Feb 22, 2024
जलद लेखन

अनोखे नाते भाग-१

Read Later
अनोखे नाते भाग-१
"अग ये मयुरी ,आवरलं का?,अग जायला यायला किती वेळ लागणार आहे त्यात येथेच उशिर केलास तर पुढेही उशिरच व्हायचा गं ...चल ना ?पटकन"

रवी मयुरीला हेच वाक्य दोन तीन वेळेस हाॅलमधून ऐकून गेला ...पण मयुरीच आवरत का?,तीला मुग्धासाठी भरपुर सामान न्यायचं होत एक एक करत तीन पिशव्या भरल्या होत्या ...आता तीच पुटपुटली ..

"बस झाल आता नाहितर हे पुन्हा चिडायचे ...दर महिन्याला माझ्या मुग्धाला भेटायला आवर्जून घेऊन जातात ते काय?कमी आहे माझ्यासाठी त्यात मी जरा अती केल तर तेच नाराज व्हायचे..."

मयुरीने पटपट सगळ्या पिशव्या बाहेर आणुन ठेवल्या .
तोवर रवीने गाडी गेटजवळ आणली व सर्व पिशव्या व साहित्य गाडीत ठेवलं...मयुरीने किचनमध्ये जात एकदा सार व्यवस्थित आहे ना,ते बघितलं,जेवणाच सार सामान एका बाजूला पध्दतशीररित्या ठेवलं व सासूबाईंना आवाज देत ती बाहेर पडली...

"आई ,बाबा निघालो हो आम्ही ,लवकर येण्याचा प्रयत्न करतो ,सगळ जेवण बनवून ठेवलं जेवून घ्या ...आई भांडेवैगरे राहू द्यात आल्यावर आवरेल मी ..".

निघतांना मयुरीचा चेहेरा खुललेला होता .सासुबाई तिच्या खुललेल्या चेहेर्याकडे बघतच होत्या तोच सासरे म्हणाले ,

" मयुरी हे घे बेटा ,माझ्याकडून मुग्धासाठी ".

एक बंद पाॅकिट देत ते शांत झाले .

आजवर बाबांनी मुग्धासाठी काहिच दिलेल नव्हतं.मुग्धाच नाव घेतल की ते शांत होत ,कधी ओठांवरही तिच नाव आलं नव्हतं पण ,आज बाबांनी चक्क मुग्धा म्हटलं व तिच्यासाठी काहीतरी वस्तु दिली म्हणजे ते मुग्धाला स्विकारू पहात होते...रवीही बाबांच्या वागण्याने सुखावला होता .आज दोघांचाही मुग्धाकडे जाण्याचा उत्साह द्विगुणित झाला होता..नेहमीप्रमाणे आईचे डोळे पाण्याने डबडबले होते ..

रवी म्हणाला आई ,"आलोच गं,जरा नदीला पुर आलाय तो सावर बरं...".

त्याच्या बोलण्याने सहजच आईच्या चेहेर्यावर हसू फुलल..
दोघेही मुग्धाला भेटीच्या ओढीने निघालेत...

खरतर शहरापासून दोन तीन तासांचा रस्ता तो ,कधी एकदा संपेल अस मयुरीला झालं होत .मुग्धा आता पंधरा वर्षाची झाली होती .घारे डोळे ,सतत बडबडणारी,सहजच कोणालाही अपलसं करणारी मुग्धा आईचीच सावली होती..एकदम डिक्टो दिप्तीची झेराॅक्स काॅफी...

रवी म्हणाली,"मयुरी दिप्ती ना?,मुग्धासारखी दिसायला होती गं ,पण मुग्धात समंजशपणा व संयम जास्त आहे बरं दिप्तीपेक्षा..."

"हो का?"

"खरतर आई बाबांकडून ऐकून असते हो ..पण कधीतरी दिदींचा सहवास लाभायला हवा होता मला.पण,दिदींची पोकळी मुग्धाने भरून काढली बरं,समंजश बाळ माझं".

"अग,पण,तु तीची मामीआई ना?,ननंदेचा जाच झाला असता बघ..".

मयुरी हसत म्हणाली,"बरं झाल असतं बघा ,पण,तुमच्या चौकिणी कुटुंबाची शोभा राहिली असती ना?"

ती बोलत असतांना रवीचे डोळे भरून आले..

तो मयुरीला म्हणाला,"औक्षणाच ताट घेतलं ना?,मला ओवाळायच आहे बच्चाकडून ".

"अहो तीने केली असेल बघा सगळी तयारी ,तशी समजदार आहे ती..बहुतेक सागरदादाही असतील का?हो तिकडे".

"हो तर ,रहातीलच ना?वडिल ग तीचे ,त्याची काय चुक बरं पण जगण सुटत नाही ना?आईवडिलांसमोर नाईलाज झाला त्याचा पण दिप्तीवर खुप प्रेम बरं दुसर लग्न करायलाच नको म्हणत होता तो..आजही मुग्धासाठी सगळच करतो की ,बाबा व आईला नाही पटत पण वडिलांचा आधार कोणी काढुन घेऊ शकत नाही ना?".

"बरोबर हो तुमचं काहीवेळा तो प्रसंग आठवला कि काळिज हेलावत बघा ,नको तो विषय आता ".

दोघेही शांत झाले .दरवेळी सोबतीला मुल असल्याने पटकन पोहचणारे आज जरा जास्तीच वेळ लागतो आहे अस दोघांनाही वाटत होतं..

रवी म्हणाला,"मयुरी मुग्धा मुलांना विचारेल गं,आता मुल आली की परत पंधरा दिवसात चक्कर मारू हं...!"

"हो चालेल ना?".

गाडी रस्त्यावर सुसाट धावत होती ,मयुरी खुश होती .पण,रवीच्या चेहेर्यावर जस ठिकाण जवळ येत होत तसा जरासा आवघडलेपणा दिसू लागला होता..मयुरीला तो दिसत होता..

"का हो ,ह्यावेळी जरा आलघडले तुम्ही,"

"हो गं..खरतर दिप्तीच्या घरी अगोदर जाणयेणं नव्हत .आपल लग्न झाल व तुझ्या आग्रहाखातर मी येथे येऊ लागलो.ते फक्त मुग्धाला भेटायला ,आजवर मुग्धाला कधी घरी नाही नेल बघ आपण,पण चार /आठ दिवस कुठेतरी फिरायला हक्काने घेऊन जातो .काय?विचार करत असतील तीचे आजी आजोबा .मला जरा आवघडत गं,पण तुझ्या हट्टापुढे सगळ सहन करतो मी".

"बरोबर आहे हो तुमचं,पण आजवर त्यांनी आपल्याला कधी अडवल नाही ना?,सागर दादाही खुश होतात आपल्याला बघून ,त्यांची बायकोही कधी चुकिच नाही वागली इतक्या दिवसात...'"

"हो गं, त्याची मामाचीच मुलगी ना?ती तीला सगळच माहित आहे बघ ..म्हणुन शांत असते ती परिस्थितीपुढे कोणाच चालत गं".

"पण,तीचा मुलगा वारिस होईल म्हणुन बाबांचा राग असावा बहुतेक".

"तस नाही गं खरी परिस्थीती जरा वेगळी होती ते तुला नाही कळायचं.."

आता मयुरीची उत्सुकता अजून वाढली होती मुग्धाच्या प्रत्येक भेटीत एक नवा विषय मयुरीला कळत होता ...आता परतीच्या प्रवासात हा ही विषय जाणुन घ्यायचा ती विचार करत होती तोच गाडीचा ब्रेक लागला..

मुग्धाच घर आलं होत.

क्रमश:..

बाकी कथा पुढील भागात...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//