अंकलची मॅगी ( भाग तिसरा )

एक साधी मॅगी किती आनंद देवू शकते


अंकलची मॅगी ( भाग तिसरा )

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये प्रत्येक लेडीज आली ती मॅगीचा नवीन फॉर्मुला घेऊनच. अंकल पहिल्यांदाच मॅगी खाणार आहेत. दोन मिनिटात मॅगी बनते हे कबूल. परंतु जर ती खरोखरच स्वादिष्ट आणि रुचकर बनवायची असेल , तर त्यात अनेक भाज्या, टोमॅटो सॉस ,मॅगी मसाला चवी साठी हे टाकणं खूप गरजेचे आहे.

पुन्हा मॅगी खाण्याला पण एक पद्धत असते. मॅगी खाण्या साठी एक काटेरी चमचा लागतो. तो चमचा देखील आणावा लागणार होता. त्याशिवाय अंकाला मॅगी खातात येणारच नव्हती. 

झालं, मग कोण कोणत्या भाज्या मॅगी मध्ये टाकायच्या असतात,  याबद्दल गहन चर्चा सुरू झाली. काही जणांनी अनुभवाचे बोल सांगितले. तर काहीजणांनी त्यासाठी गुगलचा आधार घेतला. शेवटी दोघांच्या आधार घेऊन,  योग्य अशी लिस्ट तयार केली गेली. त्या पालेभाज्या आणण्यासाठी एकाला बाजारात पाठवल गेल. त्याला एक स्टीलचा काटा चमचा सुद्धा आणायला सांगितला. टोमॅटो सॉस देखील मागवला गेला.

कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा त्या पाकिटावर दिलेल्या सूचनांची पुनरावृत्ती केली गेली. ज्या ज्या भाषेत सूचना दिल्या गेल्या होत्या त्या भाषेतल्या सूचना नीटपणे समजून घेतल्या गेल्या.

अंकल तर पार घाबरून गेले होते. हा काय नवीन प्रकार आपल्यासाठी तयार होत आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. कोरोनाच्या काळात त्यांच्या एकाकी जीवनात थोडासा तरी आनंदाचा क्षण यावा यासाठी सगळेच जण झटत होते. ज्यांच्या घरी लहान मुलं होती त्यांच्याकडून मार्गदर्शनाची विशेष अपेक्षा होती.  ते देखील अशा बाबतीत पुढाकार घेत होते.

कोरोनाच्या काळात ऑफिसमध्ये गर्दी कमी असल्याने प्रत्येकजण मोकळाच होता. आता अंकलच्या घराचा ताबा ऑफिसमधल्या काही उत्साही स्त्रियांनी घेतला. कोणी त्यांची भांडी घासायला घेतली. कोणी भाजी कापायला घेतली. कोणी गॅस वरती पाणी तापायला ठेवलं. अगोदर भाज्या उकळू दिल्या. सगळ्या जणी मिळून मिसळून काम करत होत्या.

अंकलला  हे सगळं काय सुरू आहे हे समजत नव्हत. खरं तर त्यांना भूक लागली होती. पण बोलता येत नव्हतं. त्यांचच घर असून ते बाहेर बसलेले होते. आत मध्ये काम करणाऱ्या लोकांची लगबग ते पाहत होते.

कोणीतरी पाणी तापवून त्यामध्ये मॅगीचे तुकडे सोडले. अक्षरशः दोन मिनिटाच्या आत मॅगी शिजून तयार झाली. त्या शिजलेल्या मॅगी मध्ये उकळलेल्या भाज्या टाकल्या. त्यामध्ये चवीसाठी टोमॅटो सॉस टाकला. मॅगी मसाला टाकला. मॅगीचा खरोखरच  घम घमाट सुटला होता. एका स्वच्छ डिशमध्ये एका स्टाफने  मॅगी वाढून दिली अंकलच्या हातात दिली.

त्या मॅगीचा वास अंकलला खूप आवडला. त्यांनी  अत्यंत आवडीने मॅगी मध्ये तो काट्याचा चमचा बुडवला. मॅगी तर चविष्ट होती पण काही केल्या त्यांना त्या चमच्याने ती खाताच येत नव्हती. शेवटी त्यांनी  आगतिकपणे माझ्याकडे पाहिलं आणि हळूच विचारलं,

" मला खूप भूक लागली आहे. मी हाताने खाऊ का ?"  मला त्यांची दया आली मी त्यांना मानेनेच होकार दिला. आणि अंकल हातानेच मॅगी खाऊ लागले.  त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा कल्पनातीत  होता.

दोन मिनिटाच्या मॅगीने अंकलला आनंद तर दिला होता पण त्या पेक्षा जास्त आनंद आम्हाला झाला होता.

( समाप्त)
लेखक : दत्ता जोशी

🎭 Series Post

View all