प्रेम समजताना..

Story of spy

फोटो सौजन्य:- गुगल

सादर कथा हि संपूर्ण काल्पनिक कथा असून कुठेही साधर्म्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

----------------------------------------------------------------------

'आईsss.. रोहन धाव रे.. आईला बघ काय होतंय..'- मनाली आपल्या धाकट्या भावाला जोरजोरात हाक मारून बोलवत होती.

मनालीच्या आईला म्हणजे सुनिताला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्या जागीच कोसळल्या होत्या. रोहन पुढे येताच, आईला तसं निपचित पडलेलं पाहून काही क्षण त्यालाही एक भीती वाटली होती पण पुढच्याच क्षणी त्याच्यातल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने परिस्थितीवर मात करत आईला सी.पी.आर देण्यास सुरुवात केली होती. मनालीला रुग्णवाहिका बोलवण्यास सांगून तो आपले प्रयत्न करतच होता. आई थोडीही हालचाल करत नसल्याचे पाहून त्याचाही धीर हळूहळू खचू लागला होता. 

'आली का ग एम्ब्युलन्स?'

'नाही ना.. सायरनचा आवाज दुरदूरवर ऐकू येत नाहीये.. आईss.. ऊठ ना ग.. असं आम्हाला घाबरवू नकोस ना.. प्लिज..'

'बाबांना फोन करूया का?'- रोहनने विचारलं.

'काही उपयोग होईल का? नेहमी सारखा फोन बंद असेल किंवा चालू असला तरी उचलणार नाहीतच. सोड.. आपणच काहीतरी करू.'- मनाली उद्वेगाने बोलून गेली.

दोघे बहिण भाऊ आता काहीसे हवालदिल होऊ लागलेच होते की रुग्णवाहिकेच्या सायरनचा अस्पष्ट आवाज त्यांच्या कानावर पडला आणि मनाली लगेचच दरवाजा उघडायला धावली. थोड्याच वेळात रुग्णवाहिका त्यांच्या दारी पोहचली आणि सुनिताची अवस्था पाहून साऱ्यांनी जलद हालचाली करत तिला लगेच रुग्णवाहिकेत नेले होते.

'कोणीतरी एकाने आमच्यासोबत चला.'- वैद्यकीय पथकातील एकाने सूचना केली तसा रोहन रुग्णवाहिकेत बसला आणि मनाली स्कुटी घेऊन निघाली होती.

रुग्णवाहिका सायरन देत वेगाने जात होती. सुनिताला आता हलकी शुद्ध आल्यासारखं वाटत होतं. डोळे किलकिले करत तिने पाहिलं तर मनोज तिच्या डोक्यावरुन हात फिरवत बसला होता. आजही तो वरवर भावनाशून्य वाटत असला तरी त्याचे डबडबलेले डोळे त्याच वेगळंच रूप दाखवत होते. काहीसा थकलेला वाटत होता. चेहरा मात्र वेगळ्याच तेजाने तळपत होता.

'आज तुला बरा वेळ मिळाला रे? असंही आम्ही तुझ्यासाठी काहीच नाही ना रे? आज तुझी लाडकी नोकरी सोडून कसा काय?'- सुनिता कसेबसे बळ एकवटून एक एक शब्द उच्चारत होती.

'आता काही बोलू नकोस ना.. प्लिज.. त्रास होईल ग तुला..'- मनोज कळवळून म्हणाला.

'ओह! तुला त्रास होतोय? छान वाटलं रे पाहून.. आय मिन तुला माझी काळजी आहे हे पाहून छान वाटलं.'

'तू आधी बरी हो, मग आपण सविस्तर बोलू पण मला तू ठणठणीत झालेली आवडेल. असंही आता यापुढे माझा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही अग. प्रॉमिस!'

मनोज सुनिताच्या डोक्यावरून हात फिरवत मूकपणे तिच्याकडे क्षमायाचना करत होता पण दुखवलेली सुनिता नजर फिरवून जणू इतक्या वर्षांचा बदलाच घेत होती.

'ऐक ना अग.. मी नाही ग इतर नवऱ्यांसारखा. मी मान्य करतो. मला नाही होता येत रोमॅण्टिक. नाही येत मला प्रेम तोंडाने बोलून दाखवता. मी काय करू ग? पण माझं प्रेम आहे ग तुझ्यावर..'- मनोज बायकोला समजवण्याचा प्रयत्न करत होता.

'अशी काय वेगळी अपेक्षा होती रे माझी? थोडासा वेळ तर मागत होती मी. चंद्र-तारे मागत नव्हते की मला राणीसारखं ठेवायला सांगत नव्हते. कधी तरी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवायला मिळावं हिच अपेक्षा होती ना रे माझी? पण तुला तुझ्या नोकरीपुढे काही दिसलं का? मुलांच्या आजारपणात तू कुठे होतास का ते आठवून बघ.. त्यांच्या शालेय जीवनाच्या एखाद्या प्रसंगात तरी तू दिसतोस का ते आठवून बघ ना रे.. आज तू माझ्याजवळ बसून पश्चात्ताप करतो आहेस पण माझ्या पहिल्या बाळंतपणातही तू सोबत नव्हतास मनोज.. कुठेच नव्हतास रे तू.. कुठेच नव्हतास..'- सुनिताच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं होतं.

'माफ कर ग.. माझी नोकरी..'

'नको रे नको.. नको तुझ्या त्याच त्याच सबबी.. बरं कारण पण बदललं नाहीस इतक्या वर्षात.. काय आहे त्या नोकरीत एवढं देव जाणो की तुला साधी स्वतःची नातीही जोपासता आली नाहीत.. नाही ऐकायचं मला काही.'- सुनिताने पुनः एकदा मान वळवली आणि ती स्फुंदू लागली.

'तू नको ना रडूस.. मी बोललो ना आजपासून तुला आणि मुलांना माझा काहीच त्रास होणार नाहीये. पण तू माझ्याशी आता बोल ना.. किमान माझं ऐक ना..'- मनोज अगदी हात जोडून बायकोची विनंती करत होता.

'रोहन, बाबांना माझ्यापासून दूर कर रे.. नाहीतर तुझी आई रुग्णालयात पोहचण्याआधीच वर जाईल बघ.. रोहनss, ऐकतोय ना? अरे रडत काय बसला आहेस? मी काय बोलतेय ते कळतंय का? ऐकू येतंय का? रोहन?'- सुनिता बळ एकवटून ओरडत होती पण बहुतेक रोहनपर्यंत तिचा आवाज जातच नव्हता.

'आज कोणालाच तुझा आवाज ऐकू येणार नाही सुनिता. फक्त मीच तुला ऐकू शकतो आणि तू मला..'- मनोज खिन्न हसत म्हणाला.

'ठिक आहे... बोल मग, काय ते बोल.'

'प्रेम समजायला खूप अवघड असतं ग. सर्वांनाच ते कळत नाही आणि सर्वांनाच ते व्यक्त करता येत नाही. पण प्रेम असतं. मला आठवतंय मुलांच्या आजारपणात मी कुठेच नसेल पण त्यांच्या उपचारात मी काही कमी पडू दिलं नाही. त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात मी अजिबात नसलो तरी त्यांना हवं ते शिक्षण मिळावं म्हणून रक्ताचं पाणी केलंय मी. मनाली जगात आली ते पहायला जर तुझ्यासोबत असतो तर न जाणो किती जीव जगातून निघून गेले असते.'- डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसत मनोज म्हणाला.

'तू जे बोलतोय ते सगळं माझ्या डोक्यावरून जातंय. पैशांची सोय करणे म्हणजेच सर्व का रे? पैशांची सोय तर कोणीही करेल पण त्यांना कधी त्याचा बाप वाट्याला आला नाही त्याच काय? आणि कोण जगातून गेलं असतं? काय बरळतो आहेस ते माझ्या काहीच लक्षात येत नाहीये.'- सुनिता आता काहीशी चिडली होती.

'त्यांचा बाप त्यांच्या जवळ नव्हता म्हणून बाकीच्यांचे बाप त्यांच्या कुटुंबाजवळ पोहचत होते. असो, तुला नाही कळणार. पण तुला आठवतं का मी इतक्या वर्षात जेव्हा पण घरी यायचो तुझ्यासाठी गजरा अगदी न चुकता आणलाय. तुझी मर्जी नसली तरी तुला जबरदस्ती मिठीत घेतलं आहे.. हे हे! सॉरी फॉर दॅट. पण नोकरीच्या दगदगीतून आल्यावर तू जेव्हा समोर यायचीस ना मन अगदी चिल्ल होऊन जायचं ग.. मग नाही राहायचा मनावर ताबा.. तुला मिठीतच पकडून ठेवावं वाटायचं पण तू बाहेर पडण्याची धडपड करायचीस. चिडलेली असायचीस तू.. मग मलाच वाईट वाटायचं. तुझा विनयभंग करतोय की काय असं वाटायचं आणि मग मी परत माझ्या कोषात शिरून जायचो. पण त्यात तुझा बिलकुल दोष नाहीये बरं.. माझंच जीवन असं तर मी कोणाला का बोल लावावे. मुलांच्या वाट्याला मी कधी आलो नाही पण त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला व्हिडीओ कॉल करायचो, ते दरवेळी फोन कट करायचे तरी.. तुमच्या तिघांच्या बोलण्यातून काही संदर्भ मिळायचे अन मग त्यानुसार मी गिफ्ट पाठवायचो. मला तुम्हाला वेळ देता आला नाही, मी तुमच्या जवळ कधीच नव्हतो पण तुम्ही तेवढे माझ्या कायमच जवळ होतात.. अगदी ह्रदयाजवळ.. तुमच्या आठवणी, तुमची सोबत खूप मिस करायचो.. खूप मिस करायचो..'- बोलता बोलता मनोजने स्वतःच्या हृदयावर हात ठेवला.

'रक्त?? मनोज, अरे काय लागलंय तिथे. किती रक्त येतंय बघ तिथून..'- सुनिता जोर लावून उठायचा प्रयत्न करत होती.

'रडतंय ग माझं हृदय. तुमच्यासाठी काही करता आलं नाही. तुम्हाला सुखरूप ठेवणं ही माझ्या प्रेमाची व्याख्या होती फक्त मनात असूनही मला ती तुम्हाला कधी समजवता आली नाही.. खुप वाईट होतो ना ग मी..पण सोड सगळं ते विसरून जा मला.. आता तू नुसती ठणठणीत नाही तर खंबीर झाली पाहिजेस. वचन दे मला सुनिता, मला वचन दे! '- मनोज आता हसत हसत सुनिताकडे वचन मागत होता जणू त्याच्या मनावरचे मोठे ओझे हलके झाले होते. 

'दिले वचन.. मी तर असंही खंबीर आहेच. एक मिनिट!काय बोलतोय तू मनोज?? मनोज..'- सुनिताच्या तोंडून शब्द बाहेर पडले तसे रोहन आणि डॉक्टर सुनिताजवळ धावले. 

'थँक गॉड! आई तू शुद्धिवर आलीस.. आणि बाबांचं नाव का घेतलंस?'- रोहनने तिच्या कपाळावरून हात फिरवत विचारलं.

'मनोज.. मनोज होता ना इकडे आता? तुझा बाबा होता माझ्यासोबत. मी तुला मघाशी हाक पण मारली होती पण तू ऐकलं नाहीस. त्याला.. त्याला लागलं होतं..'- सुनिताची शुद्ध हरपली होती पण रुग्णवाहिका नेमकी तितक्यात रुग्णालयात पोहचली होती. सर्वांनी तातडीने हालचाल करत सुनिताला अतिदक्षता विभागात हलवलं होतं. काही तासांच्या उपचारानंतर सुनिताला शुद्ध आली होती. काही काळ अजून देखरेखीखाली ठेवल्यावर रोहन अन मनालीला तिला भेटण्याची अनुमती दिली गेली होती. डॉक्टरांच्या मते तिला ह्रदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला होता. पुढचे काही दिवस तिला तणाव टाळायचा होता.

'रोहन आता कळव बाबांना. म्हणजे मेसेज करून ठेव जेणेकरून पुढचा अटॅक येण्याआधी तरी ते येतील.'- मनाली कुत्सितपणे बोलली.

'ताई.. मला नाही जायचंय ग सैन्यात.. मला माझ्याच कुटुंबासाठी व्हिलन नाही बनायचंय.. माझ्या बापासारखं..'- रोहन अगदी रडावलेला झाला होता. रुग्णालयात असल्याने महत्प्रयासाने त्याने स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या होत्या.

'काय?? बाबांसारखं? पागल झाला आहेस का? साधे कारकून होते ना आपले बाबा? सैन्यांत?'- मनाली जवळजवळ ओरडलीच..

'सैन्यांत म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो (आय.बी.) मध्ये होते बाबा. गुप्तचर..'- रोहनच्या अश्रूंनी डोळ्यांची सीमा ओलांडायला सुरुवात केली होती.

'होते म्हणजे? रोहन?'- मनाली आता हादरली होती.

'एका मिशनमध्ये फितुरी झाली आणि बाबा गेले.. आपले बाबा गेले ग.. आवश्यक बाबींची पुर्तता करून परवा त्यांचं पार्थिव आणणार आहे. मी एम्ब्युलन्स मध्ये असताना फोन आला होता..बाबांचे सहकारी होते, आधी काही सांगत नव्हते पण मी अगदी खोदून सांगितलं तेव्हा ते पटकन बोलून गेले. पण त्यांनी हे सत्य कायम आपल्यात ठेवण्याचं वचन घेतलंय. खरंतर तुलाही सत्य सांगायचं नव्हतंच पण आपला बाप आपल्याच नजरेत खलनायक बनून राहू नये म्हणून मी सांगितलं..जे सत्य लपवण्यासाठी बाबा इतकी वर्षे स्वतःच्या सुखाची आहुती देत आले ते आपल्याला कधीच उघड केले नाही पाहिजे.. वचन दे मला ताई.. वचन दे..'- रोहन जवळच्याच बेंचवर बसून बोलत होता.

'म्हणून बाबा कधी आपल्या जवळ नव्हते का? मी वचन देते रोहन... माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे सत्य माझ्या तोंडून बाहेर पडणार नाही.'- मनालीच्याही अश्रूंचा बांध आता सुटला होता.

'आता आईला काय सांगायचं ग? तिला हा धक्का सहन होईल का ग?'- रोहन आणि मनालीला काहीच सुचत नव्हतं.

सरतेशेवटी डॉक्टरांच्या परवानगीने दुसऱ्या दिवशी सुनिताला घरी नेण्यात आले होते. एक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक मनोजचे पार्थिव येण्याच्या वेळी त्यांच्या घराबाहेर तैनात राहणार होते, त्याच्या अर्धांगिनीची काळजी घेण्यासाठी, आणीबाणीच्या प्रसंगी तात्काळ हालचाल करण्यासाठी..

अखेरीस तो कसोटीचा क्षण आलाच होता. वैद्यकीय पथक सज्ज झाले होते.  शववाहिका मनोजच्या घरासमोर येऊन उभी राहिली होती. आवाज ऐकून सुनिता आणि मुलं बाहेर आले होते. पूर्वकल्पना असल्याने मुलं आता रडू लागली तशी सुनिता गोंधळली. समोरून काही व्यक्ती  शवपेटी घेऊन येत होती. पेटीवर लिहिले होते-'स्वर्गीय मनोज निवाते'. आय.बी. च्या प्रोटोकॉल्सनुसार मनोजच्या अंतिम क्षणी तो गुप्तचर असल्याचे कोणतेच संकेत दिले गेले नव्हते. सुनिता मटकन खाली बसली तसे वैद्यकीय पथक तातडीने तिच्या दिशेने धावले. रुग्णवाहिकेतल्या प्रसंगाचा तिला आता उलगडा होत होता. जाता जाता का होईना पण मनोज त्याच प्रेम व्यक्त करून गेला होता, तिच्याकडून खंबीर बनण्याचे वचन घेऊन गेला होता. सगळं आठवून ती ताडकन उभी राहिली. डोळे पुसत ती आपल्या नवऱ्याला शेवटचा कडक सॅल्युट ठोकून उभी राहिली.

आता ती कोणी सामान्य स्त्री नव्हती, ती आता वीरपत्नी होती. देशसेवेचे व्रत घेतलेल्या एका वेड्याची पत्नी की लोकांसाठी पुढेही एक सामान्य विधवा म्हणूनच जगणार होती.. तरी ती एक स्त्री होती, प्रेमाची एक अनोखी रीत कळलेली अन त्याच प्रेमापोटी नव्या भरारीसाठी सज्ज झालेली..

समस्त भारतीय सैनिकांना तसेच आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाचे बलिदान देणाऱ्या बिना वर्दीच्या प्रत्येक सैनिकाला समर्पित.

समाप्त.

©® मयुरेश तांबे