Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अतूट नाते.. भाग १

Read Later
अतूट नाते.. भाग १

कथा - अतूट नाते..

विषय - प्रेमकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

 

              अनुराग आणि काव्या. दोन वर्षांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेलं जोडपं. त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता. अर्थात घरच्यांची संमती मिळवूनच. अनुराग माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत नोकरीला होता तर काव्या सौंदर्यप्रसाधनं उत्पादन करणाऱ्या कंपनीत कामाला होती. मुंबईसारख्या महागड्या शहारात राहायचं म्हणजे गाठीशी पैसा हवाच. त्या दोघांनी पै पै साठवून एक चार खोल्यांचं घर घेतलं होतं. घर बांधून पूर्ण झाल्यावरच त्यांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर गणेशपूजन वगैरे करून ते त्या घरी राहायला आले होते. पहिले काही दिवस सर्व सुरळीत सुरु होतं. अनुराग आणि काव्या सकाळी लवकर उठून आपलं आवरून घ्यायचे आणि मग एकमेकांना मदत करून, डब्यासाठी काहीतरी बनवून ऑफिसला जायचे. काव्या जेवण बनवत असायची तेव्हा अनुराग केर काढणं, घर आवरणं अशी काम करून घ्यायचा. त्याला जेवण करायचा अनुभव नसल्यामुळे तो इतर कामं करायचा पण तेवढीच कामात मदत होत होती. अनुराग एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. हळूहळू त्याच्या कामाचा पसारा वाढत गेला आणि तो ऑफिसच्या कामात व्यस्त झाला. त्याच्या कामाच्या व्यापामुळे हळूहळू अनुरागचा घरकामातला सहभाग कमी होत गेला. 


“तिला काय! काही तासच तर काम करायचंय. कुठे जास्त डोकं लावायचंय? माझ्यासारखं बारा बारा तास काम नसतं तिला. घरी आल्यावर करेल की सगळं. स्वयंपाक, झाडून पुसून घ्यायला कितीसा वेळ लागतो तेव्हा?”


            ह्या विचाराने त्याच्या मनात घर केलं होतं. अनुरागला आता काव्याचं काम फार कमी वाटू लागलं होतं. तो काही मुद्दाम करत होता असं नव्हे पण त्याने तिला मदत करणं सोडून दिलं होतं पण त्यामुळे तिच्यावर कामाचा किती भार पडत असेल हा विचार सुद्धा त्याच्या मनालाही शिवला नव्हता. 

            एके दिवशी काव्याच्या सासूबाई, म्हणजे अनुरागची आई काही दिवसांसाठी त्यांच्या घरी राहायला आल्या. गावाकडचं घर सोडून इथे येणं म्हणजे त्यांच्या जीवावर यायचं. गावच्या घरावर त्यांचा खास जीव जडलेला त्यामुळे त्या असंच अधूनमधून कधीतरी येऊन जायच्या. त्यांना पहाटे चार वाजताच उठायची सवय होती. इथे आल्यावर दुसऱ्या दिवशी त्या पहाटे चार वाजता उठल्या आणि त्यांनी आपलं सगळं आवरलं. सोफ्यावर बसून त्या नामजप करत बसल्या होत्या. पाचचा ठोका वाजला आणि काव्या उठून बाहेर आली.


“गुडमॉर्निंग आई..”


          समोर जपमाळ घेऊन नामस्मरण करत बसलेल्या सासूबाईंना पाहून ती स्मितहास्य करत म्हणाली आणि ती आंघोळ उरकायला निघून गेली. आंघोळ झाल्यावर देवाची पूजा करून तिने चहा ठेवला. सासूबाईंच्या हातात चहाचा कप देऊन तिने उभ्या उभ्याच चहा घेतला. त्यानंतर तिची सकाळची कामे सुरू झाली. काव्या नाश्त्याची तयारी करू लागली. दूधवाल्याकडून दूध घेणं, दारात आलेलं वर्तमानपत्र उचलून टिपॉयवर ठेवणं, दुसऱ्या बाजूला डब्यासाठी काय न्यायचं त्याचा विचार ती करू लागली. ती एकटीच भराभर कामे उरकत होती. उठल्यापासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत होती. त्यात आज सासूबाई दुपारी घरी असणार म्हटल्यावर त्यांच्यासाठी तिला पूर्ण स्वयंपाक करायचा होता. एप्रनला हात पुसत काव्या बाहेर आली आणि तिने सासूबाईंना विचारलं, 


"आई, तुमच्यासाठी दुपारच्या जेवणात काय बनवू?"


तिचे प्रेमळ शब्द पाहून त्यांनाच वाईट वाटलं. 


“कशी पोरगी एकटी राबतेय! पण चेहरा मात्र सतत हसतमुख आहे.”


त्या स्वतःशीच पुटपुटल्या. 


“मला काही नको बाळा.. तुझी आधीच खूप गडबड असणार आहे. तू तुमचं तेवढं आवरून घे, मी दुपारी घेईन मला बनवून काहीतरी.”


एरव्ही तिने ते नाकारलं असतं. पण आज फारच गडबड झाली होती. 


"आई, मी भाकऱ्या बनवून ठेवल्याच आहेत. सोबत भरली वांगी केली आहेत. तुम्ही फक्त भात लावून घ्या आजच्या दिवस. उद्या थोडं लवकर उठून करेन." 


           सासूबाईंनी डोक्याला हात लावला. म्हणजे जवळजवळ सगळं तिने केलंच होतं. फक्त भात गरमागरम लावायचा राहिला होता. सात वाजता अनुराग उठून बाहेर आला. तो एवढा झोपेत होता की आईला 'शुभ प्रभात' म्हणायचंही त्याच्या लक्षात नाही राहिलं. काव्या स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हा सासूबाई काहीतरी शोधत होत्या. 


"काय हवंय आई?" 


"अग तो रेडिओ ठेवलेला ना इथे? तो कुठे गेला?" 


"ते अनुराग त्यादिवशी काहीतरी ऐकत होता त्यावर. म्हणून आत नेला होता त्याने. बसा तुम्ही मी घेऊन येते."


काव्याने आत जाऊन रेडिओ आणला आणि त्यांना आवडीचं स्टेशन लावून पण दिलं. 


अनुराग तयार होऊन आला आणि सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचू लागला. दहा मिनिटं झाली काव्या अजून आली नाही म्हणून त्याने स्वयंपाकघराकडे पाहिलं. सासूबाईंच्या नजरेतून हे ही सुटलं नव्हतं. 


"काय रे अन्या काय हवंय?" 


"अग आई, काव्या अजून आली नाही. तिला माहित आहे मला कॉफी लागते आंघोळ केल्यावर लगेच."


            अनुरागच्या बोलण्यात थोडासा कडवटपणा होता. काव्या लगेच न आलेली त्याला आवडलेलं दिसत नव्हतं. इतक्यात काव्या वाफळलेली कॉफी घेऊन बाहेर आली. कॉफी आणि पोह्यांची डिश तिने टिपॉयवर ठेवली. अनुरागाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. 


"सॉरी, ते आईंना चहा लागतो ना.. त्यामुळे चहा बनवला होता. कॉफीचं विसरले गडबडीत. घे तू. तोवर मी माझं आवरते."


गरज नसतानाही त्याला दहा मिनिटं झालेल्या उशिराचं कारण देऊन ती बेडरूममध्ये निघून गेली. पंधरा मिनिटांत तयार होऊन ती बाहेर आली. तोवर अनुराग निघून गेला होता. 


"अग असा काय हा? मला गडबड आहे सांगून निघून गेला. एकच आहे ना तुमच्या ऑफिसची वेळ? मग थांबला असता जरा तर काय बिघडलं असतं?"


 सासूबाई रागवल्या होत्या. 


"नाही आई, असूदे ओ. त्याची महत्वाची मीटिंग वगैरे असेल. नाहीतर तो कॉफीबद्दल पण एवढं पटकन बोलत नाही. मी कॅब बोलवते. तुम्ही काही लागलं तर मला कॉल करा हं." 


सासूबाईंचा निरोप घेऊन ती बाहेर पडली. दुपारी जेव्हा त्या भात ठेवायला स्वयंपाकघरात आल्या तेव्हा त्यांना अनोखं चित्र दिसलं. काव्याने गॅसवर वरणभाताचा कुकर आधीच चढवला होता.


“अरे ही तर कुकरसुद्धा लावून गेली. अच्छा, म्हणजे मघाशी ज्या कुकरच्या शिट्या झाल्या त्या याच होत्या तर मला वाटलं भाजी टाकली असेल आणि त्याच्याच शिट्ट्या होताहेत.”


             सासूबाईंना भरून आलं. या गधड्याला तिच्या कष्टांची कधी पर्वा असेल कोण जाणे या विचाराने त्या चांगल्याच अस्वस्थ झाल्या होत्या.


क्रमशः


© तनुजा प्रभुदेसाई.

जिल्हा - रायगड - रत्नागिरी.


(प्रिय वाचक,

छोटीशीच कथा आहे. आवडते का नक्की सांगा. ) 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//