भाग ४
केसांचा संभार सुरेख रचून त्यावर जाईजुईचा गजरा रोवताना एक नजर आरश्यातून त्याच्यावर गेलीच. तो अजूनही आपल्याच कामात गुंतलेला होता. शेवटी स्वतःच्या मनाची समजूत तिने घातली. जी ती नेहमीच घालत आली होती.
आरश्यातल्या स्वतःच्या रूपाला स्वतःच सजवणे, आज मात्र तिच्या जिवावर आले होते. \"जास्त काही अपेक्षा करते का मी? त्याने माझ्याकडे पहावे हे वाटणं स्वाभाविक नाही का?\" मनात विचार आणि चेहऱ्यावर पावडर फिरून पसरत होती. लक्ष मात्र दोघातही गुंतल नव्हतं. तिला थोड्या वेळापूर्वी साडी नेसण्याची वेळ आठवली.
_______________________________________________________
चापून चोपून नेसलेली साडी, तिच्या देहाशी लगट करत होती. पदराचा डोलारा सावरून त्याला खांद्यावर विसावे पर्यंत तिचा जीव मेटाकुटीला आला होता.
एकदाचा तो व्यवस्थित म्हणण्या पेक्षा तिच्या मनासारखा स्थानापन्न होताच; तिने त्याला सेफ्टी पिन लावून जेरबंद करायचा प्रयत्न सुरू केला.
तो प्रयत्न मात्र काही केल्या फळाला येईना. तिचा जीव अगदी मेटाकुटीला आला. मदती साठी तिने खोलीभर नजर फिरवली आणि स्वतःच्याच विचारांनी गोड लाजली.
\" इश्य....... काय हा विचार? मी साडी नेसाताना हे कसे खोलीत असतील. आईंना बोलवावं लागेल.\" सासूबाईंना हाक मारायला तोंड उघडण्यापूर्वीच दरवाजा उघडला.
समोर तो उभा. तिची नजर त्याच्या नजरेचा वेध काय सांगतोय यात गुंतलेली.
"सॉरी. मला वाटलं, तुझं आटपल असेल." तो मात्र भावशून्य चेहऱ्याने मागे वळला.
"आटपलच आहे. फक्त हा पिन तेवढा लावायचा आहे." हातातला पिन त्याला दाखवत ती बोलली.
"आईला बोलावतो." त्याचा तिच्या समस्येवर तोडगा. तिचं मन मात्र त्याच्या पुढाकाराच्या
अपेक्षेत.
अपेक्षेत.
"तुम्ही लावून देता का?" ती तोंडातच पुटपुट करून त्याला पाठमोरी झाली.
\" काय तू पण, मोठ्याने बोलायचं ना! नवरा स्वतःचा, त्याला एवढस तर करायला सांगायचं होतं. त्यात काय लाजायच. आता तू बोललेल त्याने ऐकलंच नसणार.\"
विचारात गुंतलेल्या तिला कळलेच नाही; की तिच्या हातातला पिन त्याच्या हाती केव्हा गेला आणि नटखट पदर त्यात बंदिस्त ही झाला.
"मी माझं आवरून घेतो." त्याच्या आवाजाने ती वास्तवात आली. पदराला बघून \" हे कधी झालं \" या विचारात गुंतली. त्याचं विचारत त्याच्या कपाटाला हात लावायला गेली.
"मी घेतो माझे कपडे. तुला आई बाहेर बोलावते आहे." त्याने घाई घाईने तिला खोली बाहेरच काढले.
खट्टू मन घेऊन ती सासू बाईंच्या दिशेने निघाली.
"वा!! सुरेख दिसतेस. फक्त हा गजरा माळ. आणखी भर पडेल या सौंदर्यात." त्यांनी तिच्या हातात ताज्या फुलांचा गजरा देताच, त्या फुलांप्रमाणे तीही टवटवीत झाली .
"आताच माळून आले." म्हणतं खोलीकडे पळाली.
खोलीत आली तेव्हा तो शर्टाच इन व्यवस्थित करत होता. अजूनही तिच्याकडे दुर्लक्षच होतं.
तिही मग तिरमिरीत आरश्यासमोर जाऊन केस विंचरू लागली. वाटलं हा विचारेल काय झालं? पण कुठलं काय महाशय सरळ बाहेर निघून गेले.
ते आता थोड्या वेळापूर्वी खोलीत येऊन कामात गुंतले. काय काम करतायत देवालाच माहित.
"माझी तयारी झाली आहे. मी आईंकडे जाते. त्यांना काही मदत हवी का ते बघते." तिने त्याचं लक्ष वेधण्यासाठी बोलून पाहिलं.
पण परिणाम होईल ते महाशय कुठले. कागदपत्रात गुंतलेल्या डोक्यानेच डोलून होकार कळवला.
ती मात्र जरा रागातच निघून गेली.
_______________________________________________________
ती खोली बाहेर गेली याची खात्री होताच. याने पटपट उगीच मांडलेला पसारा आवरायला घेतला. बाहेर जातानाचा तिचा रागावलेला चेहरा नजरेचा कोपऱ्यातून त्याने डोळ्यात साठवला होता. आता आठवून चेहरा नकळत हसत होता.
सकाळची ती साडी नेसत असतानाची फेरी काही सहज नव्हती. साहेब तिला मदत हवी का ? हेच पहायला आले होते. खुमखुमीत आले खरे; पण तिचं रूप पाहून जागीच थिजले. शब्दांनी मुक केलं, त्यामुळे भावनांना अव्यक्त रहावं लागलं.
आता ही स्वतः आणलेला गजरा तिने केसात माळलेला पाहून, तिच्यापर्यंत तो पोचवण्यासाठी केलेला खटाटोप सफल झाल्याचे समाधान. त्याने कसे बसे चेहऱ्यावरून उघड होऊ दिले नव्हते.
_______________________________________________________
तो स्वतःचे आवरून बाहेर आला आणि पाहतो तर काय? बाईसाहेब वेगळ्याच रंगात होत्या.
\" आता तर रागावून निघून गेली होती. हिला आता काय झालं? मी बघत नसताना, मला बघून अशी काय लाजते? पण मी बघितल्यावर मात्र पुन्हा राग कुठून आणते?\"
\" आईंनी मला गजरा प्रकरण सांगितलं आहे. हे मी तुम्हाला कळूच देणार नाही. व्यक्त तर तुम्हाला व्हावच लागेल. हा अव्यक्त भावनांचा खेळ कधी पर्यंत चालतो. ते आता मीही पहातेच.\"
_______________________________________________________
नवीन लग्न त्यांचे.
अलवार भावनांना दुसऱ्या पाशी पोहचवताना, अव्यक्त राहूनही व्यक्त होताना,
प्रेमाचे नवे रंग आयुष्यात रेखाटणे कसे असते याची अनुभती करून देत होते.
अलवार भावनांना दुसऱ्या पाशी पोहचवताना, अव्यक्त राहूनही व्यक्त होताना,
प्रेमाचे नवे रंग आयुष्यात रेखाटणे कसे असते याची अनुभती करून देत होते.
-©® स्वर्णा
_________________________________________________________________
कथा आवडली तर समीक्षा व अनुसरण नक्की करा.
??
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा