अंकलची मॅगी

एक साधी मॅगी किती आनंद देवू शकते


अंकलची मॅगी ( भाग पहिला )

कोरोनाचा काळ अगदी न विसरता येण्यासारखा. त्या काळात आम्ही जसं जमेल तसं लोकांना मदत करत असायचो. जसं कधी कोणाला धान्य दे तर कधी कोणाला औषध पुरव अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही करत असायचो. एक दिवस अचानक आमच्या लक्षात आलं की आपण सगळ्यांनाच मदत करतो पण आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या अंकलला आपण त्यांना कसली गरज आहे का हे विचारलंच नव्हतं कधी. त्यांनाही काहीना काही गरज असेलच की.

आता अंकलची गोष्ट पुढे सरकवण्याआधी अंकलची ओळख होणे खूप गरजेचे आहे. वयाने अंकल हे सगळ्यात मोठे होते. परंतुअंकल हे आमच्या दवाखान्याचे अविभाज्य घटक . त्यांचे खरे नाव काय होते हे कोणालाच माहिती नव्हते. दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांपासुन ते सगळया पेशंट पर्यंत सगळे जण त्यांना अंकल म्हणूनच ओळखत असत. ज्यांच्याशिवाय आम्ही दवाखान्याची कल्पना देखील करू शकत नसू.

अंकल एक कुठून आले होते , काय कामाला होते, त्यांना कोणी कामावर ठेवलं होतं, त्यांना पगार कोण देत होतं,  किती पगार मिळत होता, ते पैसा कुठे खर्च करत , त्यांचं कोण नातेवाईक होते , हे देखील कोणाला माहित नव्हतं .

अंकल रात्रंदिवस दवाखान्यात राहात. ते नेहमी दवाखान्यातल्या प्रत्येक झाडाला पाणी घालतांना दिसत असतं. आम्ही ड्युटीवर येण्याच्या आधी सगळा दवाखाना लख्ख झाडून ठेवत. त्यांना रिकाम बसलेलं कोणी कधी पाहिलेलच नव्हतं. ते सतत काम करताना दिसत. त्यामुळे सगळ्यांनी मिळून त्यांना एक छोटीशी रिकामी असलेली खोली राहायला खाली करून दिलेली होती. त्या ठिकाणी ते राहत. तिथेच स्वयंपाक करत. बहुतेक त्यांना कोणी नसाव असं मला वाटतं. कारण ते कधी दवाखान्यात सोडून कुठेच गेलेले मी पाहिलेले नव्हते.

ते मूळचे बंगाली त्यामुळे त्यांचं बोलणं आम्हाला समजत नसे.पण एक दिवस अंकलला मी इंग्रजी पेपर वाचताना पाहिल. मला धक्काच बसला. मी त्यांना विचारलं अंकल तुम्हाला इंग्रजी येत तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जुन्या काळातला ग्रॅज्युएट आहे. आता आश्चर्य करण्याची पाळी माझ्यावरती होती. त्यांचे मला नेहमी कौतुक वाटत असे.

नंतर मला एकाएकी बंगाली शिकण्याचा झटका आला त्यावेळी अंकल ने मला बंगाली शिकवण्याचा वसा घेतला. अतिशय मन लावून ते मला शिकवत असत. अंकलची खोली दवाखान्यात एका कोपऱ्याला, टॉयलेट जवळ होती. त्यामुळे आता नेहमी येता जाता माझे अंकलेशी बोलणे होऊ लागले. इतर वेळी ते अतिशय नम्र असत. परंतु शिकण्याच्या बाबतीत टंगळमंगळ केलेली त्यांना मुळीच खपत नसे. अभ्यास केला नाही की त्यांना खूप राग येई.

अगदी लहान मुलासारखा त्यांनी माझ्याकडून बंगाली मुळाक्षरे गिरवून घेतली. प्रत्येक गोष्ट मन लावून समजावून सांगितली. कितीतरी बंगाली कविता पाठ करवून घेतल्या. त्या मुळे ती भाषा मला अलगद यायला लागली. एक प्रकारे ते माझे गुरुचे होते. त्या मुळे नकळत इतर लोकांपेक्षा त्यांचे आणि माझे संबंध खूप जवळचे झाले. मी देखील त्यांची खूप काळजी घ्यायचो. त्यांना काय हवं नाही ते बघायचो.

अशा या अंकलला आपण कोरोनाच्या कठीण काळात काही हवं का हे विचारायला विसरलो .त्याचे मला खूप वाईट वाटले. एक दिवस मी ठरवलं की त्यांना इतरांना देतो तसे अन्नधान्य तर देऊच पण त्याही पेक्षा काहीतरी वेगळं देऊन आश्चर्याचा धक्का द्यायचा.

( क्रमशः)
लेखक:  दत्ता जोशी

🎭 Series Post

View all