लिस्ट मध्ये आली होती. पण ते वर्ष तिने कसं काढलं तिचं तिला माहित.. कधी कधी आठवडाभर पण ती पुस्तक बघू शकत नव्हती. पण तरीही तिच्या ज्या विभागप्रमुख होत्या, त्यांचा पूर्ण विश्वास होता तिच्या क्षमतेवर. आणि तिने तो सार्थकी ठरवला. दुसऱ्या वर्षी तिला जो धक्का बसला होता, त्यातून तिचं मन उद्विग्न झालं होतं. आपल्याला यश असंच हुलकावणी देणार, असं तिला वाटायला लागलं होतं. ती एका इंटरव्ह्यू ला गेली होती, शेवटचा प्रश्न तिला असा विचारला गेला की , सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देऊनही तुझ्या चेहऱ्यावर आनंद का नाही! त्यात तुझं अकॅडमिक रेकॉर्ड इतकं छान आहे. तू आनंदी असलं पाहिजेस. तर ती म्हणाली, यशापर्यंत जाण्याचा प्रवास मला जगता नाही आला. तर ते म्हणाले, तू आता हा सगळा विचार करू नकोस. यू हॅव रिच द डेस्टिनेशन. तिचं दुःख असं होतं की एखाद्याला एका नजरेत कळेल नाहीतर जन्मभर कळणार नाही. एम. एससी. ला ही मुलगी लेक्चर्सना न येता एवढा अचूक पेपर कसा लिहिते हा प्राध्यापकां साठी कौतुकाचा आणि वर्ग मित्रांसाठी निंदेचा विषय होता. मुलाखतकारांसाठी तिचं यश अभूतपूर्व होतं. पण ह्या सगळ्यात अनु कुठेच खुश नव्हती. ती म्हणायची, मला पेपर लिहिताना इतक्या वेदना व्हायच्या की मी फक्त ते तीन तास संपायची वाट बघायचे. त्यानंतर मी जाऊन पाठ टेकू शकते. आणि स्वतःल बस थोडाच वेळ सहन करायचंय, असं सांगत पेपर लिहायचे. ती म्हणते, की पेपर जेव्हा तुम्ही पर्यवेक्ष काच्या हातात देता, तेव्हाच तुम्हाला निकाल कळलेला असतो. त्यावेळेस जे एक फिलिंग येतं त्यावरून. आपलं काय चुकलं, हे तिला दुसऱ्याने सांगण्याची गरज कधी पडली नाही.
एवढं सहन करूनही अनु म्हणते, दुःख वाईट नसतं, दुःखाची होणारी अवहेलना वाईट असते. ती म्हणते, मला आयुष्यात सगळ्यात वाईट तेव्हा वाटतं, जेव्हा कोणीतरी ताप वगैरे कुठल्यातरी आजारातून बरं होऊन येतं आणि लोक लगेच त्याची काळजी करतात..आणि बाजूला मला त्याच्या कितीतरी पटीने वेदना होत असून माझी दखल पण घेत नाहीत. तसंही माझ्या हक्काच्या गोष्टी कधी मला मिळाल्या नाहीत. आता कोरोना व्हायरस मुळे लोकांना बाहेर जाता येत नाही, तर लगेच फ्रस्ट्रेशन आलं त्यांना. पण मी इतकी वर्षं घरात बंद आहे, याचं कधी कोणाला वाईट वाटलं नाही. ती म्हणाली, मी शिवाजी पार्क एरिया आता माझ्या मैत्रिणीच्या लग्नाच्या वेळी पाहिला, मुंबईत इतकी वर्षं राहून. तरी मला एखादी गोष्ट मिळाली की लोक येऊन म्हणतात, तुझं बरं आहे. मी तर कधी लोकांना जाऊन म्हणत नाही, तुम्ही सगळीकडे फिरत असता, मी तर घरातच असते. कॉलेज सोडून मी कुठेच जात नाही. किंवा तुम्ही वेदनारहित आयुष्य जगता.. मला तर प्रत्येक गोष्ट करणं एक आव्हान असतं. जर तिला चुकून एखाद्या कामात सूट दिली, तर सगळ्यांची टीका. पण ते एक दिवस आजारी असले तरी आराम करतात आणि माझं रोज दुखत असून पण मी काम करते. म्हणजे त्यांची आजारात काम करण्याची probability ० च्या जवळ आहे तर माझी १ च्या.तिची एक मैत्रीण होती. अनु बी.एससी. ला मेरीट लिस्ट मध्ये आल्यावर म्हणते, ठीक आहे, तुला असेल त्रास पण तुझ्या महत्त्वाकांक्षा तर पूर्ण होतात. अरे पण ते करता करता तिचा जीव जातो त्याचं काय! आणि खरंच अनुच्या potential इतकं तिला काम करता येतं का? आय. ए.एस. परीक्षेला बसण्याची तिची इच्छा पूर्ण झाली नाही. खाण्यापिण्याच्या इच्छा तर किती माराव्या लागतात, याची गणतीच नाही. आणि दुखण्यामध्ये काम करणं किती torturous असत! पण हे लोक एवढा विचार का करतील? तशीही काहीही सारासार विचार न करता वक्तव्यं करण्याची सवयच असते त्यांना. ती म्हणते, विश्वासघाताइतकच अपेक्षाभंगाचे दुःख मोठं असतं. ती म्हणते, मी आजारी आहे म्हणून आजपर्यंत कोणी मला भेटायला आलं नाही. माझं दुखणं सुरू झाल्याासून माझी काळजी करणं दूर.. लोकांनी मला तत्वज्ञान शिकवायला सुरुवात केली. किती जणांच्या मते ते फक्त मानसिक होतं. पण या प्रवासात अशी काही लोक होती, पाठ थोपटणारी. ती म्हणते, फक्त मोरल सपोर्टवर माणूस खूप पुढे जाऊ शकतो. आणि समजा वण्यापेक्षा समजून घेणं महत्त्वाचं असतं.
जीवनाचं तत्वज्ञान अनुप्रीता ला खूप लहान वयात कळलं. तिच्या यशापेक्षा सुद्धा तिचं या परिस्थितीत हसतमुख राहणं आणि जगण्याचा आस्वाद घेत राहणं मला जास्त प्रेरणादायी वाटतं. ती इतकी प्रांजळ आहे, म्हणते, लहानपणी ते तीनच हीरो फेमस होते. शाहरुख खान, सलमान खान, अमीर खान. मला वाटायचं, ह्यांना नावाने कशी हाक मारायची. किती मोठे आहेत ते. मग मी प्रत्येकाच्या नावापुढे दादा, लावायचे. मग मला सगळे म्हणायचे, मग दिलीपकुमारला तर तू आजोबा म्हटलं पाहिजेस. ती विचार करायची, पण नाही , तो दिलीपकुमारच. आमच्या अनु च पहिलं प्रेम ना. अनुचा  देवावर कितीही राग आला असला तरी ती म्हणते, १९४६ ते ६५ या कालखंडात त्याने जिनियस गीतकार संगीतकार आणि लता मंगेशकर यांना एकत्र आणून पृथ्वीवर स्वर्गच थाटला.

अनुला करणाशिवाय हसत सुटायची फार सवय होती. थोडंसं काहीतरी व्हायचं, लोक स्मितहास्य करून गप्प व्हायचे आणि ही त्यावर अर्धा तास हसत बसायची. तिला शाळेत फक्त हसण्यावरून ओरडा मिळायचा. अभ्यासाच्या बाबतीत तर तिने कधी तक्रारीची संधीच दिली नाही. पण नंतर आयुष्यात अशी परिस्थिती आली की साधं स्माईल पण अनुपासून दूर गेलं.

 नंतर अनुच्या विद्यार्थ्यांनी परत तिच्या आयुष्यात आनंद आणला.  एका वर्गाला ती म्हणाली होती, मी पुढच्या सत्रात तुम्हाला शिकवणार नाही. तर ती मुलं अनुला विचारायला आली, " mam, हमसे कुछ गलती हुई क्या जो आप हमें छोड़ कर जा रहे हो" अनु म्हणते, हे ऐकुन माझं मनच भरून आलं. कितीतरी वर्षांनी मला ही जाणीव करून दिली गेली होती की माझी आई सोडून कोणाला तरी मी हवी आहे. माणूस अन्न, पाण्याने शारीरिक दृष्ट्या जिवंत राहू शकतो; पण भावनिक जिवंत राहण्यासाठी आपण कोणाला तरी हवे आहोत, ही जाणीव हवी असते. मी मध्यंतरी वाचलं होतं, when you get ignored by someone whose attention is important for you, your brain reacts the same as it does in physical pain". हेच झालं असावं अनुप्रीता च्या बाबतीत. मित्र मैत्रिणी, भावंडं, अशा बऱ्याच समवयस्काकडून ती दुखावली, आणि दुर्लक्षित झाली होती. कदाचित तिचं दुखणं सुरू झालं, तेव्हाच तिला हवा तो support मिळाला असता तर परिस्थिती इतकी विकोपाला गेली नसती. पण तिला खरच काहीतरी होतंय हे सिद्ध करण्यातच समाजाने तिची जास्त एनर्जी घालवली.


आम्हाला वाटायचं, अनुच्या घरी सगळं आलबेल आहे. पण तसं नव्हतं. ती म्हणते, माझ्या वडिलांनी कधीच माझ्या आईवर प्रेम केलं नाही. नेहमी तिला गृहीत धरलं. तिला कधी आज वर एक साडी सुद्धा घेतली नाही प्रेमाने. तिच्या कष्टांची कधी कदर केली नाही. आणि कोणत्याही छोट्या गोष्टीवरून तो माणूस इतका आरडाओरडा करायचा, त्यामुळे मी खूप डिस्टर्ब व्हायचे. ती म्हणते, लहानपणी मला पप्पा बरोबर जा, म्हटलं की मी रडायला सुरुवात करायची आणि आईला पण कधी कळलं नाही की तो माणूस तिच्यावर इतक प्रेम करतो मग ही अशी का वागते! त्या लहान जीवाला आपल्या आईवर होणारा अन्याय त्या वयातही सहन व्हायचा नाही तिला नेहमी वाटायचं, मला फक्त माझ्या आई बरोबर राहायचं आहे. कारण या घरात माझ्या आईला किंमत नाही. आणि यामुळे तिची घुसमट व्हायची आणि हे ती कोणाला सांगूही शकत नव्हती. तिच्या लहानपणी पोट दुखण्याचं कारण सुद्धा हेच होतं. नंतर नंतर ती आईला म्हणायची, आपण वेगळे राहू. पण काकू तिलाच दरडवायच्या, तुला हे सगळे एवढं सोपं वाटतं का? खरंतर काकूंना त्यांच्या माहेरच्यांचा सपोर्ट मिळाला असता, तर अनुच्या लहानपणीच त्या वेगळ्या होणार होत्या. हे सगळं अनुने मला तिच्या विसाव्या वर्षी म्हणजे जेव्हा तिचे आजोबा वारले, तेव्हाही तो माणूस गेला नाही, हे सांगताना ही परिस्थिती सांगितली. त्यात तिच्या जवळ राहणारी जी मावशी होती, तिच्या घरातलं वातावरण खूप हेल्दी! ते बघून अनुला वाटायचं, आपल्या घरात असं का नाहीये! मला माझे आई वडील बोलायला लागले की छातीवर दडपण यायचं कधीही हा माणूस मोठ्याने ओरडेल. छोट्याशा गोष्टीवरून आईच्या माहेर च्यांचा उद्धार व्हायचा. तिकडून आल्यावर तर काहीही भांडण उकरून काढून शिव्या द्यायच्या. वर म्हणायचं, ते लोक माझ्याविरुद्ध शिकवतात, जे की कधीच खरं नव्हतं. बरं,वर स्वतःला फार पुरोगामी म्हणायचं. आणि बायकोवर सतत संशय. ती म्हणते, माझी आई छान दिसत असली की हा माणूस भांडण उकरून काढायचा. वरून, तिच्या मोठ्या मावशीच्या कपाळावर तिला बघून कायम आठ्या. ती म्हणते, पुण्याची मावशी आली की खूप आदरसत्कार. मला आधी वाटायचं, ते कधीतरी येतात म्हणून असेल. पण असं नव्हतं. ती आणि तिची मुलं खूप प्रिय. मी आणि माझी आई, आश्रित. वर तिची सर्वात छोटी मुलगी तिने तर अनुला इतका मनःस्ताप दिलाय. कधीकधी तर समोर बघून पण बोलणार नाही. आणि आता या सगळ्या गोष्टीवरून आम्ही बोलायला गेलो, तर त्यांचं म्हणणं आम्ही काही केलं नाही. म्हणजे सगळीकडून अवहेलना.  खरंतर अनुच्या आईने तिच्या वडिलांचा विक्षिप्त स्वभाव लग्नाआधीच ओळखला होता. त्यांना ते लग्न मोडायचं सुद्धा होत; पण घरच्यांच्या दबावामुळे त्यांना ते करावं लागेल आणि नंतर या सगळ्याचा बळी फक्त काकूच नाही तर अनु सुद्धा ठरली आणि तरीही या लोकांना पश्चाताप नाही.

 आज अनु म्हणते, माझा प्रवास, " ना हंसो हमपे जमाने के है ठुकराए हुए। दरबदर फिरते है तकदीर के बहकाए हुए" पासून सुरु झालेला प्रवास " ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है" वर आला आहे. ती देवाला मानत नाही. कारण दीन दुबळ्यांचा आवाज त्याला ऐकू येत नाही. पण ती म्हणाली, मी एकच गोष्ट त्याच्याकडे मागितली, " सावरकरांसारख मनोधैर्य दे" .. ती म्हणते, त्यांच्या पायाशी उभं राहता येईल, एवढं मोठं बनायचंय मला. त्यांच्या फक्त नावाने अंगावर काटा येतो. एका ब्रिटिश वृत्तपत्रात इंग्रज सरकारने म्हटलं होतं "इंग्लंड हे अतिशय भाग्यशाली राष्ट्र आहे की त्याला सावरकरांसारखा प्रचंड बुद्धिमान चारित्र्यसंपन्न आणि प्रखर  देशप्रेमी शत्रू मिळाला". पण शत्रुकडेही ते समजण्याची ताकद आणि मान्य करण्याचा मोठेपणा असायला हवा ना. जेव्हा अंदमान च्या तुरुंगात उच्चशिक्षित क्रांतीकारकांनी इंग्लंड सरकारच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्या. सावरकरांना अशा कोठडीत ठेवलं होतं की तिथून फाशीची शिक्षा देणारी कोठडी दिसावी; जेणेकरून त्यांचे मानसिक खच्चीकरण होईल; पण याही परिस्थितीत त्यांनी महाकाव्य लिहिले. तर मी देवाकडे यापेक्षा मोठं काय मागू शकते. 


अनुच्या आईचं अनु म्हणजे अगदी सर्वस्व.त्या ऑफिस सोडून कधी अनुला एकट सोडून कुठे गेल्या नाहीत. गेली कित्येक वर्ष अनु मुळे त्यांना कुठे जायला मिळत नाही पण त्यांची कधी तक्रार नसते. अनुला जे चालत नाहीत ते पदार्थ त्या स्वतःही खात नाहीत. काकू इतकं सुंदर गातात, अगदी सहज! सहज जरी गात असल्या तरी लोक विचारतात की तुम्ही गाणं शिकलाय का? आता अनु चे वडील गाण्याचे एवढे मोठे दर्दी! तीच साहित्याची, गाण्याची आवड अनु मध्ये आली, पण ह्या माणसाने स्वतःच्या बायकोला कधी प्रोत्साहन दिलं नाही. ह्याचा पण अनुला खूप त्रास व्हायचा. ती म्हणते, एवढं कलेचे दर्दी असून आपल्या घरातल्याच कलेला वाव दिला नाही, तर त्याची किंमत शून्य आहे. 
काकूंनी अनुच्या सुखाव्यतिरिक्त कधीच कशाचा विचार केला नाही. पण तरीही आपल्या मुलीच्या मनातील उलथापालथ त्यांना कळत नव्हती. आता त्यांना खूप वाईट वाटतं, लहानपणासूनच आपण तिच्या भावनिक गरजा समजून घेतल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती. पण आता अनु खूप समाधानी आहे, तिच्या व्यथा तिच्या इतक्याच मोठं वाटणारी व्यक्ती कायम तिच्यासोबत आहे. ती म्हणते, चार भिंतींच्या बाहेरच्या जगाकडे मी दुर्लक्ष करायला शिकलेय. पण त्याच्या आतला माणूस हा माझं मन पूर्णपणे कळणाराच असला पाहिजे. लग्न सुद्धा मी त्याच माणसाशी करेन, ज्याला माझ्या भावनिक गरजा कळतील. मी काय भोगलंय, ह्याची जाणीव त्याला असली पाहिजे. अनुचा स्वभाव चाकोरीच्या बाहेर विचार करण्याचा आहे. एखादी गोष्ट चालत आली आहे किंवा सगळे लोक करतात म्हणून करणाऱ्यातली ती नाही. ती म्हणते, माझ्या नवऱ्याला माझी एखादी गोष्ट नाही पटली; तरीही तिने स्वतंत्र विचार करून काहीतरी केलंय ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी नाही कारण प्रवाहाविरुद्ध जाणार्‍या माणसाला नेहमीच जास्त अडचणी येतात. याचा त्याला अभिमान असला पाहिजे. ती म्हणते एका वाक्यात सांगायचं तर, जो मला म्हणेल, "अनु, जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है", त्याच्याशीच लग्न करेन मी. 
आणि महत्वाचं म्हणजे तिला फक्त स्वतःसाठी आयुष्य जगायचं नाही. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग जर समाजासाठी झाला नाही, तर आपण भोगलेलं दुःख, त्याची किंमत शून्य राहील. समाजात जर कोणाला एकट वाटत असेल, तर ती हार त्या माणसाची नाही तर पूर्ण समाजाची आहे. ती म्हणते, अन्याय करणारा गुन्हेगार असतो अन्याय सहन करणारा 'हतबल' असतो आणि ते पाहत राहणारा, त्याला मूक पाठिंबा देणारा हा फार मोठा गुन्हेगार असतो.
या सगळ्यात सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे, एवढं सगळं होऊनही अनुची बुद्धिमत्ता, तिची विचार करण्याची शक्ती आणि त्यापेक्षाही जगण्याचा आस्वाद घेण्याची वृत्ती हे सगळं शाबूत आहे. जगाकडे दुर्लक्ष करायला तर ती कधीच शिकलीये, तिच्या विद्यार्थ्यांमध्ये तिला तिचा आनंद सापडलाय. महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीतही ती असंं आयुष्य जगली आहे की लोकांना तिचा हेवा वाटतो. हेच समाजाने तिलाा दिलेलं प्रशस्तीपत्रक आहे.

यापुढे अजुन मी काय बोलू अनु बद्दल! तिच्या शब्दात सांगायचं तर देवाला जर त्याचे बेस्ट क्रिएशन्स विचारली तर नक्कीच पहिली दोन नावं लता आणि मधुबाला असतील त्यात मला ऍड करावसं वाटतं तो शेवटी म्हणेल, लास्ट बट नॉट द लीस्ट "अनुप्रीता" 

समाप्त.

🎭 Series Post

View all