Login

अव्यक्त भाग १

क्षणात गुंतले सारे.


         तो रागाने तडक निघाला होता. नेहमी मुक असणाऱ्या  पायातल्या चपला आज खूपच आवाज करत होत्या. घरात सगळे आज एकदम चिडीचूप झाले होते. हा जमदग्नी जागा केला कोणी? हा सर्वांनाच प्रश्न पडला होता.
         ती अचानक समोर आली घाईघाईने खाणाखुणा करु लागली. घरातले तिला बाजूला राहायला खुणावत होते. तिचे मात्र त्यांच्याकडे लक्षच नव्हते. सगळ्यांना तिची काळजी वाटू लागली.
            तो तसा कमीच चिडतो; पण चिडला की त्याचा राग अनावर होतो. मागे एकदा घरात प्रकरण तोडफोडी पर्यंत गेले होते. तेव्हा राग शांत झाल्यावर याने सगळ्यांना निक्षून सांगितले होते; की मी चिडलेला दिसलो तर माझ्याशी बोलणेच काय जवळ ही फिरकू नका.

       हे तिला बिचारीला कसं माहित असेल. ती नवीन होती आणि एवढ्या लवकर सांगायची वेळ येईल अस वाटले ही नव्हते.
        असो तिचे खुणेने विचारणे चालूच होते. आता काही खरे नाही, असे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर असताना अचानक तिचे हातवारे थांबले होते. सांगण्याचा प्रयत्न करताना तोंडातून होणारा आँ ऊ चा आवाज बंद झाला म्हणून सगळ्यांनी त्या दोघांकडे बघितले.

        तो शांतपणे तिच्या हाताला मलमपट्टी करत होता. ती भारावून त्याला बघत होती. तिला थांबवायच्या प्रयत्नात कोणाचे  लक्ष तिच्या हाताकडे गेलेच नव्हते. तिच्या धक्याने त्यांच्या खोली मधला काचेचा शो पीस पडला आणि होत्याचा नव्हता झाला हेच ती सांगत होती. चुकून झाले म्हणून गांगरून माफी मागत होती.

तिच्या डोळ्यात आता आसवं जमा झाली होती.

       रूप तुझे हे या डोळ्यात
            धूसर आज आसवांनी केले
                 कारण त्याला ही तूच आहेस
                   आयुष्य भर असाच राहशील ना
                      न सांगता मी तुला सांग सख्या रे
                        सांभाळून घेशील ना
                          हवे ते देशील ना


       -©      स्वर्णा.
            
     

🎭 Series Post

View all