Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अतूट नाते.. भाग २ (अंतिम)

Read Later
अतूट नाते.. भाग २ (अंतिम)

कथा - अतूट नाते..

विषय - प्रेमकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका


            संध्याकाळी अनुराग आणि काव्या अर्ध्या तासाच्या फरकाने घरी आले. काव्या थोडी लवकर आली. तिने सासूबाईंची विचारपूस केली आणि ती थेट स्वयंपाकघरात शिरली. कॉफी आणि चहा दोन्ही तयार करुन ठेवून मग ती आत गेली. दाराची बेल वाजल्यावर ती गडबडीने बाहेर येणार तोपर्यंत सासूबाईंनी दार उघडलं होतं. काव्या एक क्षण स्वस्थ बसली नव्हती. ती पुन्हा स्वयंपाकघरात गेलेली पाहून सासूबाई तिच्या मागोमाग गेल्या. तिने रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु केली होती. परत अनुरागने कॉफी मागितल्यावर पहिले पाढे पंचावन्न! 


"काव्या, मला एक नवीन प्रोजेक्ट देण्यात आलाय. उद्यापासून कामाचा व्याप जरा जास्त वाढेल. तू कसं जमेल ते बघून घे जरा." 


"अरे अनुराग, त्या एकटीने किती करायचं? तू इकडची काडी तिकडे करत नाहीस घरात. तिचा काही जीव आहे की नाही. दिवसभर अशी नुसती धावत राहील तर काय होईल तिचं?" 

सासूबाईंनी समजावण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

आईला काय सांगणार म्हणून अनुरागही शांत राहिला. दुसऱ्या दिवशी सासूबाई काव्याला काळजी घ्यायला सांगून निघून गेल्या. आपल्या शब्दांनी त्याच्यावर थोडा तरी फरक पडेल असा त्यांचा समज होता. त्यानंतरचे पाच सहा दिवस अतिशय धावपळीत गेले. घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत आता काव्याला जड जाऊ लागली होती. शेवटी तीही काही यंत्र नव्हती. किती धावपळ करणार? अनुरागला काही बोलावं असंही तिला वाटत नाही, कारण तोही किती धावपळ करत होता हे ती पाहत होती. तरी अखेर आज तिने अनुरागसोबत बोलायचं ठरवलं. 


"अनि, आपल्या दोघांच्या नोकरीच्या वेगवेगळ्या वेळा, रोजचे डबे आणि घरातील काम याचा मेळ बसत नाही आहे रे." 


"मला माहित आहे काव्या. आई म्हणाली तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुझी फार धांदल उडतेय. पण मी काय करू गं? सतत लॅपटॉपसमोर काम करून थकून जायला होतं. इच्छा असून तुझ्याशी बोलता येत नाही. तितका वेळच मिळत नाही." 


"मी तुझ्याकडे तक्रार करायला नाही आले आहे. मी तुला माझा निर्णय सांगायला आले आहे अनि. तुझ्या पगारात आपलं दोघांचं भागतं आहे. मी नोकरी आणि घर एकत्र सांभाळायचा अट्टाहास करत राहिले तर मला ते झेपणार नाही. न जाणो पुढे आपल्यात वादही निर्माण होतील. त्यामुळे मी नोकरी सोडायचा निर्णय घेतलाय." 


काव्या एका निर्धाराने पण तितक्याच शांतपणे म्हणाली. 


"काव्या, अगं असं करायची गरज नाही आहे. आपण हवं तर घरकामाला कोणीतरी ठेवू. तू फक्त घरच सांभाळत बसावं असं नाही होऊ देणार मी. मला नाही पटणार ते." 


"तू हे म्हणालास हेच पुरेसं आहे अनि. पण यासाठीही मी विचार केला आहे. बाजूच्या इमारतीतल्या सुधाताई आहेत ना त्या सांगत होत्या की तिथे राहणारी एक शिकवण्या घेणारी शिक्षिका सोडून गेली आहे. त्यामुळे तिच्या इथे शिकत असणाऱ्या सात-आठ मुलांची गैरसोय झाली आहे. त्यांना शिकवण्यासाठी कोणी असेल तर त्यांनी बघायला सांगितलं होतं. माझं उच्च शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे त्या तिसरी-चौथी इयत्तेतल्या मुलांना मी शिकवूच शकेन. घराच्या कामातून दोन तास वेळ काढणं शक्य होईल." 


          अनुराग काव्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत राहिला. ती त्याग करायला तयार होती, त्याच्या स्वप्नांसाठी, त्यांच्या प्रेमाचं अतूट नातं जपण्यासाठी. दुसऱ्या दिवशीपासून काव्याचा दिनक्रम बदलला. ती अनुरागची ऑफिसची तयारी, घरकाम हे सर्व निवांतपणे करू लागली. संध्याकाळच्या वेळेत मुलांच्या शिकवण्याही घेऊ लागली. आधी सुरु असलेल्या धावपळीच्या आयुष्यापेक्षा थोडीशी उसंत घेता येऊ शकणारं हे आयुष्य तिला फार आवडत होतं. दरम्यान तीन चार महिने लोटले. अनुरागने चांगलीच प्रगती केली होती. काही काळाने त्याला कंपनीत बढतीही मिळणार होती. सर्व काही सुरळीत चाललं होतं. 


            आज अनुराग नेहमीप्रमाणे सात वाजता उठला होता. आंघोळ करून तयार होऊन तो बेडरूममध्ये आला. पण नेहमी पाच वाजता उठून कामाला सुरुवात करणारी काव्या अजूनही उठली नव्हती. त्याला आश्चर्य वाटलं. आजकाल उठल्या उठल्या कॉफीसाठीचा हट्ट त्याने सोडला होता. तिचा गाढ झोपलेला चेहरा खूप निरागस आणि गोड वाटत होता. अनुरागला तिच्या गालाला स्पर्श करावासा वाटला. पण तिची झोपमोड होईल म्हणून त्याने तसं करायचं टाळलं. तो बेडरूममधून बाहेर येत सोफ्यावर बसला व त्याने लॅपटॉप चालू करून काम सुरू केलं. तो कसलं तरी प्रेझेन्टेशन तयार करत होता. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला जायचं नव्हतं. त्यामुळे तोही निवांतपणे काम करत होता. त्याची तंद्री लागली होती. 


"काव्या, कडक कॉफी आण ना." 

कामाच्या नादात थोड्या वेळाने अनुरागने सवयीनुसार काव्याला आवाज दिला.


            आवाज दिल्यावर काव्या थोड्याच वेळात कॉफी घेऊन येते, ही गोष्ट त्याच्या सवयीची झाली होती. बराच वेळ झाला तरी ती कॉफी घेऊन आली नाही म्हणून तो स्वतःच उठून स्वयंपाकघरात गेला. तेव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की काव्या अजूनही उठलेली नाही. आता मात्र त्याला काळजी वाटू लागली होती. तो जवळजवळ धावत बेडरूममध्ये आला. काव्या डाव्या कुशीवर झोपलेली होती. तो तिच्याजवळ बसला. तिला स्पर्श करताच चटका लागल्याप्रमाणे त्याने हात मागे घेतला. काव्या तापाने चांगलीच फणफणली होती. त्याने तिला उठवलं. खूप कष्टाने तिने डोळे उघडले. आज रविवार म्हणजे बहुतेक दवाखानेही बंद असणार. तो आठवत होता की काव्या त्याची कशी काळजी घ्यायची. काहीतरी आठवल्याप्रमाणे त्याने कोपऱ्यातील कपाटात शोधायला सुरुवात केली. 


"अनि, काय हवंय?" 


तशाही अवस्थेत कण्हतच काव्याने विचारलं. 


"काही नाही. तू जरा शांत पडून रहा." 


           अनुरागने कपाटातून औषधांचा डबा बाहेर काढला. त्यातून पॅरासीटामॉलची गोळी काढून त्याने तिला दिली. अंगावर ब्लँकेट देत तिला आराम करायला सांगून तो बाहेर निघून गेला. काव्या मात्र हरखून ते पाहत होती. अनुरागचं हे रूप तिला नवं होतं. इकडे अनुराग स्वयंपाकघरात शिरला होता. इथे येण्याची त्याची पहिलीच वेळ होती. चहा करायला भांडं सापडलं तर चहापूड सापडत नव्हती, साखर कुठे ठेवली आहे ते माहित नाही अशी गत झाली त्याची. नेहमी कामात व्यस्त असल्याने अश्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे कधी लक्षच गेलं नव्हतं. नेहमी एक विश्वास होता की काही लागलं तर काव्या आहे ना! पण आज तिची श्रम करायची अवस्था नाही तर आपण काहीतरी केलं पाहिजे, असं त्याला वाटत होतं. शेवटी बरेच प्रयत्न करून त्याने सगळं शोधलं. गॅसवर चहा उकळायला ठेवून तो काहीतरी खायला करण्याचा विचार करू लागला. पण करायचं म्हटलं तर यायला नको? शेवटी तिथल्याच डब्यातलं मॅगीचं पाकीट काढून त्याने मॅगी तयार केली आणि तो मॅगीचा बाऊल आणि चहाचा कप घेऊन बेडरूममध्ये आला. काव्या बसूनच झोपी गेली होती. हसतच त्याने काव्याला उठवलं व हे सर्व तिच्यासमोर ठेवलं. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित आनंदाचा सुखद धक्का स्पष्ट दिसत होता. 


"सॉरी अनि, तुला करावं लागलं ना सगळं?" 


पुढच्याच क्षणी पाणावल्या डोळ्यांनी काव्या म्हणाली. तिचे ओघळणारे अश्रू पुसत अनुराग तिच्याकडे पाहत म्हणाला, 


"काव्या, तू माझ्या स्वप्नांसाठी तुझी नोकरी सोडली आहेस हे मी कधीच विसरणार नाही राणी. अजूनही माझ्या कामाच्या वेळा पाळताना तुझी किती दमछाक होत असेल ते आज लक्षात आलं. नको एवढी दगदग करत जाऊ." 


"हं." 


काव्याने चहाचा एक घोट घेत हुंकार दिला. चहा अतिशय कडवट झाला होता. मात्र तिच्या चेहऱ्यावर आठीही उमटली नाही. त्याने एवढा मनापासून जो केला होता. 


"नीट नाही झालाय ना?" 

त्याने हसतच विचारलं. 


"नाही रे. छान झालाय." 


"खोटं बोलणं जमत नाही तुला काव्या. असू दे. सवयीने जमेल नीट." 


"सवयीने? तू सवयीने जेवणपण बनवणार आहेस आता?" 

काव्याने मस्करी करत विचारलं.

अनुरागने एवढं मनावर घेतलं असेल याची तिला कल्पना नव्हती. 


"हो. तू मला आवरायला, कामाच्या वस्तू आठवणीने घ्यायला रोज मदत करतेस. मला येत नाही काही, पण थोडी थोडी मदत मी नक्की करेन. आजपासून केर काढण्याचं आणि बेडरूम आवरण्याचं काम परत माझ्याकडे. जेवण मात्र फक्त शनिवार-रविवार हा." 


           त्याचं बोलणं ऐकताच काव्या खळखळून हसायला लागली. यापुढे कामं कशी दोघांनी मिळून करायची, हे तो तिला सांगत होता. तिच्या आजारपणामुळे तिच्याशिवाय आपलं काय होईल, याची जाणीव त्याच्या मनाला झाली होती. एकमेकांच्या डोळ्यांत एकमेकांबद्दलचं प्रेम अगदी ओसंडून वाहत होतं.


नातं तुझं आणि माझं, आहे जगावेगळं

परिपूर्ण नाही जरी, भले थोडं थोडं वेंधळं 


तरी सावराया तुला, मी कमी पडणार नाही 

माझ्या मनातलं प्रेम, कधीच विरणार नाही 


विश्वास अन् काळजीतून, पुन्हा बहरेल.. फुलेल 

प्रेमाच्या सिंचनाने अतूट नाते नव्याने जन्मेल


_______________________

समाप्त. 

© तनुजा प्रभुदेसाई

जिल्हा - रायगड - रत्नागिरी. 


(प्रिय वाचक,

कथामालिका छोटीशीच होती. मनात विषय आला आणि लिहिल्याशिवाय राहवलंच नाही. आवडली असेल कथा तर छोटीशी का असेना प्रतिक्रिया नक्की द्या. 

वाचत रहा..!)


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//