अव्यक्त भाग ८

व्यक्त न झालेले क्षण


अव्यक्त भाग ८


दूर जाणाऱ्या गाडीला बघून तिचे डोळे पाणावले. काही क्षण तर मागितले होते त्याने तिच्याकडे. ती तेही त्याला देऊ शकली नव्हती.

जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेली ती प्रेमाच्या सादेला प्रतिसाद देऊ शकली नव्हती.


आजची सकाळचं चुकीची झाली होती. तीन आठवड्यांची रजा घेऊन कालच आलेला तो. रात्रीच्या मिट काळोखात तिला आपलंसं करून पहुडला होता. सकाळची कोवळी किरणे येण्याआधी काही बंद मिठीतले क्षण तिच्याकडे उधार मागत होता.

" नाही केलास आज सकाळचा दिनक्रम वेळेत, तर आभाळ कोसळणार नाही." त्याच्या आवाजातला आर्जव ऐकून ही गालात हसली.

" मी उठले नाही म्हणून काही सूर्य उगवायचा राहणार नाही." त्याच्या भाषेत त्याला उत्तर देताना ती मिठीत चुळबुळत म्हणाली.

"रोजचेच आहे ते सगळे, माझ्या येण्याचे तुला काहीच कसे कौतुक नाही." तिच्या चुळबुळीला घट्ट मिठी घालत, थोपवून तो म्हणाला.

" तुमच्या येण्यानेच आजचे महत्त्व वाढले आहे, रोजचे जूनेपण कात टाकून नव्याची नवलाई न्याले आहे." त्याच्या छातीशी सलगी वाढवत ती त्याची मिठी सैल करून अलगद  बाजूला झाली.

तो मात्र आधी सुखावून मग हिरमुसला. ती हसली, त्याने मात्र अबोला धरला.

त्याचा अबोला कसा दूर करायचा? हे तिच्या मनाला चांगलंच माहित होतं. तन आणि मन, मग तिने त्याचं प्रयत्नांत जुंपल होतं.


स्वयंपाक वाढताना चोरटे स्पर्श करून त्याची कळी खुलवू ती पाहत होती.

मनातून तोही विरघळला होता; तरीही तिच्या पुढाकाराची अभिलाषा होती.

त्याचा सगळा रोष दूर करायचा प्रयत्न ती करायचा ठरवून निघाली.

आजची निशा सजवायला ती आतुर झाली. बेत आखण्यासाठी तिच्या गुप्त स्थळी गेली.


तार होती त्याच्या हातात. चेहरा झरकन बदलला होता. तिला सांगण्या निरोप, शोध त्यानेही खूप घेतला होता.

जायची वेळ जवळ आली तरीही हीचा काही पत्ता नाही. तिची वाट पाहणारी नजर फिरवून जाणे, त्याच्या मनालाही जड होई.


तिला निरोप मिळायला खूप उशीर झाला. तिच्या आगमनाआधी तिचा साजण गाडीतून माघारी परतला.


त्याच्याबरोबरचे क्षण वेचणे
   तिचे मात्र राहूनच गेले.
तिच्या अव्यक्त प्रेमा पासून
   त्याचे मन वंचित राहिले.


-©® स्वर्णा
  
आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट आणि स्टिकर्सच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.

🎭 Series Post

View all